हॅमिटिक भाषा समूह : प्रथम सेमिटिक आणि हॅमिटिक असे दोन भाषासमूह मानले गेले नंतर हॅमिटो-सेमिटिक भाषासमूह मानला गेला. त्यानंतरच्या संशोधनामुळे चित्र क्रमाक्रमाने बदलले. प्रथम सेमिटिक आणि हॅमिटिक (बर्बर, प्राचीन लिबियन, सहारन) अशा दोन शाखा मानल्या गेल्या. नंतर हॅमिटिक शाखेत बर्बर-लिबियन, उपशाखेखेरीज कुशिटिक, ईजिप्शियन, चॅडिक उपशाखा क्रमाने जोडल्या गेल्या. आज मात्र हॅमिटिक भाषासमूह कुणीच मानत नाही. त्याऐवजी दक्षिण-पश्चिम आशिया आणि उत्तर-पूर्व आफ्रिका अशा विस्तीर्ण भूप्रदेशात पसरलेला हॅमिटो-सेमिटिक भाषासमूह आणि त्याच्यात सेमिटिक, बर्बर-लिबियन, ईजिप्शियन, कुशिटिक आणि चॅडिक अशा पाच शाखा मानल्या जातात. हॅमिटो-सेमिटिक भाषासमूहाला सेमिटो-हॅमिटिक आणि आफ्रो-आशियाई अशीही पर्यायी नावे आहेत. त्यांपैकी आफ्रो-आशियाई हे नाव स्थिर होईल असे दिसते. पाच शाखांपैकी सेमिटिक शाखा ऐतिहासिक-भौगोलिक दृष्ट्या महत्त्वाची असल्याने तिची स्वतंत्र नोंद मराठी विश्वकोशात सेमिटिक भाषासमूह या शीर्षकाने अंतर्भूत आहे. उरलेल्या चार शाखांचा इथे विचार करायचा आहे. सेमिटिक भाषासमूहाप्रमाणे इतरही शाखांत प्राचीन, मध्य, नव्य अशा भाषापरिवर्तनाला धरून तीन अवस्था मानल्या जातात.

 

बर्बर-लिबियन शाखेत प्राचीन लिबियन, सहारन या उत्तर आफ्रिका आणि सहारा भागांत बोलल्या जात. मध्य ग्वानेहा कॅनरी द्वीपसमूहात बोलली जाई. नव्य बर्बर बोली मोरोक्को, अल्जीरिया, सहारा इ. प्रदेशांत विखुरल्या आहेत. ईजिप्शियन शाखेत ईजिप्शियन भाषेच्या प्राचीन, मध्य, नव्य अवस्था बोलल्या जात असत. त्यांपैकी कॉप्टिक भाषा – इ. स. १०० ते १७०० (मध्य), १७०० ते १९०० (नव्य )– आज व्यवहारात नाही पण ती ईजिप्तमधल्या मोनोफिझाइट ख्रिश्चन चर्चची धर्मभाषा म्हणून आजही वापरली जाते. कुशिटिक शाखेत नव्य सोमाली, गाल्ला इ. विविध बोली तांबड्या समुद्राच्या पश्चिम किनारा, दक्षिण-पूर्व इथिओपिया, सोमालिया, सोकोत्रा बेट, पूर्व केन्या या प्रदेशांत बोलल्या जातात. चॅडिक भाषेत चॅड सरोवराच्या पश्चिमेस आणि पश्चिमेस विखुरलेल्या प्रदेशात उत्तर नायजेरियातील हाउसा इ. विविधबोली बोलल्या जातात. बर्बर-लिबियन ११० लक्ष, कुशिटिक १६० लक्ष आणि चॅडिक २५० लक्ष लोक बोलतात. ईजिप्शियन शाखेतील भाषा आज बोलल्या जात नाही. सेमिटिक भाषा २० कोटी लोक बोलतात. एकूण आफ्रो-आशियाई भाषा २५ कोटी लोक बोलतात.

 

सेमिटिक आणि ईजिप्शियन भाषा सोडल्या, तर इतर आफ्रो–आशियाई भाषांचे विश्लेषण आणि तौलनिक अध्ययन पुरेसे खोलवर झालेले आढळत नाही. अरबी भाषेच्या आक्रमणामुळे इतर बऱ्याच बोली भाषा नामशेष किंवा अत्यल्पसंख्य झाल्या आहेत. ईजिप्शियन भाषा हायरोग्लिफिक, हायरेटिक आणि डेमॉटिक लिप्यांतून लिहिल्याजात. रोझेटाच्या त्रैभाषिक शिलालेखामुळे त्यांचे वाचन सुलभ झाले.हाउसा भाषा रोमनमध्ये लिहिली जाते. कॉप्टिक धर्मभाषा आपल्या ग्रीकसदृश कॉप्टिक लिपीत (चोवीस ग्रीक अक्षरे व सात डेमॉटिक) लिहिली जाते.

 

हॅमिटिक असा काही भाषासमूह नसल्यामुळे या सर्व बिगर-सेमिटिक आफ्रो-आशियाई भाषांची समान वर्णव्यवस्था, व्याकरण, शब्दसंग्रह या संबंधीची समान वैशिष्ट्ये फारशी सांगता येणार नाहीत. फार तर असे म्हणता येईल की, सेमिटिक भाषांच्या वैशिष्ट्यांशी कमी-अधिक जुळती किंवा समांतर वैशिष्ट्ये या उर्वरित चार शाखांमधून आढळतात.

 

आफ्रो-आशियाई भाषासमूहाची उगम भाषा सहारा प्रदेशात इ. स. पू. ८०००–५००० पर्यंत बोलली जात असावी आणि तिथून ती बोलणारे लोक उत्तर-पूर्व आफ्रिकेत आणि दक्षिण-पश्चिम आशियात क्रमाक्रमाने पसरले असावेत, असा एक तर्क आहे. हे होताना पुष्कळदा त्या त्या प्रदेशातल्या मूळच्या भाषा बोलणाऱ्यांनी आफ्रो-आशियाई भाषा स्वीकारल्या असेही झाले आहे. आफ्रो-आशियाई भाषा आणि इतर काही भाषासमूहांतील भाषा म्हणजे इंडो-यूरोपियन, अल्ताइक, फिनो-उग्रिक, कार्तवेलियन (जॉर्जियनसदृश) आणि द्राविडी यांच्यामधली काही लक्षणीय साम्ये लक्षात घेता त्यांचा एक महासमूह असावा, असा दुसरा तर्क आहे. अर्थात हा तर्क सिद्ध करणे अशक्यप्राय आहे.

केळकर, अशोक रा.