हॅरिसन, जॉन :(? मार्च १६९३–२४ मार्च १७७६). इंग्रज कालमापनविद्यावेत्ते. त्यांनी व्यवहारोपयोगी अचूक सागरी कालमापक प्रथम तयार केले. या कालमापकामुळे जहाजावरील मार्गनिर्देशकाला समुद्रातील ठिकाणाचे रेखावृत्त (रेखांश) आकडेमोड करून अचूकपणे काढता येऊ लागले. [→ कालमापक].

 

हॅरिसन यांचा जन्म फाउल्बी (यॉर्कशर, इंग्लंड) या गावी झाला.त्यांचे वडील घड्याळ दुरुस्ती व सुतारकाम करीत. जॉन वडिलांकडून घड्याळ दुरुस्तीचे काम शिकले शिवाय बिनचूक वेळ दाखविणारी घड्याळे (कालमापके) कशी बनवावीत याविषयीचे संशोधनही त्यांनी केले. तापमानातील बदलांमुळे घड्याळाच्या लंबकाची लांबी कमी-जास्त होऊन घड्याळ पुढे-मागे पडते. यावरील उपाय म्हणून त्यांनी १७२० मध्ये प्रतिपूरक लंबक तयार केला. या लंबकात पितळ व लोखंड यांच्या दोन समांतर पट्ट्या वापरल्या होत्या. पितळेच्या पट्ट्या वरच्या बाजूला तर लोखंडाच्या पट्ट्या खालील बाजूला पक्क्या बसविल्या होत्या. तापमानात बदल झाल्यावर एका धातूच्या पट्ट्यांचे प्रसरण वरच्या बाजूस व दुसऱ्या धातूच्या पट्ट्यांचे प्रसरण खालच्या बाजूस होते. दोन्ही धातूंचे प्रसरण विरुद्ध दिशांना अशा प्रकारे होते की, लंबकाचा गुरुत्वमध्य न हलता लंबकाची मूळ लांबी तेवढीच राहते.

 

समुद्रावर घडलेल्या अनेक आपत्तिजनक घटना वरवर पाहता खराब मार्गनिर्देशनामुळे घडल्या होत्या. म्हणून ब्रिटिश सरकारच्या बोर्ड ऑफ लाँजिट्यूड या मंडळाने एक विशिष्ट प्रकारचे कालमापक प्रथम तयार करणाऱ्या व्यक्तीला २० हजार पौंडांचे पारितोषिक देण्याचे जाहीर केले. सागरी प्रवासात बिनचूक वेळ दाखविणारे कालमापक आवश्यक असते. ब्रिटनपासून वेस्ट इंडीजपर्यंतच्या सु. सहा आठवड्यांच्या प्रवासात अशा कालमापकाच्या मदतीने आकडेमोड करून काढलेल्या रेखांशाच्या मूल्यात कमाल अर्ध्या अंशाचीच चूक राहणे अपेक्षित होते. हॅरिसन यांनी १७३५ मध्ये असे कालमापक तयार करून पारितोषिकासाठी सदर मंडळाकडे पाठविले. पुढील पंचवीस वर्षांच्या काळात त्यांनी अधिक लहान व अधिक अचूक अशी तीन कालमापके तयार केली. १७५९ मध्ये बनविलेले त्यांचे प्रसिद्ध ४ क्रमांकाचे कालमापक प्रत्यक्ष जहाजावर वापरण्यात आले. १८ नोव्हेंबर १७६१ ते २६ मार्च १७६२ या काळातील जमेकापर्यंतच्या दीर्घ प्रवासात या कालमापकाची चाचणी घेण्यात आली. या दीर्घ कालावधीत सदर कालमापक अवघे ५ सेकंद मागे पडल्याचे दिसून आले. अशा प्रकारे हॅरिसन यांच्या कालमापकाने बोर्ड ऑफ लाँजिट्यूडच्या सर्व अपेक्षित अटी पूर्ण केल्या. तथापि, १७६३ पर्यंत त्यांना सदर बोर्डाने कोणतीही रक्कम दिली नव्हती. नंतर त्यांना ५,००० पौंडांची रक्कम मिळाली आणि १७७३ मध्ये राजे तिसरे जॉर्ज यांनी मध्यस्थी केल्यानंतर त्यांना पूर्ण रक्कम देण्यात आली. या कालमापकात हॅरिसन यांनी आणखी एक प्रयुक्ती वापरली होती. या प्रयुक्तीमुळे कालमापकाला चावी देतानाही ते चालू राहत असे. कालमापकांच्या नंतरच्या उत्पादकांनी त्यांची ही एकच प्रयुक्ती आपल्या कालमापकांत टिकवून ठेवली होती.

 

हॅरिसन यांचे लंडन येथे निधन झाले.

 

 ठाकूर, अ. ना.