हॅमा : प्राचीन ग्रीक नाव एपिफानिया अरबी नाव हॅमाथ. पश्चिम मध्य सिरियातील याच नावाच्या प्रांताची राजधानी, व्यापारी केंद्र व सिरियातील पाचव्या क्रमांकाचे मोठे शहर. लोकसंख्या ८,५४,००० (२००९). हे ओराँटीस नदीकाठावर असून दमास्कसच्या ईशान्येस २१३ किमी. व आलेप्पोच्या नैर्ऋत्येस १५१ किमी.वर वसलेले आहे. शहरात बहुतांश सुन्नी मुसलमान असल्याने हे सिरियातील शिया-सुन्नी धार्मिक संघर्षाच्या दृष्टीने संवेदनशील शहर आहे.

 

या शहरास प्राचीन इतिहास असून येथे ताम्रयुग व लोहयुगापासून लोकवस्ती असल्याचे पुरावे मिळतात. इ. स. पू. २००० च्या सुमारास येथे हिटाइट संस्कृतीचे केंद्र होते. बायबल मध्येसुद्धा याचा वारंवार उल्लेख आलेला आहे. ॲसिरियन सम्राट तिसरा शॅल्मानीझर याने हे शहर इ. स. पू. ८३५ मध्ये जिंकले होते. नंतर अलेक्झांडर द ग्रेट यानेही हे शहर जिंकून त्याचा हेलेनिक साम्राज्यात समावेश केला. त्याच्या मृत्यूनंतर (इ. स. पू. ३२३) सिल्युसिडी राजांनी हॅमावर हक्क सांगितला आणि त्याचे एपिफानियाअसे नामकरण केले. कालांतराने हॅमा रोमनांच्या ताब्यात आल्यावर बायझंटिन साम्राज्यात त्याचा समावेश झाला. इ. स. ६३८ मध्ये हेअरबांनी हस्तगत केले. इ. स. ११८८ मध्ये सलाद्दीन याने हॅमा जिंकले. सलाद्दीननंतर या शहरावर मामलुक वंशाची सत्ता होती (१३०३–४३). सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात हॅमा शहर ऑटोमन साम्राज्याच्या आधिपत्याखाली होते. पहिल्या महायुद्धानंतर सिरियातील काही भागफ्रेंच अधिराज्य म्हणून घोषित करण्यात आला त्यात हॅमाचाही समावेश होता. १९४१ मध्ये हॅमाला स्वतंत्र सिरियाचा अविभाज्य भाग म्हणूनघोषित करण्यात आले. २०११ मध्ये सिरियातील जनतेने सत्तारूढबाथ सरकारने पायउतार व्हावे, यासाठी सशस्त्र संघर्ष उभारला होता.हॅमा हे या संघर्षाचे मुख्य केंद्र होते.

 

जलसिंचनयुक्त समृद्ध कृषिप्रदेशात असल्यामुळे हे कृषी बाजारपेठेचे मुख्य केंद्र आहे. येथे कापूस, गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी आणि मका इ. पिकांचे उत्पादन होते. तसेच येथे सुती, रेशमी आणि लोकरी कापड, सतरंजी, टॉवेल व मोठे अंगरखे आणि दुग्धजन्य पदार्थ यांच्या निर्मितीचे लघुउद्योग विकसित झाले आहेत. येथे सतरा मीटर व्यासाच्या काही प्रसिद्ध जुन्या (चौदावे शतक) लाकडी पाणचक्क्या असून त्यांच्याद्वारे ओराँटीस नदीतून शेतीसाठी पाणी आणले जात असे. सध्या या पाणचक्क्या पर्यटकांचे आकर्षण आहेत. हॅमा हे रस्ते व लोहमार्गांचे केंद्र असून येथे जवळच विमानतळ आहे.

 

अद्याप वापरात असलेली रोमन कालवा प्रणाली आणि नूरी येथील ख्रिश्चन बॅसिलिका, ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्च, अझीम राजवाडा आणि नूरअल् दीन मशीद ही येथील प्रेक्षणीय स्थळे आहेत.

कुंभारगावकर, य. रा.