हॅटशेपसूट : (इ. स. पू. ?–१४६९?). ईजिप्तमधील अठराव्या राजघराण्यातील एक महत्त्वाकांक्षी, कर्तृत्ववान राणी व नवसाम्राज्याचीचौथी स्त्री फेअरो. या घराण्याचा प्रारंभ पहिला थटमोझ या फेअरोपासून झाला. पहिला थटमोझ आणि त्याची पट्टराणी आमोस यांची हॅटशेपसूट ही कन्या. दुसरा थटमोझ हा तिचा सावत्र भाऊ. त्याच्याशीच तिचा विवाह झाला. दुसरा थटमोझ याच्या अकाली निधनानंतर (इ. स. पू. १४७९) हॅटशेपसूटचा सावत्र मुलगा–दुसऱ्या थटमोझचा इसिस या रखेलीपासून झालेला मुलगा–तिसरा थटमोझ गादीवर आला परंतु तो अज्ञान असल्यामुळे हॅटशेपसूटने त्याची पालक म्हणून राज्यकारभार पाहिला (इ. स. पू. १५०१–१४९६ आणि इ. स. पू. १४९३–१४८१). तिने आपला जन्म आमोस राणीच्या पोटीच, पण ॲमन दे वा पा सू न झाल्याचे सांगावयास सुरुवात केली आणि त्यासाठी ॲमन देवाच्या पुरोहितांचे सहकार्य मिळविले. त्यानंतर तिने आपल्या सावत्र मुलाबरोबर सहराज्य-कर्ती म्हणून राज्याभिषेक करून घेतला (इ. स. पू. १५०३). तिलाविरोध होऊ नये म्हणून तिने पुरुषी वेश धारण करून वावरण्यास सुरुवात केली आणि स्वतःचे पुतळेही तसेच बनविले. तिच्या अमलात राज्यात आर्थिक भरभराटीसह मोठी बांधकामेही झाली. तिने व्यापारास उत्तेजनदेऊन आफ्रिकेच्या ईशान्य किनाऱ्यापर्यंत मोहिमा काढल्या. तिने कारनॅक येथील ॲमनच्या मंदिराचा विस्तार केला आणि स्वतःची स्मृती जागृत रहावी म्हणून एक भव्य स्मृतिमंदिर बांधले. तेच नाईल नदीच्या पश्चिम किनाऱ्यावरील थीब्झजवळील विद्यमान डेर-एल्-बाहरी होय. त्याच्या भिंतीवर काही चित्रे आढळतात. तिने दोन सूर्यस्तंभ (ऑबेलिस्क) बांधले. तिसऱ्या थटमोझला राजपदाची अनेक वर्षे वाट पाहावी लागली. अखेर हॅटशेपसूट आणि तिच्या साहाय्यकांचा निकाल लावून तो गादीवर आला. पहिला आमेनहोतेप हा तिचा मुलगा होय.
सोसे, आतिश सुरेश
“