हळबी बोली : (हलबी बोली ). हळबा किंवा ? हलबा लोकांची बोली. ती मराठी, ओडिया व छत्तीसगढी यांच्या मिश्रणाने बनली आहे. हळबी बोलीचा अंतर्भाव मात्र मराठीच्या प्रमुख बोलींमध्ये केला जातो. महाराष्ट्रातील चंद्रपूर (चांदा), गोंदिया, भंडारा, अचलपूरचा (एलिचपूरचा) टापू मध्य प्रदेशातील बस्तर, कांकेर, रायपूर तसेच छत्तीसगढ, आंध्र प्रदेश, ओडिशा या भागांत ती प्रचलित आहे. तिच्या भौगोलिक स्थानामुळे वर्‍हाडी-नागपुरीप्रमाणे तिच्यावर शब्दांच्या संदर्भात छत्तीसगढी हिंदीचा व ओडियाचा पगडा अधिक आहे. असे असले, तरी एकूण प्रत्ययप्रक्रिया मराठी धर्तीची आहे. व्याकरणदृष्ट्या विचार केल्यास हळबीला हिंदीची बोली असे न म्हणता मराठीची बोली म्हणावी लागते, असा भाषाशास्त्रज्ञांचा कल आहे. त्याबद्दल मतभेदाला वाव मिळावा,असे तिचे स्वरूप आहे.

 

हळबी बोलणारे लोक हे मूळचे अनार्य असावेत. कोणत्यातरी कारणाने त्यांनी आर्यसंस्कृतीचा व आर्यभाषांचा स्वीकार केला असावा. अहिराणी, गोंडी यांच्या संदर्भातही अशीच स्थिती दिसते. प्रमाण मराठीपेक्षा त्यांचे शब्द, उच्चार-प्रक्रिया व व्याकरणिक रूपसिद्धी यांमध्ये येणारा फरक हा त्यांच्या मूळ भाषेतून किंवा मूळ भाषा व मराठी यांच्या संमिश्रणातूनआलेला असावा.

 

उच्चारप्रक्रिया : (१) हळबीत ‘अ’ चा ‘ओ’ आणि ‘ऐ’ चा ‘ उइ’ होतो. उदा., बोल – बोलो बैला – बुइला मै – मुइ. (२) ‘च’ वर्गीय च् , छ् , ज् या व्यंजनांचे मराठीप्रमाणे दंतमूलीय उच्चार न होता संस्कृत-प्रमाणे तालव्य उच्चार करण्याकडे प्रवृत्ती आहे. उदा., जानने, छोडवने, माझा (मोचो ). (३) ‘व’ चा ‘ब’ आणि ‘ण’ चा ‘न’ होतो. वन( बन), वीस (बीस), आपण (आपन), पाणी (पानी ). (४) ‘ड्’ व ‘ळ’ यांचा ‘र्’ होतो. उदा., कपडा (कपरा), वेळा (बेरा ).

 

व्याकरणिक प्रक्रिया : (१) हिंदीप्रमाणे दोनच लिंगे असतात. पुल्लिंग व स्त्रीलिंग. (२) वचने दोन : कधी एकवचनाच्या रूपाला ‘मन’ हा प्रत्यय लावून अनेकवचन होते. उदा., बाबा/बाप (बाबामन), ते (हूनमन), आम्ही (हममन ) कधी अनेक दर्शक शब्द घेऊन अनेकवचन होते. उदा., घोडे (खुबे घोडा), सर्व नोकरांना (सबोके नोकर ). यामधील त –’ तो’ चे (अनेकवचन) योजलेला ‘हून’ कोणत्या भाषेतला आहे, याचा शोध घेण्याची गरज काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. (३) विशेष्याच्या लिंगवचनानुसार विशेषणे बदलत नाहीत. (४) विभक्तिप्रत्यय लागण्यापूर्वी नामांचे सामान्यरूप होत नाही.

 

हळबीचे विभक्तिप्रत्यय पुढीलप्रमाणे :

 

प्रथमा – प्रत्यय नाही. मूळ रूपच येते व्दितीया – चतुर्थी – क तृतीया–प्रत्यय नाही पंचमी – ले, लगे, लले षष्ठी – चों, के सप्तमी – में, ने. ‘ ने’ हा प्रत्यय हळबीत तृतीयेचा नसून सप्तमीचा आहे. हळबीची सर्वनामरूपे वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

 

 

मी

तू

विभक्ती

एकवचन

अनेकवचन

एकवचन

अनेकवचन

प्रथमा

मुइ, मइ, मे

आमी, हममन

तुई, तइ, तू

तुमी, तुम

द्वितीया-चतुर्थी

मोके, मके

 

तुके

 

षष्ठी

मोचो, माचो

अमचो, आमर

तचो, तोर

तुमचो, तुमर

 

आख्यात व्यवस्था :

(१) क्रियापदाची रूपे लिंगाप्रमाणे बदलत नाहीत. ही पद्धती संस्कृत क्रियापदानुसार आहे.

(२) क्रियापदानंतर पादपुरणार्थ ‘ना’ जोडण्याची प्रथा. उदा., तुचो नाव काय आहे ना जान ना.आख्यातेपुरुष

 

आख्याते

पुरुष

एकवचन

अनेकवचन

प्रथम पुरुष

आसे

आसू

द्वितीय पुरुष

आसील

आसास

तृतीय पुरुष

आसे

आसत

भूतकाळ : राहाणे – मराठीप्रमाणे ‘ल’ प्रत्ययान्त रूपे

पुरुष

एकवचन

अनेकवचन

प्रथम पुरुष

रले, रली

रले, रला, रलो

द्वितीय पुरुष

रला, रले, रली

रलास, रले

तृतीय पुरुष

रलो, रले, रली, रला

रले, रला, रली, रलो

 

 आगम करूनही भूतकाळ साधला जातो. उदा., मई करबेसे ( मी केले आहे ). माके मारबा असत (मला मारले).

 

भविष्यकाळ :

(१) ‘दे’ हा प्रत्यय लागून भविष्यकाळाची रूपे साधली जातात. उदा., मई मारेन्दे (मारू देईन).

(२) कधी ‘से’ प्रत्ययानेही ती साधली जातात. उदा., मई करू से (मी करीन). यांपैकी भविष्यकाळाचा ‘दे’ प्रत्यय कुठल्या भाषेतून आला ह्याचाही शोध घेण्यात यावा, असे काही तज्ज्ञांचे मत आहे.

 

आज्ञार्थ :

(१) प्रत्ययरहित मूळ धातुरूप योजून ही पद्धती पुष्कळशी आर्य-भाषेमध्ये आहे. उदा., बस, राखा, देख.

(२) कधीकधी ‘आस’ हा प्रत्यय लागून आज्ञार्थी रूप होते. उदा., आनास, दिवास.

 

हळबीसाठी वापरात असलेल्या देवनागरी व ओडिया या लिपींपेक्षा भाषाभ्यासक विक्रम सोनी यांनी शोधलेली हळबी लिपी अधिक सोपी आहे, असे मत आर्. ए. सिंग यांनी आपल्या सर्व्हे ऑफ हळबी इन मध्य प्रदेश (१९७७) या ग्रंथात व्यक्त केले आहे.

  

गोविलकर, लीला