हळदीघाटाची लढाई : मोगल सम्राट अकबर व मेवाडचा महाराणा प्रताप यांमध्ये झालेली निकराची लढाई. अकबराला राजस्थानात वर्चस्व प्रस्थापिण्यासाठी राणाप्रताप (कार. १५७२–९७) हा मोठा अडसर होता कारण त्याची राजधानी चितोड शत्रूच्या हातात गेली होती.त्यामुळे त्याने आपल्या प्रजेसह आपले वास्तव्य अकबराच्या सैन्याच्या दृष्टिक्षेपापासून दूर अरवली पर्वताच्या डोंगराळ भागात केले होते. तेथेत्याने काही भागांत शेती केली आणि मेवाडचा प्रदेश ओसाड करूनटाकला व आपली राजधानी गोगुंड येथे नेली. त्याने सैन्याला उत्तमप्रशिक्षण देऊन गनिमी युद्धतंत्राची कला अवगत केली. उदयपूर व कुंभालगढ यांवर आधिपत्य मिळविले. अकबराने त्याच्यावर स्वामित्व प्रस्थापित करण्यासाठी मानसिंह व आसफखान यांच्याबरोबर मोठी सेना देऊन पाठविले. पश्चिम मेवाडात उतरण्यासाठी हळदीघाटातील खिंड हाच सोयीस्कर मार्ग होता.
या खिंडीचा विस्तार सु. दोन किमी.चा होता आणि या डोंगराचा रंग पिवळसर असल्यामुळे त्यास हळदी डोंगर म्हणत. मोगलांचे सैन्य मंगलगढ ओलांडून त्याच्या गोगुंड राजधानीकडे येण्याच्या बेतात असताना राणाप्रतापने त्यांना हळदीघाटच्या खिंडीत गाठले. २१ जून १५७६ रोजी तेथे घनघोर युद्ध झाले. राणाप्रतापकडे तीन हजार घोडेस्वार (घोडदळ) होते. त्याने त्याचे दोन भाग करून एक तुकडी हकीमखान सूर याच्या नेतृत्वाखाली आघाडीस पाठविली. मोगलांची डावी फळी राय लोण करणकडे होती. बदाऊनी हा या युद्धात मोगल सैन्यात असून तो बेछूटपणे बाण सोडीत होता. खिंडीच्या तोंडाशी स्वतः राणाप्रताप दुसऱ्या घोडदळ तुकडीचे नेतृत्व करीत होता तोफखाना व उंटदल असलेल्या बलाढ्य मोगल सैन्यापुढे राजपुतांचा टिकाव लागला नाही पण राणाप्रताप तेथून कोलायटी येथे निघून गेला आणि राजस्थानच्या दऱ्याखोऱ्यांतून त्याने मोगलांशी गनिमी काव्याने संघर्ष चालू ठेवला. कर्नल टॉडने या लढाईचे वर्णन ‘मेवाडची थर्मॅापिली’ असे केले आहे.
कुलकर्णी, गो. त्र्यं.
“