हळदी : या पक्ष्याची पीलक, कांचन व सुवर्ण मंजू ही देखील नावे आहेत. याचा समावेश पॅसेरिफॉर्मिस गणातील ओरिओलिडी या पक्षिकुलात केला जातो. याच्या ओरिओलस प्रजातीतील सु. ३० जाती यूरोप, आफ्रिका, आशिया व ऑस्ट्रेलिया या खंडांत आढळून येतात. भारतात आढळणाऱ्या हळदी पक्ष्याचे शास्त्रीय नाव ओ. कुंडू असे आहे. तो आसाम वगळता भारतात सर्वत्र आणि हिमालयात सस.पासून सु. १,५२५ मी. उंचीपर्यंत आढळतो.

हळदी (ओरिओलस कुंडू) : (अ) नर, (आ) मादी.

हळदी पक्ष्याचा आकार साळुंकी एवढा असतो. नराच्या शरीराचा रंग सोनेरी पिवळा असून पंखांचा बराच भाग व शेपटीचा मधला भाग काळा असतो. नराच्या शरीराचा ज्या ठिकाणी पिवळा रंग असतो त्या ठिकाणी मादीचा हिरवट-पिवळा आणि ज्या ठिकाणी काळा असतो त्या ठिकाणी तपकिरी रंग असतो. डोळे किरमिजी चोच गुलाबी, अणकुचीदार व मजबूत असते. चोचीच्या बुडापासून एक काळा पट्टा निघून तो डोळ्यामधून मागे जातो. पाय काळसर रंगाचे असून पायाच्या एकूण चार बोटांपैकीतीन बोटे पुढील बाजूस व एक मागे वळलेले असते. त्यामुळे त्याला फांदी घट्ट धरून ठेवण्यास मदत होते. तो वड, पिंपळ, उंबर आणि इतर झाडांची फळे व किडे खातो. तसेच फुलातील मध देखील पितो. त्याचा आवाज मोठा, परंतु मंजूळ असतो. एक प्रकारच्या ‘पीलोलोऽऽ’ अशा कोमल आवाजात तो शीळ घालतो.

हळदी पक्षी वृक्षवासी असून तो दाट पाने असलेल्या झाडांवर राहतो लाजाळू असल्याने पानांच्या दाटीत तो लपलेला असतो. तो सहसाजमिनीवर उतरत नाही. तो वेगाने उडू शकतो, परंतु सामान्यतः एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडून जातो. प्रजनन काळात क्वचितच तोलांब अंतरापर्यंत उडत जातो. मादी बारीक गवत व झाडांच्या सालीचे मजबूत तंतू विणून सुंदर वाटीसारखे घरटे बनविते. ते झाडावर जमिनीपासून ४–१० मी. उंचीवर एका आडव्या फांदीच्या टोकावरील दुबेळक्यात टांगलेले असते. कोतवाल पक्षी ज्या झाडावर घरटे बांधतो, त्याच झाडावर हळदी पक्षी पुष्कळदा घरटे बांधतो. त्यामुळे त्यांना आपोआपच कोतवाल पक्ष्याकडून संरक्षण मिळते. याची वीण एप्रिलपासून जुलैपर्यंत होते. मादी घरट्यात ३-४ पांढऱ्या रंगाची अंडी घालते. अंड्यांवर काळ्या रंगाचे लहानलहान ठिपके असतात. अंडी उबविणे व पिलांना भरविणे ही कामेनर व मादी दोघेही करतात. चकाकणारा सोनेरी पिसारा आल्यानंतरच नर पिले व मादी पिले यांच्यातील फरक लक्षात येतो.

आणखी एक ओ. लार्व्हाटस जातीचा हळदी पक्षी भारतात सर्वत्र आढळतो. त्याचा आकार व रंग वर वर्णन केलेल्या हळदी पक्ष्याप्रमाणेच असतो; परंतु डोके, गळा व छातीचा वरचा भाग काळा कुळकुळीत असतो. या पक्ष्याला काळ्या डोक्याचा किंवा टोपीवाला हळदी म्हणतात. (चित्रपत्र).

कर्वे, ज. नी.; वाघ, नितिन भरत

हळदी (ओरिओलस कुंडू) हळदी (ओरिओलस लारव्हॅटस)