मेहदी हसनहसन, मेहदी :(१८ जुलै १९२७ –१३ जून २०१२). एक श्रेष्ठ पाकिस्तानी गझल गायक. त्यांचे मूळ नाव मेहदी हसन खान. त्यांचा जन्म राजस्थानातील लूना (झुनझुन जिल्हा) या गावी सां गी ति क परंपरा असणाऱ्या घराण्यात झाला. त्यांचे वडील उस्ताद अझीम खान आणि चुलते उस्ताद ईस्माईल खानहे पारंपरिक ध्रुपद गायक होते. त्यांच्याकडेच मेहदींनी ध्रुपद व ख्याल गायकीचे प्रारंभीचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले. मेहदी हसन यांची पिढी ही या कलावंत घराण्याची संगीतसाधना करणारी सोळावी पिढी होय. प्रारंभीच्या काळात ⇨ बडे गुलामअलीखाँ, ⇨ अब्दुल करीमखाँ, ⇨ फैयाझखाँ आणि पंडित ओंकारनाथ ठाकूर यांच्या गायकीचे संस्कार त्यांच्यावर झाले. त्यांनी आपली पहिली मैफल १९३५ मध्ये फाळणीपूर्व पंजाबातील ‘ फजिल्का बंगला’ येथे आपल्या मोठ्या भावासोबत गाजविली.

 

भारत-पाकिस्तान फाळणीनंतर (१९४७) त्यांच्या कुटुंबाने पाकिस्तानात स्थलांतर केले. तिथे त्यांनी चरितार्थासाठी सुरुवातीस किरकोळ नोकऱ्या केल्या पण आपल्या संगीतसाधनेत खंड पडूदिला नाही. पाकिस्तान नभोवाणीवर ठुमरी गायनाची संधी त्यांना प्रथम १९५७ मध्ये मिळाली. त्यातूनच पुढे आकाशवाणीवर गझल गायक म्हणून त्यांना अल्पावधीत लोकप्रियता मिळाली. उर्दू कविता, रुबाया, गझल यांचे त्यांना अतोनात वेड होते.

 

ससुराल या चित्रपटासाठी त्यांनी ‘जिसने मेरे दिलको दर्द दिया’ हे गझलनुमा गीत गायिले (१९६२) आणि पाकिस्तानी चित्रपटसृष्टीत पार्श्वगायक म्हणून ते प्रविष्ट झाले. त्यानंतर एक रात अंगारे, अझमत, फिरंगी, सैक्रा, झर्का, मेरी जिंदगी है नगमा, नया रास्ता, शराफत, झीनत शबाना, आइना इ. चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले.

 

पारंपरिक ठुमरीसदृश शैलीत सुरुवातीस गझला गायिल्या जात व त्यांच्या चाली साधारणपणे खमाज, पिलू, देस अशा रागांमध्ये रूढ चौकटीत बांधल्या जात. गझलेचा मूड, भाव महत्त्वाचा ठरवून, व्याकरणजडत्वाला थोडे गौणत्व देऊन मेहदी हसन यांनी ही चौकट मोडून आपली स्वतंत्र सुगमशैली निर्माण केली. भावानुरूप रागांची निवड करून ध्रुपद गायकी, ख्याल गायकी व राजस्थानी लोकसंगीत यांच्या समन्वयातून निर्माण झालेल्या त्यांच्या गझल गायकीने जगभरचे रसिक धुंदावले. पाच दशकांच्या या सुरेल प्रवासातली त्यांची पहिली गझल ‘ गुलोमें रंग भरे बादे नौबहार चले ‘ ही होती. १९६२–८० या काळात त्यांनी गझल गायकी सर्वोच्च पातळीवर नेली. या काळात देश-विदेशांत त्यांनी कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक दौरे केले. भारतातही त्यांचा चाहता रसिकवर्ग मोठा होता.

 

१९७८ मधील भारताच्या दौऱ्यात मेहदी हसन यांनी मुंबई, पुणे, दिल्ली, जयपूर आदी शहरांतून गझल गायनाचे कार्यक्रम केले. या कार्यक्रमांत त्यांनी ‘रजीशही सही’ (यमन), ‘बात करनी मुझे मुष्किल’ (पहाडी), ‘दिल में अब यूं’ (बागेश्री), ‘जो चाहते है’ (नटभैरव), ‘आये कुछ अब्र’ (बिलावल), ‘नावक अंदाज जिधर’ (झिंझोटी), ‘आगे बढे न किस्सा’ (खमाज), ‘कैसे छुपाऊँ राज’ (मिश्र मालकंस-पिलू), ‘पत्ता पत्ता बुटा बुटा’ (शिवरंजनी), तसेच ठुमरीच्या अंगाने गायलेली ‘अब के हम बिछडे’ या गझला प्राधान्याने सादर केल्या. त्यांच्या गझल गायनात मुख्यत्वे फैज अहमद फैज, मीर ताकी मीर, हाजी हस्रत मोहानी, सलीम गिलानी सफी तबस्सुम, जफर, मोमीन यांच्या गझला असत.

 

उर्दू, बंगाली, पंजाबी, फार्सी अशा अनेक भाषांमध्ये त्यांनी गायनकेले. एच्. एम्. व्ही. कंपनीने सरहदें या ध्वनिमुद्रिकेची (अल्बम) निर्मिती केली (२०१०). तीत भारतरत्न लता मंगेशकर व मेहदी हसन यांनी ‘तेरा मिलना’ हे द्वंद्वगीत गायिले आहे. फरहत शाहजाद यांच्या या गीताला स्वतः मेहदींनी स्वरसाज चढविला होता. हेच द्वंद्वगीत त्यांनी मलिका-ए–तरन्नुम नूरजहाँ यांच्या सोबतही गायिले होते.

 

मेहदी हसन यांना अनेक मानसन्मान लाभले. त्यांपैकी भारत सरकारचा के. एल्. सैगल संगीत शहेनशाह सन्मान (१९७९), नेपाळ सरकारचा गोरखा दक्षिणा बहुसन्मान (१९८३), पाकिस्तान सरकारचा प्राइड ऑफ परफॉर्मन्स, हिलाल – ए– इम्तियाझ सन्मान, तमघा-ए-इम्तियाझ सन्मानआणि प्रतिष्ठेचा निशान – ए– इम्तियाझ सन्मान हे महत्त्वाचे होत. यांशिवाय पार्श्वगायक म्हणून त्यांना पाकिस्तानी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट निगार पुरस्कार चित्रपटनिहाय सु. नऊ वेळा लाभले.

 

परवेझ मेहदी, तल्त अझीझ, गुलाम अब्बास, सलामत अली, अफजल, मुन्नी सुभानी हे त्यांचे पट्टशिष्य होत. त्यांना एकूण चौदा अपत्ये झाली. त्यांपैकी तारीक– अष्टपैलू पार्श्वगायक आरीफ व इम्रान – शास्त्रीय तबला-वादक आसीफ व कामरान – पार्श्वगायक व गझलगायक आणि फैजान –गझलगायक होत.

 

कराची येथे त्यांचे निधन झाले.

खाडिलकर, मंगला