हवा ब्रश : संपीडित (दाब दिलेल्या) वेगवान हवेमार्फत रंगलेप, लेपन, संरक्षक लेप किंवा द्रवरूप रंग (शाई, रंजक इ.) यांचा सूक्ष्म थेंबांचा फवारा निर्माण करणाऱ्या लहान साधनाला हवा ब्रश म्हणतात. पुष्कळ वेळा हवा ब्रशचा आकार पेन्सिलीप्रमाणे असतो. वाणिज्य कलेतील रेखाचित्रांमध्ये इष्ट छटा निर्माण करण्यासाठी किंवा नवीन छटा निर्माण करून छायाचित्र निर्दोष करण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी तसेच वस्तूला किंवा वास्तूला रंग देण्यासाठी वा लेपन करण्यासाठी हवा ब्रश वापरतात.

 

हवेवर दाब दिला असता तिच्यात शक्ती साठते. हवेत साठविलेली ही शक्ती हत्यारे चालविण्यासाठी वापरतात. अशा हत्यारांना वातचलित किंवा वायवीय (न्यूमॅटिक) हत्यारे म्हणतात. एका संपीडकात (पोलादी बंद टाकीत) हवेवर ठराविक दाब देतात. हा दाब देण्यासाठी इंधनावर चालणारे एखादे एंजिन अथवा विद्युत् चलित्र (मोटर) वापरतात. नंतर अशी दाब दिलेली हवा लवचिक नळीमार्फत हत्याराला पुरवितात आणि तिच्यात साठविलेल्या शक्तीचा उपयोग हत्यार चालविण्यासाठी होतो. अशा हत्याराचे कार्य जलद व सुलभपणे होते. शिवाय त्याच्या देखभालीसाठी फारसा खर्च येत नाही. हवा ब्रश हे अशाच प्रकारचे लहान हत्यार आहे.

 

हवा ब्रश : (१) झडप, (२) संपीडित हवेसाठीची नळी, (३) रंग भरलेले पात्र.

हवा ब्रशात द्रवाचे नियंत्रित रीतीने असंख्य सूक्ष्म थेंबांत परिवर्तन करण्यासाठी संपीडित हवा वापरतात. द्रवाचा बारीक प्रवाह किंवा पातळ पटल संपीडित हवेने ताणले जाते. तेव्हा ते भंग पावून असंख्य सूक्ष्म थेंब निर्माण होतात. अशा सूक्ष्म थेंबांचा फवारा निर्माण करण्यासाठी प्रोथासारखी (तोटीसारखी) प्रयुक्ती वापरतात. हवा ब्रश किंवा हवाई कुंचला या साधनांचा हा प्रोथ सर्वांत महत्त्वाचा भाग असतो. जलदपणे वाहणारी (संपीडित) हवा नळीच्या संकुचित भागातून जाताना तेथील दाब कमी होतो आणि वातावरणाएवढा दाब असलेल्या व उपकरणाला जोडलेल्या पायामधील साठ्यातून रंगलेप वा लेपन ओढून वा शोषून घेतले जाते. हवेच्या उच्च वेगामुळे यापासून सूक्ष्म थेंबांचा फवारा निर्माण होतो. नंतर हा रंगलेप कागद वा इतर पृष्ठभागावर लावतात. अशा रीतीने रेखाचित्रे, ठसे व छायाचित्रे रंगविण्यासाठी, त्यांच्यावर इष्ट छटा निर्माण करण्यासाठी, उठाव स्पष्ट करण्यासाठी किंवा इष्ट पार्श्वभूमी तयार करण्यासाठी हवा ब्रश वापरतात.

 

अधिक गुंतागुंत असलेला हवाई कुंचला मुळात हवा ब्रशपासून विकसित झाला असून तो कमी कौशल्य व कमी नाजूक कामांसाठी वापरतात. तसेच वापरणे, जुळविणे व स्वच्छ करणे याबाबतींत साधे हवाई कुंचले असतात. लॅकरे, रंगलेप, व्हार्निशे, शेलॅक व उत्पादित वस्तूंवर अखेरीस लावावयाची इतर द्रव्ये हवाई कुंचल्यांनी लावतात. काही हवा ब्रशांत १.३८ बार, तर इतरांत ०.२–२.४ बार दाब वापर-तात (१ बार =१.०१९८ किग्रॅ./सेंमी.२). स्वयंचलित वाहनांच्या रंगकामासाठी अधिक मोठे हवाई कुंचले वापरतात. त्यामुळे विद्रावक (विरघळविणारा पदार्थ) कमी असलेल्या अधिक दाट रंगलेपाचा पुरेशा सूक्ष्म थेंबांचा फवारा निर्माण होऊ शकतो. त्यांच्यामुळे अधिक व्यापक क्षेत्रावर रंगलेपाचा अधिक जाड थर जलदपणे देणे शक्य होते. फर्निचर, उपकरणे इत्यादींवरील अंतिम संस्करणासाठी हवाई कुंचले वापरतात.

 

ॲक्रिलिक रंगलेप (लेपन) वापरणाऱ्या लहान हवा ब्रशांच्याही बाबतीत रंगाऱ्याने या वेळी निर्माण होणाऱ्या सूक्ष्म थेंबांच्या फवाऱ्यात श्वास न घेण्याची दक्षता घ्यायला हवी. कारण हा अपायकारक सूक्ष्मकणी रंगलेप काही मिनिटे हवेत तरंगत राहतो आणि तो फुप्फुसांत आतपर्यंत जाऊ शकतो. स्वयंचलित वाहने रंगविण्याच्या हवाई कुंचल्यांच्या बाबतीत रंगाऱ्याच्या श्वसनासाठी स्वच्छ हवेचा जीवनरक्षक स्रोत असणे आवश्यक असते.

 

पहा : वातचलित हत्यारे.

ठाकूर, अ. ना.