हरिमोतकाचे प्रकार : (अ) स्कंभोतक (आ) विरलोतक.हरिमोतक : (क्लोरेनकायमा). वनस्पतींत सामान्यपणे आढळणाऱ्या मूलभूत, साध्या, सापेक्षतः पातळ भित्ती असलेल्या व सजीव कोशिकांच्या ऊतकांना (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहांना) ⇨ मृदूतक म्हणतात. मृदूतकाच्या ज्या कोशिकांत हरितकणू असतात त्यांना हरिमोतक ही संज्ञा वापरतात. पानांच्या अपित्वचेच्या (बाह्यत्वचेच्या) आतील बाजूस असलेल्या तसेच कोवळ्या खोडाच्या मध्यत्वचेच्या बाहेरच्या थरात असलेल्या कोशिकांमुळे ⇨ मध्योतकतयार होते. मध्योतकातील कोशिकांची उत्पत्ती, रचना, स्वरूप वगैरे मृदूतका-प्रमाणेच असते. हरितकणूंमुळे ⇨ प्रकाशसंश्लेषणाचे आणि तात्पुरत्या अन्नसंग्रहाचे कार्य मृदूतकात व मध्योतकात चालू असते. या ऊतकांमुळेच वनस्पतीचे काही अवयव हिरवे दिसतात (उदा., कित्येक उपपर्णे,शल्कपर्णे, प्रताने, पाने, कोवळी फळे, अपवादात्मक मुळे इत्यादी).

द्विदल वनस्पतींमध्ये स्कंभोतक आणि विरलोतक अशा दोन प्रकारच्या मृदूतक कोशिका असतात. या दोन्ही प्रकारच्या कोशिकांतील हरितकणू प्रकाशसंश्लेषणाचे कार्य करतात.

स्कंभोतक : या स्तंभाकार ऊतकाची मांडणी पानाच्या वरील भागावर काटकोनात झालेली असते. यांमध्ये अंतराकोशिकी अवकाश मांडणी कमी जागेत व दाटीवाटीने असते. यातील स्कंभोतकाची रचना सरळ सूर्यकिरण मिळेल अशा प्रकारे असते.

विरलोतक : या कोशिका खंडयुक्त, गोल किंवा अनियमित आकारांच्या असतात. या ऊतकातील अंतराकोशिकी अवकाश मांडणी जास्त जागेतव सैलसर असते. या कोशिका विशेषेकरून पानांत आणि इतर वायवी भागांत अशा प्रकारे असतात की, सौम्य सूर्यकिरणे पोहोचतील. बहुधा पानांमध्ये विरलोतक खालील अपित्वचेजवळ असतो.

मगर, सुरेखा अ.