हरारे : पूर्वीचे सॉल्झबरी. झिंबाब्वेची राजधानी तसेच देशातील सर्वांत मोठे व्यापारी व औद्योगिक शहर. लोकसंख्या २१,२३,१३२ (२०१२ अंदाज). हे देशाच्या ईशान्य भागात सस.पासून सु. १,४८३ मी. उंचीवर वसलेले असून उपनगरांसह याचा विस्तार सु. ५५९ चौ. किमी. क्षेत्रात आहे. शहराची नियोजनबद्ध रचना, दुतर्फा झाडी असलेले रुंद रस्ते, समशीतोष्ण व आल्हाददायक हवामान यांसाठी हे शहर प्रसिद्ध आहे.

ब्रिटिश साउथ आफ्रिका कंपनीने मॅशोनालँडच्या मोहिमेवर असताना येथील स्थानिकांच्या वसाहतींचा ताबा घेऊन तेथे पहिला तळ उभारला व त्या जागी १८९० मध्ये या शहराची स्थापना केली. या वसाहतीस त्यांनी लॉर्ड सॉल्झबरी असे नाव दिले. सांप्रतच्या शहराचा ईशान्य भाग हा या मूळच्या वसाहतीचा भाग म्हणून ओळखला जातो. स्थानिक शोन लोक त्यांच्या नेहरावे या प्रमुखाच्या नावावरून या मूळ वसाहतीस हरारेअसे म्हणत. १८९७ मध्ये येथे नगरपालिकेची स्थापना करण्यात आली. १८९९ मध्ये याच्या परिसरातील खनिज उत्पादनांच्या वाहतुकीसाठी मोझँबीकमधून येथपर्यंत लोहमार्ग काढण्यात आला. तेव्हापासून एकबाजारपेठ म्हणून या शहराचा विकास झपाट्याने होऊ लागला. १९२३ मध्ये दक्षिण र्‍होडेशियाच्या नवनिर्मित स्वतंत्र ब्रिटिश कॉलनीचे सॉल्झबरी हे राजधानीचे ठिकाण करण्यात आले. पुढे १९३५ मध्ये त्याला शहराचा दर्जा देण्यात आला. १९८० मध्ये ब्रिटिश कॉलनीला पूर्ण स्वातंत्र्य मिळून तिचे स्वतंत्र झिंबाब्वे प्रजासत्ताकात रूपांतर झाले व या प्रजासत्ताकाची सॉल्झबरी हीच राजधानी ठेवण्यात आली. १९८२ मध्ये शहराचे नाव बदलून हरारे असे करण्यात आले.

हरारे हे झिंबाब्वेतील निर्मिती उद्योगांचे तसेच रस्ते व लोहमार्गांचे प्रमुख केंद्र असून शहराजवळच आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. शहराच्या सभोवतालच्या सुपीक प्रदेशातून मका, तंबाखू (विशेषतः व्हर्जिनियाटोबॅको), कापूस, लिंबूवर्गीय फळे इ. पिके घेतली जातात व त्यांचीयेथे मोठी बाजारपेठ आहे. यांशिवाय मांस, दुग्धजन्य पदार्थ, अन्न वतंबाखू यांवरील प्रक्रिया, मोटारवाहनांची जुळणी, धातू व विद्युत् अभि-यांत्रिकी, चर्मोद्योग, छपाई व रसायने निर्मिती इ. उद्योग शहरामध्ये चालतात. रासायनिक खते, पोलाद, कागद, कापड व कपडे यांच्या निर्मितीचे उद्योग येथे विकसित झाले असून येथून त्यांची निऱ्यात केली जाते. शहराच्या परिसरात सोन्याच्या खाणी असून त्याच्या आनुषंगिक उद्योगांसाठीही हे प्रसिद्ध आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागात उंच इमारती, बाजारपेठा, उत्तर व पूर्व भागांत टुमदार निवासी घरे असलेली उपनगरे आणि दक्षिण भागात मोठे उद्योग-धंदे अशी याची रचना आहे. शहरातील अँग्लिकन व रोमन कॅथलिक कॅथीड्रल, डच रिफॉर्म्ड चर्च, राणी व्हिक्टोरिया मिमॉरिअल ग्रंथालय व संग्रहालय, राष्ट्रीय अभिलेखागार, युनिव्हर्सिटी ऑफ झिंबाब्वे (स्था. १९५७), नॅशनल गॅलरी, क्रिकेटचे प्रेक्षागार इ. वास्तू तसेच उद्याने ही पर्यटकांची आकर्षणे आहेत.

चौंडे, मा. ल.