हरणवेल : (इं. चायनिज मून क्रिपर, किंग्ज टॉनिक सं. गंधाली हिं. गंधप्रसारिणी, पसरण बं. गंध-भादुलिया गु. गंधना त. पेनरी सेंगाई लॅ. पिडेरिया फेटिडा कुल-रुबिएसी). ही लहान बहुवर्षायू ओषधी वेल आहे. पिडेरिया प्रजातीतील सु. ३० जाती जगात सर्वत्र असून त्यांपैकी भारतात पाच जाती आढळतात. या वनस्पतीचा नैसर्गिक आढळ उत्तर–पूर्व भारत ते चीन आणि जपान ते थायलंड, तसेच मलेशिया, इंडोनेशिया आणि फिलिपीन्स या देशांत आहे. भारतात तिचा आढळ मध्य व पूर्व हिमालयात, बिहार, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल येथे आहे. तिची लागवड व प्रसार उत्तर अमेरिका (कॅरोलायना, टेक्सस, लुईझिॲना), हवाई बेटे, ख्रिसमस बेटे, मॉरिशस आदी ठिकाणी करण्यात आला आहे. हवाई बेटांवरील रोपवाटिकांत हिच्या शोभिवंत पर्णसंभार असलेल्या वनस्पती तयार करतात. तिचा नैसर्गिक अधिवास जंगलांत व दाट रानांत असतो. ती सस.पासून ३,००० मी. उंचीपर्यंत आढळते. तिची वाढ मोकळ्या परिसरात वेगाने होते. ती फार उपद्रवी तण आहे. वृक्षांवर आणि झुडपांच्या आधाराने ती पसरते. आर्द्रतायुक्त हवामान आणि सूर्यप्रकाश तिच्या वाढीस पोषक असतो. वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीत तिची वाढ होते.

हरणवेलहरणवेल वनस्पतीचे वक्राकार असलेले दुर्गंधीयुक्त खोड १.५–७ मी. लांब वाढते. कोवळे खोड जांभळट किंवा लालसर तपकिरी रंगाचेत्यावर दाट लव असते किंवा कधीकधी नसते पूर्ण वाढ झालेले खोड पिवळसर तपकिरी ते करड्या रंगाचे असून मऊ व चमकदार असते. पाने साधी (२–२१ × ०.७–९ सेंमी.), वृंत (०.५–९ सेंमी.), सोपपर्ण (उपपर्णयुक्त), अंडाकृती व दीर्घवृत्ताकृती ते रेषाकृति-आयत, तळाशी हृदयाकृती व कधीकधी गोलाकार ते प्रशराकृती, तर अग्र तीक्ष्ण ते प्रकुंचित असतात. वृंताजवळ सोपपर्णे असून ती वर्तुळाकार ते त्रिकोणी (१.५–५ × २-३ मिमी.) असतात. फुलोरा कक्षास्थ किंवा अग्रस्थ कुंठित परिमंजिऱ्या विविध प्रकारच्या फुलोऱ्याची वाढ काही सेंमी. ते १ मी.पर्यंत होते, परंतु तो साधारणपणे १० सेंमी. लांब वाढतो. पुष्पच्छद पानासारखा किंवा लहान व रेषीय त्यात थोडी ते अनेक फुले २–३० मिमी. लांब पुष्पबंधाक्ष कुंडल वल्लरींवर येतो. फुले द्विलिंगी, गडदगुलाबी किंवा जांभळट रंगाची, साधारणपणे ५ खंडीय संदले फिकट तपकिरी ते पिवळसर वा लालसर तपकिरी रंगाची असतात. अश्मगर्भी फळ अर्धवर्तुळाकृती, ४–६ मिमी. व्यासाचे फळाची साल पातळ, कोरडी व सुरकुत्यायुक्त असते.

हरणवेल वनस्पतीची पाने, मुळे, साल व फळे उपयुक्त आहेत. पानांचा वापर पोटाच्या विशेषतः आतड्यांच्या विविध विकारांवर केला जातो. अतिसार झालेल्या बालकांसाठी पानांचा रस उपयुक्त असतो. पोटदुखीसाठी उकळलेल्या पानांचा लेप लावतात. तसेच पानांचा काढा मुतखडा विरघळविण्यासाठी वा काढण्यासाठी घेतात. तापावरही या काढ्याचा वापर करतात. फिलिपीन्समध्ये संधिवातासाठी पाने पाण्यात टाकून आंघोळ करतात. चीनमध्ये विषारी कीटकांच्या चावण्यावर उपचार म्हणून तसेच पचनासाठी व वातसारक म्हणून पानांचा उपयोग करतात. मुळे वेदनाहारक व वायुनाशी असतात. ती शूल, अंगग्रह, संधिवात व गलगंड यांसारख्या आजारांवर उपयुक्त असतात. भारतात वांतिकारक म्हणून मुळांचा, तर फिलिपीन्समध्ये सालीचा वापर होतो. दंतशूलासाठी फळांचा वापर केला जातो. या वनस्पतीतील विविध रसायनांचा वापर प्रतिशोथकारक, कासरोधी, अतिसाररोधक इ. औषधांत तसेच कीटकनाशकांत केला जातो.

हरणवेल वनस्पतीचे नैसर्गिक शत्रू कीटक, वाळवी व कवक हे होत.

भारस्कर, शिल्पा चं.