हनुमान : हिंदू देवतासमूहातील एक आराध्यदैवत व रामायणातील सुविख्यात रामभक्त वानर. किष्किंधेचा वानर राजा सुग्रीव याचा तो अमात्य. सप्तचिरंजीवांपैकी एक. सुमेरूचे राजे केसरी (केसरिन्) आणि गौतमकन्या अंजनी यांचा क्षेत्रज व वायूचा तो औरस पुत्र (वाल्मीकिरामायण, किष्किंधा ६६, १८-१९ व ब्रह्मपुराण) असून शिवाचाही पुत्र होता (शिवपुराण). त्याविषयीच्या कथा विविध पुराणांत आढळतात. हनुमान ही प्राचीन देवता असून तो आर्येतरांचा मूळ देव होय. वैदिक आऱ्यांनी नंतर तो स्वीकारला. त्याच्या प्रदेशपरत्वे भिन्न जन्मतिथी भारतात साजऱ्या होतात मात्र महाराष्ट्रात चैत्र पौर्णिमेला हनुमानजयंती साजरी होते. हनुमान या नावाविषयी अनेक दंत-कथा प्रचलित आहेत. एकदा लहान असताना नुकत्याच उगवलेल्या सूऱ्यास फळ समजून ते घेण्यासाठी त्याने उडी मारली. ते पाहून इंद्राने रागाने त्याला वज्र फेकून मारले. त्यामुळे त्याची डावी हनू मोडली. तेव्हापासून तो ‘हनुमान’ झाला, अशी कथा वाल्मी किरा मायणात आहे. मारुती, बजरंग, बजरंगबली, बलभीम, रामदूत, केसरीनंदन, आंजनेय, वायुपुत्र, पवनकुमार किंवा पवनसुत, वज्रांग, संकटमोचन, महावीर, महारुद्र इ. नावांनीही ह्याचा उल्लेख होतो. कर्नाटक ही हनुमानाची जन्मभूमी मानली जाते. ⇨ मध्वाचार्य हे त्याचे अवतार मानले जातात. त्यांच्या ⇨ माध्व संप्रदायात हनुमंताची पूजा करण्याची पद्धती आहे.
‘हनुमंत’ हा शब्द तमिळचे संस्कृत रूप असावे, असे एफ्. ई. पार्जिटर, सुनीतीकुमार चतर्जी इ. अभ्यासकांचे मत आहे. द्रविड शब्दाचे संस्कृत रूप बनविताना प्रारंभी ‘ह’ कार जोडण्याची प्रथा असल्यामुळे तमिळ आणमंदि (आण = कपि, मंदि = नर) या शब्दाचे संस्कृतीकरण हनुमंत असे झाले असावे. सूर्य, इंद्र, वरुण, ब्रह्मदेव यांनी हनुमानास अनेक वर दिले होते. सूऱ्याने आपल्या तेजाचा शंभरावा भाग देताना ‘सर्व शास्त्रांचे अध्ययन करण्याची बुद्धिमत्ता मी याला देतो, त्यामुळे हा श्रेष्ठ वक्ता होईल’, असे म्हटले आहे (उत्तर. ३६.१४). ‘जोपर्यंत भूतलावर रामकथा प्रचलित असेल, तोपर्यंत माझ्या शरीरात प्राण राहोत’, असा वर त्याने रामाकडून मागून घेतला (उत्तर. ४०.१६-१७). अशा प्रकारच्या कथांमुळे त्याची गणना सप्तचिरंजीवांमध्ये केली जात असावी. रामायण-महाभारता तील हनुमान म्हणजे शास्त्रप्रवीण, राजनीतिज्ञ, शौर्य, बुद्धिमत्ता, ब्रह्मचर्य, रामभक्ती, वक्तृत्व इ. अलौकिक गुणांची मूर्ती. गदा हे त्याचे मुख्य आयुध. रामरहस्योपनिषदा त त्याला गुरुस्वरूपात वर्णिले असून सनक, सत्कुमार, शांडिल्य, मृद्गल इ. ऋषिमुनींनी त्याच्याकडून राम-तत्त्वाचे ज्ञान प्राप्त करून घेतले. सीताशोध, अशोकवनविध्वंस, लंकादहन या हनुमानाच्या अलौकिक शौऱ्याच्या गाथा होत. समुद्रोल्लंघनाने लंकेत जाऊन त्याने सीतेचा शोध घेऊन तिची भेट घेतली. हनुमानाचे चारित्र्य निष्कलंक होते. रावणाच्या अंतःपुरात निःशंकपणे पडलेल्या स्त्रिया पाहूनही त्याचे मन स्वस्थ होते (सुंदर. ११.४२-४३). राम-रावण युद्धात रावणाचा पराक्रमी मुलगा अक्ष तसेच रावणाचे अनेक पराक्रमी वीर त्याने ठार केले. युद्धात मूर्च्छित झालेल्या लक्ष्मणासाठी संजीवनीच्या शोधार्थ त्याने आपल्या अचाट ताकदीने द्रोणागिरी पर्वत उचलून आणला. हवे तेथे हवे तसे रूप धारण करण्याची कला त्याला अवगत होती. एक विश्वासू दूत म्हणून अत्यंत नाजूक प्रसंगी दौत्य करण्याचे काम रामाने अनेकवेळा हनुमानावर सोपविले. विभीषणाला आश्रय देण्यासंदर्भात रामाला दिलेले त्याचे मत म्हणजे त्याच्या दूरदर्शीपणाचा एक उत्तम नमुना होय.
हनुमान गृहस्थ असल्याचा उल्लेखही आढळतो. लंकादहनानंतर समुद्रस्नान करून परत येत असता त्याचा घाम मगरीने गिळला. त्यापासून ती गर्भवती होऊन मकरध्वज नावाचा मुलगा तिला झाला. तसेच अहिरावण व महिरावण यांच्या वधप्रसंगी ह्या पितापुत्राची भेट झाल्याचा उल्लेखही आनंदरामायणा त आहे. याशिवाय पउमचरिय या जैन रामकथेत त्याला सहस्र पत्न्या असल्याचा उल्लेख आहे, तर स्वयंभूरचित पउमचरिउ-मध्ये हनुमानास आठ हजार बायका असल्याचे म्हटले आहे.
हनुमानास रुद्रावतार मानले असून ‘भीमरूपी महारुद्र’ असेही त्याला म्हटले जाते. पुराणकाळात हनुमान आणि रुद्र यांचे हे नाते निर्माण झाले असावे, असे काही विद्वानांचे मत आहे. हनुमानाला जे देवत्व लाभले, त्याचे मूळ त्याच्या रुद्रावतारात आणि यक्षपूजेत असावे. हनुमानाच्या पंचमुखी मूर्ती रुद्रशिवाच्या पंचमुखी मूर्तीच्या प्रभावातून निर्माण झाल्या असाव्यात. रुद्रावतारी पंचमुखी हनुमानाचे उल्लेख असणारे कित्येक मंत्र लोकसाहित्यामध्ये आहेत. बहुधा ठिकठिकाणी हनुमानाच्या मूर्ती तांबड्या (शेंदूर माखलेल्या) असतात. त्याबद्दल अनेक कथाही प्रचलित आहेत. शनिवार व मंगळवार हे हनुमानाचे पूज्य दिवस मानले जातात. शनीच्या रुद्र नावाशी त्याचे साधर्म्य असल्यामुळे त्याची शनिवारी पूजा व शनिवारव्रतात उपासना सुरू झाली असावी. दासमारुती आणि वीरमारुती ही हनुमानाची दोन रूपे. रामोपासना, यक्षोपासना व शिवोपासना या तीन उपासना-संप्रदायांशी त्याचे मूर्तिविज्ञान निगडित आहे. रामपरिवारातील हनुमान म्हणजे एकमुखी व द्विभुज दासमारुती. तो रामासमोर अंजली मुद्रेत उभा असतो. त्याचे शेपूट जमिनीवर रुळत असते. वीर मारुती हा यक्ष संप्रदायाशी संबंधित आहे. तो बहुधा युद्धाच्या पवित्र्यात असतो. त्याची शेपटी व उजवा हात त्याच्या मस्तकाकडे वळलेले असतात. काही वेळा त्याच्या पायाखाली राक्षसाची मूर्ती असते. गावाच्या वेशीपाशी किंवा गावात मुख्यतः वड, पिंपळ इ. वृक्षांच्या सान्निध्यात स्वतंत्रपणे पारावर याच्या मूर्ती वा मंदिरे आढळतात. महाराष्ट्रामध्ये फाल्गुन महिन्यामध्ये वीर मिरविण्याची प्रथा आहे. पोरबंदर (सौराष्ट्र) येथे सुदामामंदिराजवळ असलेल्या अकरामुखी मारुतीला बावीस हात व दोन पाय आहेत. पंचमुखी मारुतीच्या मूर्ती दशभुज असून भुजांमध्ये ध्वज, खड्ग, नरमुंड, त्रिशूळ, पाश इ. आयुधे असतात. हनुमानकवच नामक ग्रंथात तो भूत, प्रेत, पिशाच, राक्षस इत्यादिकांकडून होणाऱ्या उपद्रवातून सोडवितो, असे वर्णन आहे. आंजनेयसंहिता (हनुमत्संहिता) हा ग्रंथ त्याच्या नावावर आहे. तो संगीतशास्त्राचा एक प्रवर्तक मानला जातो. संगीतपारिजात, संगीतरत्नाकर इ. ग्रंथांमध्ये प्राचीन संगीताचाऱ्यां- बरोबर त्याचाही उल्लेख आढळतो. स्त्रिया पुत्रप्राप्तीच्या इच्छेनेही मारुतीची उपासना करतात.
भारतात प्राचीन काळापासून हनुमानाच्या मूर्ती सर्वसाधारणतः रामोपासना, यक्षोपासना व शिवोपासना या त्रिविध उपासना-संप्रदायाशी निगडित आहेत. त्या पाषाण, कांस्य, काष्ठ, हस्तिदंत, ब्राँझ व मृदा इ. माध्यमांत भारतात सर्वत्र आढळतात तथापि अलीकडे निरनिराळ्या रंगांचा वापर केलेल्या संगमरवरी मूर्ती भारतात सर्वत्र आढळतात. महाबलिपुरम् येथील विष्णू मंदिरातील हनुमानाची मूर्ती (इ. स.चे पहिले किंवा दुसरे शतक), देवगढ (झांशी जिल्हा) मधील गुप्तकालीन दशावतार मंदिरातील हनुमंताची मूर्ती, प्रयागच्या संग्रहालयातील पाचव्या शतकातील मूर्ती, कैलास मंदिरातील (वेरूळ) आठव्या शतकातील मूर्ती, राष्ट्रीय संग्रहालयातील (दिल्ली) आठव्या शतकातील मूर्ती या प्राचीन असून रामपरिवारातील आहेत. शिवाय केरळ येथील शठांकुलागुरा येथे अशोकवनात सीतेपुढे उभ्या असलेल्या हनुमंताची काष्ठमूर्ती (चौदावे शतक), त्रिवेंद्रम येथील हस्तिदंतात कोरलेल्या रामसमूहातील हनुमानमूर्ती या काही उल्लेखनीय मूर्ती होत. आंध्र प्रदेशातील पारिताल (कृष्णा जिल्हा) येथील सु. ४४ मी. उंच असलेली वीर अभय आंजनेय हनुमान स्वामी मूर्ती (२००३), हिमाचल प्रदेशातील सिमला येथील सु. ३५ मी. उंच असलेली हनुमानमूर्ती (२०१०) व महाराष्ट्रातील नांदुरा (बुलढाणा जिल्हा) येथील सु. ३४ मी. उंच असलेली हनुमानमूर्ती ह्या काही भव्य हनुमानमूर्ती असून त्यांपैकी वीर अभय आंजनेय हनुमान स्वामी मूर्ती ही सर्वांत उंच मूर्ती होय. अमृतसर येथे रामतीर्थ मंदिरामध्ये २६ मी. उंच गदाधारी हनुमानाची तांबडी ‘द्विभुज मूर्ती’ आहे.
हनुमानाची मंदिरे भारतभर आहेत. विवाहविधीपूर्वी हनुमानाचे दर्शन घेण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. संत रामदास यांनी महाराष्ट्रात हनुमानाची उपासना रूढ करून आरती व स्तोत्र लिहिले. त्यांनी ठिकठिकाणी मठ स्थापन करून बलोपासनेसाठी मारुतीच्या मूर्तींची स्थापना केली. त्यांनी कृष्णा नदीपरिसरात स्थापन केलेले अकरा मारुती प्रसिद्ध आहेत. रामदासांप्रमाणेच संत तुलसीदासांनीही काशी येथे हनुमानमूर्तींची स्थापना केली. त्यांपैकी संकटमोचन, हनुमानफाटक, बडे हनुमान इ. क्षेत्रे प्रसिद्ध आहेत. पुरंदरदास, स्वामी विवेकानंद हे हनुमानाचे परमभक्त होते. सयाम, कंबोडिया, जावा, सुमात्रा इ. ठिकाणीही हनुमानाच्या मूर्ती आढळतात.
आदिवासींमध्ये वानर या अर्थी तिग्गा, हलमान, बजरंग व गडी अशी गोत्रे असून रेद्दी, बरई, बसौर इ. जातींमध्येही वानरसूचक गोत्रे आढळतात. सिंगभूममधील भुईया जातीचे लोक स्वतःस हनुमंताचे वंशज समजतात. त्यावरून तो दक्षिणेतील आदिवासी जमातींचा देव असावा, असा तर्क केला जातो.
पहा : राम रामायण.
संदर्भ : 1. Aryan, K. C. Aryan, Subhasini, Hanuman in Art and Mythology, Delhi, 1975.
२. गाडगीळ, अमरिंद्र, अनु. वाल्मीकिरामायण, दोन भाग, पुणे, १९७३.
पोळ, मनीषा
“