हनगळ : हनगल, हानगल. कर्नाटक राज्याच्या हावेरी जिल्ह्यातील एक ऐतिहासिक शहर. लोकसंख्या २८,१५९ (२०११). हे धारवाडच्या दक्षिणेस सु. ७५ किमी., धर्मा नदीच्या डाव्या काठावर वसलेले आहे. विराटनगर, विराटकोट, पानुंगल, हानुंगल इ. नावांनी ते पूर्वी ओळखले जात होते. ऐतिहासिक किल्ल्याचे अवशेष, कोरीव लेख, होयसळकालीन मंदिरे यांसाठी हे प्रसिद्ध असून येथील तारकेश्वर मंदिर लक्षणीय आहे. या मंदिरावरून याला तारकक्षेत्र असेही म्हणतात. शहराच्या पश्चिमेस शंक्वाकार गढी (टेकडी) असून ती ‘कुंतिना डिब्बा’ किंवा कुंती टेकडी या नावाने ओळखली जाते. महाभारत काळात पांडव अज्ञातवासात येथे रहात होते, असे परंपरेने सांगितले जाते.
इसवी सन पाचव्या शतकापासूनचा या प्रदेशाचा इतिहास ज्ञात असल्याचे उपलब्ध पुराव्यांवरून दिसून येते. कदंब, पश्चिमी चालुक्य, कलचुरी, होयसळ इ. घराण्यांची, त्यानंतर आदिलशाही व अखेरीस टिपू सुलतान यांची सत्ता या प्रदेशावर होती. कदंबांच्या एका शाखेची (हनगळ कदंब) ही राजधानी होती व त्या काळात हे शहर हानुंगल या नावाने प्रसिद्ध होते, असा उल्लेख मिळतो. येथील पुरावशेषांमध्ये ३० पेक्षा जास्त कोरीव लेखांचा समावेश असून, त्यांमध्ये बाराव्या-तेराव्या शतकांपर्यंतचा ऐतिहासिक उल्लेख मिळतो. कदंबांपैकी ताइलप, कामदेव, मल्लिदेव, चालुक्य घराण्यातील सहावा विक्रमादित्य, कलचुरीं पैकी दुसरा बिज्जल यांच्या सत्ता या प्रदेशावर होत्या. बाराव्या शतकात होयसळ राजा विष्णुवर्धन याने आपल्या उत्तरेच्या मोहिमेत येथील किल्ला घेतला होता असा उल्लेख मिळतो. चालुक्य व होयसळांनी येथे अनेक मंदिरे बांधली व नदीच्या काठांवर तटबंदी केली. सांप्रत भग्नावस्थेत असलेला येथील किल्ला धर्मा नदीकाठावर सु. ६२० मी. उंचीच्या गोलाकार टेकडीवर आहे. त्याचा बालेकिल्ला तटबंदीयुक्त व १६ बुरूजांचा असून त्याभोवती खंदक आहे. शहरात व परिसरात हनुमान, दुर्गा, नारायण, रामलिंग, विरूपाक्ष, वीरभद्र, बिलेश्वर, गणपती, तारकेश्वर इ. अनेक मंदिरे असून नागरशैलीतील भव्य तारकेश्वर मंदिर विशेष उल्लेखनीय आहे. तारकेश्वर हे शिवमंदिर असून त्याचे बांधकाम काळ्या घडीव पाषाणात केले आहे. ते होयसळांच्या काळातील असून चार खांबांचे छोटे आंतरालय गर्भगृह, वीस खांबी सभामंडप व आठ खांबी द्वारमंडप असे याचे चार भाग आहेत. त्याचे शिखर नागरशैलीतील आहे. याच्या सभामंडपावर सुंदर घुमट व मंडपाच्या छतावर सुंदर कोरीवकाम आहे. मंदिराजवळच काही वीरगळ आहेत. शहरातील होयसळकालीन बिलेश्वर मंदिराजवळील आनिकेरी तलाव, येथील सांस्कृतिक समारंभप्रसंगी खेळला जाणारा ‘हत्ती हब्बा’ हा खेळ, वीरशैव कुमारस्वामी मठ, किल्ल्यातील जैन मंदिर, सैय्यद सादत दर्गा इ. पर्यटकांची आकर्षणे आहेत. शहरात हातमाग उद्योग व तांदुळाच्या गिरण्या असून महाविद्यालयापर्यंतच्या शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध आहेत. येथील सु. ६४% लोक साक्षर आहेत. येथे एच्.आय्.व्ही. बाधितांची संख्या जास्त असल्याने प्रशासनापुढील ही महत्त्वाची समस्या आहे.
चौंडे, मा. ल.