हटन, जेम्स : (३ जून १७२६ – २६ मार्च १७९७).स्कॉटिश भूवैज्ञानिक, रसायनशास्त्रज्ञ व निसर्गवैज्ञानिक. समरूपतावाद (यूनिफॉर्मिटॅरिॲनिझम) या भूविज्ञानातील मूलभूत तत्त्वाचेआणि आधुनिक भूविज्ञानाचे जनक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. या तत्त्वा-मध्ये भू क व चा च्या वैशिष्ट्यांचे स्पष्टीकरण संपूर्ण भूवैज्ञानिक काळात घडत आलेल्या नैसर्गिक प्रक्रियांद्वारे दिले जाते.
हटन यांचा जन्म स्कॉटलंडमधील एडिंबरो येथे झाला. त्यांचे वडील व्यापारी व मुलकी काऱ्यालयातील अधिकारी होते. वडिलांच्या निधनानंतरही हटन यांनी आपले शिक्षणस्थानिक शाळेत व एडिंबरो विद्यापीठात पूर्ण केले. सुरुवातीला त्यांना रसायनशास्त्राविषयी आकर्षण होते. मात्र, प्रत्यक्षात ते वकिली व्यवसायात उतरले. वकिलांकडे उमेदवारी करताना त्यांनी कायदेविषयक दस्त-ऐवजांच्या नकला करण्याऐवजी रासायनिक प्रयोग करून सहकारी लिपिकांचे मनोरंजन करण्यात अधिक वेळ खर्ची घालविला. ते व त्यांचे मित्र जेम्सडेव्ही यांना दगडी कोळशाच्या भुकटीपासून नवसागराचे (साल अमो-नियाकचे) उत्पादन करण्यासाठीच्या अनुसंधानात फार रस वाटत असे.यामुळे हटन यांची वकिलाकडील उमेदवारी वर्षभरही चालली नाही. नंतरते वैद्यकाच्या अभ्यासाकडे वळले. एडिंबरो विद्यापीठात तीन वर्षे व नंतर पॅरिसमध्ये दोन वर्षे वैद्यकाचे अध्ययन केल्यानंतर अखेरीस सप्टेंबर१७४९ मध्ये त्यांनी हॉलंडमध्ये एम्.डी. पदवी संपादन केली. तथापि, त्यांना वैद्यकाचे कमीच आकर्षण होते. डेव्ही यांच्याबरोबर त्यांनीनवसागरनिर्मितीची अधिक स्वस्त पद्धत विकसित करून या व्यवसायातचांगली कमाई केली.
हटन यांनी वैज्ञानिक विषयांवरील आपले वाचन चालूच ठेवले आणि मोठ्या प्रमाणात भटकंतीही केली. या भटकंतीमध्ये ते खडकांची तपासणी आणि नैसर्गिक प्रक्रियांमधील क्रियांचे निरीक्षण करीत असत. त्यांनी एडिंबरोच्या रॉयल सोसायटीला एक प्रबंध सादर केला (१७८५). या प्रबंधात त्यांनी आपले समरूपतावादाचे तत्त्व विशद केले होते. यांतील दोन निबंध ट्रँझॅक्शन्स ऑफ द रॉयल सोसायटी ऑफ एडिंबरो या ज्ञानपत्रिकेत थिअरी ऑफ द अर्थ ऑर ॲन इन्व्हेस्टिगेशन ऑफ द लॉज ऑब्झर्व्हेबल इन द काँपोझिशन, डिस्सोल्यूशन अँड रिस्टोरेशन ऑफ लँड अपॉन द ग्लोब या शीर्षकाखाली १७८८ मध्ये प्रसिद्ध झाले. या निबंधांत हटन यांनी निरीक्षण करता येण्याजोग्या नैसर्गिक प्रक्रियांद्वारेजागतिक भूवैज्ञानिक आविष्कार स्पष्ट करता येतील आणि या प्रक्रियापृथ्वीवर व पृथ्वीच्या आत आजही चालू असून त्या संपूर्ण भूवैज्ञानिकदीर्घ काळात सर्वसाधारण अशा एकसारखेपणाने (समरूपतेने) चालूहोत्या अशी मते मांडली. हटन यांच्या या दोन निबंधांमुळे भूवैज्ञानिकविचारांना क्रांतिकारक वळण दिले आणि त्यानंतर भूविज्ञान हा सम-रूपतावाद तत्त्वावर आधारलेला विज्ञानाचा विषय झाला.
समकालीन भूवैज्ञानिक मत प्रणालीच्या संदर्भात हटन यांच्या कल्पना आश्चर्यचकित करणाऱ्या होत्या. १७५० पर्यंत खडक, त्यांचे थर, त्यांच्या-तील जीवाश्म (शिळारूप झालेले जीवांचे अवशेष) यांची पुष्कळमाहिती उपलब्ध झाली होती. मात्र, यांपैकी कोणत्याही ज्ञानसंपदेचे संश्लेषण करून भूविज्ञानाचा कोणताही सिद्धांत तयार केला नव्हता.बायबल च्या जेनेसिस (सृष्टिनिर्मिती) या पुस्तकातील वर्णनानुसार पृथ्वी सुमारे केवळ सहा हजार वर्षांपूर्वी निर्माण झाली. मात्र, ही श्रद्धा भूविज्ञानाच्या सैद्धांतिक काऱ्यातील गंभीर अडथळा होती. काही भूवैज्ञानिकांच्या मते बायबल मधील वर्णनानुसार पुराच्या पाण्यातील खनिजे प्रचंड प्रमाणावर साचून जगातील गाळाचे (अवसादी) खडक तयार झाले. झीज घडविणाऱ्या प्रक्रिया दीर्घ काळापासून माहीत होत्या. झिजेमुळे जशी भूपृष्ठाची झीज होते, तसे भूपृष्ठाच्या निर्मितीसाठीचे समतुल्य स्पष्टीकरण (जे झिजेमुळे होणाऱ्या र्हासाविरुद्धचे असेल) माहीत नव्हते. ज्वालामुखी क्रिया व भूकवचातील उष्णतानिर्मित इतर प्रक्रिया यांद्वारे होणाऱ्या खडकांच्या निर्मितीचे महत्त्व जवळजवळ पूर्णपणे माहीत नव्हते. शिवाय एकूणच अग्निज खडकांचे अस्तित्वही असेच अज्ञात होते.
हटन यांच्या कल्पना तेव्हाच्या सिद्धांताच्या संदर्भात अगदी थेट विरुद्ध अशा होत्या. अवसादनाच्या (गाळ साचण्याच्या) प्रक्रियांनी खरोखरच पुष्कळ खडक निर्माण झालेले आहेत, असे त्यांनी ठामपणे सांगितले होते. खडकांचे कण पाण्याने जमिनीवरून धुवून नेले जाऊन समुद्रात गेले, तेथे त्यांचे थर साचत गेले आणि तेथील त्यांच्या घनी-भवनातून खडक तयार झाले. हे घनीभवन त्यांच्या पाण्यातील केवळ विद्रावामुळे झाले नाही, तर उष्णता व दाब हेही घनीभवनामागील कारणे असल्याचे हटन यांनी म्हटले होते. हे विधान आजही लागू पडणारे आहे.त्यांनी पुढील मतही ठामपणे मांडले होते : भूपृष्ठाची झीज होऊन त्याचा र्हास होतो. याची भरपाई ज्वालामुखी व इतर क्रियांनी नवीन भूपृष्ठ निर्माण होऊन होत असते आणि यामध्ये पृथ्वीअंतर्गत उष्णतेने खडकांचे नवीन घटक भूपृष्ठापर्यंत आणले जातात. नंतर हे नव्याने निर्माण झालेले पर्वत व इतर भूमिरूपे पुन्हा झिजतात आणि समुद्रात गाळाच्या रूपात साचतात. त्यांच्यापासून भूपृष्ठाखालील उष्णतानिर्मित प्रक्रियांद्वारे ते वर उचलले जाऊन नवीन भूपृष्ठे तयार होतात.
वरील एकूण सर्व भूवैज्ञानिक प्रक्रियांची गोळाबेरीज लक्षात घेता जगातील सर्व भूमिरूपांचे स्पष्टीकरण देता येऊ शकेल, असा हटन यांचा दावा होता. याबाबतीत बायबलमधील स्पष्टीकरणांची गरज उरत नाही. झीज, साचणे, अवसादन व वर उचलले जाणे या प्रक्रिया आवर्ती किंवा चक्रीय आहेत. त्या पृथ्वीच्या इतिहासात पुष्कळ वेळा पुनःपुन्हा घडल्या असल्या पाहिजेत आणि अशा आवर्तांना वा चक्रांना लागणाराकालावधी पाहता पृथ्वीचे वय कल्पना करता येणार नाही एवढे जास्त असले पाहिजे, असे त्यांचे मत होते. त्यांच्या थिअरी ऑफ द अर्थ वुइथ प्रूफ्स अँड इलस्ट्रेशन्स (१७९५) या दोन खंडांच्या ग्रंथातत्यांनी आपली मते संक्षिप्तपणे मांडली आहेत आणि आपण काढलेल्या निष्कर्षांसाठी लागणारे पुरेसे निरीक्षणात्मक पुरावेही त्यामध्ये त्यांनी दिले आहेत. या ग्रंथाचा तिसरा खंड त्यांच्या मृत्यूपर्यंत अंशत:च पूर्ण झाला होता.
हटन यांच्या या कल्पना यूरोपातील शास्त्रज्ञांमध्ये व्यापकपणे प्रसृत झाल्या. मात्र, त्यांच्या क्लिष्ट लेखनशैलीमुळे त्यांचा प्रभाव लगेचचपडण्यामध्ये अडथळा आला. सुदैवाने त्यांचे निकटवर्ती मित्र जॉन प्लेफेयर (१७४६-१८१९) यांनी हटन यांच्या ग्रंथाचा बिनचूक व सुस्पष्ट सारांश लिहून आणि त्यात स्वतःची जादा निरीक्षणे घालून इलस्ट्रेशन्स ऑफ द हटनियन थिअरी ऑफ द अर्थ हा सुधारित ग्रंथ १८०२ मध्ये प्रसिद्ध केला. यामुळे समरूपतावादाचा अचूकपणाप्रस्थापित झाला आणि या पायाभूत तत्त्वावर आधुनिक भूविज्ञानाचीइमारत उभी राहिली.
प्लेफेयर यांनी ट्रँझॅक्शन्स ऑफ द रॉयल सोसायटी ऑफ एडिंबरो या ज्ञानपत्रिकेत लिहिलेला बायोग्राफिकल अकाउंट ऑफ द लेटडॉ. जेम्स हटन, एफ्. आर्. एस्. (१८०५) हा लेख आणि ई. बी. बेलीयांचे जेम्स हटन : द फाउंडर ऑफ द मॉडर्न जिऑलॉजी (१९६७) हेपुस्तक यांतून हटन यांचे जीवन, व्यक्तिगत माहिती, त्यांचे कार्य, त्यांचेभूवैज्ञानिक काऱ्यावरील तपशीलवार भाष्य इ. माहिती मिळू शकते.
हटन यांचे एडिंबरो येथे निधन झाले.
ठाकूर, अ. ना.
“