हक्सली, टॉमस हेन्री : (४ मे १८२५—२९ जून १८९५). इंग्रज जीववैज्ञानिक व अज्ञेयवादाचे पुरस्कर्ते. त्यांनी ॲग्नॉस्टिसिझम — अज्ञेयवाद — हा शब्द तयार केला [→ अज्ञेयवाद ]. त्यांनी ⇨ चार्ल्स रॉबर्ट डार्विन यांच्या ⇨ क्रमविकासवादी निसर्गवादाला जाहीर पाठिंबा दिल्यामुळे त्यांना डार्विनचा बुलडॉग (विलक्षण धैऱ्याचा समर्थक) अशी उपाधी प्राप्त झाली होती. त्यांनी केलेल्या संघटनात्मक कार्यामुळे तसेच जाहीर व्याख्याने व लेखन यांच्यामुळे आधुनिक समाजातील विज्ञानाचे स्थान उंचावण्यास मदत झाली. त्यांनी सांगितले होते की, विज्ञान एक दिवस संपूर्ण विद्वत्तेच्या प्रांतावर आधिपत्य गाजवेल.
हक्सली यांचा जन्म इंग्लंडमधील एलिंग (मिड्लसेक्स) येथे झाला. त्यांचे वडील जॉर्ज हे शिक्षक होते व त्यांच्या शाळेत टॉमस यांचे दोन वर्षे (१८३३—३५) औपचारिक शिक्षण झाले. तेथे शिकविण्यात आलेल्या आलंकारिक भाषेचा उपयोग टॉमस यांना पुढे विज्ञानविषयक लेखन करताना झाला. त्यांचे आई-वडील अँग्लिकन्स (इंग्लंड चर्चचे सदस्य) होते. तथापि, सार्वजनिक संस्थांवरील अँग्लिकन्स यांचे नियंत्रण संपुष्टात यावे आणि विणकरांना धार्मिक समानता मिळावी असे टॉमस यांना वाटत होते. या काळातच वाचन व विचार यांमधून त्यांच्या मनात अज्ञेयवाद, वैज्ञानिक अतिउत्साह वा प्रेरणा आणि सांप्रदायिक शक्तिप्रदर्शन यांची बीजे रोवली गेली. ⇨ टॉमस कार्लाइल यांच्या पुस्तकातून त्यांना समजले की, आदरयुक्त भीतीची जाणीव ही धर्मशास्त्रापेक्षा वेगळी असून ती देव किंवा चमत्कारिक घटनांशी निगडित असते.
हक्सली यांनी जॉन चार्ल्स कुक या जडवादी वैद्याकडे उमेदवारी केली (१८३८–४१). त्यानंतर ते लंडनला जाऊन वैद्यकीय व्यवसाय करू लागले. १८४२ मध्ये त्यांना लंडनच्या शारीरविषयक प्रशाळेत वनस्पतिविज्ञानाचे पारितोषिक आणि १८४५ मध्ये चॅरिंग क्रॉस हॉस्पिटलमधून शरीरक्रियाविज्ञान व कार्बनी रसायनशास्त्र या विषयांची पदके मिळाली. १८४५ मध्ये त्यांनी मानवी केसाच्या आवरणातील नवीन पटल शोधून काढले. या पटलाला ‘हक्सली पटल’ असे नाव पडले. या शोधातून सूक्ष्मदर्शकीमधील त्यांचे श्रेष्ठ कौशल्य दिसून येते.
हक्सली नाविक दलात एच्एम्एस् रॅटलस्नेक या जहाजावर सहायक शल्यचिकित्सक होते (१८४६—५०). त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या ग्रेट बॅरिअर रीफ आणि न्यू गिनीचा दक्षिण किनारा या प्रदेशांचे सर्वेक्षण केले. सूक्ष्मदर्शकाद्वारे त्यांनी समुद्रजीवांच्या (उदा., समुद्रपुष्प, हायड्रा, जेलीफिश) स्वरूपाचा व वाढीचा अभ्यास केला. या सगळ्या प्राण्यांना त्यांनी केसांसारख्या कोशिकांवरून ‘नेमॅटोफोरा’ असे नाव दिले. नंतर त्यांचे वर्गीकरण सीलेंटेरेटा या संघात करण्यात आले. त्यांनी असे दाखविलेकी, ते सर्व प्राणी दोन आधारभूत पटलांद्वारे बनलेले असतात. कालांतराने या पटलांचे नामकरण अंतस्त्वचा व बाह्यत्वचा असे झाले.
हक्सली यांनी माइन्स पिकॅडिली (लंडन) येथील शासकीय शाळेत नैसर्गिक इतिहास आणि जीवाश्मविज्ञान हे विषय शिकविले. त्यांनी शिक्षकांना विज्ञानात निष्णात केले. तसेच शिक्षकांसाठी जीवशास्त्राचा अभ्यास संरचनात्मक शरीरशास्त्रावर आणि काही मोजक्याच प्राण्यांवरव वनस्पतींवर आधारित असा केला. रॉयल इन्स्टिट्यूशन आणि रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स या ठिकाणी त्यांनी विविध पदे भूषविली. १८५६ मध्ये हक्सली आणि चार्ल्स डार्विन यांची भेट झाली. हक्सली यांनी डार्विन यांचा क्रमविकासविषयक सिद्धांत तसेच नैसर्गिक निवडीचा विचार यांना पाठिंबा दिला आणि डार्विन यांचा ऑन द ओरिजिन ऑफ स्पीशीज (१८५९) हा ग्रंथ सर्वांना वाचनासाठी खुला केला. हक्सली यांनी कपीच्या पूर्वजांविषयी आणि निअँडरथल मानवाच्या जीवाश्मांविषयी एव्हिडन्स ॲज टू मॅन्स प्लेस इन नेचर (१८६३) या ग्रंथात चर्चा केली.
आधुनिक विज्ञानासाठी हक्सली यांनी एक्स (द) क्लबची (मंडळाची) स्थापना केली होती (१८६४). त्यांनी १८७० च्या दशकात शैक्षणिक स्वरूपाची पुनर्रचना करण्याचे व संस्था उभारण्याचे काम केले. १८६९ मध्ये त्यांनी नेचर या विज्ञानविषयक मासिकाची स्थापना केली.
हक्सली यांनी १८६९ मध्ये ॲग्नॉस्टिक (agnostic) या नव्या शब्दाची निर्मिती केली. या शब्दाचा अर्थ ‘कोणालाही भौतिक अथवा आध्यात्मिक स्वरूपाचे अंतिम सत्याचे संपूर्ण आकलन होऊ शकतनाही ‘, असा होतो. त्यांच्या दृष्टीने नीतितत्त्वे प्रार्थनांच्या पठणावर अवलंबून नसतात, तर वास्तवाच्या भौतिक पुराव्यावर आधारित असतात. प्रेषितासारख्या करत असलेल्या जाहीर निवेदनामुळे त्यांना ‘पोप हक्सली’ हे टोपण नाव मिळाले होते.
हक्सली १८५१ मध्ये रॉयल सोसायटीचे फेलो झाले, तर १८५२ मध्ये त्यांना रॉयल पदक मिळाले आणि १८५३ मध्ये ते समुपदेशक झाले. त्यांनी पुढील विविध संस्थांचे अध्यक्षपद भूषविले : एथ्नॉलॉजिकल सोसायटी (१८६८—७१), जिऑलॉजिकल सोसायटी (१८६९—७१), द ब्रिटिश ॲसोसिएशन फॉर द ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्स (१८७०), रॉयल सोसायटी (१८८३-८५), द मरिन बायोलॉजिकल ॲसोसिएशन (१८८४—९०) इत्यादी.
हक्सली यांनी १८७८ मध्ये प्रकाशित झालेल्या एन्सायक्लोपीडिया ऑफ ब्रिटानिका याच्या नवव्या आवृत्तीत क्रमविकासविषयक ‘इव्होल्यूशन’ हा लेख लिहिला. त्यांचे महत्त्वाचे लेखन कलेक्टेड एसेज् (९ खंड, १८९३–९४) यामध्ये समाविष्ट आहे. विज्ञानाची ओळख करून देणारी त्यांची पुस्तके पुढीलप्रमाणे आहेत : लेसन्स इन एलिमेंटरी फिजिऑलॉजी (१८६६), फिजिओग्राफी (१८७७), इंट्रोडक्टरी सायन्स प्रायमर (१८८०) आणि द क्रेफिश : ॲन इंट्रोडक्शन टू द स्टडीऑफ झूलॉजी (१८८०). तसेच त्यांचे व्यक्तिलेख आणि पाठ्यपुस्तके पुढीलप्रमाणे आहेत : द ओशनिक हायड्रोझोआ (१८५९), लेक्चर्स ऑन द एलेमेंट्स ऑफ कंपॅरेटिव्ह ॲनॉटॉमी (१८६४), अ मॅन्युअल ऑफद ॲनॉटॉमी ऑफ व्हर्टिब्रेटेड ॲनिमल्स (१८७१) आणि अ मॅन्युअल ऑफ द ॲनॉटॉमी ऑफ इनव्हर्टिब्रेटेड ॲनिमल्स (१८७७).
हक्सली यांचे हृदयविकाराच्या झटक्याने ईस्ट बोर्न (ससेक्स) येथे निधन झाले.
वाघ, नितिन भ.