हक्सली, ऑल्डस लेनर्ड : (२६ जुलै १८९४-२२ नोव्हेंबर १९६३). विख्यात इंग्रजी कादंबरीकार व निबंधलेखक. त्याचा जन्म गॉडलमिंज (सरे) येथे लेनर्ड हक्सली व ज्युलिया या दांपत्यापोटी झाला. त्याचे घराणे सुसंस्कृत, सुशिक्षित, विद्याव्यासंगी होते. वडील लेखक, तर आजोबा टी. एच्. हक्सली प्रसिद्ध जीवशास्त्रज्ञ होते आणि आई ज्युलिया ही ⇨ मॅथ्यू आर्नल्ड या श्रेष्ठ कवीची भाची होती. सुरुवातीचे शिक्षण ईटनमधून घेऊन डॉक्टर होण्याची मनीषा असलेल्या हक्सलीला कृष्णपटलदाह (केराटायडिज) व्याधीने आंधळे केले. थोडे वाचता येऊ लागल्यावर अथक प्रयत्नांनी त्याने ऑक्सफर्ड बॅलिओल महाविद्यालयातून बी. ए. ची पदवी मिळविली (१९१६).

हक्सलीने पहिल्या महायुद्धाच्या काळात अथेनियम नियतकालिका-साठी काम केले (१९१९-२१). तत्पूर्वी गार्सिंग्टन मॅनर येथे शेतमजूर म्हणून काम करत असताना बर्ट्रंड रसेल, क्लाइव्ह बेल इ. ‘ब्लूम्सबरीग्रुप ‘च्या सदस्यांशी त्याची भेट झाली. क्रोम यलो (१९२१) या पहिल्याच कादंबरीत हक्सलीने समकालीन विचारवंतांच्या बौद्धिक दिवाळ-खोरीची टर उडविली. तत्पूर्वी १९१९ मध्ये त्याने मरिआ निस या युवतीशी विवाह केला. त्यांना एक मुलगा झाला. नंतर हक्सली आपल्या कुटुंबा-सोबत बराच काळ इटलीत राहिला (१९२३-३०). त्याच्या लेखनावर प्रसिद्ध इंग्रज कथा-कादंबरीकार ⇨ डी. एच्. लॉरेन्सच्या विचारसरणीचा प्रभाव होता.

हक्सलीच्या सुरुवातीच्या विनोदी कादंबऱ्या अँटिक हे (१९२३), दोज बॅरन लिव्ह्ज (१९२५) आणि पॉइंट काउंटर पॉइंट (१९२८) तत्कालीन बौद्धिक वादविवाद नाट्यमय रीत्या सादर करतात. या कादंबऱ्यांना पूरक अशी तात्त्विक व सामाजिक प्रश्नांची चर्चा हक्सलीने प्रॉपर स्टडीज (१९२७) या निबंधग्रंथात केली. १९३० च्या दशकात हक्सलीने पाश्चात्त्य संस्कृतीवर कडाडून टीका केली असून त्याचा रोख विशेषतः वैज्ञानिक प्रगतीच्या अमानवी चेहऱ्यावर होता. ब्रेव्ह न्यू वर्ल्ड (१९३२) या कादं-बरीत हक्सलीने तंत्रज्ञानाच्या विळख्यातील अमानवी समाजाचे अत्यंत उपरोधिक चित्रण केले आहे. या कादंबरीतील जगात धर्म आणि कला यांना मानवाने मूठमाती दिली आहे. येथे जी अपत्यनिर्मिती होते तीकृत्रिम बीजधारणेतून होत असून विज्ञान, तंत्रज्ञान व राजकारण यांच्या अभद्र युतीतून मानवी व्यक्तिमत्त्वाचा संकोच होईल, हे त्याने दाखविले. दुसरे महायुद्ध, शीतयुद्ध, शस्त्रास्त्रस्पर्धा इ. ऐतिहासिक घटनांतून त्याची प्रचीती आली, असे त्याचे म्हणणे आहे.

हक्सलीची आयलेस इन गाझा (१९३६) ही कादंबरी तिच्यातील प्रमुख व्यक्तिरेखेच्या स्वार्थी आत्मकेंद्रिततेपासून पारलौकिक गूढापर्यंतचा प्रवास चित्रित करते. तसेच ही कादंबरी युद्ध व राष्ट्रवाद यांचा अव्हेर करते. हक्सलीने जगात शांतता प्रस्थापित होण्यासाठी युद्ध व हिंसेच्या विरोधातङ्क पीस प्लेज युनियन ‘चे सक्रिय सभासदत्व स्वीकारले. यासंदर्भात पॅसिफिझम अँड फिलॉसफी (१९३६), एंड्स अँड मीन्स (१९३७), ॲन एन्सायक्लोपीडिआ ऑफ पॅसिफिझम (संपादक, १९३७) इ. त्याचे ग्रंथ महत्त्वाचे आहेत.

हक्सली आपले कुटुंब व हर्ड या मित्रासमवेत अमेरिकेत गेला व कॅलिफोर्नियात स्थायिक झाला. तेथे त्याने आफ्टर मेनी अ समर (१९३९) ही कादंबरी लॉस अँजेल्स येथील कॉलेजच्या अनुभवावर लिहिली. अमेरिकेत ‘बेट्स’ पद्धतीने स्वतःची दृष्टी सुधारण्याचे त्याने प्रयोग केले. त्यावर आधारित द आर्ट ऑफ सिइंग हे पुस्तक त्याने लिहिले (१९४२). प्राइड अँड प्रेजुडिस (१९४०), मादाम क्यूरी (१९४३), जेन आयर (१९४४) इ. चित्रपटांसाठी त्याने पटकथालेखन केले. याशिवाय कथा, काव्य, प्रवासवर्णने इ. अन्य लेखनही त्याने केले.

हर्डने हक्सलीला वेदान्त, ध्यान आणि शाकाहाराची ओळख करून दिली. १९३८ मध्ये हक्सलीचा परिचय भारतीय विचारवंत ⇨ जे. कृष्णमूर्ती यांच्याशी झाला. हक्सलीने त्यांच्या फर्स्ट अँड लास्ट फ्रीडम(१९५४) या ग्रंथाला प्रस्तावना लिहिली. पुढे स्वामी प्रभावानंदांच्या सान्निध्यात तो स्वतः वेदान्ती झालाच परंतु त्याने इंग्रज साहित्यिक ⇨क्रिस्टोफर इशरवुड यालाही या संप्रदायाची दीक्षा दिली. १९४४मध्ये स्वामी प्रभावानंद आणि क्रिस्टोफर इशरवुड याने अनुवादित केलेल्या भगवद्गीतेला त्याने प्रस्तावना लिहिली. स्वामींच्या ‘विवेकानंद सोसायटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निआ’ या संस्थेच्या वेदान्त अँड द वेस्टसाठी त्याने एकूण ४८ लेख लिहिले. वेदान्तावर अनेक व्याख्याने दिली. अत्यंत प्रचलीत आध्यात्मिक मूल्ये व सिद्धांत यांवर द परेनिअल फिलॉसफी (१९४५) हा ग्रंथ लिहून गूढवाद्यांच्या शिकवणीचा परिचय लोकांनाकरून दिला. त्याने निबंध व कादंबरीलेखनातून प्रस्थापित परंपरा, रूढी, सामाजिक संकेत आणि आदर्श यांचे परिशीलन केले आहे.

वाढती लोकसंख्या, सामाजिक विषमता आणि तंत्रज्ञानाचा वापर यांमुळे अस्वस्थ झालेल्या हक्सलीने दुसऱ्या महायुद्धानंतर गूढवादाचा आश्रय घेतला. द डोअर्स ऑफ परसेप्शन (१९५४) व हेवन अँड हेल (१९५६) या त्याच्या ग्रंथांचा हिप्पी संप्रदायावर विशेष परिणाम दिसून येतो. आयलंड ही त्याची आणखी एक उत्कृष्ट कादंबरी.

पहिल्या पत्नीचे निधन झाल्यावर (१९५५) त्याने लॉरा आर्चिरा हिच्याशी दुसरा विवाह केला. तिने दिस टाइमलेस मोमंट (१९६८) या शीर्षकाने हक्सलीचे चरित्र लिहिले. ‘ह्यूमन पोटेन्शिॲलिटीज्’ (मानवीसुप्त सामर्थ्य) या विषयावर त्याने जी व्याख्याने दिली, त्यातून पुढे ‘ह्यूमनपोटेन्शन’ चळवळ निर्माण झाली.

आफ्टर मेनी अ समर या कादंबरीसाठी ‘जेम्स टेट ब्लॅक मेमोरियल प्राइझ’ (१९३९), अमेरिकन अकॅडेमी ऑफ आर्ट्स अँड लेटर्सकडून ‘ॲवॉर्ड ऑफ मेरिट फॉर ब्रेव्ह न्यू वर्ल्ड’ (१९५९) व द रॉयल सोसायटी ऑफ लिटरेचरकडून ‘द कंपॅन्यन ऑफ लिटरेचर’ (१९६२) इ. मानसन्मान त्याला लाभले.

लॉस अँजेल्स येथे त्याचे निधन झाले तथापि त्याचे दफन इंग्लंडमधील त्याच्या मूळ गावी झाले.

संदर्भ : 1. Bedford, Sybille, Aldous Huxley : A Biography, 1974.

           2. Ferns, C. S. Aldous Huxley, London, 1980. 3. Watt, Donald, Aldous Huxley, 1985.  

सावंत, सुनील