हंसराजलाला : (१९ एप्रिल १८६४-१५ नोव्हेंबर १९३८). पंजाबमधील ⇨ आर्यसमाजाचे एक प्रमुख व शिक्षणतज्ज्ञ. त्यांचा जन्म पंजाब प्रांतातील बजवाडा (जि. होशियारपूर) या गावी आई गणेशदेवी व वडील चुनीलाल या दांपत्यापोटी झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर (१८७६) त्यांच्या आईने कठीण परिस्थितीत आपल्या सर्व मुलांना शिकविले. हंसराज यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण होशियारपूर येथे झाले.त्यानंतर लाहोरमधून त्यांनी पदवी घेतली (१८८५). ते विद्यार्थिदशेत असताना त्यांच्यावर आर्यसमाजाचा प्रभाव पडला होता. ते आर्यसमाजाचे सदस्य तर झालेच शिवाय लाला सैनदास आणि ⇨ लाला लजपत राय यांच्यासह ते रिजनरेटर ऑफ द आऱ्यावर्त या आ र्य स मा जा च्या अधिकृत पत्राचे संपादनही करू लागले. पदवी संपादनानंतर वयाच्या बाविसाव्या वर्षी त्यांनी आपले वडील बंधू मुल्कराज यांच्या साहाय्याने लाहोर येथे ‘दयानंद अँग्लो-वैदिक स्कूल’ (डी. ए. व्ही.) ची स्थापना केली (१८८६). या संस्थेत त्यांनी सेवानिवृत्तीपर्यंत कुठल्याही प्रकारचे मानधन वा वेतन न घेता सन्मान्य मुख्याध्यापक, नंतर त्याच संस्थेला संलग्न झालेल्या महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून कार्य केले. पुढे त्यांनी ⇨ स्वामी दयानंद सरस्वतींच्या स्मरणार्थ संपूर्ण पंजाबभर डी. ए. व्ही. या शिक्षण संस्थेच्या शाखा उघडण्यात पुढाकार घेतला.
स्वामी दयानंदांच्या निधनानंतर आर्यसमाजात फूट पडली (१८९३) आणि त्याच्या दोन भिन्न शाखा झाल्या. एका शाखेने मांसाहार व आधुनिक पाश्चात्त्य उच्च शिक्षणाचा पुरस्कार केला, तर दुसऱ्या शाखेने ह्या गोष्टी निषिद्ध मानल्या. या शाखा अनुक्रमे महाविद्यालय पक्ष आणि पुराणमत-वादी पक्ष म्हणून ओळखल्या जात. हंसराज हे महाविद्यालय पक्षाचे नेतेझाले आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी लक्षणीय कामगिरी बजावली.
हंसराज यांनी निवृत्तीनंतर (१९११) आपले उर्वरित जीवन समाज-काऱ्यासाठी वाहून घेतले. बिकानेर येथे पडलेल्या दुष्काळात ख्रिस्ती धर्मप्रचारक अनेक हिंदूंना मदतीच्या बदल्यात धर्मपरिवर्तनास उत्तेजन देतव तसे करीत परंतु हंसराज यांनी पीडित लोकांना दोन वर्षांपर्यंतमदत करून हिंदू लोकांचे धर्मपरिवर्तन थांबविले. या काऱ्यात हंसराज यांना लाला लजपत राय यांचे फार मोठे सहकार्य लाभले. तसेच जोधपूर येथे पडलेल्या दुष्काळात हंसराज यांनी तेथील हजारो मुला-मुलींना आर्य अनाथाश्रमांमध्ये आणून त्यांच्या पालनपोषणाची व्यवस्था केली.क्वेट्टा येथे झालेल्या भूकंपात अनेक लोक मृत्यू पावले, तर अनेक लोक बेघर होऊन त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली होती. त्या वेळी हंसराज बेघरांच्या पुनर्वसनासाठी झटले.
१९२१ मध्ये मलबारात मोपला मुसलमानांनी मोठे बंड करून असंख्य हिंदूंना जबरदस्तीने बाटवून मुसलमान केले. या संकटकाळीलाला कौशलचंद, पंडित मस्तानचंद व इतर आर्यसमाजी नेते व लोकांना सोबत घेऊन हंसराज मोठ्या धैऱ्याने मलबारात गेले आणि सु. अडीच हजार धर्मांतरित हिंदू कुटुंबांना त्यांनी पुनश्च हिंदू धर्मात आणले. त्यांनी विधवा, अस्पृश्य, अनाथ यांना तर मदत केलीच त्याचबरोबर दुष्काळ, पूर,दंगली, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींत सापडलेल्यांनासुद्धा मदत केली. हिंदू समाजाची सर्वांगीण सुधारणा हे त्यांचे ध्येय होते. जातीचा अहंकार, अंधश्रद्धा आणि अज्ञान नाहीसे व्हावे यासाठी ते झटले. बाल-विवाहांना विरोध केला. समाजसेवेसाठी अनेक सेवाभावी संस्थांची स्थापना केली, म्हणून लोकांनी त्यांना आदराने ‘महात्मा’ पदवी बहाल केली.
हंसराज हे कट्टर राष्ट्रवादी होते. सामाजिक संघटनात मूलगामी बदल घडवून आणल्याखेरीज देशात लोकशाही यशस्वी होऊ शकणार नाही, ही त्यांची धारणा होती. औपचारिक शिक्षणाबरोबरच शेतीचे तसेच तांत्रिक आणि औद्योगिक शिक्षणही तरुणांना दिले पाहिजे, या मताचे ते होते. राजकारणाच्या बाहेर कर्तृत्वाची अनेक क्षेत्रे आहेत, असे ते मानत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कर्तृत्वाचा प्रभाव पंजाबवर अनेक वर्षे राहिला.
हंसराज यांचे लाहोर येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या स्मृत्यर्थ ‘महात्मा हंसराज वेदप्रचार निधी’ ही संस्था बाबा गुरुमुख सिंग यांनी स्थापन केली.
गेडाम, संतोष
“