हंगेरी : मध्य यूरोपातील कार्पेथियन खोऱ्यातील भूवेष्ठित देश. क्षेत्रफळ ९३,०३० चौ. किमी. लोकसंख्या ९९,८५,७२२ (२०११ अंदाज ). विस्तार ४५° ४८’ उ. ते ४८° ३५’ उ. अक्षांश व १६° ५’ पू. ते २२° ५८’ पू. रेखांश यांदरम्यान. याच्या उत्तरेस स्लोव्हाकिया, ईशान्येस युक्रेन, पूर्वेस रूमानिया, दक्षिणेस सर्बीया व क्रोएशिया, नैर्ऋत्येस स्लोव्हेनिया व पश्चिमेस ऑस्ट्रिया हे देश आहेत. याच्या सरहद्दीची लांबी २,२४२ किमी. आहे. बूडापेस्ट ही देशाची राजधानी असून लोकसंख्या १७,३३,६८५ (२०११ अंदाज) होती.

भूवर्णन : हंगेरीचा सु. दोनतृतीयांश भाग सस.पासून १९८ मी. पेक्षा कमी उंचीचा आहे. पूर्वेकडील मैदानी भाग, उत्तरेस पर्वतीय प्रदेश,पश्चिमेला लहान-लहान टेकड्या व कमी उंचीचे पर्वत, वायव्येला मैदानी प्रदेश असे याचे सर्वसाधारण स्वरूप आहे. वायव्येकडील मैदानी प्रदेश हंगेरीच्या पूर्वेकडील विस्तीर्ण मैदानी प्रदेशापासून (ग्रेट हंगेरियन प्लेन) नैर्ऋत्य-ईशान्येला पसरलेल्या सु. ४०० किमी. लांबीच्या पर्वत प्रणालीने अलग झालेला आहे.

देशाचे भौगोलिक दृष्ट्या (१) द ग्रेट हंगेरियन प्लेन (द ग्रेट ऑल्फल्ड ), (२) ट्रान्सडॅन्यूबिया, (३) द लिटल ऑल्फल्ड आणि (४) नॉर्दर्न मौंटन्स याप्रमाणे चार विभाग केले जातात.

(१) द ग्रेट हंगेरियन प्लेन (द ग्रेट ऑल्फल्ड) : हा मैदानी प्रदेश डॅन्यूब नदीच्या पूर्व भागात असून या प्रदेशाने देशाच्या भूभागाच्यासु. ५०% क्षेत्र व्यापले आहे. या सखल भूभागाची सस.पासूनची सरासरी उंची ९१ मी. पेक्षा थोडी जास्त तर नद्यांच्या पूरमैदानांपेक्षा फक्त सु. ३० ते ४६ मी.ने जास्त आहे. या विभागात देशातील मैदानी भागांपैकी सर्वांत कमी उंची सेगेड येथे (७८ मी.) आहे. हा हंगेरीतील प्रमुख कृषी प्रदेश आहे. सेगेड, डेब्रेत्सेन, केचकमेट ही या प्रदेशातील प्रमुख शहरे आहेत.

(२) ट्रान्सडॅन्यूबिया : देशाच्या वायव्य कोपऱ्यातील छोटा मैदानी प्रदेश वगळता डॅन्यूब नदीच्या पश्चिमेकडील सर्व भाग ट्रान्सडॅन्यूबियाम्हणून ओळखला जातो. हा प्रदेश बहुतांशी डोंगराळ व पर्वतमय आहे. बॅलटॉन हे सरोवर याच्या मध्यभागी आहे. ऑस्ट्रिया व हंगेरीच्या सरहद्दीवरील आल्प्स पर्वताच्या पायथ्याच्या टेकड्यांचा यात समावेश होतो. त्यांची उंची ९१४ मी. पेक्षा जास्त आहे. बॅलटॉन सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावर नैर्ऋत्य-ईशान्य दिशेत बॉकोन्य, व्हेर्टेश, पिलिश हे लहान पर्वत आहेत. या पर्वतीय प्रदेशाची उंची २१३-७६२ मी. दरम्यान आहे. बॅलटॉन सरोवराच्या पूर्वेस मेझोफिल्ड हा मैदानी भाग व अगदी दक्षिणेकडे ट्रान्सडॅन्यूबियन टेकड्या (समॉज), मेचेक व व्हिलान्य हे पर्वत आहेत. ट्रान्सडॅन्यूबियन डोंगराळ भागात खनिजे असून यूगोस्लाव्हिया सरहद्दीजवळ खनिज तेलाचा शोध लागलेला आहे. या प्रदेशात प्रामुख्याने शेती व पशुपालन हे व्यवसाय चालतात. पेच, एस्टेरगॉम, सेकेशफेअर्व्हार इ. या प्रदेशातील महत्त्वाची शहरे आहेत.

(३) द लिटल ऑल्फल्ड : देशाच्या वायव्य भागात स्लोव्हाकिया व ऑस्ट्रिया सरहद्दीवर, आल्प्स पर्वत पायथ्याच्या टेकड्या व डॅन्यूबनदी यांदरम्यान हा छोटा मैदानी प्रदेश आहे. येथे फेर्ट टो (नॉयझीड्लर) सरोवर आहे. या भागात लोएस व गाळाची मृदा आढळते. हा शेतीच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग आहे. द्यॉर आणि शोप्रोन ही या भागातील प्रमुख शहरे आहेत.

(४) नॉर्दर्न मौंटन्स : कार्पेथियन पर्वत प्रणालीचा भाग असलेला हा उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश द ग्रेट हंगेरियन प्लेनच्या उत्तरेस, डॅन्यूब नदीकिनाऱ्यावरील एस्टेरगॉमपासून ईशान्येस सु. २२५ किमी.पर्यंतआहे. हे पर्वत ज्वालामुखीजन्य असून त्यांमध्ये बॉरॉन्या, सेरहॅट, बूक, मात्रॉ, झेम्प्लेन हे प्रमुख आहेत. मात्रॉ पर्वतातील मौंट केकेश हे १,०१४ मी. उंचीचे देशातील सर्वोच्च शिखर आहे. या प्रदेशात कार्स्ट भूमिस्वरूपे आढळतात. या भागातील ऑग्टलेक येथे बॉरॉदलॉ – डोमिका या गुहा आहेत. येथील गुहा एकमेकींना जोडल्या गेलेल्या असून त्यासु. २५ किमी. लांब आहेत. या गुहा म्हणजे यूरोपमधील सर्वांत मोठी अधोमुख लवणस्तंभ प्रणाली मानली जाते. येथील ऑग्टलेक नॅशनल पार्क प्रसिद्ध आहे. या प्रदेशात अनेक खनिजे असून मिशकोल्त्स हे या भागातील खाण उद्योग केंद्र आहे. तसेच या प्रदेशातील टोकाज हा प्रदेश मद्यनिर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. दिओझद्यर, ओझ्द, शॉल्गोतॉऱ्यान आणि एगर इ. या प्रदेशातील प्रमुख शहरे आहेत.

हंगेरी हा देश डॅन्यूबच्या मध्य खोऱ्यात असून डॅन्यूब व टिस यायेथील प्रमुख नद्या आहेत. डॅन्यूब नदी हंगेरी व स्लोव्हाकिया यांच्या सरहद्दीवरून पश्चिम-पूर्व दिशेने वाहत जाऊन एस्टेरगॉम (बूडापेस्टच्या उत्तरेस) येथे दक्षिणवाहिनी होते. तद्नंतर ती हंगेरीच्या मध्यभागातून उत्तर-दक्षिण दिशेने वाहते. देशांतर्गत जलवाहतुकीच्या दृष्टीने डॅन्यूबला महत्त्व आहे. टिस नदी हंगेरीच्या पूर्व भागात असून ती ईशान्येकडून दक्षिणेकडे वाहते. या देशातील तिची लांबी ५७९ किमी. आहे. बॅलटॉन सरोवरातून उगम पावणारी शिओ, कॉपॉश या नद्यांशिवाय डॅन्यूबच्या उपनद्या राबा व क्रोएशियाच्या सरहद्दीवरून वाहणारी द्रावा या येथील महत्त्वाच्या नद्या आहेत.

बॅलटॉन हे मध्य यूरोपातील सर्वांत मोठे गोड्या पाण्याचे सरोवर या देशात आहे. याची लांबी ७८.१ किमी. व रुंदी ३.१ किमी. ते १४ किमी.पर्यंत असून क्षेत्रफळ ५९८ चौ. किमी. आहे. याशिवाय देशात फेर्ट टो, व्हेलेन्से ही अन्य महत्त्वाची सरोवरे आहेत. तसेच हंगेरीत अनेक गरम पाण्याचे झरे असून यांमध्ये काही औषधी दृष्ट्या महत्त्वाचे आहेत (उदा., हेवेश लेक). बूडापेस्टजवळ असे शंभरपेक्षा जास्त झरे आहेत.


देशाच्या मैदानी भागात काळी मृदा असून बहुतेक भागांत चेस्टनट तपकिरी मृदा आढळते. वनभागात करडी तपकिरी पॉडझॉल मृदा आढळते.

हवामान : हंगेरीच्या विशिष्ट स्थानामुळे येथील हवामान कोरडे, खंडीय प्रकारचे आहे. देशाचे सरासरी वार्षिक तापमान सु. १०° से.असते. हिवाळ्यात जानेवारीतील सरासरी तापमान ०° ते -४° से. पर्यंतव उन्हाळ्यात जुलै महिन्यातील सरासरी तापमान १८° ते २३° से. पर्यंत आढळते. मे, जून व जुलैमध्ये पाऊस पडतो. येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६० सेंमी. आहे.

हंगेरीमध्ये ओक, बीच, चेस्टनट, लिंबूवर्गीय फळांचे वृक्ष आढळतात. यूरोप व आफ्रिकेतून स्थलांतरित होणाऱ्या पक्ष्यांचे हे स्थान आहे.येथे तितर, बगळा, करकोचा, पाकोळी इ. पक्षी व हरिण, रानडुक्कर, ससा, कोल्हा, ऊद मांजर इ. प्राणी आढळतात. जलाशयांत पाइक, ब्रीम, पर्च, कार्प इ. मासे सापडतात. येथे क्रौंच पक्षी संरक्षित करण्यात आला आहे.

इतिहास व राज्यव्यवस्था : नवव्या शतकाच्या अखेरीस मग्यार लोक कार्पेथियन खोऱ्यात आले, तेथे पासून सामान्यपणे हंगेरीच्या इतिहासाचा प्रारंभ मानण्यात येतो. प्रारंभीचे भटके मग्यार हे काळ्या समुद्राच्या उत्तरेस खझार राज्यात राहत होते. ते तेथे व्होल्गा नदी आणि अरल पर्वतीय प्रदेशातून स्थलांतरित झालेले असावेत. मग्यारांच्या सात टोळ्या होत्या व त्यांच्या प्रमुखाला ऑर्पाड म्हणत. यांनी कार्थेजियन खोऱ्यात राहणाऱ्या स्लाव्ह व इतरांचा पराभव केला. नंतर ऑर्पाडांचे वारसदार हंगेरीचे सत्ताधीश झाले. त्यांची सत्ता चौदाव्या शतकाच्या प्रारंभापर्यंत होती. इ. स. ९५५ मध्ये जर्मन राजा पहिला ऑटो याने लेखफेल्ट येथे मग्यारांचा पराभव केला. तद्नंतर ९७२ मध्ये ऑर्पाडांचा प्रमुख गेझा संपूर्ण हंगेरियन संघाचा नेता बनला. त्याने पवित्र रोमन साम्राज्याचा राजा दुसरा ऑटोकडे आपला दूत पाठविला व तो आणि त्याचे कुटुंबीय यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. गेझाचा मुलगा श्टेफनने बव्हेरियन राजकन्या गीझलॉशी विवाह केला. या पहिल्या श्टेफनने (इश्टव्हान) (कार. ९९७-१०३८) बव्हेरियनांच्या साहाय्याने राजसत्तेच्या मार्गातील इतरांना दूर केले. त्याने सिल्व्हेस्टर दुसरा पोप याच्याकडे स्वतःस राजा घोषित करण्याची विनंती केली. पोपने त्याची विनंती मान्य केली व१००० मध्ये तो हंगेरीचा पहिला राजा बनला. त्याने आपल्या जनतेस ख्रिस्ती होण्यास बाध्य केले. याच्या कारकीर्दीत लॅटिन लिपी मग्यार भाषेसाठी उपयोगात आणण्यात आली. त्याने काही किल्ले बांधले व आपल्या कार्यकाळात राजा हा सर्वसत्ताधीश असतो ही संकल्पनाजनतेत दृढ केली. त्याने रोमन कॅथलिक हा देशाचा धर्म घोषित केला. १०८३ मध्ये त्यास कॅथलिक चर्चने सेंट म्हणून घोषित केले.

सेंट श्टेफनच्या मृत्युनंतर (१०३८) दीड शतकाच्या कालावधीत राजघराण्यातील अंतर्गत मत्सर, द्वेष, विध्वंसक कटकारस्थाने वाढलेली होती. राजघराण्यातील अंतर्गत वादाचा हंगेरीवर परिणाम झाला. वारसदारांनी सत्तेसाठी परकीय मदत घेतली परिणामी त्यांना आपल्या राज्यातील काही भाग परकीयांना द्यावा लागला. या राजकीय अशांततेत १०४७ व१०६३ मध्ये ख्रिस्तेतरांचे उठाव झाले. अशी अंदाधुंद राजकीय परिस्थिती असली तरी, येथे पहिला लॅडिस्लास (कार. १०७७-९५) व कॅलमॅन द बुकमॅन (कार. १०९५-१११६) यांच्या कार्यकाळात अंतर्गत वादातून राज्य सावरले व भरभराटीस आले. या कालावधीतच हंगेरीच्या शेजारील ऑस्ट्रिया व इतर देश प्रबळ झाले होते; तथापि या कालावधीत क्रोएशिया व डाल्मेशिया हंगेरीत समाविष्ट झाले व हंगेरीच्या मोठ्या राजसत्तेचा पाया घातला गेला.

बाराव्या शतकात हंगेरीने शेजारील देशांच्या अंतर्गत कारभारात दखल घेण्यास सुरुवात केली. तिसरा बेलॉ (कार. ११७३-९६) याने फ्रेंच राजकन्या मार्गारेट कॅपेटशी विवाह केला. त्याच्या काळात हंगेरीचा राज्यविस्तार झाला व फ्रान्सप्रमाणे सांस्कृतिक विकासही झाला. बहुतेक हंगेरियन फ्रान्समधील पॅरिस विद्यापीठात शिकत होते. एस्टेरगॉम येथील तिसऱ्या बेलॉचा राजवाडा व कॅथीड्रलवर फ्रेंच-रोमनेस्क शैलीचा प्रभाव असल्याचे दिसून येते.

नंतरच्या कालावधीत दुसरा अँड्र्यू याने १२२२ मध्ये बंड केले. यामध्ये राजास ‘गोल्डन बिल’ मान्य करावे लागले त्यामुळे राजाच्या अधिकारावर मर्यादा आली. ॲब्स व सॅक्स यांसारखी मोठी सधन कुटुंबे काही भागातील शासक बनली. यानंतर चौथा बेलॉ (कार. १२३५-७०) याने राजाचे वर्चस्व प्रस्थापिण्यासाठी प्रयत्न केले; मात्र मंगोलांनी १२४१-४२ मध्ये हंगेरीचा ताबा घेतला. दरम्यान हंगेरीची बहुतांश हानी झाली होती. मंगोल येथून जाताच चौथा बेलॉ याने हंगेरीची पुनर्बांधणी केली. नंतर चौथा लॅडिस्लास (कार. १२७२-९०) याच्या कार्यकाळात हंगेरीत पुन्हा गोंधळ निर्माण झाला. तिसरा अँड्र्यू हा कार्यक्षम राजा होता मात्र त्याचे १३०१ मध्ये निधन झाले. तो निपुत्रिक होता. यानंतरच्या दोन शतकांत, तुर्कांच्या हंगेरीवरील अंमलापर्यंत, हंगेरी अनेक यूरोपियन राजघराण्यांच्या आधिपत्याखाली होता. बोहीमियन राजामार्फत बव्हेरियनांकडे व तद्नंतर आंझूचा रॉबर्ट चार्ल्स (कार. १३०८-४२) व त्याचा मुलगा पहिला ल्वी (ल्वी द ग्रेट कार. १३४२-८२) यांचा हंगेरीवर अंमल होता. त्यांच्या कार्यकाळात प्रशासनिक, सैनिकी, आर्थिक व शैक्षणिक सुधारणा झाल्या. पेच (स्था. १३६७) व ओबूडा (स्था. १३९५) यांसारखी विद्यापीठे सुरू करण्यात आली. १३७० मध्ये पहिला ल्वी द ग्रेट हा पोलंडचा राजा म्हणून निवडला गेला.

ल्वीला मुलगा नसल्याने देशास पुन्हा वारसाच्या प्रश्नास सामोरे जावे लागले. ल्वीची मोठी मुलगी मारीया ही पोलंड व हंगेरीच्या गादीवर येऊ शकत होती; मात्र पोलंडने यास विरोध केला. पोलंडची राणी म्हणून पोलंडने पहिल्या ल्वीची धाकटी मुलगी यॅडव्हीगा हिला राणी म्हणून स्वीकारले. हंगेरीच्या मारीयाने लक्सेंबर्गच्या सिगिसमंडशी विवाह केला. परिणामी हंगेरी सिगिसमंडच्या (कार. १३८७-१४३७) आधिपत्यात होते. हंगेरियन साम्राज्याभोवती ऑटोमन तुर्क प्रबळ होत होते. सिगिसमंडचा ऑटोमन तुर्कांच्या विरुद्धच्या स्वारीत निकॉपलिस येथे १३९६ मध्ये पराभव झाला होता. सिगिसमंडच्या मुलीने ऑस्ट्रियाचा पाचवा ॲल्बर्ट याच्याशी विवाह केल्याने सिगिसमंडच्या मृत्युनंतर हंगेरी ॲल्बर्टच्या आधिपत्याखाली आले. जनतेने त्यास काही अटींवर स्वीकारले. त्याने देशाच्या संरक्षणासाठी प्रयत्न केले परंतु तुर्कांशी लढताना त्याचा मृत्यू झाला (१४३९). हंगेरीने राणीस प्रमुख म्हणून स्वीकारण्याऐवजी पोलंडचा तिसरा व्ह्लाडिस्लाफ यास हंगेरीचा राजा म्हणून निवडले. १४४४ मध्ये तुर्कांबरोबरच्या युद्धात हा मारला गेला. त्या वेळी जनतेने ॲल्बर्टचा मुलगा पाचवा लॅडिस्लासयास राजा म्हणून व त्याचा पालक म्हणून जनरल यानोश हून्यॉदी यास नियुक्त केले. त्याने तुर्कांच्या हल्ल्याचा चांगला प्रतिकार केला त्याला चेकोस्लोव्हाकियाच्या यान जिस्क्रा व हॅप्सबर्ग सम्राट तिसरा फ्रीड्रिख यांच्या कारवायांना सामोरे जावे लागले होते. त्याने तुर्कांचा पराभव करून बेलग्रेड जिंकले. तो १४५६ मध्ये मरण पावला. पाचव्या लॅडिस्लासच्या मृत्यूनंतर (१४५७) हून्यॉदीचा मुलगा मथाइअस कॉर्व्हायनस (कार. १४५८-९०) यास हंगेरीचा राजा म्हणून निवडण्यात आले. त्याचा कार्यकाळ हा हंगेरीचे सुवर्णयुग समजले जाते. त्याच्या कार्यकाळात हंगेरीचे राज्य बोहीमिया, सायलीशिया, मोरेव्हिया, लोअर ऑस्ट्रिया इ. ठिकाणी विस्तारले. त्याचा तुर्कांवर वचक होता.


मथाइअसच्या निधनानंतर हंगेरीत अंतर्गत कलह निर्माण झाले. तुर्कांतव हंगेरीत १५२६ मध्ये युद्ध होऊन मॉहाच येथे हंगेरीचा पराभवझाला व हंगेरी तुर्कांच्या आधिपत्याखाली आले. तद्नंतर हंगेरीचे विभाजन होऊन उत्तर व पश्चिम हंगेरी ऑस्ट्रियाच्या, मध्य हंगेरी तुर्कांच्या व ट्रान्सिल्व्हेनिया हंगेरियन राजकुमाराच्या आधिपत्याखाली, परंतु तुर्कांच्या आधिराज्यात राहिला.

ऑस्ट्रियाच्या हॅप्सबर्गांनी १६०० च्या शेवटी ऑटोमन तुर्कांना हंगेरीतून जाण्यास भाग पाडले. १७०० च्या प्रारंभी संपूर्ण हंगेरी हॅप्सबर्गांच्या ताब्यात आले. ते हंगेरीतील जनतेशी, विशेषतः प्रॉटेस्टंट पंथीयांशी, अत्यंत क्रूरपणे वागत होते. यामुळे देशात १७०३ मध्ये फेरेन्टस् राकोत्सी याच्या नेतृत्वाखाली उठाव झाला. हॅप्सबर्गांनी या उठावाचा बिमोड केला (१७११) मात्र त्यानंतर त्यांना हंगेरीत आर्थिक व राजकीय सुधारणा करणे भाग पडले.

एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी काउंट श्टेफॉन सेचेन्यी याने देशात हंगेरियन संस्कृतीबद्दलचा राष्ट्रीय अभिमान जागृत केला. आर्थिक व सामाजिक सुधारणांसाठी तो आग्रही होता. १८३० मध्ये लॉयोश कॉसूथ या सुधारणावादी चळवळीच्या नेत्याने हंगेरियन स्वातंत्र्याची चळवळ उभारली. या वेळी यूरोपात लोकशाहीवादी व उदार राष्ट्रवादी चळवळ सुरू होती. तसेच फ्रान्समधील क्रांतीचा परिणाम येथेही झाला. ऑस्ट्रियाने हंगेरीत लॉयोश बॉथ्यॅनी याची राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड करून संसदेस बांधील अशा सरकारची नियुक्ती केली. ही शासनव्यवस्था ऑस्ट्रियाचा राजा फर्डिनँड याचा वारसदार फ्रान्सिस जोझेफ यास मान्य नव्हती. क्रांतिकाळी कॉसूथ हंगेरियन सरकारचा प्रमुख झाला. त्याने १४ एप्रिल १८४९ ला हंगेरी ऑस्ट्रियापासून स्वतंत्र झाल्याची घोषणा केली मात्र ऑस्ट्रियाने रशियाच्या मदतीने हंगेरीचा पराभव केला व हंगेरीवर पुन्हा सत्ता प्रस्थापित केली. लॉयोश कॉसूथ तेथून परागंदा झाला.

व्हिएन्ना परिषदेच्या मताविरोधी राष्ट्रवादी मतांचे लोक एकत्रित येतहोते. तसेच येथील काही लोकांची हंगेरीच्या पूर्ण स्वातंत्र्याची मागणीहोती. या वेळी ऑस्ट्रियाचा इटली, फ्रान्स व प्रशिया यांच्याबरोबरच्या युद्धात पराभव झालेला होता. त्यांच्या रशियापासूनच्या अलिप्तपणामुळे ऑस्ट्रियाला हंगेरीबरोबर तह करावा लागला (१८६७) व परिणामी ऑस्ट्रो-हंगेरियन जोडराजेशाही अस्तित्वात आली. यामुळे ऑस्ट्रिया-हंगेरीत राजेशाही व स्वतंत्र सरकारे असे दोघेही कारभार पाहू लागले. याचवेळी पहिले महायुद्ध सुरू झाले. या युद्धात ऑस्ट्रिया-हंगेरीचा पराभव झाला. १६ नोव्हेंबर १९१८ रोजी हंगेरियनांनी बंड करून स्वतंत्र हंगेरियन प्रजासत्ताकाची घोषणा केली व काउंट मायकेल कारोल्यी हा राष्ट्राध्यक्ष झाला; मात्र कारोल्यीस १९१९ मध्ये राजीनामा द्यावा लागला व बेलॉ कुन या साम्यवादी नेत्याची नेतेपदी निवड झाली. याने हंगेरियन सरहद्दीचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला मात्र रूमानियाच्या हल्ल्याचा तो प्रतिकार करू शकला नाही. यामुळे त्यास सत्तेवरून पायउतार व्हावे लागले. नोव्हेंबर १९१९ मध्ये कारोल्यी हुसॅर हा राष्ट्राध्यक्ष झाला व १९२० मध्ये निवडणुका होऊन संसद अस्तित्वात आली. मात्र १ मार्च १९२० ला ऑस्ट्रिया-हंगेरी नौदलाचा ॲडमिरल मिक्लोश होर्ती रिजंट म्हणून सत्तेवर आला. त्याने २५ वर्षे कारभार केला. येथे पुन्हा राजाशिवाय राजसत्ता सुरू झाली. हुसॅर याच्या राजीनाम्यानंतर १४ मार्च १९२० रोजी शांडोर सिमोनी सेमॅडमच्या नेतृत्वाखाली संमिश्र सरकार स्थापन झाले. या वेळी राजा चार्ल्स याने हंगेरीच्या राजसत्तेवर येण्याचा दोन वेळा प्रयत्न केला परंतु त्यामध्ये त्याला अपयश आले.

हंगेरीस पहिल्या महायुद्धातील पराभवामुळे ४ जून १९२० रोजीचा त्रीआनोचा तह मान्य करावा लागला. त्यामुळे हंगेरीला ऑस्ट्रियापासून स्वातंत्र्य मिळाले; परंतु त्यांना आपला ७२% भूप्रदेश गमवावा लागला आणि त्यांची ६४% जनता इतर देशांत विभागली गेली. हंगेरीला रूमानिया, चेकोस्लोव्हाकिया, यूगोस्लाव्हिया यांना नुकसानभरपाई द्यावी लागली. हंगेरीच्या सैन्यसंख्येवर मर्यादा आली.

पहिल्या-दुसऱ्या व्हिएन्ना परिषदेनुसार हंगेरीस चेकोस्लोव्हाकियाकडून ११,९१७ चौ. किमी. व ट्रान्सिल्व्हेनियाकडून ४१,४५१ चौ. किमी. भूप्रदेश मिळाला. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीतील नाझीशाहीचा परिणाम हंगेरीवरही झाला. तत्कालीन पंतप्रधान लॅस्लो बॅर्डोसी याने या महायुद्धात जर्मनीस साहाय्य केले. परिणामी रिजंट होर्ती याने त्याच्याशी सल्लामसलत न करता त्याला पदावरून दूर केले व मिक्लोश कॅल्लॉय यास पंतप्रधान केले. कॅल्लॉय याने दोस्त राष्ट्रांशी सल्लामसलत करण्यास प्रारंभ केला. यावेळी हिटलरने हंगेरीचा ताबा घेतला. यात अंदाजे ४,००,००० हंगेरियन ज्यू मारले गेले. होर्तीने जर्मनीशी संबंध तोडले. परिणामी त्यास अटक झाली; मात्र तद्नंतर रशियाने हंगेरी जिंकला व जर्मनीचा दुसऱ्या महायुद्धात पराभव झाला. परिणामी हंगेरीस १९३८ पासून अन्य देशांचा घेतलेला भूप्रदेश परत करावा लागला.

हंगेरीत १९४५ मध्ये निवडणुका घेण्यात आल्या, यावेळी संमिश्र सरकार सत्तेवर आले. १९४६ मध्ये हंगेरी प्रजासत्ताकाची घोषणा करण्यात आली. १९४७ मध्ये पुन्हा निवडणुका झाल्या. या वेळीही कम्युनिस्टांना बहुमत मिळाले नाही मात्र त्यांचे नेते राजकारणात महत्त्वाच्या स्थानीहोते. यावेळी कम्युनिस्ट पक्षाने अधिकृत राजकीय पक्ष म्हणून मान्यता प्राप्त केली व अन्य पक्षांवर बंदी घालण्यात आली. १९४९ मध्येहंगेरीत रशियाच्या संविधानावर आधारित संविधान तयार करण्यात आले. कम्युनिस्ट कार्यकाळात अनेक उद्योग सुरू झाले; तथापि शेतीलाही प्राधान्य देण्यात आले. १९५० च्या प्रारंभी हंगेरियन सरकारचा प्रमुख मथाइअस रॅकोशी या कम्युनिस्ट नेत्याविरुद्ध जनतेत असंतोष होता. त्यामुळे १९५३ मध्ये इम्रे नादी याची रॅकोशीच्या जागी निवड करण्यात आली; मात्र रॅकोशी कम्युनिस्ट पक्षाच्या प्रमुखपदी कायम होता. नादीने हंगेरीतील जनतेस वैयक्तिक स्वातंत्र्य दिले व त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न केले. मात्र रॅकोशी व इतर कम्युनिस्ट नेत्यांनी त्यास विरोध करून १९५५ मध्ये त्यास सरकारमधून व पक्षातून दूर केले.


रॅकोशीच्या धोरणाविरुद्ध हंगेरियन जनतेत असंतोष वाढला; परिणामी त्यास पक्षप्रमुख पदावरून दूर करण्यात आले; मात्र त्याचीच धोरणे अंमलात होती. १९५६ मध्ये हंगेरीत राजकीय उठाव झाला व इम्रे नादी पुन्हा पंतप्रधान झाला. त्याने हंगेरी तटस्थ देश असल्याचे जाहीर केले; मात्र अल्पावधीतच रशियाने सैन्यबळाने हा असंतोष दूर केला. या वेळी हजारो हंगेरियन मारले गेले व अनेकांना तुरुंगात डांबण्यात आले. नादी व त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध उठावास मदत केल्याचे आरोप ठेवण्यात आले. त्यांच्याविरुद्ध राजद्रोहाचा आरोप सिद्ध झाला व त्यांना १९५८ मध्ये देहान्तशासन करण्यात आले. पुढे १९८९ मध्ये ते अन्यायिक असल्याचे जाहीर करण्यात आले.

रशियाने १९५६ च्या क्रांतीनंतर हंगेरीवर पूर्णतः वर्चस्व ठेवले. या काळात यॉनोश कादर हा (१९५६-५८ व १९६१-६५) पक्षप्रमुख व पंतप्रधानपदी होता. त्याच्या कार्यकाळात त्याने पुन्हा क्रांती होऊ नये यासाठी प्रयत्न केले व जनतेवरील सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक बंधने काही अंशी शिथिल करून जनतेचा विश्वास संपादण्याचा प्रयत्न केला.

हंगेरियन प्रशासनाने १९६८ मध्ये न्यू इकॉनॉमिक मेकॅनिझम( एन्इएम्) हा आर्थिक कार्यक्रम अवलंबिला. यामुळे १९८० च्या दशकात आर्थिक सुधारणा होऊन हंगेरियन व रशियन कम्युनिस्टांमधील विरोधकमी झाला. या कालावधीत व्यापारी तूट कमी करणे व अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्याचवेळी संविधानात काहीसुधारणा करण्यात आल्या व १९८९ मध्ये हंगेरी प्रजासत्ताक असल्याचे पुन्हा जाहीर करण्यात आले. १९९० पासून हंगेरीत बहुपक्षीय निवडणुकीस सुरुवात झाली. २ मे २०१२ पासून यानोश ॲदर हे राष्ट्राध्यक्ष आहेत.

राज्यव्यवस्था : येथील राज्यकारभार १९४९ च्या संविधानाप्रमाणे चालतो. प्रस्तुत संविधानात एप्रिल २०११ मध्ये सुधारणा करण्यात आली असून १ जानेवारी २०१२ पासून ते अंमलात आले आहे. या संविधानाप्रमाणे नॅशनल असेंब्ली ही संसद एकगृही असून तिचे २०० सदस्य आहेत. हे सदस्य १८ वर्षांवरील प्रौढ मताधिकाराने व पक्षास प्राप्त होणाऱ्या मतांच्या आधारे प्रमाणशीर प्रतिनिधित्वाने चार वर्षांसाठी निवडण्यात येतात. नॅशनल असेंब्लीतील सदस्यांमार्फत पंतप्रधानांची व राष्ट्राध्यक्षांची अनुक्रमे चार व पाच वर्षांसाठी निवड करण्यात येते. प्रशासकीय सोयीसाठी हंगेरीचे १९ परगण्यांत विभाजन करण्यात आले आहे.

हंगेरी १९५५ मध्ये यूनोत सहभागी झाला असून १९९९ मध्ये नाटोचा सदस्य झाला आहे. हा देश २००४ मध्ये यूरोपीय संघात सहभागी झाला. देशातील सक्तीची सैनिकी सेवा नोव्हेंबर २००४ पासून रद्द करण्यात आली आहे. नोव्हेंबर २०११ मध्ये देशात २२,५८७ सैन्य होते. राष्ट्राध्यक्ष हा सैन्यदलाचा प्रमुख असतो.

नॅशनल असेंब्लीने सहा वर्षांसाठी निवडलेला अभियोक्ता न्यायव्यवस्था पाहतो. सर्वोच्च न्यायालय न्यायदानात सर्वश्रेष्ठ आहे. याशिवाय कौंटी, जिल्हा, कामगार विषयक, सैनिकी इ. न्यायालयांमार्फत न्यायदान होते. येथे १११ स्थानिक न्यायालये, २० कामगार न्यायालये, २० कौंटी न्यायालये, ६ जिल्हा न्यायालये आहेत. देशात ऑक्टोबर १९९० पासून देहान्ताची शिक्षा रद्द करण्यात आली आहे.

आर्थिक स्थिती : हंगेरीची अर्थव्यवस्था दुसऱ्या महायुद्धापर्यंत शेतीवर अवलंबून होती मात्र १९४८ च्या सुरुवातीस सोव्हिएट रशियाच्या धर्तीवर हंगेरीने औद्योगिकीकरणाचे धोरण अवलंबिल्याने उद्योगक्षेत्रातनवीन रोजगारनिर्मिती झाली. परिणामी शेतीवरील अवलंबित्व कमी झाले. लोखंड, पोलाद, यंत्रसामग्री यांसारख्या अवजड उद्योगांची भरभराट झाली. १९६० च्या शेवटी येथे मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार करण्यात आला. खाजगीकरणाच्या योजना सुरू करण्यात आल्या. १९८० च्या शेवटी हंगेरीच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनात एकतृतीयांश हिस्सा खाजगी क्षेत्राचा होता. १९७३ नंतर हंगेरीस आर्थिक संकटास सामोरे जावे लागले होते. या वेळी विकासदर कमी होऊन चलनवाढ झाली होती.

अलिकडील काळात हंगेरीत खाजगीकरणात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन राष्ट्रीय उत्पादनात सेवाक्षेत्राचा वाटा ८०% पर्यंत झाला होता मात्र २००५ पासून ही वाढ मंद आहे. बेकारीत वाढ होऊन २००९ मध्ये बेकारीचे प्रमाण १०.१% झाले होते.

अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्यासाठी हंगेरी प्रशासनाने विविध उपाय योजले असल्याने गुंतवणुकीत वाढ झाली आहे. तसेच जुलै २००९ मध्ये शासनाने १ महापद्म यूरोच्या रोख्यांची आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री करून भांडवल जमा केले आहे.


कृषी : शेती हा हंगेरियन अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक आहे. हा देश अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण आहे. देशाच्या भूक्षेत्रापैकी दोन-तृतीयांश क्षेत्र लागवडीखाली आहे. प्रारंभीच्या सामुदायिकीकरणाच्या धोरणात १९९० मध्ये बदल करण्यात आला. त्यानुसार जे शेतकरी शेती करण्यास तयार असतील, त्यांना त्यांची जमीन परत करण्यात आली. एप्रिल १९९४ च्या कायद्याने प्रत्येकास ३०० हे. पर्यंत शेतजमीन खरेदी करण्यास अनुमती देण्यात येऊन, लागवडयोग्य जमीन विक्रीस व संरक्षित क्षेत्रातील जमीन कंपन्यांना व परकीयांना विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. कृषिक्षेत्रात (वन, मासेमारीसह) ४.५% लोक कार्यरत होते (२००९). तसेच एकूण राष्ट्रीय उत्पादनात कृषिक्षेत्राचा हिस्सा ३.८% होता (२०१०). देशात बार्ली, गहू, मका, सूर्यफूल, साखरबीट, सफरचंद, बटाटे, द्राक्षे इत्यादींचे उत्पादन घेतले जाते.

शेतीस पूरक म्हणून गुरे, मेंढ्या, डुकरेपालन व कुक्कुटपालन व्यवसायांत वाढ होत आहे.

देशात एकूण भूक्षेत्राच्या २३% वनक्षेत्र होते. वनांपासून ५ लक्ष ७४० हजार घ. मी. लाकूड मिळाले होते (२०१०).

हंगेरीत डॅन्यूब, टिस, द्रावा इ. नद्यांमधून तसेच बॅलटॉन सरोवरात मासेमारी केली जाते. त्यांमध्ये कार्प, सिल्व्हर कार्प, ब्रीम, पाईक इ.महत्त्वाचे आहेत.

उद्योगधंदे : हंगेरीत साम्यवादी धोरणात औद्योगिकीकरणास प्रोत्साहन दिल्याने १९८० पर्यंत उद्योगधंद्यांत भरभराट झाली होती. थोड्या कालावधीत खाणउद्योग, रसायन, अभियांत्रिकी उद्योग भरभराटीस आले. १९९० नंतर उद्योगधंद्यात आधुनिकीकरण व नवीन तंत्रज्ञान अवलंबिण्यात आले. परकीय गुंतवणूक वाढली. परिणामी वाहतूक साधने, दळणवळण, यांत वाढ झाली. येथील उद्योगधंदे बूडापेस्ट, डुनॉऊईव्हारोश, मिशकोल्त्स, सेगेड, डेब्रेत्सेन, द्यॉर या ठिकाणी केंद्रित झालेले आहेत. उद्योगक्षेत्राचा ( खाणकाम, बांधकाम, ऊर्जा, वायुनिर्मिती) २०१० मध्ये एकूण राष्ट्रीय उत्पादनात ३१.३% हिस्सा होता व या उद्योगांत एकूण कामकरी लोकां-पैकी ३२.१% लोक गुंतले होते. देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनात सेवाक्षेत्राचा ६४.९% हिस्सा होता (२०१०). २००८ मध्ये उद्योगातील प्रमुख उत्पादन पुढीलप्रमाणे (हजार मे. टन) : कच्चे पोलाद २,१६०, सिमेंट ३,५४४, साखर १८८.

उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश व ट्रान्सडॅन्यूबियातील खाणींतून लिग्नाइट कोळसा, तर कोम्लो येथील खाणींतून उच्च दर्जाचा अँथ्रासाइट कोळसा काढण्यात येतो. ट्रान्सडॅन्यूबियन व सेगेड खोऱ्यात आणि झाला परगण्यात तेल व नैसर्गिक वायू काही प्रमाणात मिळतो. २००७ मध्ये नैसर्गिक वायूचे उत्पादन २.७ महापद्म घ. मी. होते. देशात बॉक्साइट हे प्रमुख खनिज असून बॉकोन्य पर्वतीय प्रदेशात हे जास्त प्रमाणात मिळते. याशिवाय मँगॅनीज, लोह, पारा, मॉलिब्डेनम, डोलोमाइट ही खनिजेही देशात आहेत. मेचेक पर्वतीय भागात पेचनजीक युरेनियम मिळते.

देशाची विद्युत्निर्मिती क्षमता २००७ मध्ये ८.५ द. ल. किवॉ. होती व यामध्ये सु. एक पंचमांश हिस्सा अणुऊर्जेचा होता. पेच येथे २,००० मेवॉ. क्षमतेचा अणुऊर्जा प्रकल्प आहे. सॅइहॅलोम्बॅटा, लेनिनव्हारोश, व्हिसोंटा येथील औष्णिक विद्युत् प्रकल्प देशात महत्त्वाचे आहेत. टिसव डॅन्यूब या नद्यांवरील धरणांपासून काही प्रमाणात जलविद्युत्निर्मितीकरण्यात येते.

वित्त : २६ जुलै १९४६ पासून फॉरिंट हे देशाचे चलन असून१०० फिलर = १ फॉरिंट होतो. ३० डिसेंबर २०११ रोजी विनिमय दर पुढीलप्रमाणे होता : १,००० फॉरिंट = २.६९ पौंड = ४.१५ अमेरिकन डॉलर = ३.२१ यूरो. द नॅशनल बँक ही देशातील प्रमुख बँक असून हिच्यामार्फत मुद्रा धोरण व परकीय विनिमय धोरण निश्चित केलेजाते. द नॅशनल सेव्हिंग्ज ही देशातील मोठी बँक आहे. याशिवायहंगेरियन कमर्शियल अँड क्रेडिट बँक, हंगेरियन फॉरेन ट्रेड बँक याअन्य महत्त्वाच्या मोठ्या बँका आहेत. देशात २०१० मध्ये ३० व्यापारी बँका होत्या. हंगेरीतील बँकिंग क्षेत्राचे वित्तीय प्राधिकरणामार्फत पर्यवेक्षण केले जाते. देशात २,३७७ द. ल. अमेरिकन डॉलरची परकीय गुंतवणूक होती व ३३ विमा कंपन्या होत्या (२०१०).

हंगेरीच्या २०११ च्या अंदाजपत्रकानुसार ८,११०.६ हजार द. ल. फॉरिंट जमा व ९,२४८.७ हजार द. ल. फॉरिंट खर्च दर्शविण्यात आला होता.

देशाच्या आयातीत आधुनिक यंत्रसामग्री, वाहने, रसायने, नैसर्गिकवायू , खनिज तेल यांचा व निऱ्यातीत ॲल्युमिना, विद्युत्साहित्य, फळे, भाजीपाला, यंत्रसामग्री, मांस, औषधे, पोलाद, वाहतूक साहित्य इत्यादींचा समावेश असतो. ऑस्ट्रिया, फ्रान्स, जर्मनी, इटली, रशिया, स्पेन, स्वीडन, स्वित्झर्लंड, ग्रेट ब्रिटन, चीन, जपान, अमेरिका, पोलंड, रूमानिया इ. देश व्यापारातील सहकारी आहेत. २००७ मध्ये ७९.१% निऱ्यात यूरोपियन संघातील देशांना होत होती २६.८% आयात जर्मनीतून व २८.४% निर्यात जर्मनीस झालेली होती.


वाहतूक व संदेशवहन : हंगेरीत रस्ते, लोहमार्ग, हवाई व जलवाहतूक विकसित झालेली आहे. हंगेरीतील लोहमार्ग बूडापेस्टभोवती केंद्रित झालेले आहेत. याशिवाय देशातील झोल्नहोफन, सेचेन्य, पेच, सेगेड, सेकेशफेअर्व्हार ही अन्य महत्त्वाची लोहमार्ग स्थानके आहेत. देशात २००९ मध्ये ७,७९३ किमी. लांबीचे लोहमार्ग होते. बूडापेस्ट, सिरामॉल्टस, सेगेड, डेब्रेत्सेन या शहरांत मेट्रो रेल्वे आहेत.

देशात बूडापेस्ट (फेरेन्क लिस्ट ), डेब्रेत्सेन, सॅर्मेलेक, दयर, पेच या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. देशात विझ एअर ही मोठी हवाई वाहतूक कंपनी आहे.

देशात २००८ मध्ये १,४४० किमी. लांबीचा जलमार्ग होता. डॅन्यूब नदीतून जलवाहतूक होते. बूडापेस्ट, बॉयॉ, डुनॉऊईव्हारोश ही महत्त्वाची बंदरे आहेत.

हंगेरीत २०१० मध्ये २,९७७.२ (हजार) दूरध्वनिधारक , १२,०११.८ (हजार) भ्रमणध्वनीधारक, १,९५६.२ (हजार) ब्रॉडब्रँडधारक होते. हंगेरीत नभोवाणी ध्वनिक्षेपणाचे द हंगेरियन ब्रॉडकास्टिंग कंपनीमार्फत संचालन होते. नभोवाणीवरून हंगेरियन, जर्मन, इंग्रजी व इतर पाच परकीय भाषांतून प्रसारण होते. दूरचित्रवाणी १९५७ पासून सुरू आहे.

देशात २००६ मध्ये ३१ वृत्तपत्रे प्रसिद्ध होत होती व त्यांचा दैनिक खप १७,७५,००० होता. यांमध्ये मेट्रोपोल, ब्लिक, इसॅक केलेटी नॅप्लो, किशालफोल्ड, मग्यार नेमझेट, नेमझेटी स्पोर्ट, नेप्सझॅबॅलसॅग, झालाइ हिर्र्लॅप ही प्रसिद्ध दैनिके आहेत.

लोकवसमाजजीवन : हंगेरीमध्ये लोकसंख्येची घनता दरचौ. किमी.ला १०७.३ होती (२०११). जननदर हजारी ९ व मृत्युदर हजारी १३ होता (२०१०). लोकांचे सरासरी आयुर्मान ७४ वर्षे होते यामध्ये स्त्रियांचे ७८ व पुरुषांचे ७० होते (२००९). स्त्रियांतील जननक्षमता १.४ व ५ वर्षांखालील बालमृत्युचे प्रमाण हजारी ६ होते (२००९). महिलांना कायद्याने समान हक्क आहेत.

हंगेरीत बहुसंख्य लोक हंगेरियन मग्यार आहेत. देशाच्या लोकसंख्येत ८३.७% हंगेरियन, १.३% जर्मन, ०.३% स्लोव्हाक, ०.२% रूमानियन, ०.२% क्रोएटस्, ०.१% सर्ब, ३.१% जिप्सी (रोमा) व ११.१% इतर होते. यांमध्ये ३९% रोमन कॅथलिक, ११.६% कॅल्व्हिनिस्ट, १.८% ग्रीक कॅथलिक, २.२% ल्युथर, १.५% ॲथेइस्ट व १.९% इतर धर्मीय आणि कोणत्याही धर्मात समाविष्ट नाहीत असे १६.७% होते (२०११).

हंगेरीत बहुसंख्य ग्रामीण लोक लहानशा घरांत राहतात. शहरांतील लोक सदनिका किंवा स्वतंत्र घरांत राहतात. रोजगारानिमित्त शहरी भागाकडे लोकांचा ओढा असल्याने शहरात घरांची कमतरता आहे. सदरची कमतरता एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासून जाणवत आहे. येथील शहरी लोकांचा पोशाख पश्चिम यूरोपियन व उत्तर अमेरिकन लोकां-प्रमाणे आहे. ग्रामीण भागात लोक रंगीबेरंगी व हस्तकलाकाम केलेले पोशाख परिधान करत परंतु आता अशा प्रकारचा पेहराव ते सण-समारंभ, उत्सव अशा प्रसंगी करतात.

हंगेरियन लोकांच्या जेवणात सूप प्राधान्याने असते. गाउलॅश व पॅपरिका टी हे येथील आवडते पदार्थ आहेत. कॉफी, मद्य, बिअर ही आवडती पेये आहेत. हंगेरी मद्यासाठी प्रसिद्ध आहे.

शिक्षण : हंगेरीत ६ ते १६ वर्षे वयाच्या मुलांना शिक्षण मोफत व सक्तीचे आहे. १९४८ मध्ये शिक्षणाचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले आहे. प्रौढ साक्षरता ९९.४% होती (२००९). १४ वर्षे वयापर्यंत मुले प्राथमिक व तद्नंतर माध्यमिक शिक्षण घेतात. माध्यमिक स्तरावर ग्रामर स्कूल व व्होकेशनल (तांत्रिक) स्कूल असे प्रकार असून ग्रामर स्कूलमधून पारंपरिक यूरोपियन माध्यमिक शाळांप्रमाणे शिक्षण देण्यात येते, तर तांत्रिक शाळांतून पारंपरिक शिक्षणाबरोबर कृषी, व्यापार, उद्योग यांबाबत शिक्षण देण्यात येते.

उच्च शिक्षणाच्या संस्था शासन व चर्चमार्फत चालविल्या जातात. उच्च शैक्षणिक संस्थांत लोरांट अट्व्हश विद्यापीठ, बूडापेस्ट लॉयोश कॉसूथ विद्यापीठ, डेब्रेत्सेन जेनस पॅनोनिअस विद्यापीठ, पेच ॲटिला जोसेफ विद्यापीठ, सेगेड इ. प्रसिद्ध आहेत. हंगेरीने २००७-०८ मध्ये एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या ५.२% व एकूण शासकीय खर्चाच्या १४.४% खर्च शिक्षणावर केलेला होता.

बूडापेस्ट येथील राष्ट्रीय सेचेन्यी ग्रंथालय हे हंगेरीतील सर्वांत मोठे ग्रंथालय आहे. तसेच येथील एर्बिन सॅबो नगरपालिका ग्रंथालय, लोरांट अट्व्हश विद्यापीठ ग्रंथालय, द हंगेरियन ॲकॅडमी ऑफ सायन्सेसचे ग्रंथालय ही ग्रंथालये मोठी आहेत.

हंगेरियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसची स्थापना १८२५ मध्ये झाली असून, ही संस्था हंगेरीतील महत्त्वाची संशोधन संस्था आहे.


हंगेरीतील प्रसिद्ध शास्त्रज्ञांत लोरांट अट्व्हश, ॲनोस जेडलिक, शांडोर फेरेन्सी, इग्नाझ फिलिप सिमेलव्हाईस, बेलॉ शिक, थिओडर व्हान कॅरमॅन, लॅस्लो बिरो, कॅलमॅन टिटॅनी, फेरेन्टस् क्राउस, ॲरपड युस्टॅ, इर्नो रूबिक यांचा समावेश होतो. हंगेरीमध्ये जन्मलेल्या ऑल्बेर्ट सेंट-ड्यर्ड्यी फोन नॉडीरापोल्ट, गेऑर्ख फोन बेकेसे, झॉर्झ दे हेव्हेशी, डेनिस गॅबर या शास्त्रज्ञांनी नोबेल पारितोषिके प्राप्त केली आहेत. तसेच अमेरिकेतील लिओ त्सिलार्ड, यूजीन विगनर, जॉन फोन नॉयमान व एडवर्ड टेलर या हंगेरियन शास्त्रज्ञांचे अणुसंशोधनात महत्त्वाचे योगदान आहे.

आरोग्य : हंगेरियन लोकांचे आयुर्मान इतर यूरोपीय देशांच्या तुलनेत कमी आहे. मद्यप्राशन, तंबाखू सेवन येथे अधिक असून, हृदयरोगाचेप्रमाण जास्त आहे. साम्यवादी राजवटीत आरोग्यसुविधा प्राप्त झाल्याने या कालावधीत डॉक्टर व रुग्णालये यांच्या संख्येत वाढ झालेली होती आरोग्यसेवा मोफत होती. मात्र १९९२ पासून लोकांना वैद्यकीय विमा घेणे बंधनकारक असून, याचे शुल्क उत्पन्नाच्या किमान १०% द्यावे लागते. २००९ मध्ये एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या ७.३% खर्च आरोग्य सेवेवर करण्यात आला होता.

कला व क्रीडा : हंगेरीत एकोणिसाव्या शतकात चित्रकलेस विशेष महत्त्व होते. मिहालय मंकॅसी, व्हिक्टर मॅदॅरस्झ, पॉल सिनेई मेर्से, बेर्टलॅन सेकेली, मिहालय झिसी, इश्टव्हान सोक या रंगचित्रकारांना आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त झाली आहे.

इश्टव्हान फेरेन्सी व त्याचा शिष्य मिक्लोश इसो हे हंगेरीचे एकोणिसाव्या शतकातील प्रसिद्ध शिल्पकार व गॉर्गी झॅला ॲल्जॉस स्ट्राब्ल, सिगमाँड किस्फॅलोरी स्ट्राब्ल हे प्रसिद्ध वास्तुशिल्पज्ञ होत.

एकोणिसाव्या शतकातील संगीतात संगीतकार फ्रॅझ लिस्ट व हंगेरियन राष्ट्रगीताचा आणि बॅक बॅनचा संगीतकार फेरेन्टस् एर्केल यांचे योगदान महत्त्वाचे आहे. बेलॉ बॉर्टोक, झोल्टान कोडालय, सर गेऑर्क सोल्टी, अन्टाल डोरॅटी, आन्द्रॅश शिफ, पाँग्रक कॅसो, इम्रे कॅलमॅन, फेरेन्टस् लेहार, पॉल आब्राहाम हे संगीतकार आणि ॲनी फिशर व झोल्टान कोसीस हे पियानोवादक प्रसिद्ध आहेत.

चित्रपट उद्योगाचे १९४८ मध्ये राष्ट्रीयीकरण करण्यात आले. इश्टव्हान होमोकी नेगी, मिक्लोश जॅन्सो, इश्टव्हान सॅबो यांच्या चित्रपटांमुळे हंगेरियन चित्रपटांना आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त झाली.

फुटबॉल हा हंगेरीमधील आवडता खेळ आहे. याशिवाय ॲथलेटिक्स, वॉटरपोलो, टेनिस, जलतरण, बुद्धिबळ, भारतोलन, नेमबाजी, मुष्टियुद्ध, कुस्ती हेही येथील आवडते खेळ आहेत.

महत्त्वाची स्थळे : हंगेरीतील अनेक शहरांस असणारे ऐतिहासिक महत्त्व, तेथील अनेक आकर्षण स्थळे, बॅलटॉन सरोवरातील नौकाविहारव स्नान, मत्स्यपारध खेळ, येथील पुरातत्त्वीय दृष्ट्या महत्त्वाची स्थळे इत्यादींमुळे अनेक पर्यटक देशास भेट देतात.

हंगेरीत बूडापेस्ट येथील डॅन्यूब नदीचा किनारी भाग व बूडाकिल्ला, होल्लॉको परिरक्षित वसाहत, पॅनोन्हॅल्माचा मठ, पेच येथील ख्रिश्चन स्मशानभूमी, हजारो वर्षांपासूनचा दारू निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेला टोकाज वाईन ऐतिहासिक व प्रेक्षणीय प्रदेश, ऑग्टलेक व स्लोव्हाक कार्स्ट गुहाक्षेत्र (स्लोव्हाकियाशी संबंधित), हॉर्टॉबादया राष्ट्रीय उद्यान, विविध संस्कृतींचे मीलनस्थळ ‘लँडस्केप ऑफ फेर्ट टो’ इत्यादींना पुरातत्त्वीय दृष्ट्या महत्त्व असून, त्यांचा युनेस्कोच्या जागतिक पुरातत्त्वीय यादीत समावेश आहे. बूडापेस्ट हे राजधानीचे व देशातील प्रमुख ऐतिहासिक, सांस्कृतिक, औद्योगिक, शैक्षणिक व प्रशासकीय केंद्र आहे. याशिवाय देशात द्यॉर, सेकेशफेअर्व्हार, एस्टेरगॉम, शोप्रोन, डेब्रेत्सेन, केचकमेट, पेच, कॉसेग, सेगेड, टोकाज इ. प्रमुख व मोठी शहरे आहेत.

गाडे, ना. स.


हंगेरी
संसदभवन व्हिशेग्राड येथील ऐतिहासिक किल्ला, १३ वे शतक.
राजधानी बूडापेस्ट : विहंगम दृश्य. स्टेट ऑपेरा हाउस, बूडापेस्ट.
मद्यनिर्मिती केंद्र, बूडापेस्ट. ग्रेट रिफॉर्म्ड चर्च : डेब्रेत्सेन, १९ वे शतक.
ऱ्हॅप्सॉडी : हंगेरियन लोकनृत्य. गरम पाण्याचे प्रसिद्ध सरोवर, हेवेश.