स्वित्झर्लंड : (स्विस कॉन्फेडरेशन ). मध्य यूरोपमधील भूवेष्टित देश. हा २६ कँटनचा संघ प्रजासत्ताक देश असून स्विस संघ म्हणून ओळखला जातो. याचा विस्तार ४५° ४९’ ते ४७° ४८’ उ. अक्षांश व ५° ५७’ ते १०° २९’ पू. रेखांश यांदरम्यान आहे. देशाचे क्षेत्रफळ ४१,२९३ चौ.किमी. आहे. लोकसंख्या ७८,७०,१३४ (२०१०). याच्या पश्चिमेस फ्रान्स, उत्तरेस जर्मनी, पूर्वेस ऑस्ट्रिया व लिख्टेनश्टाइन, दक्षिणेस इटली हे देश आहेत. याची उत्तर-दक्षिण कमाल रुंदी २२० किमी. वपूर्व-पश्चिम कमाल लांबी ३५० किमी. असून याच्या सरहद्दीची लांबी १,८५२ किमी. आहे. हा देश तेथील निसर्गरम्य ठिकाणे आणि बँकिंग व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे. बर्न ही देशाची राजधानी असून तिची लोकसंख्या १,२४,३८१ होती (२०१०).

भूवर्णन : स्वित्झर्लंडच्या लहानशा क्षेत्रातील भूस्वरूपात विलक्षण भिन्नता असून याचे जुरा पर्वत, स्विस पठारी प्रदेश व आल्प्सचा पर्वतीय प्रदेश असे तीन विभाग केले जातात. हा देश पर्वतमय असून याचा फारच थोडा भाग सस.पासून ३०० मी. पेक्षा कमी उंचीचा आहे.

जुरापर्वत : स्वित्झर्लंड-फ्रान्स सरहद्दीवर जुरा या वली पर्वतीयप्रदेशाने देशाचा सु. १२% भाग व्यापला आहे. जुरा पर्वताचा भाग म्हणजे अल्पाइन घडीची अग्रभूमी आहे. या पर्वताच्या रांगा एकमेकींस समांतर असून नैर्ऋत्य-ईशान्य दिशेत पसरलेल्या, अरुंद दऱ्यांनी एकमेकींपासून अलग झालेल्या आहेत. या पर्वताच्या व्हो रांगेत टेंड्र हे १,६८३ मी. उंचीचे शिखर आहे. येथील खडक हे प्रामुख्याने जुरासिक काळातील जीवाश्मयुक्त चुनखडक आहेत. जुराच्या पठारी भागात चुनखडीच्या प्रदेशातील कार्स्ट भूप्रदेश आढळतात. येथे विवरे, गुहा व भेगा, भूमिगत नद्या, झरे पहावयास मिळतात. जलभेद्य खडकही बऱ्याच ठिकाणी आहेत. या पर्वताचे उतार वृक्षांनी आच्छादलेले असून दऱ्या गवताने व्यापलेल्या आहेत. येथील दू पठारी भागात लोकवस्ती वाढावी म्हणून हा भाग करमुक्त ठेवण्यात आला होता. या प्रदेशात दुग्धोत्पादन व शेती होते. जगप्रसिद्ध स्विस घड्याळांच्या निर्मितीची सुरुवात या भागातच झाली. नशाटेल व बील ही सरोवरे बेलफोअर, कॉल द ला फोसी, पाँतार्ल्ये या खिंडी या रांगांत आहेत. येथील खिंडी व त्यांमधील रस्ते यूरोपात मोक्याचे ठरलेले आहेत.

स्विसपठारीप्रदेश : (मिडललँड) उत्तरेकडील जुरा पर्वत व दक्षिणेकडील आल्प्स पर्वतरांगांदरम्यानचा पठारी प्रदेश हा स्विस पठारी प्रदेश म्हणून ओळखला जातो. या प्रदेशाने स्वित्झर्लंडचे सु. २३% क्षेत्र व्यापलेले आहे. हा भाग दोन पर्वतांनी व पश्चिमेकडील जिनीव्हा वपूर्वेकडील कॉन्स्टन्स या सरोवरांमुळे बद्ध झालेला आहे. हा प्रदेशसस.पासून ३६६-६७१ मी. उंचीवर असून, पठारी व डोंगराळ आहे. तो प्रदेश शेतीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. येथे उद्योगधंदे विकसित झालेले असून या भागाचे शहरीकरण झालेले आहे. प्राचीन हिमनद्यांमुळे येथे जिनीव्हा, कॉन्स्टन्स, ली, झुरिक, लूसर्न, तून यांसारखी अनेक सरोवरे निर्माण झाली आहेत.

आल्प्सचापर्वतीयप्रदेश : हा पर्वतीय प्रदेश देशाच्या दक्षिण भागात असून याने देशाचे सु. ६०% क्षेत्र व्यापलेले आहे. या भागातआल्प्स पर्वताच्या बर्नीज, उरी, ग्लारस, पेनाइन, लिपाँटाइन, रोशन या पर्वतरांगा आहेत. बर्नीज पर्वतरांगेत फिन्स्टर आर्हॉर्न (४,२७५ मी.) व युंगफ्राऊ (४,१६१ मी.) ही शिखरे आहेत. बर्नीज पर्वतरांग पूर्वेकडेपसरत गेली असून ती उरी व ग्लारस या नावांनी ओळखली जाते.बर्नीज व पेनाइन पर्वतरांगा र्‍हाईन व र्‍होन या नद्यांच्या खोऱ्यांनी अलगझालेल्या आहेत. पेनाइन पर्वतरांग पश्चिम-पूर्व पसरलेली असून यातीलमाँटे रोझा पर्वतामधील डुफुरस्पिट्स (४,६३४ मी.) हे देशातीलसर्वोच्च शिखर आहे. याशिवाय मॅटरहॉर्न (४,५०५ मी.), वाइसहॉर्न (४,५११ मी.) व डोम (४,५४५ मी.) ही अन्य शिखरे आहेत. या पर्वतरांगेच्या पूर्वेस लिपाँटाइन व रोशन या पर्वतरांगा आहेत. आल्प्स पर्वताच्या रांगा दुर्गम असून येथील ग्रेट सेंट बर्नार्ड, सिंप्लॉन, सेंट गॉथर्ड, श्प्लुगेन, आल्बुला, फुर्का, झूल्ये, सान बेर्नारदीनो या खिंडी प्रसिद्ध आहेत. सेंट गॉथर्ड खिंडीतून (उंची २,११४ मी.) १५ किमी. लांबीचा लोहमार्ग बोगदा १८८२ मध्ये आणि सु. १७ किमी. लांबीचा महामार्ग बोगदा १९८० मध्ये सुरू झाला. ग्रेट सेंट बर्नार्ड खिंडीतून (उंची २,४७२ मी.) फ्रान्स व इटलीशी दळणवळण होते. सिंप्लॉन खिंडीतील (उंची २,००८ मी.) सिंप्लॉन बोगदा २० किमी. लांब आहे. श्प्लुगेन ही खिंड २,११७ मी. उंचीवर आहे.

येथे अनेक धबधबे निर्माण झाले असून बर्नीज आल्प्समधीलगीसबाख धबधबा प्रसिद्ध आहे. बर्फाच्छादित हिमशिखरे व निसर्गसौंदऱ्या-मुळे पर्यटक यास भेट देतात. येथील र्‍हाईन व र्‍होन या प्रमुख नद्याअसून र्‍हाईन नदी उत्तर समुद्रास आणि र्‍होन नदी भूमध्य समुद्रास मिळते.र्‍हाईनची उपनदी अर, अरच्या उपनद्या रेयूस व लिमात, पो नदीची उपनदी तीचीनो व डॅन्यूब नदीची उपनदी इन या येथील अन्य प्रमुख नद्या आहेत. आल्प्स पर्वतीय भागात सस.पासून १,०७० मी. उंचीवर हिमनद्या आढळतात. या हिमनद्यांनी सु. ३,००० चौ.किमी. क्षेत्र व्यापले आहे. येथील ऑलिच व दे सॅनफ्ल्यूरॉन या प्रमुख हिमनद्या आहेत. ऑलिच हिमनदी २३ किमी. लांब असून हिने ८६ चौ.किमी. क्षेत्र व्यापले आहे.


स्वित्झर्लंड हा देश सरोवरांसाठीही प्रसिद्ध आहे. जिनीव्हा (५८१चौ.किमी.), कॉन्स्टन्स, तून, लूसर्न, झुरिक, नशाटेल, बील, लूगानो, माद्जॉरे, ब्रिएंत्स, ग्रूयेर, वॉलन ही येथील प्रमुख सरोवरे आहेत.

येथील मृदेत विविधता आढळते. स्विस पठारी प्रदेशात पॉडझॉलव हिमनद्यांच्या संचयनाने तयार झालेली गाळाची मृदा आढळते. जुरापर्वतीय भागात तांबडी व हिमनद्यांच्या संचयनामुळे तयार झालेलीमृदा आहे. आल्प्स पर्वतीय भागात पॉडझॉल मृदा आढळते.

हवामान : उत्तर अटलांटिक प्रवाह, उत्तर आर्क्टिक प्रदेशावरून येणारे वारे, पूर्वेकडून येणारे खंडीय वारे व भूमध्य समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांचा परिणाम येथील हवामानावर झालेला असला, तरी येथील तापमानात व पर्जन्यमानात स्थानिक भूप्रदेशाप्रमाणे विविधता आहे. येथील हिवाळे अति- थंड व उन्हाळे सौम्य व उबदार असतात. जिनीव्हा सरोवराचाउत्तर किनारा व स्विस-इटली सरहद्दीवरील सरोवरांव्यतिरिक्तच्या भागात हिवाळ्यात तापमान गोठणबिंदूइतके किंवा गोठणबिंदूच्या खाली असते, तर उन्हाळ्यातील तापमान क्वचितच २१° से. पेक्षा जास्त असते. दक्षिण भागात तीचीनो कँटनमध्ये उबदार, भूमध्य सागरी हवामान असते. आल्प्समधील उंच शिखरे बर्फाच्छादित असतात. मध्यवर्ती पठारी भागात वार्षिक सरासरी १००-११४ सेंमी. पाऊस पडतो. उंच पर्वतीय भागात वार्षिक सरासरी २५० सेंमी.पेक्षा जास्त पाऊस पडतो. काही वेळा स्वित्झर्लंडमध्ये उष्ण कोरडे दक्षिणी वारे वाहतात, त्यांना फॉन म्हणतात. हे वारे आल्प्स पर्वतीय प्रदेशात दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहतात. या वाऱ्यांमुळे हवेच्या तापमानात व दाबात अचानक बदल होतो. पर्वतीय भागात या वाऱ्यांचा परिणाम बर्फ वितळण्यावरही होतो. हे वारे कित्येकदा हानीकारक ठरतात.

वनस्पतीवप्राणी : स्वित्झर्लंडचा सु. ३०% भाग जंगलव्याप्त आहे. यूरोपमधील हवामानाचा व भूप्रदेशाचा परिणाम येथील वनस्पतिजीवनावरही झालेला आढळतो. याच्या पश्चिम भागात ओक, बीच, रुंदपर्णी वनस्पती पूर्व भागात लार्च, हॉर्न, बीम उत्तर उपअल्पाइन भागात स्प्रूस, फर, पाइन आणि दक्षिणेकडे चेस्टनट या वनस्पती आढळतात. आल्प्समधील वनस्पतिजीवनावर सूर्यप्रकाशाचा परिणाम दिसून येतो. मध्यवर्ती पठारी प्रदेशात गवताची कुरणे आहेत.

प्राण्यांत आयबेक्स, कोल्हा, हरिण, ससा, अस्वल, काळवीट, लांडगा, मार्मोट इ. प्राणी आढळतात. तसेच येथे अनेक प्रकारचे पक्षीसुद्धा आहेत. येथील स्विस नॅशनल पार्कमध्ये हरिण, आयबेक्स, कोल्हा, काळवीटया प्राण्यांचे तसेच गरुड, ग्राउझ या पक्षांचे संरक्षण व संवर्धन करण्यातयेते. आल्प्स पर्वतीय प्रदेशातील वनस्पती व प्राणी यांचा नाश आणिसंहार थांबविण्यासाठी शासनामार्फत दक्षता घेतली जात आहे.

इतिहासवराज्यव्यवस्था : स्वित्झर्लंडमधील मूळ रहिवासी केल्टिक जमातीपैकी हेल्वेटिक वंशाचे होते. इ. स. पू. ५८ मध्ये ज्यूलियस सीझरचा त्यांच्यावर अंमल होता. हेल्वेटिया हा रोमन साम्राज्यातील समृद्ध प्रांत होता. इ. स. २५० मध्ये जर्मानिक वंशातील ॲलिमॅनी टोळीने आणि इ. स. ४३३ मध्ये बर्गंडियनांनी त्यावर आपला अंमल बसविला. फ्रँकांनी इ. स. ४९८ मध्ये ॲलिमॅनींचा आणि पुढे बर्गंडियनांचा पराभव केला होता. या टोळ्या फ्रँकांना विरोध करू लागल्यावर फ्रँकांनी स्वित्झर्लंडचा समावेश फ्रँक साम्राज्यात करून झुरिक व लोझॅन ही शहरे वसविली आणि तेथे ख्रिस्ती धर्माचा प्रसार केला.

फ्रँक सत्तेच्या र्‍हासानंतर स्वित्झर्लंड पवित्र रोमन साम्राज्याच्या व तेराव्या शतकात हॅप्सबर्ग राजवटीच्या आधिपत्याखाली आले. हॅप्सबर्ग राजवटीच्या कडक धोरणाविरुद्ध स्वित्झर्लंडमधील अनेक कँटननी उठाव केला व उरी, श्‍वीझ, अंटर वॉल्डन या कँटननी ऑगस्ट १२९१ मध्ये अंतर्गत संघ स्थापन केला. हॅप्सबर्ग राजवटीने या तिन्ही कँटनवर स्वारी केली परंतु त्यांना यामध्ये यश प्राप्त झाले नाही. तद्नंतरच्या ३८ वर्षांत या कँटनच्या संघात लूसर्न, झुरिक, ग्लारस, झूग आणि बर्न ही पाचकँटन समाविष्ट झाली. या कँटनमधील श्‍वीझ या मोठ्या कँटनच्यानावावरून या देशास स्वित्झर्लंड असे नाव पडले.

स्वित्झर्लंडने ऑस्ट्रियाविरुद्धच्या १३८६, १३८८, १४७६ व १४९९ मध्ये झालेल्या युद्धांत विजय संपादन केला. त्यानंतर बर्गंडीच्या चार्ल्सचाही पराभव केला व १४९९ च्या बाझेलच्या तहान्वये पवित्र रोमन साम्राज्या-पासून पूर्णतः स्वातंत्र्य मिळविले. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात विल्यम टेल, अर्नाल्ड व्हॉन विंकलरिड, निकॉलस व्हॉन फ्ल्यूए यांनी अनमोल असे कार्य केले. १५१३ मध्ये आर्गाऊ, तुर्गाऊ, फ्रायबर्ग, झोलतुर्न, शॉफहाउझन, अपनझेल ही कँटन श्‍वीझ संघात सामील झाली. यामुळे स्वित्झर्लंडचे प्रभुत्व आल्प्सच्या दक्षिणेकडे तीचीनोपर्यंत प्रस्थापित झाले आणि त्यांना दक्षिण व उत्तर यूरोपशी जोडणाऱ्या दळणवळणात मोक्याच्या पर्वत खिंडीवर ताबा मिळाला.

सुधारणावादी चळवळीत स्वित्झर्लंडमधील कँटनमध्ये रोमन कॅथलिकव प्रॉटेस्टंट पंथीयांत अंतर्गत वाद सुरू झाले. या चळवळीमुळे स्वित्झर्लंड प्रॉ टेस्टंट व रोमन कॅथलिक अशा दोन सैनिकी तळांत विभागला गेला. हे दोन्ही समूह १५२९, १५३१, १६५६ व १७१२ मध्ये आपसांत लढले. कॅथलिक कँटननी फ्रान्सशी जवळीक केली. परिणामी स्वित्झर्लंड-मधील संघांत फूट पडली. १७९८ मध्ये फ्रेंच राज्यक्रांतीवेळी फ्रेंचांनी स्वित्झर्लंडचा ताबा घेतला आणि त्यांनी हेल्वेटिक प्रजासत्ताकाची घोषणा केली. परिणामी श्‍वीझ कँटनचे प्रशासकीय अधिकार कमी झाले. या राजकीय बदलामुळे तेथील जनतेत गोंधळ व असंतोष निर्माण झाला. परिणामी १८०३ मध्ये पहिला नेपोलियन याने १३ श्‍वीझ कँटनची पुनर्स्थापना करून ६ नवीन कँटन निर्माण केले. या कँटनना अधिकार प्रदान करून केंद्रशासनाचे अधिकार कमी केले.


नेपोलियनच्या पराभवानंतर १८१५ च्या व्हिएन्ना परिषदेने तीन कँटनची भर घालून स्वतंत्र स्वित्झर्लंडची पुनःस्थापना केली व २५ कँटन मिळून स्वित्झर्लंड हा देश अस्तित्वात आला. १९७९ मध्ये जुरा हा कँटन होऊन तो स्वित्झर्लंडमध्ये समाविष्ट झाला आहे. १८३० मध्ये स्वित्झर्लंडमधील जनतेने राजकीय सुधारणांची विशेषतः वैयक्तिक अधिकार व मुद्रण-स्वातंत्र्याची मागणी केली मात्र शासनाने त्यास प्रतिबंध केला तथापिकाही कँटनमध्ये याबाबत उठाव झाले. त्यामुळे येथील सुधारणावादी चळवळीला बळ मिळाले. त्यातच १८४७ मध्ये अंतर्गत यादवी युद्ध झाले.

स्वित्झर्लंडने १८४८ मध्ये संविधानाचा स्वीकार केला. त्यान्वये संघीय लोकशाही व द्विगृही विधानमंडळाची रचना करण्यात आली. त्यानुसार सर्व कँटनवर संघीय सत्ता प्रस्थापित झाली व त्यांना धार्मिक स्वातंत्र्य व इतर वैयक्तिक अधिकार प्रदान झाले. १८६३ मध्ये जिनीव्हा येथे झां आंरी द्यूना (१८२८-१९१०) या मानवतावादी स्विस उद्योजक व लेखकाने ‘ रेडक्रॉस’ या संघटनेची स्थापना केली. नंतरच्या कालावधीत या संघटनेस नोबेल पारितोषिकेही प्राप्त झाली. १८७४ मध्ये संविधानात सुधारणा करून नवीन संविधानानुसार राज्यकारभार सुरू झाला. यान्वये केंद्र- शासनाच्या सैनिकी व न्यायदानविषयक अधिकारात वाढ झाली.

पहिल्या व दुसऱ्या महायुद्धात स्वित्झर्लंड तटस्थ राहिला. यावेळी स्वित्झर्लंडवर आंतरराष्ट्रीय दबाव होता. या काळात देशाचा विकासदर कमी होता. युद्धोत्तरकाळात स्वित्झर्लंड तात्काळ यूनोत समाविष्ट झाला नाही मात्र यूनोच्या विविध कार्यक्रमांत व प्रकल्पांत सहभागी झालाहोता. आज अनेक यूरोपीय संघटनांची मुख्यालये जिनीव्हा येथे आहेत. स्वित्झर्लंड १९९२ मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व जागतिक बँकेचा सदस्य झाला असून २००२ मध्ये यूनोत सहभागी झाला आहे.

स्त्रियांना राजकीय समानता देणारा हा यूरोपमधील प्रमुख देशांपैकी शेवटचा देश आहे. १९५८ मध्ये प्रथमच महिलांना बाझेल शहराच्या स्थानिक निवडणुकीत मतदानाचा हक्क प्रदान करण्यात आला. स्त्रियांना फेडरल निवडणुकीत मतदानाचा अधिकार १९७१ पासून प्राप्त झाला. १९९९ मध्ये रूथ ड्रेफस या स्वित्झर्लंडच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष झाल्या. २०१२ मध्ये इव्हेलिन विडमर स्क्लूम्फ यांची राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली.

स्वित्झर्लंडमध्ये १८ एप्रिल १९९९ चे संविधान १ जानेवारी २००० सालापासून अंमलात आलेले असून त्यान्वये देशाचा कारभार चालतो. हे संघीय प्रजासत्ताक आहे. येथील सत्ता केंद्रशासन व कँटनमध्ये विभागलेली आहे. येथील १८ वर्षे वयाच्या सर्व नागरिकांना मतदानाचा अधिकार आहे. मतदारास संसदेचा प्रतिनिधी निवडण्याचा, संविधानाच्या संशोधनास किंवा संविधान पुनर्मुल्यांकनास तसेच आंतरराष्ट्रीय संघटनेत समाविष्ट होण्यासाठीच्या मतदानाचा हक्क आहे. ५०,००० मतदारांनीकिंवा ८ कँटननी मागणी केल्यास कायदा तयार करणे किंवा आंतर-राष्ट्रीय संघटनेत सहभागी होणे, यांविषयी मतदानाने निर्णय घेण्यात येतो. तसेच १,००,००० मतदारांनी मतदानाने मागणी केल्यास संविधानसंशोधन करता येते.

संघीय सरकार हे वैधानिक बाबी व परराष्ट्र धोरण, संरक्षण, शिक्षण, तांत्रिक विद्यापीठे, पऱ्यावरण रक्षण, जलनिःसारण, पाणीपुरवठा, रस्ते व दळणवळण, अणुऊर्जा, परराष्ट्रव्यवहार, सामाजिक सुरक्षा, दिवाणी कायदा, बँका, विमा, आर्थिक विकास, क्रीडा, वने, दूरसंचार, दूरचित्रवाणी,मद्य व जुगार यांसाठी जबाबदार आहे.

वैधानिक अधिकार संसदेस असून संसद द्विगृही आहे. संसदेत काउन्सिल ऑफ स्टेट्स व नॅशनल काउन्सिल ही दोन सभागृहे आहेत. काउन्सिल ऑफ स्टेटचे ४६ सदस्य असतात. प्रत्येक कँटनचे दोन सदस्य याप्रमाणे २० कँटनचे ४० व सहा अर्धकँटनचे प्रत्येकी १ प्रमाणे ६, असे एकूण ४६ सदस्य निवडून देण्यात येतात. नॅशनल काउन्सिलमध्ये २०० सदस्य असतात. हे कँटनच्या लोकसंख्येच्या प्रमाणशीर प्रतिनिधित्वाने चार वर्षांसाठी लोकांनी निवडून दिलेले असतात. संसदेचे दरवर्षी तीन आठवड्यांचे एक अधिवेशन याप्रमाणे किमान चार अधिवेशने होतात. आवश्यकतेनुसार जादा अधिवेशन घेण्यात येते. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी कायदा संमत केल्यानंतर त्यावर जनतेचे सार्वमत घेण्यात येते.

फेडरल काउन्सिलला कार्यकारी प्राधिकरणाचे अधिकार आहेत. याचे सात सदस्य असून हे चार वर्षांसाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांनी निवडलेले असतात. हे सदस्य मंत्री म्हणून कामकाज पाहतात. राष्ट्राध्यक्ष व उपराष्ट्राध्यक्ष प्रमुख असतात. यांची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनात एका वर्षासाठी करण्यात येते. राष्ट्राध्यक्षपदाचाकार्यकाल संपताच पुन्हा तात्काळ त्याच पदावर ती व्यक्ती निवडली जात नाही.

कँटन त्यांचा अंतर्गत कारभार स्वतः पाहतात. प्रत्येक कँटनमध्ये प्रजासत्ताकीय प्रशासन असते. स्वित्झर्लंडमध्ये अनेक राजकीय पक्ष आहेत. त्यांमध्ये ख्रिश्चन डेमॉक्रॅटिक पीपल्स पार्टी, सोशल डेमॉक्रॅटिक पार्टीऑफ स्वित्झर्लंड, स्विस डेमॉक्रॅटिक पार्टी, ग्रीन पार्टी इ. प्रमुख आहेत.

स्वित्झर्लंडमधील सैनिक संख्या ही लोकसेनेवर आधारित आहे.प्रत्येक २०-५० वर्षे वयाच्या सुदृढ पुरुषास सैनिकी सेवा सक्तीची व सार्वत्रिक आहे. स्त्रियांना ही सेवा ऐच्छिक आहे. १९-२० वर्षे वयोमानात १८-२१ आठवड्यांचे सैनिकी प्रशिक्षण देण्यात येते. प्रत्येक सैनिक त्याच्या घरी शस्त्र ठेवू शकतो. कमिशन व नॉन कमिशन अधिकाऱ्यां-व्यतिरिक्त स्थायी सैन्य दल नाही. स्वित्झर्लंड डिसेंबर १९९६ मध्ये नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशनचा सदस्य झाला. २०१२ च्या अंदाज-पत्रकामध्ये संरक्षणासाठी ४,५२० द. ल. स्विस फ्रँक खर्चाची तरतूद होती.


न्यायदान पद्धती ही स्विस दिवाणी संहितेवर आधारित आहे. बहुतेक न्यायिक प्रकरणे कँटन स्तरावर निकाली काढण्यात येतात. प्रत्येक कँटनमध्ये दिवाणी व फौजदारी न्यायालये आहेत. फेडरल ट्रिब्यूनलहे सर्वोच्च न्यायालय असून ते लोझॅन येथे आहे. येथे अपवादात्मक परिस्थितीत दिवाणी व फौजदारी अपीले दाखल होतात. येथील न्यायाधीशांची नेमणूक फेडरल असेंब्लीमार्फत सहा वर्षांसाठी होते.

फेडरल न्यायदान पद्धतीचे १९९७ पासून पुनर्निरीक्षण होऊन फेडरल सर्वोच्च न्यायालयाचा ताण कमी करण्यासाठी फेडरल फौजदारी न्यायालय (एप्रिल २००४ ), फेडरल प्रशासकीय न्यायालय (२००७) सुरू करण्यात आले आहे.

आर्थिकस्थिती : स्वित्झर्लंड हा आकाराने लहान असला, तरी समृद्ध देश आहे. जगातील उच्च राहणीमान असलेल्या देशांत त्याचा समावेश होतोे. उच्चशिक्षित कुशल कामगार वर्ग, लवचिक कामगारधोरण, औद्योगिक क्षेत्रातील सौहार्दपूर्ण वातावरण, व्यापार, उद्योगधंद्यांत आधुनिकतेचा वापर व कच्च्या मालाच्या आयातीचे धोरण इत्यादींमुळे देशाचा विकास साधलेला आहे. हा देश यूरोपीय संघाचा सदस्य नाही,तरी आंतरराष्ट्रीय व्यापारात अनेक उभयपक्षी करारान्वये प्राप्त विशेषा-धिकाराने त्याने व्यापार वाढ केलेली आहे. बँकिंग व पर्यटन हे या देशाच्या अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे घटक आहेत. यूरोपमधील श्रीमंत देशांत याची गणना होत असली, तरी ओईसीडीच्या सरासरी दरडोई उत्पन्नापेक्षा येथील दरडोई उत्पन्न कित्येक वर्षे कमी होते. व्यापारास चालना मिळावी यासाठी २००४ मध्ये सरकारने अन्य देशांसोबत व्यापारी संबंध वृद्धिंगत करण्याचे धोरण जाहीर केले होते. त्यामुळे जागतिक बाजारातून गुंतवणूक व खाजगी उपभोक्ता यांमध्ये वाढ झाली. देशात आर्थिक विकासाच्या दृष्टीने केंद्र व राज्य सरकार यांच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. नॅशनल बँकेने २००० मध्ये मुद्राविषयक धोरण जाहीर केलेले आहे, त्यान्वये चलनवाढीचा दर २% पेक्षा कमी ठेवण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. परिणामी चलनवाढीचा दर कित्येक वर्षे कमी राहिला. मुद्राविषयक धोरणांमुळे स्विस कंपन्यांना कमी व्याजदर देता आला व त्याचा त्यांना फायदा झाला. २००४-०८ मध्ये स्वित्झर्लंडच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होत होती तरीसुद्धा येथील आर्थिक सेवाक्षेत्रावर २००८ पासूनच्या जागतिक आर्थिक मंदीचा परिणाम झाल्याचे दिसून येते. ऑक्टोबर२००८ मध्ये स्विस नॅशनल बँकेने ६,००० द. ल. स्विस फ्रँकचे अर्थसाहाय्य यूबीएस् या देशातील सर्वांत मोठ्या बँकेस केले. त्यामुळेसदर बँकेची अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत झाली. तसेच सरकारने नोव्हेंबर २००८, मार्च व जून २००९ मध्ये अर्थव्यवस्थेच्या सुधारणेसाठी विशेष प्रयत्न केले. ग्राहकांच्या खर्चाच्या उत्तेजनासाठी स्विस नॅशनलबँकेने व्याजदर कमी केले. २०११ मध्ये देशाचे ५,६०६ द. ल. स्विस फ्रँकचे शिलकी अंदाजपत्रक होते. २००१-१० या दशकात एकूण राष्ट्रीय उत्पादनात दरवर्षी सरासरी वाढ १.७% झाली होती.

उद्योगधंदे : एकूण राष्ट्रीय उत्पादनात उद्योग क्षेत्राचा २७.२% हिस्सा होता (२०१०). या क्षेत्रात एकूण कामकरी जनतेच्या २२.४% लोकगुंतले होते (२०११). २००१-०९ मध्ये औद्योगिक उत्पादनात वार्षिक सरासरी वाढ १.५% होती. हा देश खनिज संपत्ती आणि शेतमालयांबाबत संपन्न नाही. त्यामुळे त्यांची आयात करणे भाग पडते. मोटारी, टर्बाइने (वीज संयंत्रे ), घड्याळे याप्रकारच्या विशिष्ट वस्तू निर्माण करणे, त्यांच्या वितरणाच्या विशिष्ट तारखेची हमी देणे, बँकांमार्फत आवश्यक तेथे पतपुरवठा करणे, विक्री पश्चात सेवा, आवश्यक तेथे कारखान्यांची उभारणी करणे, उत्पादित वस्तूंची जगभर विक्री करणे, यांतून आर्थिक फायदा मिळवून आर्थिक विकास साधणे हे स्विस उद्योगांचे महत्त्वाचे सूत्र आहे. येथील रसायने व औषधनिर्मिती उद्योगातील अनेक कंपन्या प्रसिद्ध आहेत. अशा निर्मिती उद्योगांत संशोधन व सुधारणा व्हावी यांसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक करण्यात येते. त्यासाठी अनेक कंपन्या देशातील विद्यापीठांशी व तांत्रिक संस्थांशी सहयोग करतात. तसेच जागतिक स्पर्धा, बाजारपेठ उपलब्धता यांसाठी काही कंपन्या दुसऱ्या कंपन्यांत विलीनही होतात. मोठमोठ्या कारखान्यांशिवाय येथे लहानलहान कारखानेही बहुसंख्य आहेत. वस्तुनिर्माण उद्योगाचा एकूण राष्ट्रीय उत्पादनात १९% हिस्सा होता (२००९). तसेच यामध्ये एकूण कष्टकरी जनतेच्या १४.४% लोक गुंतलेले होते (२०११). घड्याळ निर्मिती हा येथील प्रमुख उद्योग असून, यापासून निऱ्यातीच्या एकूण महसुलापैकी ७.१% महसूल मिळाला होता (२०११). कापडउद्योग, विद्युत्साहित्य, विशिष्ट अचूक उपकरणे, अन्नप्रक्रिया उद्योग (चीज, चॉकोलेट, साखर ), कागद, यंत्रसामग्री इ. निर्मिती उद्योग येथे विकसित झालेले आहेत.

देशाची विद्युत्निर्मितीची क्षमता १९.२ द. ल. किवॉ. व उत्पादन ६७.९ महापद्म किवॉ. ता. होते. देशातील विद्युत्निर्मितीपैकी ५४.१%जलविद्युत् , ४१.१% अणुऊर्जा व ४.८% औष्णिक ऊर्जा होती (२००७). जपानमधील फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्पास भूकंपामुळे झालेल्या हानीचा विचार करून देशात नवीन अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यावर बंदी घातली आहे (२०११). मोव्हे्झे व ग्रांदे डिक्सन्स हे मोठ्या क्षमतेचे जलाशय असून जलविद्युत्निर्मितीसाठी महत्त्वाचे आहेत. देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनापैकी अंदाजे ७१.७% उत्पादन सेवाक्षेत्रातून मिळत होते (२०१०).

कृषी : देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनात अंदाजे १.१% हिस्सा कृषीउत्पादनांचा होता (२०१०). या क्षेत्रात एकूण कामकरी जनतेच्या ३.७% लोक गुंतले होते (२०११). देशातील शेतकऱ्यांना उद्योग क्षेत्रातील कामगारांप्रमाणे अर्थप्राप्ती होईल याची हमी देण्यात आली आहे. लागवड-योग्य क्षेत्रात वाढ करणे, एकरी उत्पादनात वाढ व शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळेल असे सरकारचे शेती धोरण आहे. शेतांचा आकार लहान असून शेतकरी त्याची काळजीपूर्वक निगराणी करतात. दुग्धोत्पादनात देश स्वयंपूर्ण आहे.

गुरे पाळणे व दुग्धोत्पादन हा येथील शेतीक्षेत्राशी निगडीत व्यवसाय आहे. दुधाचा जास्तीत जास्त उपयोग चीजनिर्मितीसाठी केला जातो. येथील चीज ‘स्विस चीज’ म्हणून प्रसिद्ध आहे. निऱ्यातीत चीज महत्त्वाचे आहे. देशातील ३०.९% क्षेत्र जंगलव्याप्त होते. एकूण लाकूड उत्पादन ४,९३८ ह. घ. मी. मिळाले (२०१० ). नद्या व सरोवरांमधून मासेमारी होते. २००९ मध्ये २,९३१ मे. टन विविध प्रकारचे मासे पकडण्यात आले होते.


वित्तव्यवस्था : स्विस फ्रँक हे देशाचे चलन असून १०० तैपेन = १ स्विस फ्रँक होतो. ३० डिसेंबर २०११ मधील विनिमयदर १०० स्विस फ्रँक = ६८.७४१ पौंड = १०६.२८ अमेरिकी डॉलर = ८२.१४ यूरो याप्रमाणे होता.

नॅशनल बँक ही देशातील सर्वोच्च बँक असून, हिची मुख्यालये बर्न व झुरिक येथे आहेत. या बँकेची स्थापना २० जून १९०७ मध्ये झालेली असून, या बँकेस चलन वितरणाचे अधिकार आहेत. बँकिंग, विमा व इतर अर्थविषयक बाबी हा देशातील महत्त्वपूर्ण उद्योग असून देशाच्या राष्ट्रीय उत्पादनात त्यांचा हिस्सा १४.५ % आहे.

परकीय भांडवलाचे सुरक्षित कोठार म्हणून येथील बँकांची प्रसिद्धी आहे. ‘द स्विस बँकिंग लॉ’ १९३४ अन्वये स्विस बँकेने त्यांच्या ग्राहकांची माहिती ग्राहकाच्या स्पष्ट प्राधिकारपत्राशिवाय अथवा न्याया-लयाच्या आदेशाशिवाय देणे हा दंडनीय अपराध मानला जातो. जेव्हा परकीय प्राधिकरण स्विस बँकेतील खात्याविषयी चौकशी करण्याचीइच्छा प्रदर्शित करते, तेव्हा त्यांना फौजदारी शुल्क परकीय न्यायालयात जमा करावे लागते व शासनानेे ते विधिग्राह्य मानावे लागते. बँकेच्या गोपनीयता अधिनियमांत १९९० व ९८ मध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. फेडरल बँकिंग कमिशनला मोठ्या प्रमाणात पर्यवेक्षी अधिकार देण्यात आले आहेत. १ जानेवारी २००९ मध्ये फेडरल बँकिंग कमिशनचे स्विस फायनान्शियल मार्केट सुपरवायझरी ऑथॉरिटीमध्ये समायोजन करण्यात आलेले आहे. या प्राधिकरणाकडे सर्व आर्थिक सेवाघटकांच्या नियमनांची जबाबदारी आहे.

देशात १९९० मध्ये ४९५ बँका होत्या. त्या कमी होऊन २०१० च्या अखेरीस ३२१ बँका होत्या. येथील खाजगी बँकक्षेत्र माल-मत्तेच्या बाबतीत जगात मोठे आहे. देशातील यूबीएस् बँक ही बाजारी भांडवलाच्या बाबतीत यूरोपात सहाव्या क्रमांकाची व मालमत्तेच्या बाबतीत नवव्या क्रमांकाची (१५,९३,००० द. ल. अमेरिकन डॉलरची मालमत्ताअसलेली) मोठी बँक होती (२०११).

देशातील विमाक्षेत्र प्रसिद्ध असून, येथे २१८ विमा कंपन्या होत्या (२००८). स्वित्झर्लंड हा यूरोपीय खुल्या व्यापारी संघटनेचा संस्थापक सदस्य आहे. देशाने यूरोपीय संघाशी मुक्त व्यापारविषयक अनेककरार केलेले आहेत. १९९५ मध्ये स्वित्झर्लंड जागतिक व्यापारी संघटनेत (डब्ल्यूटीओ) सामील झाला असून तो आर्थिक सहकार्य व विकास संघटनेचा (ओईसीडी) संस्थापक सदस्य आहे. देशाच्या आयातीत प्रामुख्याने यंत्रसामग्री, विद्युत् उपकरणे, दागिने, रसायने, मोटारगाड्या, कापड इत्यादींचा, तर निऱ्यातीत यंत्रसामग्री, घड्याळे इत्यादींचा प्रामुख्याने समावेश असतो. २०११ मध्ये १, ७४, ११०.४ द. ल. स्विस फ्रँकची आयात व १, ९७, ७९४.२ द. ल. स्विस फ्रँकची निऱ्यात झाली होती. देशाचा व्यापार प्रामुख्याने ऑस्ट्रिया, बेल्जियम, चीन, फ्रान्स, जर्मनी,ग्रेट ब्रिटन, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, स्वीडन, स्पेन, रशिया, जपान, इटली, इझ्राएल, सिंगापूर, हाँगकाँग यांच्याशी होतो. स्वित्झर्लंडच्या व्यापारात ८०.१% आयात यूरोपीय संघातील देशांतून व ५६.९% निऱ्यात याच देशांना होत होती (२०१०). एकूण आयातीच्या ३३.७% आयात जर्मनीतून व त्याखालोखाल फ्रान्स, इटलीतून झाली. तसेच एकूण निऱ्यातीच्या २०.२% निऱ्यात जर्मनीस झाली होती (२०१०).

वाहतूकवदळणवळण : आल्प्स पर्वतातील खिंडींवरील ताबाआणि र्‍हाईन – र्‍होन – डॅन्यूब नद्यांमधील जलमार्ग यांमुळे यूरोपच्या प्रवास वाहतुकीमध्ये स्वित्झर्लंडला महत्त्व आहे. स्वित्झर्लंडमधील सेंट गॉथर्डमार्ग हा यूरोपियन-ट्रान्स अल्पाइन वाहतुकीतील महत्त्वाचा दुवा आहे.

स्वित्झर्लंडमध्ये ७१,४५४ किमी. लांबीचे रस्ते व त्यांमध्ये१,७८९ किमी. लांबीचे महामार्ग होते (२००९). सेंट गॉथर्ड खिंडीतीलसु. १७ किमी. लांबीचा बोगदा दळणवळणात महत्त्वाचा असून हा १९८० मध्ये सुरू झाला आहे. ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ‘च्या २००९-१० च्या जागतिक स्पर्धात्मक अहवालान्वये स्वित्झर्लंडचा रस्ते, पायाभूतसुविधा यांमध्ये जगात चौथा क्रमांक होता.

देशात २०१० मध्ये ३,१३७ किमी. लांबीच्या लोहमार्गांचे विद्युतीकरण झालेले होते. येथे अस्तित्वात असणाऱ्या रेल्वे सुविधांमध्ये महत्त्वाच्या सुधारणा व वाढ करण्यासाठी ‘रेल्वे २०३०’ हा प्रकल्प घोषित केला आहे (२०११). येथील लचबेर्क बोगदा ३५ किमी. लांबीचा आहे. या बोगद्यामुळे जर्मनी व इटली या देशांत जाण्याचा वाहतूक कालावधी कमी झाला आहे. तसेच गॉथर्ड खिंडीजवळ एर्स्तफेल्ट व बोडीओ यांना जोडणारा ५७ किमी. लांबीचा लोहमार्ग बोगदा २०१० मध्ये तयार झाला असून, हा २०१७ मध्ये खुला करण्याचे जाहीर केले आहे.हा बोगदा जगातील लोहमार्ग बोगद्यांतील सर्वांत लांब समजला जातो. लोझॅन येथे मेट्रोची सुविधा आहे. याशिवाय बर्न, बाझेल, जिनीव्हा, लोझॅन,झुरिक, नशाटेल येथे ट्रामची सुविधा आहे.


देशात २०१० मध्ये ६५ विमानतळ होते. बर्न, बाझेल, जिनीव्हा, लूगानो, सायन, सेंट गॅलन, झुरिक येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. झुरिक व जिनीव्हा येथील विमानतळांवरून प्रवासी व मालवाहतूकमोठ्या प्रमाणात होते. डार्विन एअरलाइन्स, एडेल्विस एअर, हेल्वेटिक एअरवेज एजी, स्विस (स्विस इंटरनॅशनल एअरलाइन्स) या येथीलप्रमुख हवाई कंपन्या आहेत. र्‍हाईन नदीतून बाझेल ते उत्तर समुद्रापर्यंत जलवाहतूक चालते.

देशात २००८ मध्ये ४.८ द. ल. दूरध्वनीधारक, ८.९ द. ल. भ्रमणध्वनीधारक व ५.८ द. ल. आंतरजाल (इंटरनेट) सुविधाधारक होते. देशात ६.६ द. ल. संगणक कार्यरत होते (२००६). देशात २००८ मध्ये २०३ दैनिके प्रकाशित होत होती व त्यांचा सरासरी खप २.२ द. ल.प्रती इतका होता. झुरिक येथून प्रसिद्ध होणारी डेर ब्लिक, नेउए झुर्चर झेइटुंग, टॅगस-अँझेइगर व जिनीव्हा येथून प्रसिद्ध होणारी ला ट्रिब्यून दे जिनीव्हाले टेम्प्स ही वृत्तपत्रे प्रसिद्ध आहेत. येथील वृत्तपत्रे जर्मन, फ्रेंच व इटालियन इ. भाषांत प्रसिद्ध होतात.

देशाच्या तीनही भाषांमधील आकाशवाणी व दूरचित्रवाणी कार्यक्रमांवर सरकारचे नियंत्रण आहे. देशात ४८ स्थानिक विभागीय आकाशवाणी केंद्रे आणि ८३ स्थानिक व विभागीय दूरचित्रवाणी प्रसारण केंद्रे होती.

लोकवसमाजजीवन : स्वित्झर्लंडमधील लोक त्यांची राजकीय व आर्थिक गरज यांमुळे वास्तववादी, सावध आणि समंजस झालेले असून, उपलब्ध असणाऱ्या साधनसंपत्तीचा उपयोग ते नवविचार व सर्जनशीलतेने करतात. येथे जर्मन-स्विस, फ्रेंच-स्विस, इटालियन-स्विस आणि रोमन-स्विस असे चार विभिन्न मानववंशीय समूह असले तरी स्वित्झर्लंड हा राष्ट्रीय एकता असलेला देश आहे. विविधतेतून एकता हे येथील जनतेचे ब्रीद आहे. सर्वांना धर्मस्वातंत्र्य व प्रार्थनास्वातंत्र्य आहे. येथील जनतेची निष्ठा कँटनमध्ये राष्ट्रीय भावनेप्रमाणे आहे. येथील लोकसंख्येत ४१.८% रोमन कॅथलिक, ३५.३% प्रॉटेस्टंट, १.८% ऑर्थोडॉक्स चर्चचे अनुयायी, ०.२% ओल्ड कॅथलिक, ४.३% मुस्लिम,०.२% ज्यू , ०.८% इतर (बौद्ध व हिंदू यांसह ), ११.१% कोणताही धर्मपंथ नसलेले होते (२००० ).

येथील लोकसंख्येची घनता दर चौ.किमी.स १९०.६ होती. तसेच जननदर हजारी १०.२ व मृत्युदर हजारी ८.०० होता (२०१०).

येथील बहुतेक लोक शहरी भागात राहतात. लोकांचे राहणीमानउच्चप्रतीचे असून, येथील घरे आधुनिक सुखसोयींनी युक्त, स्वच्छ वनीटनेटकी असतात. लोकसंख्येच्या मानाने येथे घरांची कमतरता आहे.येथे चीज प्रसिद्ध असून त्याचा वापर करून बनविलेले फाँडू , रॅक्लेट व रॉस्टी हे आवडते खाद्यपदार्थ आहेत. येथील लोकांच्या भोजनात दुग्धजन्य पदार्थ, सॉसचे अनेक प्रकार, डुकराचे मांस, गोमांस, मासे यांचा समावेश असतो. जेवणानंतरच्या मुखशुद्धीत चॉकोलेट व पेस्ट्री असते. येथील बियर, चहा, कॉफी, हॉट चॉकोलेट ही आवडती पेये आहेत. नोकरीच्या सर्व सेवांमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांना कमी वेतन देण्यात येते. आर्थिक मंदीच्या काळात स्त्रियांना प्रथमतः सेवेतून कमी करण्यात येते. येथील कुटुंबे लहान असतात. येथे विवाह न करता एकत्र राहण्याचे प्रमाण वाढत आहे. विवाहाच्या सरासरी वयात वाढ होत आहे. मुलांच्या संवर्धनाची जबाबदारी स्त्रियांकडे असते.

आरोग्य : देशात आरोग्यसुविधांचे नियंत्रण कँटन स्तरावरून होत असते. बहुतांशी रुग्णालये कँटन अनुदानित असून खाजगी रुग्णालयेही आहेत. आरोग्य दर्जा व वैद्यकीय सेवा उत्कृष्ट आहे. सर्व जनतेस राज्य आरोग्य विम्यासाठी विमा हप्ता भरावा लागतो. सर्व जनता सर्वसाधारण-पणे त्यांच्या मिळकतीच्या १०% रक्कम विमा हप्ता, औषधे, वैद्यकीयखर्च यांसाठी करते. गरीब लोकांना आरोग्यसुविधांसाठी अर्थसाहाय्य करण्यात येते. येथील बालमृत्यूचे प्रमाण दर हजारी पाचपेक्षा कमीआहे. जास्त आयुर्मान असलेल्या देशांत या देशाची गणना होते. येथील लोकांचे सरासरी आयुर्मान ८२ वर्षे आहे. यामध्ये पुरुषांचे ८० वर्षेव महिलांचे ८४ वर्षे होते (२००९). आरोग्यसेवांवर एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या १०.८% खर्चाची तरतूद होती (२००७). देशात सुखमरणास कायद्याने बंदी आहे मात्र रोग्याने विशिष्ट संमती दिल्यास डॉक्टरत्यास मृत्यूसाठी मदत करू शकतात.


शिक्षण : प्रख्यात विचारवंत झां झाक रूसो, शिक्षणशास्त्रवेत्ते योहान पेस्टालोत्सी व झां प्याजे यांचे येथील शिक्षणक्षेत्रात महत्त्वाचे योगदानआहे. देशात १६ वर्षे वयापर्यंतच्या मुलांना प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे आहे. पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणावर कँटनचे नियंत्रण असते. उच्च शिक्षणाची जबाबदारी फेडरल शासन व कँटनची आहे. माध्यमिक शिक्षणाचा कालावधी व शिक्षणाची पद्धत यांचे धोरण कँटनमार्फत ठरविण्यात येते. देशात २०१०-११ मध्ये बर्न, बाझेल, फ्रायबर्ग, जिनीव्हा, लोझॅन, लूसर्न, नशाटेल, सेंट गॅलन, स्विझेरा इटालिना, झुरिक ही विद्यापीठे कार्यरत होती. याशिवाय २०१०-११ मध्ये उप-योजित विज्ञानाची बर्न, सेंट्रल स्वित्झर्लंड, ईस्टर्न स्वित्झर्लंड, नॉर्थवेस्टर्न स्वित्झर्लंड, झुरिक इ. विद्यापीठे कार्यरत होती. २००६ मध्ये देशाच्या एकूण खर्चाच्या १६.३% खर्च शिक्षणावर झाला होता. देशातप्रौढ साक्षरता प्रमाण ९९% होते.

भाषावसाहित्य : भाषेत आढळणारी विविधता हे स्वित्झर्लंडचे वैशिष्ट्य आहे. येथे जर्मन, फ्रेंच, इटालियन, रोमन या भाषा प्रामुख्याने बोलल्या जातात. याशिवाय येथे अनेक बोली भाषा आहेत. येथील साहित्य लेखनात जर्मेन दे स्ताल, आल्ब्रेख्त फोन हॉलर, योहान हाइन्रिक दान्येल चॉक, येरेमीआस गोट्हेल्फ, गोट्फ्रीट केलर, कोनराट फेर्डिनांड मायर, कार्ल श्पिटेलर (नोबेल पारितोषिक विजेता , १९१९), आंरी फ्रेडेरिक ॲमयेल, चार्ल्स फेर्डिनांड रॅम्यू , हेर्मान हेस (नोबेल पारितोषिक विजेता, १९४६), रॉबर्ट वॉल्सेर, मॅक्स रूडॉल्फ फ्रिश, फ्रेड्रिक डूर्रेनमॅट, योहानस फोन म्यूलर ह्या व्यक्ती प्रसिद्ध आहेत. तसेच वृत्तपत्रकार एली द्यूकॉमं आणि वकील व मुत्सद्दी शार्ल आल्बेर गॉबा यांना १९०२ मध्ये शांततेचे नोबेल पारितोषिक प्राप्त झाले होते.

स्वित्झर्लंडचे विज्ञानक्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे. सोळाव्या शतकातील स्विस शास्त्रज्ञ टी. बी. होएनहेम यांनी औषधनिर्माण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले आहे. बाझेलच्या बेर्नुली कुटुंबाने व सिआनहार्द येऊलेर यांनी गणितात योगदान दिलेले आहे. नोबेल पारितोषिक विजेते एमिल टेओडोर कोचर (१९०९), आल्फ्रेट व्हर्नर (१९१३), शार्ल एद्वार गीयोम (१९२०), ॲल्बर्ट आइन्स्टाइन (१९२१), पॉल कारर (१९३७), लेओपोल्ट रूझीच्का (१९३९), पॉल हेरमान म्यूलर (१९४८), वॉल्टर रूडोल्फ हेस (१९४९), टाडेयस राइशस्टाइन (१९५०), व्ह्लाडिमीर प्रेलॉग (१९७५), वॉर्नर ॲर्बर (१९७८), रिचर्ड आर्. अर्न्स्ट (१९९१), कुर्ट वुथरिच (२००२) हे शास्त्रज्ञ प्रसिद्ध आहेत. तसेच पर्मनंट इंटरनॅशनल पीस ब्यूरो, बर्न (१९१०), इंटरनॅशनल रेडक्रॉस कमिटी, जिनीव्हा (१९१७), नान्सेस इंटरनॅशनल ऑफिस फॉर रेफ्यूजीज, जिनीव्हा (१९३८), ऑफिस ऑफ द युनायटेड नेशन्स हायकमिशनर फॉर द रेफ्यूजीज, जिनीव्हा (१९५४), इंटरनॅशनल रेडक्रॉस कमिटी द लीग ऑफ रेडक्रॉस सोसायटीज, जिनीव्हा (१९६३), इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, जिनीव्हा (१९६९) या स्वित्झर्लंडस्थित आंतरराष्ट्रीय संस्थांनाही शांततेच्या काऱ्यासाठी नोबेल पारितोषिके प्राप्त झाली आहेत.

कलावक्रीडा : स्वित्झर्लंडमधील लोककला तेथील संगीत, गीते, नृत्य, काष्ठशिल्पकाम, भरतकाम यांमधून पहावयास मिळते. तेथील प्रसिद्ध संगीतकारांत लूटव्हिख झेनफल, हाइन्रिक लॉरस, अर्नेस्ट ब्लॉक, ऑटमॉर शोएक, आर्थर ऑनेगर, फ्रँक मार्टिन, अर्नेस्ट आन्सेर्मे हे प्रसिद्ध आहेत.येथे आंतरराष्ट्रीय संगीत महोत्सव भरविण्यात येतात. त्यामध्ये लूसर्न व माँट्र येथील संगीत महोत्सव प्रसिद्ध आहेत. सोळाव्या शतकातील  धर्मसुधारणा आंदोलना चा परिणाम स्विस चित्रकला व शिल्पकलेवर झालेला दिसून येतो. स्वित्झर्लंडमधील अल्बेर्तो जाकोमात्ती, पॉल क्ले यांचा समावेश जगप्रसिद्ध चित्रकारांत होतो. येथे चित्रपट उद्योगही भरभराटीस आलेला आहे.

बाराव्या शतकातील रोमन पद्धतीची रचना जिनीव्हा, बाझेल, लोझॅन, सिओन, क्यूर येथील कॅथीड्रल तसेच राजवाडे यांमधून दिसून येते.गॉथिक पद्धतीची रचना झुग, झुरिक, शॉफहाउझन येथील कॅथीड्रल-मधून, तर बरोक पद्धतीची रचना झुग, सेंट गिल व आयंझील्डेन येथील चर्चमध्ये आहे. देशात सु. ५०० संग्रहालये व ग्रंथालये आहेत. ग्रंथालयांत बाझेल विद्यापीठातील ग्रंथालय, बर्न येथील स्विस राष्ट्रीय ग्रंथालयव जिनीव्हातील ग्रंथालये मोठी आहेत. संग्रहालयांत बाझेल, बर्न वजिनीव्हा येथील ऐतिहासिक संग्रहालये, बाझेल व बर्न येथील ललितकला संग्रहालये व झुरिक येथील कला संग्रहालय प्रसिद्ध आहे. देशात अनेक सांस्कृतिक महोत्सव साजरे केले जातात. लूसर्न येथील महोत्सव यूरोपमध्ये महत्त्वाचा समजला जातो. माँट्र जॅज महोत्सव दरवर्षी जुलैमध्ये साजरा होतो. दरवर्षी जूनमध्ये सेंट गॅसेन येथे भरविण्यात येणारा रॉक ॲण्ड पॉप महोत्सव प्रसिद्ध आहे. २००७ मध्ये सु. २०,००० लोकांनी या महोत्सवास भेट दिली होती. सायकल, कुस्ती, शिकार, हँडबॉल, बर्फावरील हॉकी, टेनिस, गोल्फ, सॉकर शर्यती इ. येथील आवडते खेळ आहेत. १९७२ च्या कायद्याप्रमाणे फेडरल सरकार खेळांसाठी अर्थसाहाय्य करते. येथील मार्टिना हिंगीस, रॉजर फेडरर व पॅट्टी स्कँडर हे प्रसिद्ध टेनिस खेळाडू आहेत.

स्वित्झर्लंड हा देश जगातील अनेक प्रसिद्ध पर्यटनस्थळांपैकी एक असून तो आतिथ्य व हॉटेल उद्योग यांसाठी प्रसिद्ध आहे. पर्यटन हायेथील प्रमुख व्यवसाय आहे. स्वित्झर्लंडमधील आल्प्सचा परिसर सर्वांत रमणीय व आकर्षक आहे. येथील बर्फाच्छादित हिमशिखरे, पर्वतातूनगेलेले लोहमार्ग, रस्ते व देशातील सरोवरे ही गिऱ्यारोहक आणि पर्यटकांची आकर्षणे आहेत. येथे जर्मनी, अमेरिका, ग्रेट ब्रिटन इ. देशांतून पर्यटक येतात. २००९ मध्ये देशाला १५,३७७ द. ल. स्विस फ्रँक महसूल पर्यटनाद्वारे प्राप्त झाला होता.


बर्न ही देशाची राजधानी असून, बर्फाच्छादित आल्प्सची पार्श्वभूमी लाभल्याने हे शहर निसर्गसुंदर बनलेले आहे. येथील घड्याळ मनोरा, गॉथिक वास्तुशैलीचा उत्कृष्ट नमुना असलेले पंधराव्या शतकातील कॅथीड्रल, टाउन हॉल प्रेक्षणीय आहेत. येथील बर्न विद्यापीठ, स्विस राष्ट्रीय ग्रंथालय प्रसिद्ध आहे. तसेच हे स्वित्झर्लंडचे प्रमुख औद्योगिक,सांस्कृतिक केंद्र असून पर्यटन केंद्र म्हणूनही याला महत्त्व आहे. झुरिक शहराचा परिसर अप्रतिम सृष्टिसौंदऱ्याने नटलेला आहे. हे विमा व्यवसायाचे व प्रमुख औद्योगिक शहर आहे. येथील विद्यापीठ, कलावीथी, प्राणी संग्रहालय, वनस्पतिउद्यान प्रसिद्ध आहे. जिनीव्हा येथे आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस संघटना, जागतिक आरोग्य संघटना, सेर्न संघटना इ.ची मुख्य काऱ्यालये आहेत. आल्प्स व जुरा पर्वताच्या दरम्यानच्या रस्त्यावरील मोक्याचे स्थान म्हणून यास महत्त्व आहे. लूसर्न हिवाळ्यातील खेळांसाठी प्रसिद्ध असून येथील नगरभवन, आयरिन हाउस, सेंट पीटर्स चॅपेल, मारिया हिल्स चर्च या वास्तू प्रेक्षणीय आहेत. लूगानो हे वित्तीय व्यवहार व चॉकोलेट निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. येथील सरोवरालगतची उद्याने, पोहण्याचे तलाव, नौकानयन आणि सँ लॉरेन्झो, सांता मारिया इ. चर्च उल्लेखनीय आहेत. बाझेल इतिहासप्रसिद्ध शहर असून, यास स्वित्झर्लंडचे उत्तर सीमेवरील सोनेरी प्रवेशद्वार म्हणतात. हे औद्योगिक, व्यापारी, सांस्कृतिक केंद्र आहे. येथील प्रॉटेस्टंट कॅथीड्रल, नगरभवन, सेंट मार्टिन चर्च, फ्रान्सिस्कन चर्च, कलावीथी, विद्यापीठे प्रसिद्ध आहेत. लोझॅन हे देशातील महत्त्वाचे शहर व बंदर आहे. शैक्षणिक, सांस्कृतिक व राजकीय दृष्ट्या यास महत्त्व आहे. येथील ऑर्थोडॉक्स अँग्लिकन चर्च, नगरभवन, विद्यापीठ, ऐतिहासिक संग्रहालय यांस पर्यटक भेट देतात. येथे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे मुख्यालय आहे. याशिवाय माँट्र, नशाटेल ही अन्य शहरेही प्रसिद्ध आहेत.

गाडे, ना. स.

स्वित्झर्लंड

मध्ययुगीन बर्न शहराचे दृश्य. निसर्गसुंदर जिनीव्हा सरोवर
झुरिक शहराचे विलोभनीय दृश्य. ट्रंपेट : वैशिष्ट्यपूर्ण लोकवाद्य, झुरिक.
स्कीइंग : स्विस आल्प्समधील आवडता खेळ. हिवाळी खेळांसाठी प्रसिद्ध असलेले आरॉझा शहर : एक दृश्य.
स्विस नॅशनल बॅक, बर्न. प्रसिद्ध गीसबाख धबधबा, बर्नीज आल्प्स.