स्वामीरामानंदतीर्थ : (३ ऑक्टोबर १९०३-२ जानेवारी १९७२). हैदराबाद (दक्षिण) स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर नेते, विद्वान व ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव व्यंकटेश भगवान खेडगीकर.त्यांचा जन्म कर्नाटकातील सिंदगी (जिल्हा विजापूर) येथे कर्मठ ब्राह्मण कुटुंबात झाला. वडील भगवानराव प्राथमिक शाळेत शिक्षक होते. त्यांनी दोन मुलींनंतर संन्यास घेतला पण पत्नीची संमती घेतली नाही. तेव्हा त्यांच्या गुरूंनी त्यांना परत गृहस्थाश्रमात जाण्याची आज्ञा दिली. त्यानंतर त्यांना हे पुत्ररत्न झाले. जन्मगावी प्राथमिक शिक्षण घेऊन ते सोलापूरच्या नॉर्थकोट हायस्कूलमध्ये दाखल झाले. तिथे मॅट्रिकला असताना गांधी टोपी घातली म्हणून स्वामीजींना छड्या खाव्या लागल्या पण टोपी काढण्याचा हुकूम त्यांनी पाळला नाही. त्यांना शाळेतून बहिष्कृत केले गेले. तेव्हा त्यांनी एका राष्ट्रीय विद्यालयातून मॅट्रिकची परीक्षा दिली आणि पुढे अमळनेर व पुणे येथील महाराष्ट्र विद्यापीठातून इतिहास, अर्थशास्त्र व राज्यशास्त्र या विषयांसह बी.ए. व ‘लोकशाहीचा विकास’ हा प्रबंध लिहून एम्.ए. पदवी संपादन केली. त्यानंतर १९२६ मध्ये ना. म. जोशी यांच्या स्वीय साहाय्यकपदी ते रुजू झाले. त्यामुळे आपाततः गिरणी कामगारांच्या लढ्यात ते सक्रिय सहभागी झाले. तत्पूर्वी लोकमान्य टिळकांच्या निधनाने ते अतीव दुःखी झाले. त्यांनी त्या वेळी ‘या क्षणापासून माझे सर्व उर्वरित जीवन मी मातृभूमीच्या चरणी वाहत आहे, सर्व सुखांचा त्याग करून मी आजन्म ब्रह्मचर्य व्रताचे पालन करीन’, अशी प्रतिज्ञा केली आणि आयुष्यभर तिचे पालन केले.
ना. म. जोशींनी स्वामीजींना कामगारविषयक विधेयकाची माहिती घेण्यासाठी ऐन हिवाळ्यात दिल्लीला पाठविले. दिल्लीच्या थंड हवामानामुळे त्यांना पक्षाघाताचा झटका आला व त्यात त्यांचे दीड वर्ष वाया गेले. नंतर त्यांनी अध्यात्माची कास धरली आणि १४ जानेवारी १९३० रोजी आपल्या जन्मनावाचा त्याग करून भिक्षुकी अंगीकारली. त्यानंतर १४ जानेवारी १९३२ रोजी हिप्परगा (तालुका लोहारा, जिल्हा उस्मानाबाद) येथे लखनौस्थित स्वामी नारायण यांच्याकडून संन्यासदीक्षा घेऊन ते स्वामी रामानंद तीर्थ झाले. त्यांनी हिप्परगा येथे तत्पूर्वीच १९३० मध्ये राष्ट्रीय विचारांच्या प्रचारार्थ शिक्षण संस्था काढली. सहा-सात वर्षे राष्ट्रीय बाण्याने हे कार्य केल्यानंतर ते १९३५ मध्ये सक्रिय राजकारणात सहभागी झाले आणि याच सुमारास आंबेजोगाई येथे योगेश्वरी नूतन विद्यालयात शिक्षकाची नोकरी धरली. पुढे ते मुख्याध्यापकही झाले. याच काळात आ. कृ. वाघमारे आणि अनंतराव कुलकर्णी यांनी हैदराबाद संस्थानच्या जुलूमजबरदस्तीला शह देण्यासाठी हैदराबाद संस्थान महाराष्ट्र संघाची स्थापना केली. १९३१ मध्ये केशवराव कोरटकर आणि धर्मवीर वामनराव नाईक यांच्या प्रेरणेने आर्य समाजाची स्थापना झाली होती. परभणी जिल्ह्यातील परतूर येथे १ जून १९३७ रोजी हैदराबाद संस्थान महाराष्ट्र परिषदेचे पहिले अधिवेशन गोविंदराव नानल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. त्यानंतर हैदराबादमधील जनता शिक्षण परिषदेच्या अधिवेशनात स्वामीजींनी मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीवर घणाघाती टीका केली. या भाषणानंतर सर्व सहकाऱ्यांनी स्वामीजींना हैदराबाद संस्थानातील असंतुष्टांचे नेतृत्व स्वीकारण्याचे आवाहन केले. त्याच सुमारास स्वामीजींनी आपल्या असंख्य अनुयायांसह आंबेजोगाई सोडून हैदराबादला प्रयाण केले.
स्वामी रामानंदांनी ९ जून १९३८ पासून हैदराबाद शहरात कायमचे वास्तव्य केले. त्या वेळी हैदराबाद स्टेट काँग्रेसमध्ये सधन व मवाळ पंथीय कार्यकर्त्यांचे प्राबल्य होते. ते स्वामीजींच्या क्रांतिकारक चळवळी-पासून दूर राहिले. स्वामीजींनी गोविंदभाई श्रॉफ, आ. कृ. वाघमारे, बाबासाहेब परांजपे, शंकरराव चव्हाण, दिगंबरराव बिंदू , रवीनारायण रेड्डी यांसारख्या निष्ठावान मित्रांच्या सहकाऱ्याने काँग्रेसांतर्गत स्वतंत्र संघटना स्थापन केली आणि निजामाच्या जुलमी राजवटीविरुद्ध आंदोलन छेडले. निजाम सरकारने स्टेट काँग्रेसवर बंदी घातली आणि स्वामीजींसह सर्व कार्यकर्त्यांना बंदीहुकूम मोडल्याबद्दल तुरुंगात डांबले (१९३८). स्वामीजींना स्वातंत्र्यापर्यंतच्या दहा वर्षांच्या काळात (१९३८-४८) अनेक वेळा शिक्षा होऊन सलग १११ दिवस अंधारकोठडीत ठेवले होते.
महात्मा गांधींनी १९४२ मध्ये छोडो भारत आंदोलनाचा इशारा देताच त्याचे पडसाद हैदराबाद संस्थानातही उमटले. हैदराबादमध्ये हिंदूंचे जीवन असुरक्षित व धोकादायक बनले. अशा परिस्थितीत स्वामीजींनी नागरी हक्कांसंदर्भात सत्याग्रह व सनदशीर मार्गांचा निजामशाहाविरुद्ध फारसा उपयोग होणार नाही हे जाणले आणि त्यांनी आपला लढा प्रखर व तीव्र करण्याचा मनोदय व्यक्त केला. १६-१८ जून १९४७ या काळात हैदराबाद संस्थानातील मुशिराबाद भागात भरविलेल्या स्टेट काँग्रेसच्या अधिवेशनात स्वामी रामानंद यांनी ⇨ हैदराबाद स्वातंत्र्यसंग्रामाचा नारा पुकारून सर्व कार्यकर्त्यांना निजामाविरुद्ध लढण्याचे आवाहन केले. या सशस्त्र लढ्यात सत्याग्रह, साराबंदी, निजामी ठाण्यांची लूट, बँक-दरोडे, सरकारी कागदपत्रांची होळी अशा विविध मार्गांनी व गनिमी काव्याने क्रांतिकारकांनी निजाम सरकारला वेठीस धरण्याचे प्रयत्न केले.
भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले, तत्पूर्वी हिंदुस्थानची फाळणी होऊन भारत व पाकिस्तान ही दोन राष्ट्रे उदयास आली परंतु निजामाने हैदराबाद संस्थान भारतात विलीन होणार नाही व आपले स्वतंत्र अस्तित्व कायम राहील असे घोषित केले तथापि संस्थानातील जनतेस स्वामीजींनी स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचे आवाहन केले. निजाम सरकारने तिरंगा फडकाविण्यास बंदी घातली आणि बंदी मोडणाऱ्यास जबर शिक्षा फर्माविली. त्यामुळे रझाकारांचे अत्याचार व जुलूम प्रचंड प्रमाणात वाढले. त्यानंतर ३० जानेवारी १९४८ रोजी उमरी (जिल्हा नांदेड ) येथील बँक स्वातंत्र्यसैनिकांनी भरदिवसा लुटली. या सुमारास स्वामीजी तुरुंगात होते आणि तेथून ते कार्यकर्त्यांना संदेश धाडीत असत. अखेर तत्कालीन गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांनी १३ सप्टेंबर १९४८ रोजी पोलीस कारवाई करून हैदराबाद संस्थानातील निजाम राजवट संपुष्टात आणली. त्या वेळी स्वामीजींची तुरुंगातून मुक्तता झाली आणि हैदराबादेत सत्ता स्थापण्याच्या हालचाली त्यांनी सुरू केल्या.
स्वातंत्र्य लढ्यातील निष्ठावान व सच्च्या कार्यकर्त्यांनी केलेल्या संघर्षाकडे दुर्लक्ष करून काँग्रेसश्रेष्ठी भलत्याच स्वार्थी व संस्थानातील धनाढ्यांकडे सत्ता सोपवू पाहत आहेत, हे पाहून स्वामीजींनी हैदराबाद स्टेट काँग्रेसचे अध्यक्षपद सोडले मात्र त्यांनी काँग्रेसचे सभासदत्व सोडले नव्हते. राजकारणापासून अलिप्त राहून शैक्षणिक काऱ्याकडे ते वळले. त्यांनी नांदेड येथे १९५० मध्ये नांदेड एज्युकेशन संस्थेची स्थापना केली आणि नांदेड शहरात पीपल्स कॉलेज काढले. त्यानंतर त्यांनी १९५२ च्या सार्वत्रिक निवडणुकांत गुलबर्गा मतदार संघातून निवडणूक लढवून संसदेत प्रवेश केला. १९५३ मध्ये अखिल भारतीय काँग्रेसच्या अधिवेशनात त्यांनी हैदराबाद राज्याच्या विभाजनाचा प्रश्न प्रभावीपणे मांडला आणि मराठवाड्यातील जनतेची महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या कानी घातली. स्वामीजींनी १९५७ मध्ये औरंगाबाद मतदारसंघातून निवडणूक लढवून पुन्हा खासदारकी मिळविली आणि मराठवाड्याचा प्रश्न धसास लावला. १ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या वेळी त्याची कार्यवाही झाली.
सक्रिय राजकारणातून निवृत्त होऊन स्वामीजींनी विनोबांच्या भूदान चळवळीत सहभाग घेतला आणि तेलंगणातील विषम व्यवस्थेच्या संदर्भात आपले प्रयत्न चालविले. या चळवळीच्या निमित्ताने त्यांची पायपीट वाढली आणि १९७१ मध्ये त्यांच्या पायाचा आजार बळावला. त्यातच काही महिन्यांनी त्यांचे हैदराबाद (आंध्र प्रदेश) येथे निधन झाले.
देशपांडे, सु. र.
“