द्यूकॉमं, एली : (१९ फेब्रुवारी १८३३–७ डिसेंबर १९०६). नोबेल शांतता पारितोषकाचा मानकरी व स्वीस वृत्तपत्रकार. जिनीव्हा येथे जन्म. त्याच्या बालपणाविषयी तसेच शिक्षणासंबंधी फारशी माहिती उपलब्ध नाही. Revue de Geneve या वृत्तपत्राचा तो प्रमुख संपादक होता (१८५५). त्यानंतर तो बर्नला गेल आणि तेथे त्याने Der Fortschritt हे वृत्तपत्र सुरू केले. त्यातून तो जागतिक शांतताकार्याचा प्रसार करी. त्याने ज्युरी सिंप्लॉन रेल्वे कंपनीत चिटणीसाचे काम पतकरले. होते तथापि फावला वेळ तो शांतिकार्यात व्यतीत करे, यूरोपीय संघटनेच्या कार्यात त्याने सक्रिय भाग घेतला अणि त्याच्या पुरस्कारार्थ Les Etats-unis-d’ Europe हे नियतकालिक चालविले.१८६५ मध्ये स्थापन झालेल्या आंतरराष्ट्रीय शांतता व स्वातंत्र्य संघाचे मासिकही तोच चालवीत असे. १८९९ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय शांतता परिषदांत भाग घेतला आणि पुढे दोन वर्षानी आंतरराष्ट्रीय शांतता कार्यालयाची स्थापना केली. त्याचा तो पहिला सचिव होता. १८९५ मध्ये त्याने या कार्यालयाचा सर्व पत्रव्यवहार प्रसिद्ध केला. त्याने विपुल लेखन केले असून त्यांपैकी Loeurre de la paix (१८९३) la programme pratigue des amis de la paix (१८९७), Precis historigue dee mouvement en fuveur de la paix (१८९९) हे ग्रंथ उल्लेखनीय आहेत. १९०२ मध्ये त्याच्या कार्याबद्दल त्यास चार्ल्स गोबा याच्या समवेत नोबेल पारितोषिक मिळाले. तो बर्न येथे मरण पावला.

देशपांडे, सु. र.