स्वामी नारायण पंथ : एक वैष्णव भक्तिपंथ. स्वामी नारायण हे या पंथाचे आराध्य दैवत असल्यामुळे त्यांचे नाव या पंथाला मिळाले. स्वामी सहजानंद हे ह्या पंथाचे थोर आचार्य. सहजानंदांना उद्धवाचे अवतार मानले जात असल्यामुळे उद्धव संप्रदाय म्हणूनही तो ओळखला जातो. सहजानंदांचे मूळ नाव हरिकृष्ण. त्यांचा जन्म १७८१ चा. त्यांच्या वडिलांचे नाव धर्मदेव आईचे भक्तिदेवी. हरिकृष्ण नऊ वर्षांचे असतानाच त्यांच्या आईवडिलांचे निधन झाल्यामुळे विरक्ती येऊन ते परमार्थाच्या मार्गावर चालू लागले. परमार्थाच्या क्षेत्रात यथोचित गुरू मिळावा, यासाठी त्यांनी सात वर्षे भारतयात्रा केली तपस्या केली त्याचप्रमाणे एका योग्याकडून योगविद्या प्राप्त करून घेतली. सौराष्ट्रात त्यांना रामानंद हे गुरू भेटले. त्यांनी हरिकृष्णांना आपल्या रामानंदी संप्रदायाची दीक्षा दिली, तसेच त्यांना सहजानंद हे नाव दिले. या संप्रदायात सहजानंदांनी रामानंदांचे उत्तराधिकारी म्हणून स्थान प्राप्त करून घेतले आणि रामानंदांच्या मृत्यू-नंतर ते त्यांच्या गादीवर बसले. परमेश्वरावर लक्ष केंद्रित करून आपल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या आणि मठातील सर्व साधकांची दुःखे स्वतः सोसावी अशी त्यांची इच्छा होती आणि रामानंदांच्या मृत्यूसमयी तसा आशीर्वाद त्यांनी त्यांच्याकडे मागितला होता.
सहजानंदांना दिसत होते, की या संप्रदायाची अवस्था चांगली राहिलेली नाही. या संप्रदायात स्वतःला साधू म्हणवणारे बेशिस्त वर्तन करतात. ते आळशी झालेले आहेत. भोगवादी प्रवृत्ती वाढत आहे. अशा या संप्रदायाची घडी नीट बसवली पाहिजे, त्यासाठी त्यांनी पंथात प्रवेश करू इच्छिणाऱ्यांसाठी कडक नियम लागू केले. पाच प्रतिज्ञा त्यांना घ्याव्या लागत. त्या अशा : (१) चोरी कधी करणार नाही. (२) व्यभिचार कधी करणार नाही. (३) मांस कधी खाणार नाही. (४) मद्यपान कधी करणार नाही. (५) नीच यातीकडून कधी भिक्षा घेणार नाही.
यांखेरीज पंथीयांसाठी इतरही काही नियम होते : पंथीय साधूंनी वीस ते पंचवीस जणांचा समूह करून राहावे, अनवाणी हिंडावे, कोणत्याही वाहनात बसू नये, झोपताना अंथरुण घेऊ नये इत्यादी. साधू ज्या ज्या गावी जातील, तेथे त्यांनी भागवताचे निरूपण करावे. झाडाची फुले, पाने, फळे तोडू नयेत. यांखेरीज पावसाळ्यात एकाच ठिकाणी राहावे. हिवाळ्यात वेगवेगळ्या दिशांना जावे असेही काही नियम होते. सहजानंदांनी हा संप्रदाय वाढवला. त्यात शिस्त आणली. १८३० मध्ये त्यांचे निधन झाले.
पंथाचे अनुयायी पंथाला मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत करीत असल्यामुळे पंथाकडे विपुल धनसंचय झालेला होता. हे धन सहजानंदांनी मठ, मंदिरे बांधण्यासाठी उपयोगात आणले. आजही या पंथाला धनाची कमतरता भासत नाही.
स्वामी नारायण म्हणजेच श्रीकृष्ण त्याचीच उपासना करावी. त्याला शरण जावे. परमेश्वराच्या निकट असणे हीच मुक्ती होय. परमेश्वरापाशी करुणा आणि वात्सल्य आहे, तो उदार आहे, अशी या पंथाची शिकवण आहे. ⇨ पुष्टिमार्ग आणि ⇨ विशिष्टाद्वैतवाद यांचा या पंथावर प्रभाव आहे.
स्वामी सहजानंदांनी लक्षणीय असे सामाजिक कार्यही केले. सौराष्ट्रात लूटमारीचा धंदा करणाऱ्यांना त्यांनी सन्मार्गाला लावले. अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांना त्यांच्या व्यसनांपासून सोडविले. मुलगी नको म्हणून
ती जन्मताच तिला ठार मारण्याची दुष्ट प्रथा त्यांनी बंद पाडली.
द्वारका हे या पंथाचे मुख्य तीर्थस्थान. या पंथात साधू आणि ब्रह्मचारी असे दोन प्रकार आहेत. साधू भगव्या वस्त्रांत, तर ब्रह्मचारी श्वेतवस्त्रांत असतात. त्यांच्या कपाळावर नाम आणि त्याच्या मध्यभागी लाल टिळा असतो. भिक्षेत मिळालेले वेगवेगळे पदार्थ एकत्र करून खातात. शेंडी, जानवे ठेवतात. तुळशीच्या माळा गळ्यात घालतात. कमंडलू बाळगतात. स्त्रियांशी ते बोलत नाहीत. या पंथात स्त्री-पुरुषांनी एकत्र येण्यावर बंदी आहे. सहजानंद, बलराम व पुरुषोत्तम हे या पंथाचे तीन मोठे आचार्य होत.
स्वामी नारायणाची मंदिरे ठिकठिकाणी आहेत. त्यांपैकी गदरा, वडताल आणि अहमदाबाद येथील मंदिरे प्रसिद्ध आहेत. मंदिरांतून लक्ष्मी-नारायण, राधाकृष्ण, नरनारायण, कृष्ण-बलदेव, शिव, गणेश, सूर्य, हनुमान यांच्या प्रतिमांखेरीज सहजानंद व त्यांच्या आईवडिलांच्या मूर्तीही असतात.
वचनामृत हा ह्या पंथाचा अत्यंत पवित्र मानलेला ग्रंथ. त्यात सहजानंदांची २६२ वक्तव्ये संग्रहित केलेली आहेत. भिक्षापत्री हा त्यांचा दुसरा महत्त्वाचा ग्रंथ. यात त्यांच्या २१२ कविता आहेत. संप्रदायाची मार्गदर्शक सूत्रे यात आहेत. सहजानंदांच्या शिष्यपरंपरेतील कवींनी हजारो पदे लिहिली आहेत.
कुलकर्णी, अ. र.