मोनकोंबू, स्वामिनाथन्

स्वामिनाथन्, मोनकोंबूसांबशिवन् : (७ ऑगस्ट १९२५). भारतीय कृषिवैज्ञानिक. अनुप्रयुक्त आनुवंशिकी विषयाच्या संशोधन कार्याबद्दल प्रसिद्ध आणि भारतातील हरितक्रांतीचे जनक. त्यांचा जन्म तमिळनाडूमधील कुंभकोणम् येथे झाला. तेथेच त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांनी त्रावणकोर विद्यापीठा-तून (आताचे केरळ विद्यापीठ) बी.एस्सी. (प्राणिशास्त्र, १९४४) व मद्रास विद्यापीठातून बी.एस्सी.( कृषी, १९४७) या पदव्या मिळविल्या. तसेच त्यांना आनुवंशिकीमध्ये बटाट्यावर संशोधन केल्याबद्दल केंब्रिज विद्यापीठाची पीएच्.डी. (१९५२) ही पदवी मिळाली. १९५२ मध्येच त्यांची अमेरिकेतील विस्कॉन्सिन विद्यापीठात संशोधकपदी नेमणूक झाली. तेथेही त्यांनी बटाट्यावरील संशोधन चालू ठेवले. त्यांच्या संशोधनामुळे बटाट्याच्या सोलॅनम ट्युबरोजम या जातीच्या मूळ ठिकाणाचा शोध लागला. या वेळी त्यांच्या शोधनिबंधाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली. आनुवंशिकी शास्त्रातील आपल्या संशोधनाचा उपयोग भारतातील अन्न समस्या सोडविण्यासाठी व्हावा, असा निर्धार करून ते भारतात परतले.

इसवी सन १९५४ मध्ये भारतात परतल्यावर स्वामिनाथन् यांची कटक येथील केंद्रीय भात संशोधन केंद्रात वनस्पतिशास्त्रज्ञ या पदावर नेमणूक झाली. वर्षभरातच त्यांच्यावर दिल्लीच्या भारतीय शेती संशोधन परिषदेत गहू संशोधनाची जबाबदारी टाकण्यात आली. १९६६ मध्ये ते ⇨ भारतीय कृषी संशोधन संस्थेचे संचालक म्हणून रुजू झाले. त्यानंतर त्यांनी शेतीच आपली प्रयोगशाळा मानली. शेतकऱ्यांबरोबर प्रत्यक्ष शेतात काम करीत असता शेतकऱ्यांच्या पारंपरिक कृषी पद्धतीच्या मऱ्यादा त्यांच्या लक्षात आल्या. त्यामुळे त्यांनी गव्हाच्या सुधारित वाणाच्या निर्मितीचे प्रयोग हाती घेतले. गव्हाचे उत्पादन वाढविणे ही त्या वेळी जगभरातील सर्व राष्ट्रांची समस्या होती. प्रसिद्ध कृषिशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते ⇨ नॉर्मन अर्नेस्ट बोर्लॉग यांनी भरघोस उत्पन्न देणारी गव्हाची बुटकी (खुजी) जाती विकसित केली होती. त्यामुळे मेक्सिको-मध्ये दर हेक्टरी उत्पादन चौपटीने वाढले होते. भारतीय शेतीची बोर्लॉग यांनी पाहणी केल्यास भारतातील वातावरणास योग्य असा वाण निवडता येईल शिवाय येथील संशोधनाला गती येऊ शकेल, अशी सूचना स्वामिनाथन् यांनी केल्यामुळे बोर्लॉग शेतीची पाहणी करण्याकरिता भारतात आले व त्यांनी रोपांची निवड तसेच त्यांच्या वर्गीकरणाबाबत मोलाचा सल्ला दिला.

बोर्‍लॉग यांनी पाठविलेल्या गव्हाच्या जातींच्या चाचणीचा सविस्तर अहवाल स्वामिनाथन् यांनी तयार केला. त्यांनी गव्हाच्या मेक्सिकन जातीच्या साहाय्याने नवीन गव्हाच्या संकरित जाती शोधून काढल्या. त्यांनी बुटक्या ड्युरम गव्हाच्या संकराने मालविका हा वाण शोधून काढला.तसेच त्यांनी सरबती सोनोरा हा बुटका आणि न लोळणारा वाण शोधून काढला. जपानी आणि देशी वाणांशी संकर करून त्यांनी सोनेरी वर्णाचा दाणा असलेल्या कसदार गव्हाचा नवा वाण तयार केला आणि त्या वाणाचा देशभर प्रसार करण्यास उत्तेजन देऊन पाठपुरावा केला. त्यामुळे देशातील गव्हाचे उत्पादन अनेक पटींनी वाढले व देशात हरितक्रांतीला सुरुवात झाली. गव्हाप्रमाणेच त्यांनी भाताची पुसा २-२१ आणि बासमती यांच्या संकराने साबरमती हा वाण शोधून काढला. १९६४ मध्ये त्यांनी तृणधान्यांच्या नवनवीन संकरित जातींसाठी राष्ट्रीय प्रात्यक्षिक कार्यक्रमात सुधारणा केली. त्यानंतर ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, कपाशी, भुईमूग व बटाटा या प्रमुख पिकांचे उत्पादन वाढू लागले. तसेच द्राक्षे, सफरचंद, केळी, आंबा, पपई, पेरू व चिकू अशा फळांच्या उत्पादनांतही वाढ झाली. अशा रीतीने तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतात कृषी उत्पादन वाढले. यामध्ये स्वामिनाथन् यांचे योगदान मोलाचे ठरले.

स्वामिनाथन् यांनी त्यांच्या प्रारंभीच्या संशोधनात बटाट्याच्या बहुगुणित जातींचे संशोधन केले. बर्फ पडल्यावर बटाट्याच्या पिकाचे प्रचंड नुकसान होणे ही मुख्य समस्या होती. हे जाणून त्यांनी सोलॅनम ॲक्युल या जंगली जातीतून हिमवर्षावातही प्रतिकार करून पिकाची हानी न होऊ देणारा जनुक वेगळा केला आणि सोलॅनम ट्युबरोजम या जातीशी संकर घडवून अलास्का फ्रॉस्टलेस ही नवी जाती विकसित केली. बटाट्याच्या उत्पादनात कमालीची वाढ झाल्याने ही जाती अतिशय लोकप्रिय ठरली.

स्वामिनाथन् यांना १९७० नंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अनेक राष्ट्रीय समित्यांवर सल्लागार म्हणून नेमले. राष्ट्रीय शेती आयोगाचे ते सदस्य होते. दारिद्य्र निर्मूलन प्रकल्पासाठीच्या तज्ञ समितीमध्ये तसेच अंधत्व निवारण, कुष्ठरोग निर्मूलन समितीमध्ये त्यांचा सहभाग राहिला. भारत सरकारने विज्ञान-तंत्रज्ञान, आरोग्य व शिक्षण क्षेत्रांत त्यांचा वेळोवेळी सल्ला घेतला आहे. त्यांचा जवळपास अठ्ठावीस वर्षे देशाच्या राजधानीत शेती, संशोधन, प्रसार व नियोजन यांच्याशी संबंध आला (१९५४-८२). १९८०-९३ या काळात भात पिके आणि सागरी किनारपट्टीतील वनस्पती वैविध्य यांचे संरक्षण यांवरील संशोधनाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले होते. भारतीय शेतकऱ्यांच्या संदर्भात स्थापन झालेल्या ‘नॅशनल कमिशन ऑन फार्मर’ या राष्ट्रीय आयोगाचे ते अध्यक्ष होते (२००४-०६). राष्ट्रीय नमुना पाहणी संघटनेच्या एक्कावन्नाव्या पाहणीचा अहवाल व इतर अभ्यासाच्या आधारे त्यांनी भारतीय शेतीची एकूण १६ भिन्नत्वदर्शक वैशिष्ट्ये विषद केली आहेत.

स्वामिनाथन् यांचा आंतरराष्ट्रीय समित्यांमध्ये सहभाग राहिला असून अनेक वैज्ञानिक क्षेत्रातील संस्थांकडून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. ते भारताच्या राज्यसभेचे सदस्यही होते (२००७-०९, २००९-१०). त्यांना भारत सरकारने पद्मश्री (१९६७), पद्मभूषण (१९७२) व पद्मविभूषण (१९८९) देऊन गौरविलेले आहे. कृषिविज्ञान आणि अन्नधान्य उत्पादन वाढीसाठी केलेल्या संशोधनामुळे त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार मिळाले. राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये त्यांना शांतिस्वरूप भटनागर पारितोषिक (१९६४), बिरबल सहानी पुरस्कार (१९६६), बोर्लॉग पुरस्कार (१९७९), मेघनाद साहा पदक (१९८१), जगदीशचंद्र बोस पदक (१९८९), चार्ल्स डार्विन आंतरराष्ट्रीय विज्ञान व पऱ्यावरण पदक (१९९३), बिपीनचंद्र पाल पदक (१९९७), उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची (जळगाव) डी.लिट् ., ही सन्मान्य पदवी (२०१३), इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार (२०१३) इ. पुरस्कार मिळाले. तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कारांमध्ये त्यांना चेकोस्लोव्हाकियातील मेंडेल मेमोरियल पदक (१९६५), रामन मागसायसाय (मॅगसेसे) पारितोषिक (१९७३), ॲल्बर्ट आइन्स्टाइन जागतिक विज्ञान पारितोषिक (१९८६), कृषी क्षेत्रातील नोबेल गणला जाणारा पहिला वर्ल्ड फूड प्राइज पुरस्कार (१९८७), फिलिपीन्सचा द गोल्डन हार्ट प्रेसिडेन्शियल पुरस्कार (१९८७), नेदरर्लंड्सचा कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द गोल्डन आर्क पुरस्कार (१९९०), जपानचा होंडा पुरस्कार (१९९१), पऱ्यावरण संवर्धन आणि विकासासाठी आंतरराष्ट्रीय समन्वय घडविल्याबद्दल चीनचा सर्वोच्च पुरस्कार (१९९७), फ्रान्सचा शेती क्षेत्रातील ऑर्डर टू मेरिट पुरस्कार (१९९७), अमेरिकेतील हेन्री शॉ पदक (१९९८), टाइम साप्ताहिकाकडून विसाव्या शतकातील आशिया खंडाच्या इतिहासावर ठसा उमटविणाऱ्या अलौकिक अशा वीस व्यक्तींमध्ये समावेश (१९९९), अमेरिकेतील व्होल्व्हो एन्व्हायरन्मेंट पुरस्कार (२०००) इ. मानसन्मानांचा समावेश होतो.

स्वामिनाथन् यांची काही प्रसिद्ध पुस्तके पुढीलप्रमाणे आहेत : बिल्डिंग ए नॅशनल फूड सिक्युरिटी सिस्टिम (१९८१), सस्टेनेबल ॲग्रिकल्चर : टूवर्ड्स ॲन एव्हरग्रीन रिव्होल्यूशन (१९९६), सस्टेनेबल ॲग्रिकल्चर : टूवर्ड्स फूड सिक्युरिटी (१९९६), ग्रोव्हज ऑफ ब्युटी अँड प्लेण्टी : ॲन ॲटलास ऑफ मेजर फ्लॉवरिंग ट्रीज इन इंडिया (सहलेखक, २००३), टूवर्ड्स ए हंगर फ्री वर्ल्ड : द एथिकल डायमेन्शन्स (२००४), नॅशनल फूड सिक्युरिटी समिट (सिलेक्टेड पेपर्स, २००४), टूवर्ड्स ए हंगर फ्री इंडिया : फ्रॉम व्हिजन टू ॲक्शन (२००४), एन्व्हायरन्मेंट अँड ॲग्रिकल्चर (२००६), ॲग्रिकल्चर कॅन नॉट वेट (२००६) इत्यादी.

संदर्भ : देऊळगावकर, अतुल स्वामिनाथन : भूकमुक्तीचा ध्यास, पुणे, २०००.

धुमाळ, रा. रा. घोडराज, रवीन्द्र