स्प्रूस : (लॅ. पिसिया कुल-पायनेसी गण-कॉनिफेरेलीझ). ही प्रकटबीज वनस्पतींपैकी पिसिया प्रजातीमधील महत्त्वाची सदाहरित वनस्पती आहे [⟶ वनस्पति, प्रकटबीज उपविभाग]. पिसिया प्रजातीत सु. ४० जाती असून त्यांना सर्वसामान्य इंग्रजी नाव ‘स्प्रूस’ असे आहे. त्यांचा प्रसार उत्तर गोलार्धातील समशीतोष्ण व थंड प्रदेशांत विपुल आहे. त्याखेरीज अधिक उच्चतेवरील थंड हवामानातही काही जाती आढळतात. कॅनडा व अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशांत स्प्रूसच्या सात जाती, मेक्सिकोत एक, यूरोपात दोन आणि आशियात एकोणतीस जाती आढळतात. त्यांपैकी भारतात तीन जाती जंगली अवस्थेत आढळतात. या जातीं पैकी पि. स्मिथियाना उत्तर व वायव्य हिमालयात, पि. ब्रॅकिटिला नेफामध्ये आणि पि. स्पायनुलोजा पूर्वेस सिक्कीम, भूतान आणि पुढे मिश्मी टेकड्या ह्या प्रदेशांत आढळते. दोन आयात जाती (पि. ॲबीस व पि. सिचेन्सिस) पश्चिम हिमालयात लागवडीत आहेत. स्प्रूसच्या सर्व जाती बहुधा उंच, डौलदार व सदापर्णी असून त्यांचा आकार स्तूपासारखा असतो [⟶ कॉनिफेरेलीझ]. खोडावर पसरट आडव्या व काहीशा लोंबत्या फांद्यांची मंडले, पातळ आणि खवलेदार साल आणि रेषाकृती (सूच्याकृती) व सर्पिल लहान पाने असतात. खोडाची उंची १८–६० मी व क्वचित ९० मी.पर्यंत जाते. तसेच त्याचा घेर ०·६–१·२ मी. व क्वचित ४·८० मी.पर्यंत (उदा., सितका स्प्रूस) आढळतो. हिमालयीन स्प्रूसची (पि. स्मिथियाना) उंची सु. ६० मी. व घेर ५·७० मी. असल्याचे आढळले आहे. काही वृक्षांचा आयुःकाल सु. ६०० वर्षांपर्यंत (उदा., एंगलमान स्प्रूस) आढळला आहे. या वृक्षांना पायनसप्रमाणे [⟶ पाइन] पानांचे झुबके नसतात. ती एकेकटी व सूक्ष्म कठीण उंचवट्यावर (पुलवृंत) येतात ती बहुधा चौकोनी, परंतु कधी सपाट (उदा., पि. स्पायनुलोजा) असून गळल्यानंतर मागे कठीण खुंट राहतो. तसेच स्प्रूस वृक्षांना येणारे शंकू सरळ लोंबते व स्थिर शल्कयुक्त असतात. फरचे शंकू सरळ, परंतु उभे वाढतात व त्यांची पाने सपाट रांगांत येतात [⟶ फर–१] यामुळे पाइन व फर यांपासून स्प्रूस वेगळे काढता येतात. स्प्रूसचे शंकू एकलिंगी, परंतु एकाच झाडावर असून ते नतकणिशाप्रमाणे लोंबते व अग्रस्थ किंवा कक्षास्थ असतात. पुं-शंकू पिवळे किंवा लाल व त्यावरची अनेक लघुबीजुकपर्णे सर्पिल, टोकास विस्तृत आणि शल्कयुक्त असतात. प्रत्येकावर दोन परागकोश असून पराग (लघुबीजुके) सपक्ष असतात. स्त्री-शंकू हिरवट किंवा जांभळे गुरुबीजुकपर्णे सर्पिल, खवल्यासारखी व त्यांच्या बगलेत प्रत्येकी दोन गुरुबीजुके असतात. प्रत्येक बीजाला एक मोठे पातळ पंख असते. बी पडून गेल्यावर त्यांना आधारभूत असलेली शल्के काही काळ झाडावरच राहतात.
स्प्रूसच्या काही जाती भिन्न हवामानाप्रमाणे निवड करून थंड प्रदेशातील किंवा रस्त्यांच्या दुतर्फा शोभेकरिता लावतात. काही अपवाद वगळल्यास त्यांची वाढ जलद असून आकार रेखीव व मनोवेधक असतो. उद्यानविद्येच्या साहाय्याने सुशोभिकरणाकरिता काही खुजे व विचित्र प्रकार बनविले आहेत. कुंपणाकरिता, आसऱ्याकरिता व मोठ्या वाऱ्यापासून संरक्षण मिळविण्याकरिता त्यांची विशेषप्रकारे लागवड करतात. ओली व कोरडी जमीन त्यांना चालत नाही. उथळ, साधारण ओलसर व रेतीमिश्रित जमिनीत हे वृक्ष चांगले वाढतात. साधारण वाढलेल्या झाडांचे स्थानांतर करणे सोपे असते. कारण त्यांची मुळे जमिनीत खोल गेलेली नसतात. अभिवृद्धी बियांपासून करतात. भिन्न प्रकारच्या कलमांनीही यशस्वी लागवड होते.
हे वृक्ष लाकडाकरिता महत्त्वाचे मानले आहेत. ते बळकट, चिवट, हलके व नरम प्रकारचे असून खोकी व आगपेट्या करण्यास, घरे व जहाजे यांच्या अंतर्गत सजावटीत व बांधणीत आणि जळण, सिलिपाट, तुळया, खांब इत्यादींकरिता वापरतात. काहींच्या साली कातडी कमविण्यास व राळेसारखे भाग औषधाकरिता उपयोगात आणतात. लाल व काळा स्प्रूस यांच्या कोवळ्या फांद्या मधाबरोबर उकळून बिअर पेय बनवितात. पांढरा, लाल, काळा, सितका व एंगलमान या जाती व्यापारी दृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. कागदनिर्मितीत त्यांचा काष्ठ लगदा अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. पियानोसारख्या संगीत वाद्यांत व काही तंतुवाद्यांकरिता याचे लाकूड फार उपयुक्त असल्याचे आढळले आहे. याच्या सालीपासून टर्पेंटाइन तेलही काढतात. काही जातींतील बाष्पनशील तेल अत्तरे व सौंदर्यप्रसाधने यांत वापरतात बियांतील तेल व्हार्निशमध्ये घालतात. नाताळात ‘नाताळ- वृक्षा ङ्खकरिता अनेक स्प्रूस वृक्षांचा वापर करतात. काही गदाकवक, तांबेरे व कीटक यांपासून ह्या वृक्षांचे नुकसान होते.
परांडेकर, शं. आ. कुलकर्णी, सतीश वि.
“