स्पेन्स, बॅसिल : (१३ ऑगस्ट १९०७—१९ नोव्हेंबर १९७६). तत्कालीन सनदी सेवेतील ब्रिटिश कुटुंबात झाला. सुरुवातीचे शिक्षण जन्मगावी घेऊन पुढे त्याने ग्रेट ब्रिटनमधील लंडन व एडिंबर्ग विद्यापीठांतील वास्तुशास्त्र विद्यालयांतून वास्तुशास्त्रात पदवी संपादन केली. त्यानंतर तो भारतात आला आणि नवी दिल्लीतील ‘व्हाइसरॉय हाउस’ मध्ये सर ⇨ एडविन लँड्सीर लट्येन्झ याच्या कार्यालयात रेखाचित्रकार म्हणून काम करू लागला. दुसऱ्या महायुद्धापूर्वी त्याने खेड्यापाड्यांतून प्रशस्त घरे बांधली आणि दुसऱ्या महायुद्धकाळात बाँबच्या वर्षावात उद्ध्वस्त झालेल्या ‘कॉन्व्हन्ट्री कॅथीड्रल’ या मध्ययुगीन प्रमुख चर्चच्या पुनर्बांधणीच्या अभिकल्प रेखाटन स्पर्धेत भाग घेतला आणि ती जिंकली (१९५१). त्याच्या अभिकल्पानुसार व मार्गदर्शनाखाली प्रस्तुत वास्तूचे बांधकाम १९६२ मध्ये पूर्ण झाले. या प्रकल्पाची तपशीलवार माहिती त्याने आपल्या ‘फीनिक्स ॲट कॉन्व्हन्ट्री ′ (१९६२) या पुस्तकात दिली आहे. स्पेन्सला वास्तू आणि तिचा अभिकल्प यांचा समन्वय, त्यातील बारकावे यांची जाण होती. याची प्रचिती त्याच्या ससेक्स विद्यापीठाच्या अभिकल्प व बांधकामातील (१९६२–६३) सर्वांगीण क्षेत्रीय कोंदणात प्रामुख्याने येते. या सुमारास तो रॉयल ॲकॅडेमी येथे वास्तुशास्त्रविषयाचा प्राध्यापक म्हणून कार्यरत होता (१९६१—६८). या काळात त्याने कौन्टीमधील अनेक चर्च, सदनिका, चित्रपटगृहे, कारखाने, कार्यालयांच्या इमारती यांचे अभिकल्प बनविले आणि त्या वास्तू बांधल्या. या त्याच्या कार्यकर्तृत्वामुळे ब्रिटिश शासनाने त्याच्याकडे रोम (इटली) येथील ब्रिटिश दूतावासाच्या वास्तूचे काम एक तज्ज्ञ वास्तुशास्त्रज्ञ म्हणून सुपूर्त केले. या वास्तूचे बांधकाम १९७१ मध्ये पूर्ण झाले. तत्पूर्वी माँट्रिऑलच्या ‘एक्स्पो-१९६७’ या औद्योगिक प्रदर्शनातील पॅव्हिलियनच्या बांधकामाचे कंत्राट त्यास दिले होते.
त्याच्या वास्तुप्रकल्पांतील ‘कॉन्व्हन्ट्री कॅथीड्रल’ची नवी, सुरेख व अलंकृत वास्तू ही लक्षणीय ठरली. त्याच्या या कार्याबद्दल राणी दुसरी एलिझाबेथ हिने त्यास नाइटहुडचा दर्जा दिला व ‘सर’ या किताबाने सन्मानित केले.
अल्पशा आजाराने त्याचे आय (सफोक) येथे निधन झाले.
देशपांडे, सु. र.