स्तास, झां सेर्व्हे : (२१ ऑगस्ट १८१३—१३ डिसेंबर१८९१). बेल्जियन रसायनशास्त्रज्ञ. मूलद्रव्यांची अणुभारनिश्चिती करण्या-संबंधी केलेल्या कार्याबद्दल प्रसिद्ध [⟶ अणुभार्रें].

  स्तास यांचा जन्म लूव्हाँ येथे झाला. ते एकोल रॉयल मिलिटरी, ब्रूसेल्स येथे रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते  (१८४० — ७२). 

  स्तास हे ⇨ झां बातिस्त आंद्रे द्यूमा आणि ⇨ थीओडोर विल्यम रिचर्ड्स यांच्या संशोधनकार्यामधील दुवा ठरतात, ज्यांनी अणुभारनिश्चिती-मध्ये वैशिष्ट्यपूर्ण कार्य केले आहे. त्यांच्या कार्याने परिमाणात्मक विश्लेषण क्षेत्रातील अनेक मूलभूत पद्धती निदर्शनास आल्या. अनेक महत्त्वाच्या मूलद्रव्यांचे अणुभार निश्चित करताना त्यांनी ⇨ विल्यम प्राउट यांचे मूलद्रव्याचा भार हा हायड्रोजनाच्या पटीत असतो, हे गृहीतक मान्य केले होते परंतु जसजसे संशोधन पुढे आले तसे हे गृहीतक काही प्रमाणात चुकीचे आढळले. उदा., क्लोरिनाचा अणुभार ३५.५ आहे, तो एकच्या पटीत नाही.

  स्तास आणि द्यूमा यांनी दाहक ( कॉस्टिक ) सोड्याचा विविध अल्कोहॉले व ईथरे यांवर होणार्‍या परिणामांचा अभ्यास केला आणि सर्व अल्कोहॉले त्यांच्याशी संबंधित अम्ले तयार करतात, हे सिद्ध केले. स्तास यांनी १८५० मध्ये विषारी वायूंसंबंधी अभ्यास करताना वनस्पतिज अल्कलॉइडे शोधण्याची पद्धती शोधून काढली. १८५० मध्ये त्यांनी दहा मूलद्रव्यांचे अणुभार निश्चित करणारा पहिला प्रबंध प्रसिद्ध केला. त्यांच्या संशोधनकार्याबद्दल त्यांना रॉयल सोसायटीने डेव्ही पदक दिले (१८८५). 

  स्तास यांचे ब्रूसेल्स येथे निधन झाले.          

साळुंके, प्रिती म.