स्ट्रिन्बॅर्य, आउगुस्ट : (२२ जानेवारी १८४९—१४ मे १९१२). स्वीडिश नाटककार, कादंबरीकार आणि कवी. जन्म स्टॉकहोममध्ये. वडील कार्ल ऑस्कर स्ट्रिन्बॅर्य हे उमराव वर्गातले. त्यांच्या व्यवसायात त्यांना फारसे यश मिळाले नाही. आई उल्रिका एलिनोरा नॉर्लिंग ही पूर्वी बाहेरची घरकामे करायची. द सन ऑफ सर्व्हंट (१८८६, इं. भा. १९१३) ह्या त्याच्या आत्मचरित्राचे नाव पाहिले, तर वडिलांच्या उमरावी पार्श्वभूमीपेक्षा श्रमिक आयुष्य जगलेल्या आईशी त्याला भावनिक नाते जोडावेसे वाटत होते, असे दिसून येते. अप्साला विद्यापीठात त्याने शिक्षण घेतले; पण त्याच्या अध्ययनाचा हा काळ अधूनमधून खंडित होत असे. वैद्यकाचा अभ्यास त्याने केला; पण तो पदवी मिळवू शकला नाही. आपल्या चरितार्थासाठी स्टॉकहोममध्ये तो मुक्त पत्रकारी ( फ्री लान्स ) करू लागला. दरम्यानच्या काळात मास्टर अलॉफ हे स्वीडनमधील धर्मसुधारणेच्या विषयावरील आपले ऐतिहासिक नाटक पूर्ण करण्यातही तो गुंतला होता. हे नाटक अतिशय प्रभावी असले, तरी असांकेतिक असल्यामुळे स्वीडनच्या ‘रॉयल ड्रमॅटिक थिएटर’ने ते स्वीकारले नाही. स्वीडनच्या ऐतिहासिक महापुरुषांना त्याने सर्वसाधारण माणसांसारखे चित्रित केले आहे, हा त्याच्या नाटकावर मुख्य आक्षेप होता. ‘ रॉयल… ’ च्या दिग्दर्शकाने ह्या नाटकाच्या संहितेत अनेक बदल सुचविले. हे नाटक पद्यरूपात असावे, अशीही अपेक्षा त्याने व्यक्त केली. त्याच्या ह्या प्रतिक्रियेमुळे स्ट्रिन्बॅर्य निराश झाला, तरी दिग्दर्शकाच्या म्हणण्याप्रमाणे त्या नाटकाचे पुनर्लेखन करण्याचे त्याने मान्य केले आणि १८७६ मध्ये नाटकाची नवी संहिता पूर्ण केली. तथापि प्रस्थापित संस्था आणि परंपरा ह्यांबद्दल त्याच्या मनात तिटकारा निर्माण झाला. मात्र पुढे स्वीडिश नाट्यसाहित्यातील पहिले आधुनिक नाटक, अशी मान्यता ह्या नाट्यकृतीला मिळाली.
१८७२—७४ ह्या काळात पुन्हा पत्रकारी केल्यानंतर स्वीडनच्या ‘रॉयल लायब्ररी’त सहायक ग्रंथपाल म्हणून त्याला नोकरी मिळाली आणि आयुष्यात पहिल्यांदाच त्याला काही आर्थिक स्थैर्य लाभले. १८७५ मध्ये फिनलंडमधील स्वीडिश उमराव वर्गातल्या एका स्त्रीशी त्याची ओळख झाली; १८७७ मध्ये त्यांनी लग्न केले पण हे लग्न टिकले नाही. १८९१ मध्ये ह्या दोघांनी फारकत घेतली. तथापि ह्या लग्नानंतर तो अधिक उत्साहाने लिहू लागला. द रेड रूम (१८७९, इं. भा.) ही त्याची कादंबरी प्रसिद्ध झाली. स्वीडनच्या राजकीय, सांस्कृतिक आणि धार्मिक संस्थांमधील अपप्रवृत्तींवर ह्या कादंबरीत उपरोधप्रचुर टीका होती. या कादंबरीविरुद्ध झालेल्या वादळी प्रतिक्रियेमुळे एक वादग्रस्त, पण महत्त्वाचा लेखक म्हणून त्याला मान्यता मिळाली.
स्ट्रिन्बॅर्यने त्याच्या साहित्यकृतींतून स्वीडिश समाजावर अनेकदा अत्यंत बोचरी टीका केल्यामुळे स्वीडनमधील प्रस्थापितांशी त्याचा सतत संघर्ष होत राहिला. द स्वीडिश पीपल (१८८२, इं. भा. ) ह्या त्याच्या इतिहासग्रंथात त्याने स्वीडनच्या लोकपरंपरा आणि संस्कृती ह्यांवर भर दिला. त्यामुळे राजेरजवाडे आणि त्यांचे पराक्रम म्हणजेच इतिहास, असे मानणार्या विद्वानांचे शत्रुत्व त्याने ओढवून घेतले. ह्याची प्रतिक्रिया म्हणून त्याने द न्यू किंगडम (१८८२, इं. भा. ) हा कथासंग्रह प्रसिद्ध केला. त्यातील कथांतून त्याने काही उमराव, बँक व्यावसायिक, प्रकाशक आणि द स्वीडिश अकॅडमी, रॉयल ड्रमॅटिक थिएटर ह्यांसारख्या संस्थांना आपल्या उपरोधाचे लक्ष्य केले; परंतु त्यानंतर जे शत्रुत्व आणि कडवटपणा त्याने अनुभवला तो इतका तीव्र होता, की तो मनाने पार ढासळला. १८८३ मध्ये स्वीडन सोडून तो फ्रान्समध्ये — स्वदेशत्याग करून आलेल्या स्कँडिनेव्हिअन व्यक्तींच्या वसाहतीत — राहिला. तेथे विख्यात नॉर्वेजियन नाटककार ⇨ ब्यर्न्सॉन ह्याने त्याचे स्वागत केले. फ्रान्समध्ये आल्यानंतर त्याचा पहिला काव्यसंग्रह — ‘ पोएम्स ’ ( इं. शी. ) — प्रसिद्ध झाला. ह्या संग्रहातील कवितांनी भावकवितेचा एक नवा, ताजा आविष्कार घडवून आणला. १८८४ मध्ये त्याच्या कथांचा संग्रह — ‘ मॅरिड ’ ( इं. शी. ) — प्रसिद्ध होताच त्यातील कथांनी सनसनाटी निर्माण केली. ह्या कथा कौटुंबिक समस्यांचे निर्भीड चित्रण करणार्या होत्या; तथापि त्यांत ख्रिस्ती संस्कारांचा एके ठिकाणी औपरोधिक उल्लेख त्याने केल्यामुळे त्याच्यावर पावित्र्यविडंबनाचा आरोप झाला. ह्या संदर्भातील अभियोगासाठी तो स्वीडनमध्ये आला. ह्या प्रकरणातून त्याची निर्दोष मुक्तता झाली; मात्र त्याच्या पत्नीच्या मनावर मोठा आघात झाला. ती अभिनेत्री होती. स्ट्रिन्बॅर्यबरोबर फ्रान्समध्ये ती आपला व्यवसाय सोडून आली होती. त्यातच स्ट्रिन्बॅर्य हा संभ्रम-विकृतीने ( पॅरानॉइआ ) पछाडला होता. ह्या विकृतीत कोणीतरी आपल्या मागे लागले आहे आपल्याविरुद्ध कटकारस्थाने चालली आहेत, अशी रुग्णाची भावना होत असते. आपल्या पत्नीबद्दलही असा संशय त्याच्या मनात निर्माण झाला. आपल्या मनातले असले संशय त्याने ‘ ए मॅडमन्स डिफेन्स ’ (१८९३, इं. शी.) ह्या आत्मचरित्रात्मक कादंबरीतून प्रकट केले.
एकीकडे त्याच्या वैवाहिक आणि आर्थिक समस्या वाढत असतानाच तत्त्वज्ञान, मानसशास्त्र आणि रंगभूमीवरचे नवे प्रयोग ह्यांत त्याला स्वारस्य निर्माण झाले होते. विख्यात जर्मन तत्त्वज्ञ ⇨ फ्रीड्रिख नीत्शेबरोबर त्याने पत्रव्यवहार केला. अमेरिकन साहित्यिक ⇨ एडगर ॲलन पो याचा तो चाहता झाला आणि ⇨ एमिल झोलाच्या निसर्गवादाचाही त्याने अभ्यास केला. तसेच एका नव्या उत्कटतेने तो नाट्यलेखनाकडे वळला. द फादर (१८८७), मिस् ज्यूली (१८८८), द क्रेडिटर्स (१८८८) ( सर्व इं. भा.) ही नाटके त्याने लिहिली. ह्या नाटकांतून त्याने तत्कालीन सामाजिक संकेतांविरुद्ध बंड पुकारले. मत्सर, तिरस्कार, लोभ अशा भावनांनी ह्या नाटकांतले विविध प्रसंग आणि व्यक्तिरेखा अशी विरूपता धारण करतात, की तीतून निर्माण होणारे परिणाम अनेकदा वास्तवापेक्षा अवास्तवाकडे झुकलेले वाटतात आणि तरीही त्यांतून वास्तवाची एक तीव्र दुःखद जाणीव मनाला होत राहते. द फादर आणि मिस् ज्यूली ह्या नाटकांच्या संदर्भात हे विशेष प्रत्ययास येते. पहिल्या दर्जाचा आंतरराष्ट्रीय नाटककार म्हणून ह्या नाटकांनी स्ट्रिन्बॅर्यची प्रतिमा प्रस्थापित केली. मात्र त्याच्या नाटकांपैकी फारच थोडी रंगभूमीवर आली आणि जी आली, त्यांनी त्याला फारसा पैसा मिळवून दिला नाही.
स्वीडनला परतल्यानंतरची त्याची वर्षे एकाकी अवस्थेत गेली. तो मद्यासक्त बनला. त्याला कुठे काम मिळेना. १८९२ मध्ये तो बर्लिनला गेला. तेथे त्याला एक ऑस्ट्रियन पत्रकार भेटली. १८९३ मध्ये त्यांनी लग्न केले आणि १८९५ मध्ये ते विभक्त झाले.
लिहिणे थांबलेले; शारीरिक-भावनिक ताण; त्यातून बरेच ढळलेले मानसिक संतुलन अशा स्थितीत काही काळ गेल्यानंतर त्याच्या मनोवृत्तीत लक्षणीय बदल झाला. लौकिक जीवन म्हणजे एक नरक आहे, अशी त्याची धारणा झाली. ती त्याच्या इन्फेर्नो ह्या पुस्तकात प्रकट झाली आहे. ह्या परिवर्तनानंतर त्याने टू दमास्कस (३ भाग, १९०० प्रयोग-१९१६) हे नाटक लिहिले. आध्यात्मिक शांतीच्या शोधात असलेला एक माणूस ( तो स्वतः ) त्याने ह्या नाटकात दाखवला आहे. एका स्त्रीमध्ये त्याला ती आढळते. ह्या स्त्रीपात्रामध्ये त्याच्या दोन पत्नींचे साम्य आढळते.
१८९९ मध्ये तो स्वीडनला परतला. तेथे त्याचे अखेरचे वास्तव्य स्टॉकहोममध्ये होते. आपले जीवन काही शक्तींच्या हाती आहे. त्या न्यायी आहेत आणि अपराध्याला शिक्षा करतात, अशी त्याची जीवनदृष्टी झालेली होती. तिचे प्रतिबिंब त्याच्या काही ऐतिहासिक नाटकांत आढळते. अशा नाटकांपैकी ग्यूस्ताव्ह व्हासा (१८९९) हे सर्वोत्कृष्ट मानले जाते. घोस्ट सोनाटा हे त्याच्या आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर त्याने लिहिलेले नाटक. उत्तरकालीन यूरोपीय नाटकांच्या अनेक वैशिष्ट्यांची पूर्वसूचना ह्या नाटकातून मिळते. द ग्रेट हायवे ( प्रयोग-१९०९) ही त्याची अखेरची नाट्यकृती. तीतून प्रतीकात्मकतेने त्याने आपले जीवन उभे केले आहे.
स्ट्रिन्बॅर्य हा नॉर्वेजियन नाटककार ⇨ हेन्रिक इब्सेन ह्याच्यासह आधुनिक यूरोपीय नाटकाचा जनक मानला जातो. निसर्गवादी आणि अभिव्यक्तिवादी यूरोपीय नाटकाच्या विकासाचा तो अग्रदूत होता ( उदा., अनुक्रमे मिस् ज्यूली आणि ए ड्रीम प्ले, प्रयोग-१९०७). त्याच्या कथा-कादंबर्यांनी स्वीडिश गद्याला नवे रूप दिले.
स्टॉकहोम येथे तो निधन पावला. त्याच्या मृत्यूची दखल स्वीडिश अकॅडमीसारख्या प्रतिष्ठित संस्थेने घेतली नाही; पण स्वीडिश जनतेने सर्वश्रेष्ठ नाटककार म्हणून त्याच्या मरणाबद्दल शोक केला.
संदर्भ : 1. Ahlstrom, S. Eklund, Torsten, Ed. August Strindberg,
2. Vols. १९५९–६१. २. Bulman, J. Strindberg and Shakespeare, Landon, १९३३.
3. Dahlstorm, C. E. W. L. Strindberg’s Dramatic Expres- sionism, Mich., १९३०.
4. Jaspers, Karl, Strindberg and Van Gogh, १९७७.
5. Johannesson, E. O. The Novels of August Strindberg, १९६८.
6. Johnson, W. August Strindberg, Boston, १९७८.
7. Lucas, F. L. The Drama of Ibsen and Strindberg, १९६२.
8. Madsen, G. Strindberg’s Naturalistic Theatre, Copenhagen, Seattle, १९६२.
9. Sprigge, E. The Strange Life of August Strindberg, New York, १९४९.
कुलकर्णी, अ. र.