स्टोप्स, मारी कारमायकेल : (१५ ऑक्टोबर १८८०–२ ऑक्टोबर १९५८). स्कॉटिश संततिनियमनाची पुरस्कर्ती. त्यांनी १९२१ मध्ये इंग्लंडमधील पहिले संततिनियमन मार्गदर्शन चिकित्सालय सुरू केले. त्यांचे चिकित्सालयाचे काम आणि लेखन व भाषणे यांमुळे त्यांना विशेषतः रोमन कॅथॅलिक चर्चकडून मोठा विरोध झाला. १९३० नंतर मात्र इंग्लंडमधील चर्चवर त्यांच्या कार्याचा प्रभाव पडून चर्चचा संततिनियमनास असलेला विरोध हळूहळू कमी झाला. [⟶ कुटुंबनियोजन ].
स्टोप्स यांचा जन्म स्कॉटलंडमध्ये एडिंबरो येथे झाला. १९०२ मध्ये त्यांनी विज्ञानातील पदवी युनिव्हर्सिटी कॉलेज, लंडन येथून फक्त दोन वर्षांत प्राप्त केली, तर पुरावनस्पतिविज्ञानातील पीएच्.डी. ही पदवी जर्मनीतील म्यूनिक विद्यापीठातून १९०४ मध्ये संपादन केली. त्या वर्षीच त्यांनी मँचेस्टर विद्यापीठात अध्यापनाच्या कामास सुरुवात केली. या विद्यापीठात विज्ञान शिकविणार्या त्या पहिल्या महिला अध्यापक होत्या. त्या जीवाश्म वनस्पतिविज्ञान व कोळसा खाणकामाबाबतचे प्रश्न यांच्या तज्ज्ञ होत्या. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात देखील नाव मिळविले. त्यांचा प्रथम विवाह अयशस्वी झाल्याने त्यांनी १९१६ मध्ये घटस्फोट घेतला. विवाहामुळे निर्माण होणार्या प्रश्नांचा त्यांनी अभ्यास केला. संभोग, विवाह व अपत्यजन्म आणि समाजात या गोष्टींचा अर्थ यांवर त्यांनी संशोधन केले. संततिनियमन हे वैवाहिक परिपूर्तीस साहाय्यभूत ठरते. जादा मुलांना जन्म देणे व त्याचे मातेच्या आरोग्यावर होणारे परिणाम आणि ताणतणाव यांपासून संततिनियमनामुळे स्त्रियांना व त्यांच्या वैवाहिक जीवनाला संरक्षण मिळते असे त्यांचे मत होते. सुरुवातीच्या काळात संततिनियमनाचे कार्य करणार्या कार्यकर्त्यांबरोबर त्यांचे मतभेद होते. ते कार्यकर्ते लोकसंख्येची वाढ व गरिबी यांची जास्त काळजी करतात असे त्यांचे मत होते.
स्टोप्स यांनी १९१८ मध्ये ए. व्ही. रो एअरक्राफ्ट फर्मचे सहसंस्थापक हंफ्री वेर्डान रो यांच्याबरोबर विवाह केला. रो यांनी त्यांच्या संततिनियमनाच्या कार्यास मदत केली. विवाहानंतर तीन वर्षांनी त्यांनी हॉलवे ( लंडन ) येथे पहिले संततिनियमन चिकित्सालय सुरू केले. तेथे त्या ज्ञात असणार्या संतती प्रतिबंधक पद्धती स्त्रियांना शिकवीत असत. त्याच वर्षी त्या ‘ सोसायटी फॉर बर्थ कंट्रोल ’ या संस्थेच्या संस्थापक व अध्यक्षा बनल्या. या संस्थेद्वारे त्यांनी संततिनियमनामुळे होणार्या फायद्यांविषयीचा मुक्तपणे प्रचार केला. दुसर्या महायुद्धानंतर त्यांनी पूर्व आशियात संततिनियमनाच्या प्रचाराचे काम सुरू केले. त्यांची मॅरिड लव्ह आणि वाईज पॅ रेंटहुड ही दोन पुस्तके १९१८ मध्ये प्रसिद्ध झाली. या पुस्तकांचे अनेक भाषांमध्ये भाषांतर करण्यात आले. त्यांचा काँट्रासेप्शन : इट्स थिअरी, हिस्टरी अँड प्रॅक्टिस हा ग्रंथ १९२३ मध्ये प्रसिद्ध झाला. तो संततिनियमनाच्या सर्व बाबींचा विस्तृत आढावा घेणारा ग्रंथ म्हणून ओळखला जातो.
डॉर्किंग ( सरे ) येथे त्यांचे निधन झाले.
पाटील, चंद्रकांत प.