स्टोइक मत : ग्रीक तत्त्वज्ञानातील एक विचारपंथ. ⇨ सीशीयमचा झीनो ( इ. स. पू. सु. ३३६—इ. स. पू. सु. २६५) हा ह्या पंथाचा प्रवर्तक. इ. स. पू. ३०० मध्ये अथेन्समध्ये त्याने आपल्या पाठशाळेची स्थापना केली. ही पाठशाळा एका द्वारमंडपात ( स्टोआ ) असल्यामुळे त्याच्या पंथाला स्टोइक मत वा स्टोइक पंथ असे नाव मिळाले.

स्टोइक पंथाचा इतिहास सु. पाच शतकांचा आहे. स्टोइक मताचा विकास तीन टप्प्यांत झाला. त्यातील पहिल्या कालखंडात ( इ. स. पू. तिसरे शतक ) सीशीयमचा झीनो, क्लिअँथीस ( इ. स. पू. सु. ३३१ — २३२ ) आणि क्रिसिपस ( इ. स. पू. सु.२८० — सु.२०६) यांनी स्टोइक तत्त्वज्ञानाला आकारित केले आणि नावारूपास आणले. विशेषतः क्रिसि- पसने अनेक ग्रंथ लिहून ह्या तत्त्वज्ञानाच्या संदर्भात लक्षणीय कामगिरी केली. म्हणून ‘ स्टोइक पंथा ’चा द्वितीय संस्थापक, अशी त्याची ख्याती झाली. पॅनिशिअस ( सु. १८०—१०८ इ. स. पू.) आणि पॉसिडोनियस ( इ. स. पू. सु. १३५ — सु. ५१) ह्यांनी रोममध्ये जाऊन रोमन लोकांत स्टोइक तत्त्वज्ञानाचा प्रसार केला. पॉसिडोनियसने स्टोइक तत्त्वज्ञानात गूढवादाची भर घातली. हा स्टोइक मतविकासाचा दुसरा टप्पा होय. इ. स.ची पहिली तीन शतके हा स्टोइक पंथाचा अखेरचा कालखंड. या कालखंडात ⇨ सेनिका ( इ. स. पू. ०४ — इ. स. ६५), म्यूसोनियस रूफस, एपिक्टेटस ( इ. स. सु. ५५ — सु. १३५), मार्कस ऑरीलिअस ( इ. स. १२१—१८०) ह्या रोमन विचारवंतांनी स्टोइक तत्त्वज्ञानाचा पुरस्कार केला परंतु एकंदरीत त्यांच्या विचारांत सर्वसंग्रहवाद आणि गूढवाद बळावत गेला.

स्टोइक तत्त्वज्ञान : स्टोइकांच्या मते तत्त्वज्ञानात तर्कशास्त्र, सृष्टिशास्त्र आणि नीतिशास्त्र हे तीन विभाग असतात. तत्त्वज्ञानाच्या विशाल क्षेत्राचे तर्कशास्त्र हे कुंपण, सृष्टिशास्त्र ही जमीनमाती आणि नीतिशास्त्र हे जणू पिकपाणी. काही स्टोइक विचारवंतांच्या मते सृष्टीचे नियम समजून घेणारे सृष्टिशास्त्र हा जणू एक वृक्ष असून नीतिशास्त्र हे त्याला येणारे फळ आहे तर तर्कशास्त्र या वृक्षाचे रक्षण करणारी भिंत आहे.

तर्कशास्त्राच्या दृष्टीने ह्या पंथीयांचा विचार केला, तर ⇨ ॲरिस्टॉटलने रचिलेल्या तर्कशास्त्रात त्यांनी मोलाची भर घातली. ॲरिस्टॉटलने फक्त केवल विधाने आणि केवलविधात्मक संविधाने ह्यांच्या अभ्यासाकडे लक्ष पुरविले होते. स्टोइकांनी संमिश्र विधाने आणि तदाधारित संविधाने यांच्या अभ्यासाला हात घातला. तसेच सोपाधिक विधानांच्या सत्यता-मूल्यांचाही त्यांनी अभ्यास केला.

स्टोइकांची ज्ञानमीमांसा अनुभववादी होती. त्यांच्या मते ज्ञानाचा आरंभ इंद्रियगोचर अनुभवासोबतच होतो. माणसाचे मन जन्मारंभी कोर्‍या पाटी-सारखे असते. नंतर प्रत्यक्ष इंद्रियानुभवांतूनच ज्ञान उत्पन्न होते. तप्त लाखेवर जसा शिक्का उमटतो, तशी प्रत्यक्षातल्या वस्तूची प्रतिमा, इंद्रियानु-भवाच्या वेळी माणसाच्या मनावर उमटते. ह्या प्रतिमा इतक्या अस्सल असतात, की त्यांच्या वस्तुनिष्ठतेविषयी, त्यांच्या सत्यतेविषयी तात्काळ आपली खात्री पटते. अशा सत्य वस्तूंची संवेदने जितक्या तीव्रतेने आपल्या मनास जाणवतात, त्या तीव्रतेने कपोलकल्पित पोकळ कल्पना जाणवत नाहीत. प्रत्यक्षातल्या वस्तूंची इंद्रियवेदनांद्वारे मनावर अनिवार्यपणे पडणारी छाप हीच एक सत्याची कसोटी होय, असे स्टोइक विचारवंत मानीत असत.

सृष्टिशास्त्राच्या दृष्टीने स्टोइकांच्या मते विश्व हे जडवस्तू आणि चैतन्य-शक्ती ह्या दोन मूळ द्रव्यांचे बनलेले आहे. ही दोन तत्त्वे सदैव एकत्र नांदतात. ती अविभाज्य आहेत. संपूर्ण विश्व हे जड-वस्तूचे बनविलेले असून ते चैतन्यशक्तीने व्यापलेले आहे. ज्याप्रमाणे मद्यार्काचा थेंब जलाशयात विकीर्ण होतो, त्याचप्रमाणे चैतन्यशक्ती ही सर्व विश्वात भरलेली आहे.

स्टोइक विचारवंत हे द्रव्यवादी होते. त्यांच्या मते चैतन्यशक्ती ही देखील जडवस्तूप्रमाणे द्रव्यरूप असते. विश्वामधील यच्चयावत सर्व गोष्टी आद्य चैतन्यशक्ती, मानवाचा जीवात्मा इ. सर्व काही द्रव्यमय आहे आणि द्रव्य हे अर्थातच चैतन्यमय असते. अशरीरिणी अशी कोणतीच गोष्ट अस्तित्वात नाही. जडद्रव्यमय विश्वात चैतन्यशक्तीचा संचार होत असल्यामुळे आणि ही चैतन्यशक्ती विवेकसंपन्न असल्याकारणाने सृष्टीतले व्यवहार सुसूत्रपणे घडून येतात आणि एकंदर विश्वात सौंदर्य, शिवत्व आणि पूर्णत्व ह्यांचे साम्राज्य नांदते. अशी ही आद्य चैतन्यशक्ती ही खरोखरीच ईश्वर ह्यथोर पदवीस पात्र आहे.

स्टोइक तत्त्वज्ञांनी ईश्वरसृष्टी ऐक्यवादाचा आणि नियतत्त्ववादाचा पुरस्कार केला. चैतन्यशक्तीच्या प्रभावामुळे सृष्टीमधल्या सर्व घटना परस्परसंबद्ध होऊन त्या कार्यकारणभावाच्या सूत्रानुसार अखंड उलगडत जातात. सृष्टीत असंबद्ध वा अनाठायी असे काहीच घडत नाही. येथे सर्वत्र नियमबद्धता नांदते. मानवाचे जीवनही नियमबद्ध, नियंत्रित आहे. आपल्या हातून घडणारी कृत्ये आणि भोवताली घडून येणार्‍या घटना आपल्याला टाळताच येत नाहीत. नियतीला शरण जाण्यावाचून आपल्याला गत्यंतर नसते. माणसाला विवेकाची देणगी लाभलेली आहे खरी पण म्हणून तो निसर्गघटनांच्या प्रवाहाविरुद्ध जाऊ शकत नाही. विवेकशक्तीमुळे त्याला आपल्या जीवनात आणि भोवताली काय घडत आहे, याची जाणीव मात्र होते. तिचा चांगला उपयोग करून जगाकडे पाहण्याचा सुयोग्य दृष्टिकोण स्वीकारणे हे त्याच्या हातचे आहे. योग्य विचार मनात आणून आत्मशांती टिकवणे एवढेच त्याला शक्य आहे.

जगात जर मूलतः सौंदर्य, शिवत्व आणि पूर्णत्व नांदते, तर येथे आपणास दु:खे आणि दुरिते ही का अनुभवास येतात ? ह्या अवघड समस्येचे उत्तर देण्यासाठी स्टोइकांनी पुढीलप्रमाणे युक्तिवाद केले: शिवत्व आणि दुरित परस्परांना सापेक्ष असल्यामुळे त्यांतल्या एकीशिवाय दुसरी नांदूच शकत नाही. म्हणून शिवत्वाबरोबर दुरित्वाचे अस्तित्व अटळच आहे. शिवाय दुरिते ही एका परीने उपयुक्त असतात. सज्जनांच्या चारित्र्याची कसोटी पाहण्यासाठी आणि दुर्जनांना पापाचरणाबद्दल अद्दल घडविण्या-साठी दुरितांचा उपयोग होऊ शकतो. त्याचप्रमाणे अखिल विश्व हे पूर्ण असल्यामुळे येथील प्रत्येक वस्तू ही त्यात्या प्रमाणात अपूर्णच असणार. अखिलतेत पूर्णता असल्यावर घटकांत अपूर्णता संभवणारच आणि अपूर्णतेतून दुःख-दुरितांचा उद्भव होणारच.

विश्वाची आद्य चैतन्यशक्ती ही अग्निस्वरूप असते असे प्राचीन ग्रीक विचारवंत ⇨ हेराक्लायटस याच्याप्रमाणे स्टोइकांचे मत होते. जगदारंभी जडवस्तूच्या पसार्‍यात ह्या चैतन्यशक्तीचा संचार झाला, की तेज, वायू , जल, पृथ्वी ही महाभूते उत्पन्न होतात आणि नंतर त्यांच्यापासून चराचर सृष्टी उत्पन्न होते. सृष्टीच्या व्यापारांचे चक्र काही एका कालमर्यादेपर्यंत चालल्या-नंतर अग्निप्रलय होतो आणि दृश्य सृष्टी लयास जाते. कालांतराने पुनश्च या सृष्टीची घडी नव्याने उलगडू लागते आणि सृष्टीच्या उत्पत्ति-विलयाचा हा क्रम अखंड चालू राहतो. इतकेच नव्हे, तर प्रत्येक वेळी निर्माण होणारे नवे जग हे तपशिलांत हुबेहूब पूर्वी होऊन गेलेल्या जगासारखेच असते.

सृष्टीमध्ये मनुष्यप्राणी हे सर्वांत श्रेष्ठ असून मनुष्याच्या अंगी त्याचा आत्मा श्रेष्ठ असतो. आत्मा हा द्रव्यमय असतो आणि युगान्त काळी अग्निप्रलयात नष्ट होतो, असे स्टोइकांचे मत होते. व्यक्तिगत आत्म्याचे अमरत्व त्यांना मान्य नव्हते.

‘ निसर्गास अनुसरून चालावे ’ असे स्टोइक नीतीचे केंद्रीय सूत्र होते. मनुष्याने निसर्गाचे नियम पाळले पाहिजेत. सृष्टिव्यापारांची जी नियमबद्ध सुव्यवस्था आहे, तिला बाधा येणार नाही अशा रीतीने वागले पाहिजे. विश्वचालक शक्ती अथवा ईश्वरी इच्छा विवेकाने समजून घेऊन, स्वीकारून जीवन व्यतीत केले पाहिजे.

‘ निसर्गास अनुसरावे ’ ह्या सूत्राचा आणखी एक अर्थ असा, की मनुष्याने आपल्या स्वभावधर्मास अनुसरून चालावे. मनुष्याच्या अंतरंगात विश्वाच्या अंतरीची चैतन्यशक्ती संचारत असते. ह्या चैतन्यशक्तीची विवेकसंपन्न वाणी मनुष्याने प्रमाण मानून चालले पाहिजे. त्याने नित्य विवेकशील असले पाहिजे. विवेकशील असणे म्हणजे सद्गुणाधारित जीवन जगणे.

ज्या गोष्टी आपल्या हातच्या नाहीत, त्यांच्या नादी लागल्याने मनुष्याची फसगत होते. आरोग्य, कीर्ती, संपत्ती या गोष्टी आपल्या हातच्या नाहीत. त्या बाह्य कारणांवर अवलंबून असतात. ध्यानीमनी नसताना कीर्तीला कलंक लागतो संपत्तीचा र्‍हास होतो आरोग्य खालावते. ह्या गोष्टी पराधीन असून त्यांपासून खरे सुख लाभत नाही म्हणून विवेकी माणसाने यांच्या नादी लागू नये. फक्त सद्गुण हेच मनुष्याच्या स्वाधीन असतात त्यांचीच नित्य जोपासना केली पाहिजे. त्यामुळे लौकिक सुख-दु:खापलीकडच्या शांतीचा लाभ होतो आणि जगाकडे तटस्थपणे पाहू शकणारी अलिप्त, उदासीन वृत्ती निर्माण होते.

शहाणा मनुष्य सद्गुणी आणि ज्ञानी असतो. अज्ञानी माणसे दुराचरणी होतात. शिवाय सद्गुण हे परस्परसंलग्न असल्यामुळे खरा सद्गुणी मनुष्य सर्वांगपरिपूर्ण असतो. तो मानवतेचा आदर्श बनतो. तोच सत्यार्थाने स्वतंत्र, समृद्ध, श्रीमंत, सुंदर आणि सुखी असतो. त्याच्या ऐश्वर्याला पार नसतो. सद्गुणांची जोपासना करणार्‍यांना वासनांचा क्षय करणे आवश्यक असते. स्टोइकांच्या मते इंद्रियनिग्रह, धैर्य, विवेकशीलता आणि न्यायप्रियता हे चार मुख्य सद्गुण असून त्यांच्या बरोबर विरोधी अशा विषयासक्ती, भया-कुलता, विवेकशून्यता आणि स्वार्थांधता या चार वासना होत. ह्या वासनां-विरुद्ध अखंड करावयाची लढाई म्हणजेच नैतिक जीवन होय. सज्जनाने आपल्या वासनांवर विजय मिळवलेला असतो.

साधुजनांचा दृष्टिकोण नित्य विशाल असतो. अखिल मानवजातीशी आपले बंधुत्वाचे नाते आहे, हे त्यांनी जाणलेले असते. म्हणून या किंवा त्या नगरराज्याचे नागरिक म्हणून न जगता ते जगाचे नागरिक म्हणून जगत असतात. राष्ट्राराष्ट्रांमधील यादवी आणि युद्धे स्टोइकांना नापसंत होती. सर्व माणसांमध्ये मूळ अग्नीचे स्फुल्लिंग असते, या अर्थी सर्व माणसे मूलतः समान असतात असे स्टोइक मानत.

स्टोइकांचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आत्महत्येला मान्यता दिली होती. प्रसंगविशेषी, व्यक्तीने आत्महत्या करण्यात काहीच गैर नाही असे त्यांचे म्हणणे होते. झीनो आणि क्लिअँथीससारख्या अग्रगण्य स्टोइकांनी आत्महत्या करून आपले जीवन संपविले होते.

स्टोइकांच्या शिकवणीत आदर्श आणि व्यवहार ह्यांची चांगली सांगड घालण्यात आली होती म्हणून ती शिकवण त्या काळी खूप लोकप्रिय ठरली. एक व्यवहार्य तत्त्वज्ञान म्हणून स्टोइक पंथाचे तत्त्वज्ञान पाश्चात्त्य जगात जेवढे यशस्वी ठरले, तेवढे अन्य कोणत्याही पंथाचे तत्त्वज्ञान यशस्वी झाले नाही.

स्टोइक पंथाचे ⇨ सिनिक पंथाशी नाते होते, हे दिसून येते. स्टोइक विचारवंतांना आद्य सिनिकांकडूनच स्फूर्ती मिळाली होती. सिनिकांप्रमाणेच त्यांनी भोगवादाला विरोध करून सद्गुणसंपन्नतेला आदर्श मानले तथापि सिनिकांच्या तत्त्वज्ञानापेक्षा स्टोइकांचे तत्त्वज्ञान अधिक व्यापक, समृद्ध आणि व्यवहारसुलभ होते.

रोमनांना स्टोइकांचे तत्त्वज्ञान अतिशय मानवले. त्यांचा शिस्तप्रिय शिपाईबाणा आणि व्यवहारी वृत्ती ह्यांना रुचतील अशा अनेक गोष्टी त्या तत्त्वज्ञानात होत्या. ज्या कायद्यांच्या आधारावर त्यांचे साम्राज्य उभारलेले होते, त्या कायद्यांची गृहीत कृत्ये त्यांना स्टोइकांच्या तत्त्वज्ञानातच सापडली होती.

स्टोइकांचे नीतिशास्त्र आणि ख्रिस्ती धर्मीयांचे नीतिविचार या दोहोंत बरेच साम्य आढळून येण्यासारखे आहे.

स्पिनोझा, ⇨ लायप्निट्स, ⇨ फिक्टे ह्यांसारखे अग्रेसर आधुनिक तत्त्वज्ञही स्टोइक तत्त्वज्ञानाने प्रभावित झालेले होते.

संदर्भ : 1. Erskine, A. The Hellenistic Stoa, London, १९९०.

2. Inwood, B. Ethics and Human Action in Early Stoicism, Oxford, १९८५.

3. Long, A. A. Stoic Studies, Cambridge, १९९६.

4. Mates, B. Stoic Logic, Berkeley, १९६१.

5. Rist, J. M. Ed. The Stoics, Berkeley, १९७८.

6. Sambursky, S. Physics of the Stoics, New York, १९५९.

7. Sandbach, F. H. The Stoics, London, १९७५.

8. Sandbach, F. H. Aristotle and the Stoics, Cambrigde, १९८५.

9. Wenley, R. M. Stoicism and its Influence, १९२७.

केळशीकर, शं. हि.