रॉबर्ट लूई स्टीव्हन्सन

स्टीव्हन्सन, रॉबर्ट लूई : (१३ नोव्हेंबर १८५०—३डिसेंबर १८९४). स्कॉटिश कादंबरीकार, निबंधकार आणि कवी. इंग्रजीत लेखन. जन्म एडिंबरो येथे. वडील स्थापत्य अभियंते. त्याच्या प्रकृतीच्या अडचणी असल्यामुळे त्याचे नियमित शिक्षण होणे अवघड होते ( त्याला क्षय होता ) तरीही ‘ एडिंबरो अकॅडमी ’ आणि अन्य काही शाळांतून त्याने शिक्षण घेतले. वयाच्या सतराव्या वर्षी त्याने एडिंबरो विद्यापीठात प्रवेश घेतला. तेथे त्याने अभियंत्याचे शिक्षण घेऊन कुटुंबाच्या व्यवसायास हातभार लावावा, अशी अपेक्षा होती; तथापि स्टीव्हन्सनला त्यात रस नव्हता. वडिलांबरोबर करावयाची एक तडजोड म्हणून तो वकिलीचा अभ्यास करू लागला. १८७५ मध्ये तो वकील झाला; पण तो व्यवसाय त्याने कधी केला नाही. त्याच्या लहानपणापासून त्याला लेखनात स्वारस्य होते. वृत्तीने तो बंडखोर होता. आपल्या आई-वडिलांच्या धर्माविरुद्धच भूमिका घेऊन एक उदारमतवादी आणि मुक्त वृत्तीचा माणूस म्हणून जगणे त्याने पसंत केले.

स्टीव्हन्सन हा प्रकृतिस्वास्थ्यासाठी अनेकदा परदेशात — मुख्यत: फ्रान्समध्ये — जात असे. त्याचे लेखनही चालू होते. ॲन इनलँड व्हॉयिज (१८७८) आणि ट्रॅव्हल्स विथ अ डाँकी इन सेव्हेन्स (१८७९) यांसारखी प्रवासवर्णने तो लिहीत होता. त्याचे निबंधही निरनिराळ्या नियतकालिकांतून प्रसिद्ध होत होते. ⇨ लेस्ली स्टीव्हन (१८३२—१९०४) संपादक असताना कॉर्नहिल मॅग्झीनमध्ये तो लिहू लागला. त्याच्या निबंधांतून त्याच्या चिंतनशीलतेबरोबर एक अनोखी संवेदनशीलता प्रकट होत असल्यामुळे ते लक्षवेधक ठरले.

१८७६ मध्ये फॅनी ऑझबर्न ह्या विवाहित अमेरिकन स्त्रीशी त्याची भेट झाली. ती तिच्या नवर्‍याबरोबर राहत नव्हती. दोघांचेही प्रेम जमले. १८७८ मध्ये ती कॅलिफोर्नियात परतली. १८७९ मध्ये स्टीव्हन्सनने तिला भेटण्यासाठी कॅलिफोर्नियाला जाण्याचा निर्णय घेतला. आजारी आणि विपन्न अवस्थेत स्टीव्हन्सन तेथे पोहोचला. ॲक्रॉस द प्लेन्स (१८९२) आणि द ॲमच्युअर एमिग्रंट (१८९५) ह्या त्याच्या पुस्तकांतून ह्या दुर्घट प्रवासाचे वर्णन आढळते. नवर्‍यापासून एव्हाना घटस्फोट घेतलेल्या फॅनीशी त्याने विवाह केला (१८८०). ह्या सर्व प्रकरणामध्ये आधी नाराज झालेल्या त्याच्या वडिलांनी अखेर त्याला आर्थिक पाठबळ देण्याचे ठरविल्यामुळे तो आणि फॅनी स्कॉटलंडला परतले.

ह्यानंतरच्या काळात स्टीव्हन्सनने आपल्या आजारपणाशी झगडत विपुल लेखन केले. त्यांत ट्रेझर आयलंड (१८८१), प्रिन्स ओट्टो (१८८५), स्ट्रेंज केस ऑफ डॉक्टर जेकिल अँड मिस्टर हाइड (१८८६), किडनॅप्ड (१८८६), विअर ऑफ हर्मिस्टन (१८९६, अपूर्ण) इ. कादंबर्‍या द न्यू अरेबियन नाइट्स (१८८२), मोअर न्यू अरेबियन नाइट्स (१८८५, पत्नीच्या सहकार्याने ), आयलंड नाइट्स एंटरटेनमेंट्स (१८९३) हे कथासंग्रह द सिल्व्हरॅडो स्क्वॅटर्स (१८८३), इन द साउथ सीज (१८९६) इ. प्रवासवर्णने व्हर्जिनिबस प्यूएरिस्क (१८८१), फॅमिल्यअर स्टडीज ऑफ मेन अँड बुक्स (१८८२), मेमरीज अँड पोर्ट्रेट्स (१८८७) असे अन्य ललित लेखन समाविष्ट आहे. यांखेरीज स्टीव्हनसनने काही काव्यलेखनही केले आहे. ए चाइल्ड्स गार्डन ऑफ व्हर्सिस (१८८५), अंडरवुड्स (१८८७) आणि बॅलड्स (१८९०) हे त्याचे काव्यसंग्रह.

त्याच्या कादंबर्‍यांपैकी ट्रेझर आयलंड आणि स्ट्रेंज केस ऑफ डॉक्टर जेकिल अँड मिस्टर हाइड ह्या विशेष प्रसिद्ध आहेत. ट्रेझर आयलंड ही एक विलक्षण साहसकथा आहे. ह्या कादंबरीतील वातावरण, व्यक्तिरेखा आणि तीत घडणार्‍या घडामोडी ह्यांच्यातील उत्कृष्ट सुसंवादामुळे कौशल्यपूर्ण कलात्मकतेचा प्रत्यय ती वाचकांना देते. स्ट्रेंज केस ऑफ डॉक्टर जेकिल अँड मिस्टर हाइड ही एका दुभंग व्यक्तिमत्त्वाची ( स्प्लिट पर्सनॅलिटी ) कहाणी आहे. डॉ. जेकिल ह्याला आपल्या व्यक्तिमत्त्वातील दुष्टता आणि चांगुलपणा ह्यांची जाणीव असते. हे दोन्ही घटक दोन स्वतंत्र व्यक्तिमत्त्वांच्या रूपाने वेगळे करता आले पाहिजेत ह्या कल्पनेने झपाटून तो ते घडवून आणणारे एक औषध शोधून काढतो. मिस्टर हाइड हे दुष्ट व्यक्तिमत्त्व. वेळोवेळी ते व्यक्तिमत्त्व धारण करून डॉ. जेकिल त्यातून आपल्यातल्या दुष्ट प्रवृत्तींना वाव देऊ लागतो. एक खूनही हाइडकडून घडतो. पुढे पुढे तर ते औषध न घेताही हाइड डॉ. जेकिलचा ताबा घेऊ लागतो. पुढे गोष्टी अशा थराला येतात, की डॉ. जेकिल आत्महत्या करतो.

स्टीव्हन्सनच्या कथांमध्ये गुप्तहेरकथांपासून स्कॉटिश कथांपर्यंत विविध प्रकारच्या कथा आहेत. व्हर्जिनिबस प्यूएरिस्क आणि फॅमिल्यअर स्टडीज ऑफ मेन अँड बुक्समध्ये त्याच्यातल्या परिपक्व निबंधकाराचे दर्शन घडते. ए चाइल्ड्स गार्डन ऑफ व्हर्सिस ह्या त्याच्या कवितासंग्रहाला त्याच्या गद्यलेखनाप्रमाणे लोकप्रियता लाभली.

त्याच्या प्रकृतीच्या दृष्टीने स्टीव्हन्सनने अनेक ठिकाणी राहण्याचा प्रयत्न केला; तथापि साउथ सी आयलंड्समध्येच आपली तब्येत तुलनेने अधिक चांगली राहू शकते हे लक्षात आल्यानंतर तो सामोआमधील उपोलू बेटावर स्थायिक झाला. तिथे त्याने एक मळा विकत घेतला. त्याला त्याने व्हाइलिमा असे नाव दिले होते. घर बांधले स्थानिक लोकांशी चांगले संबंध निर्माण केले. ते त्याला ‘ तुसीफाला ’ ( कथा सांगणारा ) असे म्हणत. त्या बेटावरच्या घडामोडींतही त्याचा महत्त्वाचा सहभाग असे. इन द साउथ सीज (१८९६) मध्ये सामोअन जीवनाची त्याची निरीक्षणे त्याने शब्दबद्ध केली आहेत.

सामोआ बेटावरच तो निधन पावला.

संदर्भ : 1. Barber, Benjamin A. Robert Louis Stevenson, १९७७.

2. Calder, Jenni, Robert Louis Stevenson : A Life Study, १९८०.

3. Daiches, David, Robert Louis Stevenson and His World, १९७७.

4. Daiches, David, Stevenson and the Art of Fiction, १९५१.

5. Furnas, Joseph C. Voyage to Windward : The Life of Robert Louis Stevenson, १९८०.

6.Maixner, Paul, Robert Louis Stevenson : The Critical Heritage, १९८१.

कुलकर्णी, अ. र.