स्लाव्हॉनिक लिपि : स्लाव्हॉनिक लिपी ही एकेकाळी जागतिक विचारविनिमयाची लिपी म्हणून मान्यता पावलेल्या ग्रीक लिपीची महत्त्वाची उपशाखा आहे. यूरोप व आशियाच्या काही भागांत प्रचलित असलेल्या अनेक लिप्या स्लाव्हॉनिक लिपीतूनच उगम पावलेल्या आहेत.

स्लाव्हॉनिक लिपीचा अत्यंत प्राचीन असा एक आविष्कार ‘ ओल्ड चर्चमधील स्लाव्हिक ’ ( OCS ) या नावाने ओळखला जातो. ओल्ड चर्चमधील स्लाव्हिक ही जगातील आद्य वाङ्मयीन भाषा मानली जाते. आधुनिक काळात ओल्ड चर्चमधील स्लाव्हिक ही भाषा ओल्ड बल्गेरियन या नावाने प्रचलित आहे.

इसवी सनाच्या नवव्या शतकातील संत सिरिल (८२७ — ६९) आणि संत मिथोडिअस (८२६ — ८५) या दोन ग्रीक ख्रिस्ती धर्मप्रसारक बंधूंना ओल्ड चर्चमधील स्लाव्हिक ह्या भाषेचे प्रमाणीकरण करण्याचे श्रेय दिले जाते. थेसालोनायकी ( सध्या ग्रीक मॅसिडोनियात समाविष्ट ) या प्रांतात राहणार्‍या बायझंटियन स्लाव्ह लोकांच्या बोलीवर ती आधारित होती. स्लाव्हिक राष्ट्रांना ख्रिस्ती करणार्‍या मोहिमेचा एक भाग म्हणून, त्यांनी प्रमाणिकृत भाषेचा उपयोग बायबल आणि इतर धर्मग्रंथांच्या भाषांतरासाठी केला. ओल्ड बल्गेरियन भाषेची स्मारक चिन्हेच मानता येतील अशा दोन लिप्या आज उपलब्ध आहेत : (१) ग्लॅगॉलिटिक, (२) सिरिलिक.

(१) ग्लॅगॉलिटिक लिपी : इ. स. ८६२-६३ या काळात ख्रिस्ती धर्मप्रसाराच्या कार्याचा एक भाग म्हणून ग्लॅगॉलिटिक वर्णमालेची निर्मिती करण्यात आली. या वर्णमालेत ४० अक्षरे आहेत. ग्लॅगॉलिटिक लिपीतील अक्षरे विभिन्न रूपात दिसून येतात त्यामुळे या लिपीच्या उद्भवासंबंधी अनेक सिद्धांत मांडले गेले आहेत. एका गृहीतकानुसार ग्लॅगॉलिटिक लिपीचा संबंध जर्मानिक रूनिक ( यूरोपमधील प्राचीन रूनिक लिपी ) लिपीशी जोडला गेला आहे. प्रस्तुत जर्मानिक रूनिक लिपीचा एक उपप्रकार कल्पून, त्या लिपीवर ग्लॅगॉलिटिक लिपी आधारली आहे, असे मानले गेले तथापि या उपलिपी संबंधात काहीही माहिती उपलब्ध नाही. काही अभ्यासकांच्या मते, अवेस्ता, हिब्रू , सुमेरियन यांसारख्या एखाद्या पौर्वात्य वर्णमालेत ग्लॅगॉलिटिक वर्णमालेचे मूळ असले पाहिजे. गिटलर या विद्वानाच्या मते, ग्लॅगॉलिटिक लिपी ही एखाद्या प्राचीन अल्बेरियन लिपीची उपशाखा असली पाहिजे तथापि एल्बासन लिपीच्या स्वरूपात ती आज जतन करून ठेवण्यात आली आहे. या गृहीतकातील कल्पकता मान्य करूनही ते स्वीकार्य ठरविता येणार नाही. कारण आधुनिक एल्बासन लिपीवरून प्राचीन अल्बेनियन लिपीची पुनर्रचना करता येणे शक्य नाही. ग्लॅगॉलिटिक लिपीच्या ग्रीक उगमाचे बर्‍याच संशोधकांनी मान्यता दिलेले गृहीतकच स्वीकार्य वाटते आणि तेच आज प्रचलित आहे. अर्थातच ही मूलभूत ग्रीक वर्णमालिका मोठ्या ( कॅपिटल ) किंवा अंशाल अक्षरांची नसून नवव्या व दहाव्या शतकांतील छोट्या मिनिसूल वर्णाची बनलेली आहे. ग्रीक मिनिसूल अक्षरे व ग्लॅगॉलिटिक लिपीमधील काही अक्षरे यांतील साम्य लक्षवेधी आहे.

ग्लॅगॉलिटिक वर्णमाला ही दोन प्रकारच्या लेखन पद्धतीत दिसून येते : (१) गोलाकार बल्गेरियन लिखाण, (२) इलिरियन / क्रोशियन हे अणकूचीदार पद्धतीचे लिखाण.

(२) सिरिलिक लिपी : सिरिलिक लिपीत ४३ चिन्हे आहेत. त्यांतील २४ चिन्हे ही नवव्या आणि दहाव्या शतकांतील ग्रीक अंशाल अक्षरेच आहेत. शेवटच्या ४ चिन्हांना कुठलेही ध्वनिगत महत्त्व नाही. त्यांचा उपयोग फक्त अंकचिन्हे म्हणून केला जातो. काही स्लाव्हॉनिक ध्वनींसाठी चिन्हे उपलब्ध नव्हती, तेव्हा ग्रीक वर्णमालेचा उपयोग करण्यात आला. कधी जोडवर्ण (  जसे ‘य— इ + अ, ‘य— इ + ओ इत्यादी. ), तर कधी बहुतांशी ग्लॅगॉलिटिक वर्णमालेतून चिन्हे घेऊन हा विस्तार करण्यात आला. या खेरीज सिरिलिक लिपीमध्ये अक्षरांवर कमान किंवा उलटी कमान अशी स्वरभेदक चिन्हे वापरून त्यांना वेगळे मूल्य दिले गेले.अशा रीतीने ग्लॅगॉलिटिकच्या तुलनेत सिरिलिक लिपीचा उगम सहज लक्षात येतो.

Utsav हा सिरिलिक लिपीचा प्राचीनतम अवतार आहे. यातील चिन्हे बरीचशी नवव्या व दहाव्या शतकांतील ग्रीक प्रमाणेच आहेत. त्याच काळातील काही साउथ स्लाव्हॉनिक हस्तलिखितांत या प्रकारची लिपी सापडते. यामध्ये सरळ रेषांऐवजी बर्‍याच अक्षरांत वक्र रेषांचा वापर केलेला आहे. पंधराव्या शतकानंतर कर्सिव्ह लिपीचा उदय झाला. या लिपीत अक्षरे एकमेकांस जोडलेली, लांबवलेली किंवा कधी कधी त्यांना शेपूटही जोडलेले असते.

सिरिलिक लिपीचा वापर इ. स. ८९३ — १०१४ या काळात शिलालेखांत, थडग्यावरील लिखाणांत तसेच काही हस्तलिखितांतही  केलेला आढळतो.

तेराव्या शतकाच्या सुमारास ग्लॅगॉलिटिक लिपीचा वापर बल्गेरिया व मॅसिडोनिया या प्रांतात बंद पडला. तिची जागा सिरिलिकने घेतली. ऑर्थोडॉक्स चर्चशी संबंधित स्लाव्ह लोकांची ती सर्वांत प्रभावशाली भाषा बनली. आधुनिक रशियन लिपी ही सिरिलिक लिपीचेच पुनर्रचित आणि सुलभीकृत रूप आहे. आज सिरिलिक जवळजवळ साठ पेक्षा जास्त भाषांची मातृलिपी आहे. या भाषांतील ज्या ध्वनींसाठी सिरिलिकमध्ये चिन्हे उपलब्ध नव्हती, त्यासाठी सिरिलिक वर्णातच थोडेफार बदल करून नवीन चिन्हे तयार करण्यात आली.

अलीकडे सिरिलिक लिपी रशिया, बल्गेरिया, यूगोस्लाव्हिया, मॅसिडोनिया इ. देशांत वापरली जाते. ही लिपी ज्या भाषांत वापरली जाते त्यामध्ये स्लाव्हिक, रशियन, बल्गेरियन, युक्रेनियन, बेलोरशियन आणि मॅसिडोनियन, इराणियन, नॉन इंडो-यूरोपियन (कझाक, उझबेक, किरगीझ, मंगोलियन आणि रशियातील शेकडो भाषा ) या भाषांचा समावेश आहे.

संदर्भ : हान्स, जेन्सन, साइन, सिम्बल अँड स्क्रिप्ट, लंडन, १९७०.

 

कुलकर्णी-जोशी, सोनल