स्टॉक्टन : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी कॅलिफोर्निया राज्यातील सॅन वॉकीन कौंटीचे मुख्यालय, बंदर व व्यापारी केंद्र. लोकसंख्या २,९१,७०७ (२०१०). हे सॅन फ्रॅन्सिस्कोच्या पूर्वेस सु. १३२ किमी.वर सॅन वॉकीन खोर्‍यात, सॅन वॉकीन व कॅलव्हेरस या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. हे उत्कृष्ट आंतर्देशीय बंदर असून सॅन फ्रॅन्सिस्को उपसागरास सु. १२६ किमी. लांबीच्या सामुद्रधुनीने जोडलेले आहे. हे लोहमार्ग व महामार्ग यांनी मोठमोठ्या शहरांशी जोडले असून येथे विमानतळ आहे.

कॅप्टन चार्ल्स एम. वेबरने १८४७ मध्ये हे टुलेबर्ग या नावाने वसविले. कमोडोअर रॉबर्ट फिल्ड स्टॉक्टन याच्या सन्मानार्थ याचे स्टॉक्टन असे नामकरण झाले (१८५२). कॅलिफोर्निया राज्य झाल्यानंतर यास शहराचा दर्जा मिळाला. त्यानंतर सॅन वॉकीन खोर्‍यातील शेती क्षेत्राचे प्रमुख व्यापारकेंद्र म्हणून हे भरभराटीस आले. तसेच नजीकच्या सिएरा नेव्हाडा-तील सोन्याच्या खाणींचे साधन पुरवठा केंद्र म्हणून हे प्रसिद्धीस आले. आसमंतातील कृषी पदार्थांचे साठवण व वितरण केंद्र म्हणून यास महत्त्व आहे. बेंजामिन हॉल्ट या उद्योजकाने येथे १८८३ मध्ये वास्तव्य केले होते. त्याने येथे स्टॉक्टन व्हील कं. व हॉल्ट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी स्थापन केली.

दुसर्‍या महायुद्धानंतर येथे विविध उद्योगधंदे विकसित झाले. येथे लाकडी वस्तू , ॲस्बेस्टस, सिमेंट पाईप, रबर, सागरी जहाजे, पोलाद निर्मिती इ. उद्योग चालतात.

शहरात पॅसिफिक विद्यापीठ व सॅन वॉकीन डेल्टा कनिष्ठ महाविद्यालय या शैक्षणिक संस्था आहेत. येथील सॅन वॉकीन पायोनियर हिस्टॉरिकल म्यूझीयम, हँगीन संग्रहालय, बौद्ध आणि शीख मंदिरे, सॅन फ्रॅन्सिस्को व स्टॉक्टन सिंफनी ऑर्केस्ट्रा, कलाविथी प्रसिद्ध आहेत.

गाडे, ना. स.