स्टाफ, लेऑपॉल्ट : (१४ सप्टेंबर १८७८—३१ मे १९५७). पोलिश कवी. पूर्वी पोलंडमध्ये, परंतु आता युक्रेनमध्ये असलेल्या लव्हॉव्ह येथे जन्मला. लव्हॉव्ह विद्यापीठातील आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो क्रेको येथे आला. ‘ ड्रीम्स ऑफ पॉवर ’ ( इं. शी.) हा त्याचा पहिला काव्यसंग्रह १९०१ मध्ये प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर त्याचे तिसाहून अधिक काव्यसंग्रह प्रकाशित झाले. ‘ द डे ऑफ सोल ’ (१९०३, इं. शी.) आणि ‘ द नीडल्स आय ’ (१९२७, इं. शी.) हे त्याचे काही उल्लेखनीय काव्यसंग्रह. त्याची कविता विविध रूपांनी समृद्ध असून, ती तंत्रदृष्ट्याही सफाईदार आहे. आपल्या काव्याविष्कारासाठी जुने घाट अपुरे वाटल्यास तो नवे घाट निर्माण करीत असे. Wilkina हा त्याचा अखेरचा काव्यसंग्रह १९५४ मध्ये प्रसिद्ध झाला. अनेक ताज्या आणि नवीन काव्यकल्पना त्याला त्याच्या वृद्धावस्थेत सुचत, ह्याचे प्रत्यंतर ह्या काव्यसंग्रहावरून येते. स्टाफने काही नाटकेही लिहिली. ⇨ फ्रीड्रिख व्हिल्हेल्म नीत्शे, ⇨ योहान वोल्फगांग फोन गटे ह्यांच्या साहित्याची त्याने भाषांतरे केली; तथापि कवी म्हणूनच तो मुख्यत: ओळखला जातो.
पोलंडमधील स्कारझिस्को-कम्येन येथे तो निधन पावला.
कुलकर्णी, अ. र.