स्टाइनमन, मार्व्हिन राल्फ : (१४ जानेवारी १९४३ — ३० सप्टेंबर २०११). कॅनेडियन प्रतिरक्षावैज्ञानिक व कोशिका जीवशास्त्रज्ञ. स्टाइनमन यांना २०११ सालचे मानवी वैद्यक अथवा शरीरक्रियाविज्ञान या विषयाचे नोबेल पारितोषिक अमेरिकन प्रतिरक्षा-वैज्ञानिक ब्रुस ए. ब्यूटलर आणि फ्रेंच प्रतिरक्षावैज्ञानिक ⇨ झुल्झ ए. हॉफमन यांच्या समवेत विभागून मिळाले. स्टाइनमन यांनी अमेरिकन शास्त्रज्ञ झानविल ए. कोहन यांच्यासोबत शाखिक कोशिकेचा ( प्रतिरक्षा कोशिकेचा एक प्रकार ) शोध आणि तिचा अनुकूली प्रतिरक्षामधील सहभाग यांसंबंधी संशोधन केल्याबद्दल त्यांना हे पारितोषिक प्रदान करण्यात आले. स्टाइनमन यांच्या कार्यामुळे संसर्ग, आत्मप्रतिरक्षित रोग, कर्करोग आणि प्रतिरोपण अस्वीकार हे रोग समजणे आणि त्यांवर उपचार करणे यासाठी हातभार लागला गेला आहे. त्यांना नोबेल पारितोषिक मिळणे हे एक प्रकारे पूर्वोदाहरण नसलेले मानण्यात येते (नोबेल पारितोषिक समिती परंपरेने मरणोत्तर पारितोषिक देत नाही). नोबेल पारितोषिक जाहीर होण्याच्या एक दिवस आधी त्यांचे अग्निपिंडाच्या कर्करोगामुळे निधन झाले.
स्टाइनमन यांचा जन्म माँट्रिऑल ( कॅनडा ) येथे झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण शेरब्रुक ( क्वीबेक ) येथे झाले. नंतर त्यांनी मॅकगिल विद्यापीठातून ( माँट्रिऑल ) पदवी प्राप्त केली (१९६३). त्यांनी हार्व्हर्ड मेडिकल स्कूल येथे प्रवेश घेतला व १९६८ मध्ये यशस्वी रीत्या अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांनी मॅसॅचूसेट्स येथील जनरल हॉस्पिटलमध्ये दोन वर्षे प्रशिक्षणार्थी म्हणून काम केल्यानंतर रॉकफेलर विद्यापीठात पोस्टडॉक्टरेट पदवीकरिता तसेच संशोधक कोहन आणि जेम्स जी. हिर्श यांच्यासोबत काम केले. आपल्या संपूर्ण कार्यकाळात स्टाइनमन यांनी रॉकफेलर विद्यापीठातूनच सहायक (१९७२), सहयोगी (१९७६) ते पूर्ण प्राध्यापक (१९८८) अशी पदे भूषविली. ते १९९८ मध्ये रॉकफेलरच्या ख्रिस्तोफर एच. ब्राऊन सेंटर फॉर इम्युनोलॉजी अँड इम्युन डिसीजेस् या केंद्राचे संचालक झाले.
स्टाइनमन यांनी आपला महत्त्वपूर्ण शोध १९७० दशकाच्या सुरुवातीस लावला. त्यांनी उंदराच्या प्लीहेतून काढलेल्या स्रावातून एक असामान्य कोशिकेचा प्रकार शोधून काढला. त्यांनी त्या कोशिकेला त्याच्या झाडाच्या फांदीसारख्या आकारामुळे ‘ डेन्ड्रिटिक सेल ’ ( शाखिक कोशिका ) असे नाव दिले. नंतर पुढे केलेल्या संशोधनात त्यांना असे आढळले की, या कोशिका टी (T) – कोशिकांसाठी प्रतिजने ( प्रतिपिंड निर्मिती करणारी प्रथिने ) तयार करतात ( टी – कोशिका या श्वेतकोशिकांचा एक प्रकार असतात ). या प्रतिजनामुळे टी – कोशिका पुनरुत्पादित होतात व प्रवाहित होऊन त्या प्रतिजन असलेल्या ऊतक कोशिकांवर हल्ला करतात. स्टाइनमन यांच्या संशोधनाच्या काळात महाभक्षी कोशिका आणि इतर प्रमुख श्वेतरक्त कोशिका म्हणजेच बी (B) – कोशिका असून स्तनी वर्गात दर्शविली जाणारी प्राथमिक प्रतिजने होत, असे मानले जात होते. स्टाइनमन आणि कोहन यांनी दाखवून दिले की, शाखिक कोशिका या कोणत्याही प्रतिरक्षा कोशिकांपेक्षा जास्त पटीत ( जवळजवळ १०० पटींत ) टी – कोशिकेला सक्रियित करतात. शाखिक कोशिका त्वचा, फुप्फुस व जठरांत्रीय मार्ग या अवयवांत पुष्कळ मोठ्या प्रमाणात असतात, कारण या ठिकाणी कोशिकांना मोठ्या प्रमाणावर प्रतिजनांशी संघर्ष करावा लागतो.
स्टाइनमन यांच्या शोधामुळे टी – कोशिकांच्या सक्रियित होण्याबाबतच्या संशोधनाचे द्वार उघडले गेले. त्यांच्या प्रयत्नामुळे प्रयोगशाळेत मोठ्या प्रमाणात शाखिक कोशिका निर्माण करण्याच्या पद्धती शोधून नवीन लशी आणि प्रतिरक्षा उपचार पद्धती विकसित होण्यास चालना मिळाली. प्रतिजनिक प्रथिनांविरुद्ध प्रतिरक्षा प्रतिसादाला चालना देण्याच्या क्षमतेमुळे शाखिक कोशिका कर्करोगाच्या उपचारात अतिशय महत्त्वाच्या आहेत. स्टाइनमन यांच्या शोधामुळे सिपुल्यूसेल – टी कारक तयार करण्यात आला व तो अष्ठीला कर्करोगाच्या उपचारासाठी वापरला जातो. सिपुल्यूसेल – टी ही शाखाकृती कोशिकांद्वारे बनविलेली आणि अमेरिकन अन्न व प्रशासन विभागाने मान्यता दिलेली कर्करोगावरील पहिली लस आहे. रुग्णाच्या रक्तातील प्रतिजन असणार्या कोशिका गोळा करून सिपुल्यूसेल – टी लस बनविली जाते. अष्ठीला कर्ककोशिकांमध्ये असलेल्या प्रथिनांच्या उपस्थितीत प्रयोगशाळेत त्या कोशिकांचे संवर्धन केले जाते. यामुळे प्रतिजन असणार्या कोशिका सक्रियित होतात व त्या रुग्णाच्या शरीरातील अष्ठीला कर्ककोशिकांच्या विरोधात प्रतिरक्षा प्रतिसाद उद्दीपित करतात.
स्टाइनमन यांनी अनेक वैज्ञानिक संस्थांचे सल्लागार तसेच अनेक नियतकालिकांचे संपादक म्हणून काम केले आहे. त्यांना अनेक सन्माननीय पदव्या व सन्मान मिळाले. त्यामध्ये रॉबर्ट कॉख पारितोषिक (१९९९), गैरर्डनर फाउंडेशनचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार (२००३), अल्बर्ट लास्कर बेसिक मेडिकल रिसर्च पुरस्कार (२००७) आणि ॲल्बॅनी मेडिकल सेंटरचे पारितोषिक (२००९) यांचा समावेश आहे.
स्टाइनमन यांचे न्यूयॉर्क ( अमेरिका ) येथे निधन झाले.
भारस्कर, शिल्पा चं.