स्क्विल : फुलझाडांपैकी एकदलिकित वर्गातील ⇨ लिलिएसी किंवा पलांडू या कुलात समाविष्ट असलेल्या काही कंदयुक्त ओषधींना ‘स्क्विल’ या इंग्रजी नावाने ओळखले जाते. तसेच स्क्विल हे नाव सिल्ला या शास्त्रीय नावाने ओळखल्या जाणार्‍या लिलिएसी कुला-तील सु. १०० जातींना लावतात. त्या मूळच्या यूरेशिया भागातील आहेत. त्यामध्ये समुद्र कांदा या झुडपाचा समावेश होत असून तिचे शास्त्रीय नाव अर्जिनिया मॅरिटिमा असे आहे. ती भूमध्य सामुद्रिक प्रदेशांत किनार्‍यावर आढळते. तिचे कंद अल्प प्रमाणात औषधी असून अतिसेवनाने मात्र विषारी असतात. रेड स्क्विल किंवा सी ओनियन या सामान्य नावानेही ती ओळखली जाते.

रान कांदा ( इंडियन स्क्विल लॅ. सिल्ला इंडिका ), जंगली कांदा ( इंडियन ड्रग स्क्विल लॅ. अर्जिनिया इंडिका ) यांचाही यात समावेश होत असून त्या यूरोपातील समशीतोष्ण भागांत तसेच आफ्रिकेत आढळतात. यांची शारीरिक लक्षणे लिलिएसी कुलात वर्णिल्याप्रमाणे असून यांचे कंद कफोत्सारक, मूत्रल व हृदयास पौष्टिक असतात. यांच्या काही जाती बागेत शोभेकरिता लावतात.

पहा : कांदा.

परांडेकर, शं. आ. कुलकर्णी, सतीश वि.  

स्क्विल (अर्जिनिया मॅरिटिमा)