स्कुटेरुडाइट, स्माल्टाइट व क्लो अँथाइट : ही तीन वेगवेगळी खनिजे आहेत. तथापि क्ष-किरणाच्या मदतीने त्यांच्या स्फटिकांचा अभ्यास केला असता त्यांची आणवीय संरचना एकसारखी असल्याचे दिसून आले. तीनही खनिजांचे स्फटिक घनीय प्रणालीचे आहेत. क्लोअँथाइट हे स्कुटेरुडाइटाशी समरूप असल्याचेही आढळले आहे. यामुळे या तीन खनिजांची माहिती एकत्र दिली आहे. यांपैकी क्लोअँथाइट हे कमी महत्त्वाचे खनिज आहे. मात्र त्याचा स्माल्टाइटाबरोबर सामान्यपणे उल्लेख केला जातो.

  स्कुटेरुडाइट : हे कोबाल्ट-निकेल आर्सेनाइड मालिकेतील खनिज असून यात बहुधा लोहही असते. याचे स्फटिक सामान्यपणे घनाकार व अष्टफलकाकार असून क्वचित द्वादशफलकाकार स्फटिकही आढळतात [⟶ स्फटिकविज्ञान]. मात्र हे खनिज बहुधा संपुंजित व घट्ट कणांच्या रूपांत आढळते. कठिनता ५.५ — ६ वि. गु. ६.५  ± ०.४ ठिसूळ चमक धातूसारखी रंग कथिलासारखा पांढरा ते रुपेरी करडा कस काळा अपारदर्शक [⟶ खनिजविज्ञान]. रा. सं. बहुधा (Co, Ni)As3 मात्र कोबाल्ट व निकेल यांच्या जागी पुष्कळदा लोह आलेले असल्याने रा. सं. (Co, Ni, Fe,) As3 असेही दर्शवितात. निकेलाचे प्रमाण जास्त असलेल्या याच्या प्रकाराला निकेल-स्कुटेरुडाइट म्हणतात. हे गलनीय खनिज लोणारी कोळशाच्या निखार्‍यावर फुंकनळीद्वारे भाजल्यास फुंक-नळीसमोर आर्सेनिक ऑक्साइडाचा लेप तयार होतो व लसणासारखा वास येतो. संपुंजित आर्सेनोपायराइटापासून हे केवळ कोबाल्टाची चाचणी घेऊन वेगळे ओळखता येते. 

  मध्यम तापमानाला बनलेल्या धातुक (कच्च्या रूपातील धातू) शिरांमध्ये कोबाल्टाइट व निकोलाइट या खनिजांबरोबर हे आढळते. पुष्कळदा याच्याबरोबर नैसर्गिक चांदी, बिस्मथ, आर्सेनोपायराइट वकॅल्साइट सामान्यपणे आढळतात. सॅक्सनी, कोबॉल्ट ( आँटॅरिओ ) व स्वित्झर्लंड येथे हे आढळते. कोबाल्ट व निकेल यांचे धातुक म्हणून याचा उपयोग होतो. चिरचुंबक व उच्च वेगी पोलादी हत्यारे यांच्या मिश्र-धातू बनविण्यासाठी कोबाल्ट वापरतात. मृत्पात्री व काचेच्या वस्तू तयार करताना कोबाल्ट ऑक्साइड हे निळे रंगद्रव्य म्हणून वापरतात. नॉर्वेमधील स्कुटेरुड या गावी हे प्रथम आढळल्याने याला स्कुटेरुडाइट हे नाव देण्यात आले.

  स्माल्टाइट : सदर मालिकेतील हे कोबाल्ट जास्त व आर्सेनिक कमी असणारे खनिज आहे. याचे स्फटिक घनीय आहेत. मात्र हे सामान्यपणे संपुंजित व जालकरूपात आढळते. ⇨ पाटन अस्पष्ट भंजन कणमय व ओबडधोबड ठिसूळ कठिनता ५.५ — ६ वि. गु. ५.७ — ६.८ चमक धातूसारखी रंग कथिलासारखा पांढरा, संपुंजित प्रकाराचा पोलादाप्रमाणे करडा, कधीकधी रंगदीप्त व मळल्यामुळे करडसर कस करडसर काळा अपारदर्शक [⟶ खनिजविज्ञान]. रा. सं. अंदाजे (Co, Ni) As2-x म्हणजे रा. सं. पुष्कळ वेगळी असू शकते. कधीकधी यात लोह व अत्यल्प गंधकही असू शकते. हे बंद नळीत तापविल्यास आर्सेनिक व उघड्या नळीत तापविल्यास आर्सेनिक ट्राय-ऑक्साइड संप्लवनाद्वारे मिळतात.

  स्माल्टाइट पुष्कळ वेळा कोबाल्ट व निकेल यांच्या खनिजांबरोबर खनिज शिरांमध्ये आढळते. कधीकधी हे सोने व तांबे यांच्या धातुकांमध्ये स्फॅलेराइट, गॅलेना, आर्सेनोपायराइट या खनिजांबरोबर आढळते. बोहीमिया, सॅक्सनी, कार्नवॉल, न्यू साऊथ वेल्स, फ्रान्स, स्वित्झर्लंड इ. ठिकाणी हे आढळते. निकेल व कोबाल्ट यांचे गौण धातुक म्हणून याचा उपयोग होतो. स्माल्ट ही गडद निळ्या रंगाची काच असून तिच्या संदर्भातून स्माल्टाइट हे नाव आले आहे.

  क्लोअँथाइट : हे खनिज पांढरे वा करडे असून याचेही स्फटिक घनीय प्रणालीचे आहेत. याची चमक धातूसारखी असून रा. सं. Ni As२-३ आहे. हे खनिज स्कुटेरुडाइट खनिजाशी समरूप असल्याचे आढळले आहे. अंकुर येणे आणि कोवळा हिरवा धुमारा ( प्ररोह ) या अर्थाच्या ग्रीक शब्दांवरून क्लोअँथाइट हे नाव आले आहे.

पहा : आर्सेनिक कोबाल्ट निकेल.                

ठाकूर, अ. ना.