सोरोक्यिन, प्यिट्यिऱ्यीम अल्यिक्सांद्र-व्ह्यिच : (२१ जानेवारी १८८९-१० फेब्रुवारी १९६८). एक प्रसिद्ध रशियन-अमेरिकन समाजशास्त्रज्ञ. त्याचा जन्म सिक्तिफ्‌कारच्या उत्तरेस तूर्जा (कोमी जिल्हा, ए.एस्.एस्.आर्.) या गावी झाला. सुरुवातीचे शालेय शिक्षण जन्मगावी घेऊन चरितार्थासाठी त्याने किरकोळ कामे केली आणि नंतर सेंट पीटर्झबर्ग विद्यापीठातून गुन्हेशास्त्र विषयात पदवी संपादन केली (१९१४). त्याच विद्यापीठात प्राध्यापक म्हणून त्याची नेमणूक झाली. त्याने १९१५-२२ या कालावधीत (तुरुंगातील कालावधी वगळता) अध्यापनाचे काम केले आणि त्या विद्यापीठात स्वतंत्र समाजशास्त्र विभाग सुरू केला. त्याच्या साम्यवाद विरोधी मतामुळे त्यास अनेकदा कैद करण्यात आले होते. अखेर त्यास रशियातून हद्दपार करण्यात आले तत्पूर्वी त्याचा विवाह हेलेन बरतीन्‌स्की या युवतीशी झाला. त्यांना दोन मुलगे झाले.

१९२३ मध्ये सोरोक्यिन अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत गेला. त्याला १९३० मध्ये त्या देशाचे नागरिकत्व मिळाले. प्रारंभी त्याने मिनेसोटा विद्यापीठात समाजशास्त्राचा प्राध्यापक म्हणून अध्यापन केले (१९२४-३०) व नंतर त्याला हार्व्हर्ड विद्यापीठाने निमंत्रित केले. त्या विद्यापीठात त्याने १९३०–५९ दरम्यान अध्यापन केले. तेथे त्याने समाजशास्त्र विभागाची स्थापना केली. या अध्यापनाच्या काळात त्याने सु. ३७ पुस्तके व सु. ४०० लेख लिहिले. त्याच्या ग्रंथांपैकी लिव्ह्‌ज ऑफ ए रशियन डायरी (१९२४), सिस्टेमॅटिक सोर्स बुक इन रूरल सोशिऑलॉजी (तीन खंड, १९३०-३२), सोशल अँड कल्चरल डायनॅमिक्स (चार खंड, १९३७ -४१), मॅन अँड सोसायटी इन कलॅमिटी (१९४२), ॲलट्रूइस्टिक लव्ह (१९५०), द थर्टी यिअर्स आफ्टर (१९५०), लाँग जर्नी (आत्मचरित्र, १९६३) हे ग्रंथ महत्त्वाचे असून मान्यवर झाले आहेत. त्याने लिव्ह्‌ज ऑफ रशियन डायरी यात रशियन राज्यक्रांतीतील अनेक बारीकसारीक तपशिलांची चर्चा केली असून द थर्टी यिअर्स आफ्टर या शीर्षकार्थाचा अनुबंध १९५० मध्ये त्याला जोडला आहे. त्याचा सोशल अँड कल्चरल डायनॅमिक्स हा विशेष गाजलेला व सैद्धांतिक चर्चा करणारा ग्रंथ असून त्याच्यात सामाजिक प्रक्रिया आणि ऐतिहासिक प्रकारविचार यांचा सैद्धांतिक पातळीवर तत्कालीन संस्कृतीच्या संदर्भात ऊहापोह केला आहे.

सोरोक्यिन याला सामाजिक स्तरीकरण, सामाजिक उपपत्तीचा इतिहास आणि परहितवादी (नि:स्वार्थी) वर्तन या संकल्पनांत विशेष रस होता. त्याने या संदर्भात तीन उपपत्त्या मांडल्या : सामाजिक प्रभेदन, सामाजिक स्तरीकरण आणि सामाजिक संघर्ष. त्याच्या मते, आधुनिक पाश्चात्त्य संस्कृती ही पूर्णत: भौतिकवादी असून तांत्रिक प्रगतीच्या मागे धावते आहे. त्यामुळे सामाजिक अनुबंध संपुष्टात येऊन नि:स्वार्थी प्रेमाला समाज मुकणार आहे. सामाजिक स्तरीकरण आणि ध्रुवीकरण यांच्या तत्त्वज्ञानातून ही अपरिहार्यता उद्भवली आहे जिच्यामुळे नैतिक समतुष्टी (अध:पतन) उद्भवून तिचे रूपांतर आणीबाणीच्या परिस्थितीत-संघर्षात झाले आहे. त्याला आत्यंतिक स्वार्थ कारणीभूत आहे. सामाजिक उपपत्तीच्या इतिहासात त्याने दोन प्रकारच्या सामाजिक-सांस्कृतिक पद्धतींत वैशिष्ट्यपूर्ण फरक निर्दिष्ट केला. एक, आनुभविक–नैसर्गिक शास्त्रांना उत्तेजित करणारी परावलंबित पद्धती आणि दोन, ध्येयप्रवृत्त-गूढमय, बुद्धीला छेद देणारी, प्राधिकारकावर विसंबून असणारी आणि विश्वास ठेवणारी पद्धती. त्याचे समाजशास्त्रातील योगदान जरी वादग्रस्त ठरले असले, तरी एक विचारवंत समाजशास्त्रज्ञ म्हणून त्याची ख्याती झाली आणि विविध विद्यापीठांत त्याच्या नावे संशोधन केंद्रे स्थापण्यात आली. ज्या रशियाने त्यास हद्दपार केले तेथील कोमी प्रजासत्ताकातील सिक्तिफ्कार स्टेट विद्यापीठात त्याच्या नावाने ‘सोरोक्यिन संशोधन केंद्र’ स्थापण्यात आले (२००९).

वृद्धापकाळाने त्याचे विंचेस्टर (मॅसॅचूसेट्स, अमेरिका) येथे निधन झाले.

गेडाम, संतोष