सोहागपूर : भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील होशंगाबाद जिल्ह्याच्या याच नावाच्या तालुक्याचे ठिकाण व प्रमुख शहर. लोकसंख्या २२,३३९ (२०११). हे होशंगाबादच्या पूर्वेस ५१ किमी. पालकमती नदीकिनारी वसलेले आहे. हे रस्ते व लोहमार्गांनी इतर शहरांशी जोडलेले आहे. पूर्वी याचे नाव सोनितपूर असावे असे काहींचे मत आहे. अठराव्या शतकाच्या उत्तराधीत हे नागपूरचे भोसले यांच्या अखत्यारित होते. त्यांनी येथे किल्ला बांधला होता. त्यामुळे १८०३-०४ मध्ये भोपाळच्या वझीर मोहमंदाच्या हल्ल्यापासून शहराचे संरक्षण झालेले होते. १८०३ च्या सुमारास येथे टाकसाळ होती. येथे दहा वर्षे तेरा आणे किमतीचा (सु. ८१ पैसे) रुपया तयार करण्यात येत असे. १९३३ मध्ये महात्मा गांधी याठिकाणी आले होते. येथील मुख्य चौकास त्यांचे नाव दिले आहे.

येथे कापडावरील विणकाम व रंगकाम हे उद्योग चालतात. तसेच येथील पलंगपोस, रजई व सुरई प्रसिद्ध आहे. येथे नागवेलीच्या बागा असून नागवेल, अन्नधान्य, सागवान यांची ही बाजारपेठ आहे. येथील शिवमंदिर व ऊख तलावास अनेक लोक भेट देतात. येथे महाशिवरात्री, नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

गाडे, ना. स.