स्कंधकोशिका : ( मूळ कोशिका इं. स्टेम सेल ). स्कंध-कोशिका मानवी किंवा प्राण्यांतील अविभेदित कोशिका असून त्यांच्यात स्वयंप्रतिकृती बनविण्याची तसेच विशिष्ट कोशिका निर्माण करण्याची क्षमता असते. स्कंधकोशिका विभेदित कोशिकांचा अविरत स्रोत असून त्यांपासून प्राण्यांची ऊतके ( समान रचना व कार्य असणार्‍या कोशिकांचा समूह ) व अवयव बनविता येऊ शकतात. स्कंधकोशिकांमुळे खूप मोठ्या प्रमाणात जिज्ञासा निर्माण झालेली आहे. कारण त्यांचा वापर करून विकृतींमुळे अगर अपघातांमुळे सदोष किंवा नष्ट झालेल्या कोशिकांची पुनःस्थापना करता येऊ शकेल अशा उपचार पद्धतींचा विकास होत आहे. या पद्धतीद्वारे पार्किनसन विकलांगता, हृदयविकार आणि मधुमेह यांसारख्या विकारांवर उपचार करता येणे शक्य झाले आहे.  

स्कंधकोशिकांचे शास्त्रीय तीन प्रकार आहेत : (१) पूर्णशक्तिक (टोटीपोटंट ) स्कंधकोशिका : या कोशिकांमध्ये ऊतक उत्पादन व विकसन तसेच संपूर्ण शरीर निर्माण करण्याची क्षमता असते. (२) बहुशक्तिक (प्लुरीपोटंट ) स्कंधकोशिका : या कोशिकांमध्ये ऊतक उत्पादन व विकसन निर्माण करण्याची क्षमता असते, परंतु स्वतंत्र संपूर्ण शरीर निर्माण करण्याची क्षमता नसते. (३) बहुविभवी ( मल्टिपोटंट ) स्कंधकोशिका : या प्रकारच्या कोशिका मर्यादित प्रमाणात ऊतक तयार करू शकतात.  

स्कंधकोशिकांचे मुख्य दोन प्रकार आहेत : (१) गर्भ-स्कंधकोशिका (२) प्रौढ स्कंधकोशिका, यांना ऊतक स्कंधकोशिका असे देखील म्हणतात.

(१) गर्भ-स्कंधकोशिका : या स्कंधकोशिका स्तनी वर्गातील प्राण्यांच्या गर्भातील भ्रूणाच्या विकासाच्या अगदी सुरुवातीच्या अवस्थे-तील कोशिकाद्रव्यापासून प्राप्त करतात. ते द्रव्य विभाजित कोशिकांच्या पोकळ गोलकाने ( ब्लास्टोसिस्टने ) बनलेले असते. मानवी गर्भातील किंवा इतर विशिष्ट सस्तन प्राण्यांतील गर्भ-स्कंधकोशिकांची ऊतक संवर्धकांत वाढ करता येते.

 उंदीर गर्भ-स्कंधकोशिका : या सर्वांत जास्त अभ्यास व संशोधन झालेल्या स्कंधकोशिका असून १९८१ मध्ये यांचे संशोधन झालेले होते. या प्रकारच्या स्कंधकोशिका ग्लायकोप्रोटीन सायटोकिन या ल्यूकेमिया इन्हिबिटरी फॅक्टरच्या ( श्वेतकोशिकार्बुद संदमकघटकाच्या ) उपस्थितीत अनिश्चितपणे वाढविता येऊ शकतात. अगदी सुरुवातीच्या बीजपुटी (ब्लास्टोसिस्ट ) अवस्थेत उंदरांच्या गर्भात संवर्धित गर्भ-स्कंधकोशिका  अंतःक्षेपित केल्या, तर त्या गर्भात एकत्रित होऊन जवळपास सर्व तर्‍हेच्या ऊतक कोशिका निर्माण करू शकतात. उंदरांच्या गर्भात पुनर्निर्माण करण्याच्या या महत्त्वपूर्ण क्षमतेमुळे गर्भ-स्कंधकोशिकांना बहुशक्तिक स्कंधकोशिका ( प्लुरीपोटंट म्हणजे प्रौढ अवयवांच्या कुठल्याही कोशिका निर्माण करू शकणार्‍या ) समजतात. जर श्वेतकोशिकाबुर्द संदमक घटकांच्या अनुपस्थितीत गर्भ-स्कंधकोशिका संवर्धकात वाढविल्या, तर ‘ भ्रूणपिंड रूपात ’ त्या विभाजित होतात. हे पिंड सुरुवातीच्या अंड-चितीय अवस्थेतील उंदरांच्या गर्भासारखे असतात. तसेच ते अंतस्त्वचेच्या बाह्या-वरणातील गर्भ-स्कंधकोशिकांसारखे असतात. गर्भ-स्कंधकोशिका प्रौढ उंदरांमध्ये प्रतिरोपित केल्या, तर टेराटोमा नावाच्या अर्बुदात विकसित होतात व त्यांमध्ये विभेदित ऊतकांचे विविध प्रकार असतात.

 उंदरांच्या गर्भ-स्कंधकोशिकांचा वापर जनुकीय दृष्ट्या बदल झालेले उंदीर निर्माण करण्यासाठी होतो. ऊतक संवर्धकातील गर्भ-स्कंधकोशिकांत नवीन जनुके प्रविष्ट करतात त्यासाठी पाहिजे असलेले विशिष्ट जनुकीय घटक निवडून आणि उंदराच्या गर्भात जनुकीय दृष्ट्या परिवर्तित झालेल्या कोशिका अंतःक्षेपित केल्या जातात. याद्वारे निर्माण झालेले विचित्रोतकी (चिमेरिक ) उंदीर आश्रयी कोशिका आणि दाता यांच्या संयोगाने तयार झालेले असतात. ‘ विचित्रोतकी ’ उंदरांत गर्भ-स्कंधकोशिकांपासून तयार झालेल्या जनन कोशिका ( शुक्राणू वा अंड ) असल्यास गर्भ-स्कंध-कोशिकांसारखी जनुकीय संरचना असलेल्या उंदरांच्या वंशावळीचे प्रजनन करता येऊ शकते आणि त्यामुळे परीक्षानलिकेत ( इन व्हिट्रो ) प्रयोग करून जनुकीय बदल घडवून आणता येतात. या पद्धतीचा वापर उंदरांच्या हजारो नवीन जनुकीय वंशावळी निर्माण करण्यासाठी होतो. या प्रकारच्या अनेक जनुकीय वंशावळीत स्वतंत्र जनुकाचे जीवशास्त्रीय कार्य अभ्यास-ण्यासाठी अंशोच्छेदन केले जाते. विविध मानवी जनुकीय आजारांत एक-सारखे उत्परिवर्तन घडवून आणणार्‍या जनुकांची ओळख झालेली आहे. मानवी आजाराकरिता या‘ उंदीर-प्रतिकृतींचा ’वापर विकृतिविज्ञानासाठी तसेच नवीन उपचार पद्धती यांचे संशोधन करण्यासाठी केला जातो.

आ. १. बहुशक्तिक ( प्लुरीपोटंट ) स्कंधकोशिकेची निर्मिती : (१) परीक्षानलिकेतील निषेचित अंड ( पूर्णशक्तिक स्कंधकोशिका ), (२) आठ कोशिकीय गर्भ, (३) बीजपुटी, (४) संवर्धित अविभेदित स्कंधकोशिका(बहुशक्तिक स्कंधकोशिका ), (५) रक्तकोशिका, (६) हृदीय ऊतके, (७) मज्जा कोशिका.

मानवी गर्भ-स्कंधकोशिका : उंदरांच्या गर्भ-स्कंधकोशिकांच्या अभ्यासातील दीर्घ अनुभवामुळे वैज्ञानिकांना मानवी गर्भ-स्कंधकोशिका वाढविणे शक्य झाले. १९९८ मध्ये पहिली मानवी गर्भ-स्कंधकोशिकांची वंशावळ निर्माण करण्यात आली. मानवी गर्भ-स्कंधकोशिका बहुतांशी उंदरांच्या कोशिकांसारख्याच असतात, मात्र त्यांना संवर्धनासाठी श्वेत-कोशिकार्बुद संदमक घटकाची आवश्यकता नसते. परीक्षानलिकेत प्रयोग करताना मानवी गर्भ-स्कंधकोशिका मोठ्या प्रमाणावर विविध विभेदित ऊतके निर्माण करू शकतात. प्रतिरक्षारोध कमी झालेल्या उंदरांत त्यांचे प्रतिरोपण केल्यास त्या टेराटोमा अर्बुद तयार करतात. हे जरी ज्ञात नसले की मानवी गर्भ-स्कंधकोशिका सर्व तर्‍हेच्या ऊतकांचे निवह निर्माण करू शकतात, तरी असे समजले जाते की त्यांची गुणवैशिष्ट्ये बहुशक्तिक आहेत. त्यामुळे कोशिका उपचार पद्धतीत त्यांना विभेदित कोशिकांचा स्रोत मानले जाते. कोशिका उपचार पद्धतीत रुग्णाच्या रोगी कोशिका नवीन सुदृढ कोशिकांद्वारे बदलल्या जातात. पार्किनसन विकलांगता-सारख्या किंवा मधुमेहाच्या उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर कोशिका (अनुक्रमे डोपामाइन सिक्रिटिंग न्यूरॉन व इन्शुलीन सिक्रिटिंग पँक्रिॲटिक बीटा कोशिका ) मानवी गर्भ-स्कंधकोशिकांद्वारे निर्माण करता येतात. यापूर्वी या प्रकारच्या कोशिका प्राप्त करण्याचे स्रोत फारच कमी होते उदा., पँक्रिॲटिक बीटा कोशिका या दान केलेल्या मानवी शवाच्या अवयवांपासून मिळवाव्या लागत.स्कंधकोशिका गोळा करताना बीजपुटी अवस्थेतील गर्भ नष्ट होतो, त्यामुळे मानवी गर्भ-स्कंधकोशिकांच्या वापराबाबत नैतिक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. परीक्षानलिकेत निषेचित केलेल्या अंडापासून मानवी गर्भ–स्कंधकोशिका निर्माण केल्या जातात, त्यामुळे अनेकजण या प्रकाराला नैतिक दृष्ट्या चुकीचे मानतात. काहीजण बीजपुटींना कोशिकांचा संचय मानतात आणि यापूर्वी मानवी कोशिकांचा प्रयोगशाळेत झालेल्या वापरा- वरून कधीही नैतिक किंवा कायदेविषयक प्रश्न उपस्थित झालेले नसल्याने काहीजण मान्यता देतात. आंतरकोशिकाद्रव्याच्या कोणत्याही कोशिका या गर्भाचा विशिष्ट भाग बनत नाहीत. यांपैकी सर्व कोशिका नाळेत उपस्थित असतात. त्यांच्या वापरावरूनही काही कायदा व नैतिकतेविषयक विशेष वाद उपस्थित झालेले नाहीत. मानवी गर्भ-स्कंधकोशिकांच्या वापरावरील दृष्टिकोनानुसार त्यांच्या वापराला काही देशांत परवानगी आहे, तर काहींत बंदी आहे. विशिष्ट आजारासाठी योग्य तर्‍हेच्या स्कंधकोशिका निश्चित करण्याच्या आव्हानापासून ते त्यांची वंशावळ बनविण्यापर्यंत अनेक वादग्रस्त मुद्दे आहेत. मानवी ऊतकांची विनिमय वस्तू बनविण्याची क्षमता, अविकसित आणि मागास देशांतील लोकांचे याबाबतीत शोषण व दुरुपयोग होण्याची भीती, मानवी जननवंशवृद्धी, आद्य वंशावळ अभियांत्रिकी आणि प्रतिकृती जननिकी थोपविण्याशी संबंधित आव्हाने आदी अनेक बाबी याच्याशी निगडित आहेत. या कोशिकांच्या वापरामुळे निर्माण होऊ शकणारी कर्करोगांची शक्यता, परीक्षानलिकेत प्रयोग करीत असताना जननिक बदल होण्याच्या शक्यता आणि धोके अंतर्भूत आहेत.

  गर्भ-जनन कोशिका : या कोशिका गर्भाच्या शेवटच्या अवस्थेतील जनन ग्रंथीत असलेल्या आद्य जनन कोशिकांतून प्राप्त करतात. त्यांची अनेक वैशिष्ट्ये गर्भ-स्कंधकोशिकांसारखी असतात. गर्भातील आद्य जनन कोशिकांचा स्कंधकोशिकांत विकास होतो आणि त्या प्रौढांत प्रजनना-साठी आवश्यक युग्मक कोशिका ( शुक्राणू किंवा अंड ) निर्माण करतात.

 (२) प्रौढ स्कंधकोशिका : प्रौढांच्या शरीरातील त्वचेची बाह्य-त्वचा, लहान आतड्यातील अस्तर आणि अस्थिमज्जा यांतील ऊतकांमध्ये सातत्याने बदल होत असतात. त्यांच्यात अमर्याद स्कंधकोशिका आणि ‘ संक्रमण विवर्धित कोशिका ’ असतात. त्या स्कंधकोशिकांपासून निर्माण होतात आणि विभेदित होईपर्यंत एका निश्चित संख्येच्या पटीत त्यांचे विभाजन होते. इतर कोशिकांनी निर्माण केलेल्या स्थानात स्कंधकोशिका राहतात, त्यात स्रवणार्‍या द्रवामुळे स्कंधकोशिका जिवंत व सक्रिय राहतात. यकृतातील ऊतकांच्या कोशिका कमीत कमी कोशिकाविभाजन दर्श-वितात किंवा जखमी झाल्यावर विभाजित होतात. अशा तर्‍हेच्या ऊतकांत विशेष स्कंधकोशिकांची संख्या नसते आणि ऊतकातील एखादी कोशिका आवश्यकता असेल त्यावेळेस पुनर्जनन करतात. 

 अधिस्तरीय स्कंधकोशिका : त्वचेतील अधित्वचेत केरॅटिनोसाईट कोशिकांचा स्तर असतो. त्वचेच्या आधारस्तराखालील कोशिका फक्त विभाजित होतात. यातील अनेक कोशिका स्कंधकोशिका असल्या तरी संक्रमण विवर्धित कोशिका जास्त प्रमाणात असतात. या कोशिका जसजशा पक्व ( प्रौढ ) होत जातात, तशा अधित्वचेकडे सरकत जाऊन शेवटी मृत पावतात व त्वचेच्या बाह्यपृष्ठावर येऊन काढून टाकल्या जातात. लहान आतड्याच्या अधिस्तरात रसांकुर ( व्हिलस ) हे प्रवर्धक    तयार होते व ते लहान खात्यांसारख्या गुहिकांसोबत पसरते. या गुहिकांमध्ये मुळाशी विभाजित कोशिकांसोबत स्कंधकोशिका आढळतात. या गुहिकां-मध्ये सातत्याने कोशिका निर्माण होतात व रसांकुराद्वारे आतड्याच्या वेजात ( सुषिरकात ) स्थलांतरित होतात. त्या स्थलांतरित झाल्यावर आतड्याच्या अधिस्तरीय कोशिकांची गुणवैशिष्ट्ये असणार्‍या कोशिकांत विभेदित होतात.


आ. २. विविध स्कंधकोशिकांची निर्मिती : (अ) गर्भ-स्कंधकोशिका : ( अ१ ) निषेचन पद्धतीद्वारा बनविलेल्या गर्भापासून : (१) अंडकोशिका, (२) रेतुक कोशिका, (३) निषेचन, (४) निषेचन पूर्ण, (५) एककोशिकीय गर्भ, (६) निषेचित गर्भ, (७) गर्भ-स्कंधकोशिका ( अ२ ) कृत्तकीकरण पद्धतीद्वारा बनविलेल्या गर्भापासून : (१) अंडकोशिका, (२) अक्रिय किंवा काढून टाकलेले प्रकलीय द्रव्य, (३) दाता कोशिका, (४) एकलित दाता प्रकलीय द्रव्य, (५) दाता प्रकलीय द्रव्य अंतःक्षेपित करणे, (६) कृत्तकीकरण पूर्ण, (७) कृत्तकीय गर्भ, (८) गर्भ-स्कंधकोशिका (आ) प्रवर्तित बहुशक्तिक स्कंधकोशिका ( सामान्य कोशिकांपासून पुनर्निर्मित केलेल्या गर्भ--स्कंधकोशिकांसारख्या वागणार्‍या कोशिका ) : (१) लक्ष्य कोशिका, (२) समाविष्ट जनुके आणि रसायने, (३) गर्भ-स्कंधकोशिकांसारख्या वागणार्‍या कोशिका. (इ) साधारणपणे जन्मापासून शरीरातील ऊतकांत तसेच नाळेत आढळणार्‍या स्कंधकोशिका : (१) नाळेतील रक्त व अपरेतील उल्ब द्रव, (२) अस्थिमज्जा आणि इतर ऊतके, (३) प्रौढ स्कंधकोशिका.

अस्थिमज्जा आणि रक्तजनक स्कंधकोशिका : अस्थिमज्जेत रक्तजनक स्कंधकोशिका असतात. त्या रक्त व प्रतिरक्षा तंत्रामधील सर्व कोशिका निर्माण करतात. रक्तजनक स्कंधकोशिका नाळेतील रक्तात मोठ्या प्रमाणात तर साधारण रक्तात कमी प्रमाणात सापडतात. अस्थिमज्जेतील स्कंध-कोशिका लसीका कोशिका, कणकोशिका, लाल रक्तकोशिका आणि इतर विशिष्ट कोशिका निर्माण करतात. गर्भनाळेतील स्कंधकोशिका सु. ९०% रक्त आणि प्रतिरक्षा कोशिका तयार करू शकतात, तर १०% यकृत, हृदयाचे स्नायू , मेंदूच्या कोशिका व इतर कोशिका तयार करू शकतात.     

 अस्थिमज्जा प्रतिरोपण ही एक प्रकारे स्कंधकोशिका उपचार पद्धती आहे. कर्करोग झालेल्या रुग्णांच्या उपचारासाठी केलेल्या किरणोत्सर्गी पद्धतीत नष्ट झालेल्या स्कंधकोशिका निर्माण करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. अस्थिमज्जा भ्रूणमध्यस्तरीय स्कंधकोशिकांचा स्रोत आहे. या कोशिका रक्तजनक स्कंधकोशिकांचे पूर्वद्रव्य असतात. त्यांच्यामध्ये हाडे, स्नायू, संयोजी ऊतक  इ. प्रकारच्या कोशिका विभेदित करण्याची क्षमता असते.

तंत्रिका ( मज्जा ) स्कंधकोशिका : संशोधनात आढळून आले आहे की, मेंदूत देखील स्कंधकोशिका असतात. स्तनी वर्गातील प्राण्यांत जन्मानंतर फारच कमी तंत्रिका कोशिका निर्माण होतात, मात्र गंधकंदात आणि हिप्पोकॅम्पसमध्ये काही तंत्रिका कोशिका सातत्याने निर्माण होत राहतात. या तंत्रिका कोशिका तंत्रिका स्कंधकोशिकांतून तयार होत असतात. या कोशिका परीक्षानलिका पद्धतीने तंत्रिकापुटिकांच्या ( लहान कोशिकांचे पुंजके यात स्कंधकोशिका असतात ) स्वरूपात संवर्धित करता येऊ शकतात. या तर्‍हेच्या स्कंधकोशिकांचा वापर पार्किनसन कंपवात आणि मज्जासंस्थेच्या विकारातील उपचारात केला जातो. 

  काय कोशिकांचे केंद्रकीय रोपण : ( सोमॅटिक सेल न्यूक्लिअर ट्रान्स्फर ). मानवी बहुशक्तिक कोशिका निर्माण करण्यासाठी काय कोशिकांच्या केंद्रकीय रोपणाचा वापर करण्याबाबत संशोधन सुरू आहे. या रोपणामध्ये काय कोशिकेचे केंद्रक ( ज्या कोशिकांमध्ये डीऑक्सि-रिबोन्यूक्लिइक अम्ल जास्त प्रमाणात असते ) त्यातून काढून टाकून अनिषेचित, जननिक द्रव्य नसलेल्या अंडकोशिकेत टाकले जाते. बीजपुटी अवस्थेपर्यंत अंड संवर्धकात वाढविले जाते. नंतर अंडांतून आतील कोशिकाद्रव्य काढून टाकले जाते आणि कोशिकांना गर्भ-स्कंधकोशिकांची वंशावळ निर्माण करण्यासाठी संवर्धकात वाढविले जाते.

  प्रवर्तित बहुशक्तिक स्कंधकोशिका : गर्भ-स्कंधकोशिकांऐवजी प्रौढ मानवी ऊतकांपासून बहुशक्तिक स्कंधकोशिका निर्माण करण्याची क्षमता तयार झाल्यास, त्यांचा अमर्याद पुरवठा नियमितपणे होत राहील. तसेच या महत्त्वपूर्ण संशोधनक्षेत्रात कुठल्याही कायदा, धार्मिक वा नैतिक प्रश्नांशिवाय कार्य होऊ शकेल.

  इसवी सन २०१० मध्ये मॅसॅचूसेट्स ( अमेरिका ) येथील रुग्णालयात प्रौढ त्वचा कोशिकांपासून स्कंधकोशिका आदी स्नायू कोशिका तयार करण्यात आल्या.या तंत्राद्वारे प्रवर्तित बहुशक्तिक स्कंधकोशिका बन-विण्यात आल्या.त्यांच्यात गर्भ-स्कंधकोशिकांप्रमाणेच क्षमता असून त्याच्यापासून शरीरातील प्रत्येक ऊतक तयार करता येणे शक्य आहे.

  प्रवर्तित बहुशक्तिक स्कंधकोशिका २००६ मध्ये जपानी शास्त्रज्ञ शिन्या यामानाका यांनी निर्माण केल्या.जुलै २०१० मध्ये एका संशोधन चमूने रक्तातून स्कंधकोशिका निर्माण करण्याचे तंत्र शोधून काढले.शल्य परिणाह (परिधी) रक्त-स्कंधकोशिका (प्रिक-पेरिफेरल ब्लड स्टेम सेल) शरीरातील कोणत्याही ऊतकांची निर्मिती करू शकतात.या नव्या तंत्राद्वारे शास्त्रज्ञांना विभेदित स्कंधकोशिकांचा तयार स्रोत मोठ्या प्रमाणावर उप-लब्ध झाला आहे.स्कंधकोशिका रक्तातून किंवा शल्य परिणाह रक्त–स्कंधकोशिकांद्वारा गोळा करणे हे अस्थिमज्जेतून गोळा करण्यापेक्षा अधिक सुलभ असते. 

  मे २०१० मध्ये कारोलिन्स्का इन्स्टिट्यूट ( स्टॉकहोम ) येथे मानवी गर्भ-स्कंधकोशिकांचे संवर्धक रासायनिक नियंत्रित परिस्थितीत व प्राण्यांची प्रथिने न वापरता मोठ्या प्रमाणावर तयार करण्याचे संशोधन झाले आहे. 

  स्कंधकोशिका उपचार पद्धती : या उपचार पद्धतीत स्कंध-कोशिकांचा वा त्यांच्यापासून तयार केलेल्या कोशिकांचा वापर केला जातो. या कोशिका वापरून रुग्णाच्या नष्ट वा खराब झालेल्या कोशिका वा ऊतके दुरुस्त करता येतात.स्कंधकोशिका रक्ताद्वारे अंतःक्षेपित करता येतात किंवा खराब झालेल्या ऊतकांत थेट टाकता येतात किंवा रुग्णाच्या ऊतकांद्वारे स्वयंदुरुस्तीसाठी वापरता येतात.स्कंधकोशिका उपचार पद्धतीचा वापर प्रथमतः अस्थिमज्जा प्रत्यारोपणात ⇨ श्वेत-कोशिकार्बुदाच्या (ल्युकेमिया) इलाजासाठी करण्यात आला.अस्थिमज्जा प्रत्यारोपणाकरिता गेल्या ५० वर्षांपासून स्कंधकोशिकांचा वापर करण्यात येत आहे. आता वैद्यकीय रीत्या अत्याधुनिक तंत्रे वापरून रक्तातील स्कंधकोशिका वापरल्या जात आहेत.

  स्कंधकोशिकांचा वैद्यकीय उपचार पद्धतीत वापर करण्यात काही आव्हाने देखील आहेत. औषधाप्रमाणे स्कंधकोशिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन व चाचणी होऊ शकत नाही. तसेच स्कंधकोशिकांचा उपचार एका विशिष्ट रुग्णापुरताच सीमित राहू शकतो. अनेक आजारांसाठी नेमक्या कोणत्या स्कंधकोशिका वापरायला हव्यात तसेच त्या कोशिका शरीरात योग्य स्थानी कशा पोहोचवाव्यात याचे सुद्धा पुरेसे आकलन शक्य झालेले नाही. स्कंधकोशिका उपचार पद्धतीतील दीर्घकालीन सुरक्षितता व इतर परिणाम देखील ज्ञात नाहीत. त्यामुळे स्कंधकोशिका उपचार पद्धती घेतलेल्या रुग्णांची काळजीपूर्वक देखभाल व सातत्यपूर्ण मागोवा घेत राहणे आवश्यक असते.

  रक्ताचा कर्करोग : रक्तजनक स्कंधकोशिका (हेमॅटोपोटारीक स्टेम सेल्स) अस्थिमज्जेत सापडतात. त्यांचे प्रत्यारोपण हे रक्तातील प्रतिरक्षा तंत्र, कर्करोग किंवा विकाराच्या इलाजासाठी नियमित वापरले जाते. भारतीय स्कंधकोशिका प्रत्यारोपण नोंदणीनुसार १९९०-२०१० या काळात भारतात ४,०१५ रुग्णांनी रक्त स्कंधकोशिका प्रत्यारोपण उपचार पद्धती घेतली. जवळपास १,२०,००० रक्ताचा कर्करोग असणारे रुग्ण या काळात आढळले. यांमध्ये बहुतांशी लहान बालके होती व त्यांना स्कंधकोशिका उपचार पद्धतीचा उपयोग होऊ शकतो. तसेच १०,००० पेक्षा जास्त बालके जन्मजात थॅलॅसेमियाग्रस्त ( रक्ताचा विकार असलेल्या रुग्णाला जिवंत राहण्यासाठी दर महिन्याला एक किंवा दोन वेळा रक्त संचरण करणे आवश्यक असते ) आढळली. या आजारासाठी देखील या उपचार पद्धतीचा उपयोग होऊ शकतो.

 धुमेह : मधुमेहासारख्या विकारावर ही उपचार पद्धती अधिक प्रभावी ठरत असल्याचे दिसून आले आहे. मधुमेही व्यक्तीला अल्प भूल देऊन अस्थीतून मगज काढून प्रयोगशाळेत पाठविला जातो. त्या मगजातून स्कंधकोशिका विलग केल्या जातात व त्यांची गुणवत्ता चाचणी केली जाते. त्यानंतर त्या स्कंधकोशिका स्वादुपिंडाच्या रक्तवाहिनीत थेट पोहोचल्या जातात. तेथे या स्कंधकोशिका नवीन निरोगी पेशी निर्माण करतात, त्यामुळे इन्शुलीन या हॉर्मोनाची योग्य प्रमाणात निर्मिती होते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते.  

  हृदयाचे आजार, बुबळाचे अंधत्व, दात्राकार  कोशिका ( सिकलसेल ) आजार, हंटिंग्टन कंपवात, मेंदूचा पक्षाघात, मतिमंदत्व, स्मृतिभ्रंश,मज्जारज्जू आघातजन्य कमरेखालचा पक्षाघात इ. अनेक दुर्धर रोगांत स्कंधकोशिका उपचार पद्धतीचा वापर केला जातो. स्कंधकोशिकांचा वापर सौंदर्यवर्धनासाठीही मोठ्या प्रमाणात केला जातो. त्वचा, केस आदींच्या कायाकल्पासाठी या उपचार पद्धतीचा मुख्यतः वापर होतो. यामुळे चिरतारुण्याचे वरदान लाभण्याची शक्यता निर्माण झाली आहे [⟶सौंदर्यप्रसाधने].

  स्कंधकोशिका उपचार पद्धतीचा वापर करण्याआधी अनेक चाचण्या (उदा., PET SCAN) कराव्या लागतात. या सर्व चाचण्या इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ स्टेम सेल रिसर्च थेरपीच्या नियमानुसार कराव्या लागतात. माणसाचा आजार, त्याचे स्वरूप, वय व स्कंधकोशिका रुग्णाच्या शरीरात किती कार्यान्वित होतात त्यानुसार रुग्णात सुधारणा दिसून येतात. स्कंध-कोशिकांच्या अंतःक्षेपणानंतर त्यांचा परिणाम दिसून येण्यासाठी ३-१२ महिने इतका कालावधी लागू शकतो.

  स्कंधकोशिका उपचार पद्धतीचा किती फायदा झाला आहे याच्या पडताळणीकरिता पुन्हा PET SCAN सारख्या तपासण्या कराव्या लागतात.

 संदर्भ : Biman, Basu ‘Stem Cell Therapy : Promise of the Future’, Science &amp Culture, Vol. 79, March-April, 2013.

बागुल, अनंत