सोकोत्रा : (अरेबिक-सुकूत्रा). हिंदी महासागरातील येमेनचे एक बेट. हे येमेनच्या आग्नेयीस ३४० किमी. आफ्रिकेच्या गार्डाफूई भूशिराच्या ईशान्येस २४१ किमी. हिंदी महासागराच्या एडन आखाताच्या मुखाशी वसलेले आहे. क्षेत्रफळ ३,६०० चौ. किमी. लोकसंख्या ४२,८४२ (२००४). याची लांबी पूर्व-पश्चिम सु. १३७ किमी. व रुंदी उत्तर-दक्षिण सु. ४० किमी. आहे. तामरिद (लोकसंख्या ८,५४५–२००४) हे या बेटावरील सर्वांत मोठे शहर आहे.
हे बेट प्रवाळ खडकावर असून पूर्वी हे आफ्रिकन व अरेबियन मुख्य भूमीशी जोडलेले होते मात्र खंडीय क्रियांमुळे सध्याची भूगर्भीय रचना झाली असे मानतात. बेटाच्या मध्यभागी हँगीयर पर्वत आहे. बेटाच्या उत्तर भागात अरुंद किनारी मैदाने, तर दक्षिण भागात रुंद मैदाने आहेत. या बेटांच्या नैर्ऋत्येकडे व पश्चिमेकडे सॅम्हा, दरजाह, ॲब्देल कुरी ही येमेनची अन्य लहान बेटे आहेत.
येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. आग्नेय मोसमी वाऱ्यांमुळे येथे पाऊस पडतो. येथे हिराबोळ, कोरफड, चंद्रसेनी उद, राळ, ड्रॅग्नस ब्लड ट्री, पाम इ. वनस्पती आढळतात. गाढवे, शेळ्या, बकऱ्या हे प्राणी व सूर्यपक्षी, साळुंखी, बटिग, चिमणी, ग्रासबिक इ. पक्षी आढळतात.
ग्रीक व्यापारी प्राचीन काळी यास ‘आझल ऑफ द्योस्कॉरिडेस’ म्हणत. तसेच सोकोत्रा हे नाव संस्कृतमधील ‘द्वीप सखदरा’ म्हणजे आनंदाचे आश्रयस्थान असलेले बेट या अन्वये पडले असावे असे मानतात. येथे पूर्वी ख्रिश्चन लोक राहत होते. तेराव्या शतकात अबुल फेदाने याचे वर्णन ‘नेस्टॉरियन ख्रिश्चन अँड पायरेट्स’ असे केलेले आहे. दक्षिण येमेनच्या महदी सल्तनतच्या आधिपत्याखाली हे बेट फार काळ होते. १५०६ मध्ये पोर्तुगीजांनी क्युन्हा व अफ्फोन्सो दे अल्बूक्वेरक्के यांच्या नेतृत्वाखाली तांबड्या समुद्राच्या प्रदेश मार्गावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने नाविक मोहिमेचे आयोजन केले होते. यांनी १५०७ मध्ये या बेटाचा ताबा घेऊन तळ उभारला. १५११ पर्यंत यांचा येथे अंमल होता. १८३४ मध्ये ब्रिटिशांना येथे सत्ता प्रस्थापण्यास अपयश आलेले होते मात्र १८८६ मध्ये हे ब्रिटिश संस्थानाखाली महदी सल्तनतचा भाग म्हणून आले. १९६७ मध्ये हे बेट तत्कालीन दक्षिण येमेन व सध्याच्या येमेनचा भाग बनले. बायबलमध्ये व मार्को पोलोच्या प्रवासवर्णनात या बेटाचा उल्लेख आढळतो. तसेच सतराव्या शतकाच्या मध्यास कॅमॅलिटे पी. व्हिन्सेंझो याने यास भेट दिली होती. सुएझ कालव्याच्या निर्मितीनंतर याच्या मोक्याच्या स्थानामुळे यास महत्त्व प्राप्त झाले होते.
येथील बहुतेक लोक गुरे पाळणे, मासेमारी व शेती व्यवसाय करतात. हिराबोळ, चंद्रसेनी उद, कापूस, तंबाखू, बाजरी, ज्वारी इ. पिके येथे घेतली जातात. याशिवाय खजूराचेही चांगले उत्पादन होते. येथे मासेमारी, मोती व कृषीवर आधारित लघुउद्योग चालतात. येथून तूप, कोरफड, उष्णकटिबंधीय फळे, चंद्रसेनी उद, मोती, खजूर, तंबाखू, मासे यांची निर्यात होते. तामरिदच्या जवळ १२ किमी.वर विमानतळ आहे.
गाडे, ना. स.