स्वसंरक्षक अनुयोजना, वनस्पतींतील : सर्व प्राणी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीतीने पोषणाकरिता वनस्पतींवर अवलंबून असतात. यामुळे वनस्पतींना शाकाहारी प्राण्यांच्या भक्ष्यस्थानी पडावे लागते. स्वसंरक्षणाकरिता खास अवयव किंवा शत्रूचा हल्ला परतवून लावण्यासाठी किंवा त्यापासून बचाव करण्यासाठी त्यांना खास साधने आवश्यक असतात. शिवाय बहुतेक वनस्पती जमिनीत एकाच ठिकाणी वाढत असल्यामुळे त्यांच्यावर हल्ला झाल्यास बचावासाठी त्यांना दूर पळून जाता येत नाही. वनस्पतींना प्राण्यांप्रमाणेच भोवतालच्या परिस्थितीशी योग्य प्रकारे जमवून घेतल्याशिवाय जिवंत राहणे अशय आहे. परिस्थितीत बदल झाल्यास त्याला अनुरूप असे शारीरिक बदल आवश्यक ठरतात तेव्हाच पिढ्यान्पिढ्या चालू असलेल्या जीवनार्थ संघर्षात निभाव लागतो. वनस्पती अथवा प्राणी यांच्या शरीरातील ( किंवा जीवनचर्येतील ) काही भेद असे असतात की, त्यांचा संबंध त्यांच्याभोवतालच्या परिस्थितीतील भेदांशी जोडणे शय होते. अशा भेदांना अनुयोजन म्हणतात. वनस्पती जीवनाला वरील संदर्भात ज्यापासून संरक्षण मिळते त्यांना स्वसंरक्षक अनुयोजना म्हणतात. प्राण्यांपासून संरक्षण मिळावे यासाठी वनस्पतींनी अनेक साधनांचा वापर केलेला आढळतो. यांपैकी काट्यांना कोणी शस्त्रसंभार म्हणतात तथापि त्या अनुयोजनच होत.
शूल, कंटक, शल्य व रोम हे चारही कठीण, तीक्ष्ण व टोकदार असल्याने शाकाहारी प्राण्यांपासून ते वनस्पतींचे संरक्षण करतात. काटे धोत्रा, निवगूर, उटकटारी, गुलाब यांसारख्या काटेरी खोड व पानांच्या लहान वनस्पती जनावरे खात नाहीत.
शूल हे फांद्यांचे रूपांतर असून त्यांचा उगम खोलवर असलेल्या ऊतकांपासून ( समान रचना व कार्य असणार्या कोशिकांच्या समूहांपासून) होतो. ते सरळ व कठीण असून जाड कातडीच्या प्राण्यांच्या शरीरास बोचतात किंवा घुसतातही [⟶ शूलपर्णी]. बेल, लिंबू , जुगुरू, डाळिंब, करवंद इ. उदाहरणांत शूल संरक्षण देते.
कंटक हे पान किंवा पानाच्या काही भागाचे अथवा उपपर्णाचे रूपांतर असून ते शूलाप्रमाणे संरक्षक असते उदा., केवडा व अननसाची पाने करवतीसारखी असतात. बाभळीची उपपर्णे व वेड्या बाभळीची पर्णाक्षे जाड व तीक्ष्ण काट्यासारखी असतात. घायपाताच्या जाड पानांची टोके काटेरी असल्याने ती पाने खंजिराप्रमाणे उपयुक्त असतात. तसेच या पानांची टोके व कडा काटेरी असून कडावरचे काटे लहान असताना टोकाकडे वळलेले असतात आणि जसजशी पानांची वाढ होते तसतसे ते काटे अधिक आडवे होत जाऊन शेवटी जमिनीकडे वळतात. यामुळे कोणत्याही अवस्थेत ते काटे संरक्षक ठरतात, कारण जनावरांना ती पाने खाताच येत नाहीत. बोर व तत्सम वनस्पतींचे काटे वक्र असतात.
शल्य हे शूलाप्रमाणेच कठीण, टोकदार, परंतु सामान्यतः वाकडे असते व ते सालीपासून निघते. खोड, फांद्या व पाने इत्यादींवर इतस्ततः ती विखुरलेली असतात. गुलाब, लाल सावर, पांगारा, शमी इ. वनस्पतींवर शल्ये आढळतात. वेत, चिनाई, सालीट यांसारख्या मोठ्या आरोही झुडपांवर असंख्य शल्ये व कंटक असून यांच्या जाळ्यात गुरफटलेला प्राणी सहजपणे निसटू शकत नाही. वांगे व काटे रिंगणी यांच्या पानांच्या शिरावर शल्ये असतात. त्यामुळे तीही खाण्यास गैरसोयीची असतात.
रोम हे आखूड, दृढ व सुईसारखे असून सामान्यतः त्यांचे झुबके येतात बहुधा ते वाकडे नसतात. सिलिका व कॅल्शियम कार्बोनेट यांचा बराच अंश त्यांच्या कोशिकावरणात असतो. नागफणा व निवडुंगाच्या इतर जातींत ते आढळतात त्यामुळे तसेच कंटकांमुळे या मांसल जातींचे प्राण्यांपासून संरक्षण होते.
आग्या, खाजकुइली, खाजोटी वगैरे वनस्पतींच्या पाना-फळांवर व खोड, फांद्या वगैरे भागांवर दाहक केस हे इतस्ततः उगवलेले असतात. या प्रत्येक केसाच्या टोकास सिलिकायुक्त ठिसूळ आवरण असून प्राण्यांच्या सहज लागलेल्या स्पर्शानेही ते मोडते व उरलेल्या केसाचे टोक त्याच्या कातडीत घुसून बारीक जखम होते. या स्पर्शामुळेच केसाच्या फुगीर तळभागात साठविलेला व थोड्या दाबाखाली असलेला दाहक विषारी अम्लांश जखमेत शिरून खाज ( कंडू ) उत्पन्न करतो. यामुळे प्राणी अशा वनस्पतींना ( बहुधा पूर्वानुभवाने ) टाळतात.
कित्येक वनस्पतींत पाने, फांद्या, फुलांचे भाग व फळावर चिकट द्रव स्रवणारे सप्रपिंड ( ग्रंथियुक्त ) केस येतात. असे भाग प्राण्यांनी खाल्ल्यास ते तोंडास चिकटल्याने गिळण्यास फार त्रास पडतो व त्यामुळे प्राणी या वनस्पती खात नाहीत. चित्रक, पुनर्नवा, तंबाखू व पिवळी तिळवण ही उदाहरणे यांपैकी आहेत.
इतर दृढ केसांचे किंवा लवीचे वनस्पतींवरील दाट आच्छादन प्राण्यांना प्रतिकार करते. कारण अशा वनस्पती त्यांनी खाल्ल्यास केसांचा लगदा घशाला चिकटून राहतो व तेथे अडकून घसा तात्पुरता बंद होतो उदा., आघाडा, समुद्रशोक, नॅफॅलियम ( पंजाबी नाव—बालरक्षा ). संरक्षणाच्या इतर साधनांत विषे, चीक, कडूपणा, उग्र वास इत्यादींचा समावेश होतो. कित्येक वनस्पतींमध्ये विषारी पदार्थ किंवा क्षोभ उत्पन्न करणारे पदार्थ असल्याने ते जाणणारे ( वास अथवा पूर्वानुभवाने ) प्राणी अशा वनस्पतींना तोंड लावत नाहीत. कित्येक वनस्पतींत पांढरट, पिवळट किंवा पाण्या-सारखा चीक ( क्षीर ) आढळतो यात अनेकदा विषारी किंवा टाकाऊ पदार्थ असतात व ते पोटात गेले असता खाणार्यास फारच त्रास होतो [⟶ वनस्पति, विषारी ]. स्पर्श झाल्याने फोड येणे, आग होणे व खाल्ल्यास वांत्या, जुलाब होणे इ. लक्षणे विषबाधा झाल्याचा प्रत्यक्ष पुरावा असतो अशा वनस्पतींना ( उदा., गेवा, रुई, थोर आणि पिवळी, पांढरी व लाल कण्हेरी इ. ) चिकामुळे संरक्षण मिळते. कडवटपणा व उग्र वास यांमुळे प्राणी कित्येक वनस्पतींना टाळतात. सुरणाच्या फुलोर्याचा वास किळसवाणा व कुजट असल्याने त्याचा खाद्यासारखा उपयोग करीत नाहीत मात्र, काही माश्या परागसिंचनाकरिता या वासामुळेच येतात. हरणवेल, तुळस, पुदिना, पाच, फांगळा व भामुर्डी यांचा वासही प्राण्यांना आवडत नसावा, कारण प्राणी या वनस्पती खात नाहीत. कारले, कडू इंद्रायण व किरात यांच्या कडूपणामुळे प्राणी या वनस्पतींना टाळतात. पाने, फुले, फळे वगैरे भागांत विषारी अल्कलॉइड असल्याने कुचला, अफू, तंबाखू , बेलाडोना व धोतरा या वनस्पती प्राण्यांपासून बचावल्या आहेत. अल्कलॉइडाचा थोडाही अंश मृत्यूस कारणीभूत होतो. स्ट्रिनीन, मॉर्फीन, निकोटीन, दतुरीन व ॲट्रोपीन यांसारखी अनेक संरक्षक अल्कलॉइडे भिन्न वनस्पतींत असतात. अळू , सुरण यांच्या कंदात आणि पानांत सुईसारखे टोकदार व तीक्ष्ण कॅल्शियम ऑझॅलेटाचे स्फटिक असल्याने या वनस्पती खाल्ल्यास जीभ व घशाची आग होते, म्हणून जनावरे त्यांना टाळतात. त्याचप्रमाणे इतर अनेक पदार्थांमुळेही वनस्पतींचे संरक्षण होते यात टॅनीन, रेझीन ( राळ ), बाष्पनशील तेले ( वाफेच्या रूपात उडून जाणारी ), रेती ( सिलिका ) इत्यादींचा समावेश होतो. रोगोत्पादक, जीवोत्पादक कवक वनस्पती किंवा कुरतडून खाणारे लहान कीटक, कडक उन्हाचा ताप, कडक थंडी, दहीवर, बर्फाचा स्राव इ. हानिकारकापासून वनस्पतींना स्वतःचे संरक्षण करण्यास खोडावरची जाड साल, कळ्यांवरची खवले व पानांवर जाड उपत्वचा ( यूटिकल ) किंवा मेणाचा थर इ. आवरणे असतात. अनेकदा काही वनस्पतींची पाने, देठ, छदे इ. इंद्रिये इतर काही भीतिदायक प्राण्यांच्या रंग, आकार इ. स्वरूपाची नक्कल करून चरणार्या प्राण्यांपासून स्वसरंक्षण साधतात. कॅलॅडियमच्या (ॲरॉइडी च्या ) काही जाती ठिपकेदार सापासारख्या दिसतात सॅन्सेव्हेरियाच्या ( नागीन ) जातीतील पानांवर असेच ठिपके किंवा रेषा असतात व शाकाहारी प्राणी त्यांना साप समजून दूर राहतात. सापकांदा व सुरणाच्या कुलातील एका जातीचा फुलोरा दुरून नागाच्या फडीसारखा दिसतो व त्यामुळे स्वसरंक्षण साधले जाते. ही अशी अनुकरणाची उदाहरणे प्राणिसृष्टीतही त्याच उद्देशाने उत्क्रांत झालेली आढळतात.
वर विवेचन केलेल्या स्वसंरक्षणाच्या काही योजना परिस्थितीच्या प्रत्यक्ष परिणामामुळे झालेल्या वनस्पतींच्या प्रतिक्रिया असून जीवनार्थ संघर्षात त्या उपयुक्त ठरल्यामुळे आज त्या वनस्पती आपले अस्तित्व टिकवून राहिल्या आहेत. काही योजना प्रथम परिवर्तन रूपातच आल्या असणे शय आहे.
पहा : अनुकृति कीटक परिस्थितिविज्ञान महालता मायावरण मुंगी.
जमदाडे, ज. वि.
“