स्वर्ग व नरक : स्वर्ग व नरक हे दोन ध्रुव आहेत. स्वर्ग हा पुण्य-वंतांना प्राप्त होणारा आनंदमय लोक, तर नरक म्हणजे पाप्यांना मिळणारा दुःखमय लोक. स्वर्ग हा ऊर्ध्वलोक म्हणजे पृथ्वीच्या वर असलेला आहे, तर नरक हा अधोलोक म्हणजे पृथ्वीच्या खाली आहे. काही धार्मिक परंपरांमध्ये स्वर्ग हे देवांचे वा देवाचे वसतिस्थान असून नरक हे दुष्ट शक्तींचे निवासस्थान असल्याचे मानले आहे. स्वर्ग हा आनंदमय असल्यामुळे प्रकाश हे त्याचे प्रतीक असून त्याच्या उलट स्वरूप असलेल्या नरकाचे काळोख हे प्रतीक आहे. स्वर्ग व नरक या मृत्यूनंतर प्राप्त होणाऱ्या अवस्था आहेत.
वेदांमध्ये स्वर्गलोकाची कल्पना आढळते. स्वर्ग हे देवांचे निवासस्थान असून तेथे केवळ आनंदच आहे. ऋग्वेदात सोमाला उद्देशून म्हटले आहे, की भ्रमणशील सूर्य आणि तेजोमयी लोकांच्या स्वर्गलोकी तू मला अमर बनव (९.११३.९). यजुर्वेदात यज्ञधर्माचे विस्ताराने प्रतिपादन केले असून यज्ञानंतर प्राप्त होणाऱ्या स्वर्गाचा उल्लेख वारंवार आलेला आहे. अथर्ववेदातील स्वर्गकल्पना लौकिक स्वरूपाची आहे. स्वर्गात खूप सुखोपभोग मिळतात दुधातुपाचे आणि सुरेचे प्रवाह तेथे वाहत आहेत, असे म्हटले आहे (४.३४.२,६). अथर्ववेदात असेही म्हटले आहे, की आपल्या मृत कुटुंबीयांची गाठ स्वर्गात पडते (६.१२०.३). स्वर्गात वार्धय नाही भय नाही. इहलोकातील आनंदापेक्षा स्वर्गलोकीचा आनंद शतपटीने श्रेष्ठ आहे, असे उपनिषदे सांगतात. स्वर्ग हे एखादे मूर्त द्रव्य नाही किंवा स्थानही नाही. ती आनंदावस्था आहे, असे ⇨ शबरस्वामींनी आपल्या मीमांसासूत्रावरील भाष्यात स्पष्टपणे म्हटले आहे. स्वेच्छेने प्रयत्न केला असता स्वर्गसुख प्राप्त होते, असे विष्णुपुराणात म्हटले आहे.
यज्ञयाग, तपश्चर्या करणारे, रणांगणावर मृत्यू आलेले, लोकोपयोगी कृत्ये आणि दानधर्म करणारे यांना स्वर्ग प्राप्त होतो, असे उपनिषदांत तसेच महाभारतादी ग्रंथांत म्हटले आहे. पुनर्जन्माचा सिद्धांत प्रस्थापित झाल्यानंतर मात्र सुखाचा क्षय होताच मनुष्य मर्त्यलोकात पुन्हा जन्म घेतो, असे मानले जाऊ लागले.
नरकाचा स्पष्ट उल्लेख ऋग्वेदात आढळत नाही परंतु अशा स्थानाची काही कल्पना ऋग्वेदात आढळते (४.५.५). अथर्ववेदातही अशा स्थानाची कल्पना आहे. धर्मसूत्रे, स्मृती, पुराणे, निबंधग्रंथ यांत स्वर्गनरकाच्या कल्पना विस्ताराने मांडण्यात आल्या आहेत. जे लोक पापाचरण करतात, ते केल्याबद्दल ज्यांना पश्चात्ताप होत नाही, जे पापाचे प्रायश्चित्त घेत नाहीत, ते भयंकर आणि दुःखकारक अशा नरकात जातात, असे स्मृति-ग्रंथांत म्हटले आहे. पापाचरणी लोक नरकयातना भोगल्यानंतर वनस्पती, कृमिकीटक, पशुपक्षी, जलचर, मांसभक्षक वन्य पशू यांच्या जन्माला जातात. कोणते पाप केले असता, कोणत्या नरकयातना भोगाव्या लागतात, हे पुराणांत तपशीलवार सांगितले आहे. नरकांचे अनेक प्रकार असून त्यांची संख्या किती, याबाबत वेगवेगळे निर्देश केलेले आहेत. मनूने मनुस्मृतीत एकवीस प्रकारचे नरक सांगितले आहेत.
याज्ञवल्यानेही नरकांची संख्या एकवीसच सांगितली आहे. शंकरा-चार्यांच्या वेदान्तसूत्रात सात प्रकारचे नरक असल्याचा निर्देश आहे.पापी मनुष्य मेल्यानंतर नरकयातना भोगण्यासाठी त्याला एक नवा देह मिळतो, असे मनुस्मृतीत म्हटले आहे. सूर्यपुत्र यम हा विविध नरकांचा अधिपती. मरण पावलेल्या लोकांना त्याच्यापुढे आणले जाते. ज्याचे जसे पाप असेल, तशी त्याला शिक्षा दिली जाते. या शिक्षा भयंकर असतात. पापी माणसाला आगीत फेकणे, स्वतःच्या मांसाचे लचके खायला लावणे, कडेलोट करणे अशा अनेक शिक्षांची वर्णने भागवतपुराणात आहेत. शिक्षा भोगून झाल्यावर तो मुक्त होतो. त्याच्या पदरी काही थोडे पुण्य असल्यास ते भोगण्यासाठी तो स्वर्गात जातो. तेथून आल्यानंतर त्याच्या पूर्वकर्मांनुसार त्याला जन्म मिळतो. तो माणसाचा किंवा तिर्यग्योनीतलाही असू शकतो. नरकयातना भोगण्याचा काल ज्याच्यात्याच्या पातकांनुसार एक कल्प, एक मन्वंतर, चार युगे असा असू शकतो.
जे खोटे बोलतात, दुसऱ्याच्या द्रव्याचा अपहार करतात, त्याचप्रमाणे प्राण्यांची हिंसा, वेदांचा विक्रय वा निंदा, आश्रमबाह्य-श्रुतिबाह्य वर्तन, श्रीमंत असूनही दानधर्म न करणे, लहान मुले-वृद्ध-सेवक यांना अन्न न देता ते स्वतःच भक्षण करणे यांसारखी पापकर्मे करणारे नरकयातना भोगतात, असे पद्मपुराणात म्हटले आहे. प्रजेच्या संरक्षणाची जबाबदारी न घेणारे राजेही पापकर्मीच होत.
काशीकर, चिं. ग.
अन्य काही धर्मांतील स्वर्ग व नरक विषयक कल्पनांचा परामर्श खाली घेतला आहे.
ज्यू धर्म : स्वर्ग म्हणजे सत्प्रवृत्त माणसे आणि ईश्वर यांच्यातील आदर्श नाते, अशी ज्यू धर्माची धारणा इ. स. पू. पाचव्या शतकानंतर प्रस्थापित झाली होती तथापि इ. स. पू. दुसऱ्या शतकाच्या सुमारास मृतांचे पुनरुत्थान आणि अंतिम निवाडा या कल्पना काही ज्यू धर्मीय वर्तुळांत प्रसृत झालेल्या होत्या. ईश्वराशी ज्यांचे जिवंत नाते जडलेले आहे, अशी सत्प्रवृत्तांना लाभणारी अंतिम स्थिती म्हणजे ‘ स्वर्ग ’ असे मानले गेले. ज्यूंच्या काही साहित्यात आठ किंवा दहा स्वर्गांचा निर्देश आढळतो. स्वर्गाबरोबरच गेहेन्ना (Gehenna) — जिथे वाईट कृत्यांची शिक्षा दिली जाते — ही कल्पनाही विकसित झाली. येथे शिक्षा भोगण्या-साठी येणाऱ्यांच्या शिक्षेचा काळ, त्यांची अपकृत्ये किती गंभीर स्वरूपाची आहेत यावर अवलंबून असतो. पारंपरिक ज्यू धर्मात माणसाची अंतिम स्थिती तीन तत्त्वांच्या दृष्टिकोणातून पाहिली जाते. एक, भरपाईचे तत्त्व. सद्गुणाला त्याचे पारितोषिक मिळाले पाहिजे तसेच दुष्टपणाला शिक्षाही व्हायला हवी. ज्यू धर्मपरंपरा असे मानते, की इहलोकीच्या जीवनात एखाद्याला न्यायाचा अनुभव आला नाही, तरी नंतर तो येईल न्याय मिळेल भरपाई होईल. दुसरे तत्त्व अमरत्वाचे. ते बरेच व्यापक आहे. मरणरहित अवस्थेत, माणसाची व्यक्तिगत ओळख आणि जाणीव हरवत नाही, ही अमरत्वाकडे पाहण्याची एक दृष्टी आहे तर या अवस्थेत व्यक्तिगत ओळख आणि जाणीव राहत नाही, अशीही एक दृष्टी आहे. तिसरे तत्त्व ⇨ पुनरुत्थानाचे. पुनरुत्थान या घटनेत मृत शरीर पुन्हा सचेतन होते आणि त्यानंतर त्या माणसाचा अंतिम निवाडाही होतो, असे मानले जाते. त्याचप्रमाणे पुनरुत्थानात मृत व्यक्तीची शारीरिकता विशुद्ध आध्यात्मिकतेत रूपांतरित होते, असेही मानले जाते. [⟶ ज्यू धर्म ].
ख्रिस्ती धर्म : ख्रिस्ती धर्मात स्वर्ग हे आनंदनिधान आहे. येथे ईश्वराशी नाते जुळते पण एवढेच नाही, स्वर्ग हे ईश्वराचे निवासस्थानही आहे. पृथ्वीवर जन्म घेऊन तेथे जगण्यापूर्वी येशू ख्रिस्त स्वर्गात राहत होता आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याचे पुनरुत्थान होऊन तो पुन्हा स्वर्गात आला, असे मानले जाते. याचा असाही अर्थ होऊ शकतो, की देव माणसाचेही मरणानंतर पुनरुत्थान घडवून आणू शकतो. मृत्यूनंतर माणसाचे अनन्य-साधारण असे संपूर्ण व्यक्तिमत्त्व जपले जाते. नरक हा सैतानाच्या आणि त्याच्या सहचरांच्या आधिपत्याखाली असून पापी लोक येथे येतात, ही ख्रिस्ती समजूत बायबलच्या ‘नव्या करारा’त प्रकट झालेली आहे. ही समजूत अनेक ख्रिश्चनांनी अक्षरशः स्वीकारलेली असली, तरी पर्यायी समजुतीही कधी कधी व्यक्त केलेल्या दिसतात.
रोमन कॅथलिक पंथाच्या श्रद्धेनुसार नरक ही कधीच न संपणाऱ्या शिक्षेची अवस्था आहे. केलेल्या पापांबद्दल ज्यांना पश्चात्ताप झालेला नसतो आणि म्हणून जे ईश्वराचा कृपाप्रसाद न मिळताच मरण पावतात, त्यांना ही अवस्था प्राप्त होते आणि यातनामय शिक्षा भोगाव्या लागतात. रोमन कॅथलिक पंथात ‘ पर्गेटरी ’ची संकल्पना आहे. ‘ पर्गेटरी ’ ही पश्चात्तापाची, उपरतीची अवस्था आहे. या अवस्थेत मर्त्यलोकात केलेल्या पापांबद्दल शिक्षा भोगून आपला पश्चात्ताप व्यक्त करण्याची संधी मृत माणसाला मिळते आणि अखेरीस त्याला ईश्वराचे सान्निध्य प्राप्त होते.
नरकाचे अत्यंत वेधक चित्रण इटालियन महाकवी ⇨ दान्ते याच्या ⇨ दिव्हीना कोम्मेदीआ ( इं. शी. ‘ डिव्हाइन कॉमेडी ’ ) या महाकाव्याच्या ‘ इन्फेर्नो ’ ( नरक ) या भागात केलेले आढळते.
ख्रिस्ती प्रॉटेस्टंट पंथीयांनी पारंपरिक ख्रिस्ती शिकवणीत सांगितलेल्या स्वर्ग व नरक या कल्पनांचा आदर केलेला असला, तरी आधुनिक जगात विज्ञानाची झालेली प्रगती, उदयाला आलेली सामाजिक शास्त्रे, मानसशास्त्रीय विचार आणि त्यांतून जगाकडे पाहण्याची मिळालेली नवी दृष्टी यांच्या प्रभावातून काही प्रॉटेस्टंट विचारवंतांना असे वाटते, की स्वर्ग व नरक या कल्पना स्वीकारण्यासारख्या नाहीत. परमेश्वर हादयाळू , क्षमाशील, प्रेममय आणि सर्वांचा तारणहार आहे, असे एकीकडे म्हणावयाचे आणि दुसरीकडे चिरंतन यातनादायक अशा नरकाची कल्पना स्वीकारायची, ही विसंगती आहे. [⟶ ख्रिस्ती धर्म ].
इस्लाम : कुराणा त आणि इस्लामी परंपरांमध्ये स्वर्गाची आणि नरकाची अनेक वर्णने आहेत. ⇨ निवाड्याचा दिवस येईल तेव्हा मृतात्मे आपापल्या कबरीतून बाहेर येऊन ईश्वरासमोर त्यांच्या पापपुण्याच्या हिशोबासह उभे राहतील. कृतींचा बरेवाईटपणा ध्यानी घेऊन ईश्वर त्यांचा निवाडा करील. या निवाड्यानंतर स्वर्गात कोणाला प्रवेश मिळणार हे ठरेल. जे अल्लावर विश्वास ठेवतात, ते स्वर्गात जातील आणि जे काफर असतील, त्यांची नरकात रवानगी होईल. प्रत्येक व्यक्तीला अल्-आरफ या नावाच्या एका पुलावरून जावे लागेल. जो खराखुरा मुसलमान असेल, तो हा पूल यशस्वी रीत्या पार करील परंतु जे काफर असतील ते पुलावरून पडून नरकाच्या खड्ड्यात कोसळतील तथापि अल्लाच्या इच्छेनुसार पुलावरून खाली पडणाऱ्या काहींना मुहंमद पैगंबर खड्ड्यातून वर काढतील. कुराणातून आणि इस्लामी परंपरांतून स्वर्गाची वेधक वर्णने समोर येतात.या वर्णनांतून स्वर्गातल्या ऐहिक सुखांबद्दलही सांगितले आहे. स्वर्गात प्रवेश मिळालेल्यांसाठी ईडनच्या उद्यानाचे दरवाजे खुले असतात. मुबलक फळे आणि मधुर पेयांचा आस्वाद त्यांना घेता येतो. स्वर्गात सुंदर स्त्रियाही असतात. ⇨ अल् गझालीसारख्या (१०५८—११११) श्रेष्ठ इस्लामी तत्त्ववेत्त्याने स्वर्गातील अस्तित्वात अनुस्यूत असलेल्या आध्यात्मिकतेकडे लक्ष वेधले आहे. स्वर्गात कितीही सुखे असली तरी, अल्लाच्या निकट असण्याच्या अत्युत्कट आनंदाची जाणीव स्वर्गात असणाऱ्यांना असतेच. नरक हा अर्थातच यातनामय असतो. [⟶ इस्लाम धर्म ].
पहा : पाप-पुण्य पुनर्जन्म.
कुलकर्णी, अ. र.
“