आ.स्वयंघूर्णी : (ऑटोगायरो). हे एक प्रकारचे फिरत्या पात्याचे (पंखाचे) हवाई वाहन (विमान) आहे. यातील फिरत्या पात्यामुळे (घूर्णकामुळे) याचे उत्थान (वर उचलले जाण्याची) क्रिया घडते आणि जिनाद्वारे चालविल्या जाणाऱ्या परिचालकामुळे हे हवेतून पुढे ओढले जाते.

उड्डाणात गती मंद करता येईल व उदग्र (उभ्या) दिशेत अवतरण करता येईल अशा विमानासाठी अनेक तंत्रज्ञ संशोधन करीत होते. त्यासाठी त्यांनी अशा विमानाचे अनेक मूळ नमुने बनविले होते परंतु उड्डाणामध्ये त्यांचे नियंत्रण करणे हे अवघड काम होते. स्पॅनिश अभियंते क्वान द ला थ्येर्वा यांनी याविषयीचे संशोधन १९१९ — २४ या काळात केले. तुंब्याला पाती कशी जोडावीत हे त्यांनी शोधून काढले. ही पाती बिजागरीसारखी बसविली होती. त्यामुळे वायुगतिकीय व केंद्रोत्सारी (केंद्रापासून दूर लोटणाऱ्या) प्रेरणांना व्यवच्छेदक रीतीने प्रतिसाद मिळणे शय झाले. म्हणजे वाहन स्थिर झाल्यास ही पाती खाली पडतात आणि वाहन चालू असताना ही पाती केंद्रोत्सारी प्रेरणेमुळे वर उचलली जातात. उत्थानासाठी स्वयंघूर्णीला जमिनीवर ( उदा. धावपट्टीवर ) काही अंतर जाणे गरजेचे असते. तसेच त्याचा घूर्णक फिरता राहण्यासाठी त्याला अग्रगामी हवाई गती मिळणे गरजेचे असते. अशा रीतीने उत्थानासाठी जमीन सोडण्याआधी घूर्णकाला किमान विशिष्ट गती आणि वाहन पुढे जाण्यास त्याच्या पंखाला किमान विवक्षित गती प्राप्त होणे गरजेचे असते.

आ. २. ब्रिटनमध्ये तयार करण्यात आलेली लहान स्वयंघूर्णी (१९३५).

याउलट एंजिनाद्वारे चालणारा घूर्णक ( पात्यांचा संच ) माथ्यावर असलेले हेलिकॉप्टर उदग्र दिशेत उत्थान व अवतरणही करू शकते. शिवाय घूर्णक प्रतल थोडे तिरपे करून अग्रगामी गती मिळविली जाते व उत्थान प्रेरणेचा अग्रगामी घटक हेलिकॉप्टर पुढे नेण्यास साहाय्यभूत होतो. तसेच स्वयंघूर्णी हेलिकॉप्टरप्रमाणे हवेत तरंगत राहू शकत नाही. यामुळे स्वयंघूर्णीला उत्थान व अवतरण यांसाठी धावपट्टीची आवश्यकता असते. अशा रीतीने स्वयंघूर्णीपेक्षा कार्यक्षम व सोयीस्कर असलेल्या हेलिकॉप्टरच्या तुलनेत स्वयंघूर्णी मागे पडते. अर्थात स्वयंघूर्णीचा वापर पूर्णपणे थांबलेला नाही व त्याच्या सुधारित आवृत्त्याही पुढे आल्या आहेत.

थ्येर्वा यांनी आपल्या स्वयंघूर्णीची पहिली प्रतिकृती १९२८ मध्ये प्रदर्शित केली व त्याच वर्षी तिची माद्रिद (स्पेन) येथे चाचणीही घेतली. ‘ ऑटोगायरो ’ हा शब्द त्यांनी तयार केला असून त्यांच्या थ्येर्वा ऑटोगायरो कंपनीचे व्यापारी चिन्ह ऑटोगायरो हेच होते.

गायरो ग्लायडर (घूर्णी ग्लायडर) हे वाहन चालविण्यास शक्तीचा उपयोग होत नाही. ओढून किंवा ताणून धरणाऱ्या यंत्रणेतून मुक्त झाल्यावर ते घूर्णी पंखांवर मुक्तपणे विसर्पण ग्लायडिंग करू शकेल. अशा प्रकारे त्याचा अभिकल्प (आराखडा) तयार केलेला असतो [ ग्लायडर व ग्लायडिंग].

पहा : वाततल्पयान वातयान विमान हेलिकॉप्टर.

ठाकूर, अ. ना.