स्यूडोमोनेडेसी : हे सूक्ष्मजंतूंच्या स्यूडोमोनेडेली गणातील व स्यूडोमोनेडिनी उपगणामधील एक कुल आहे. या कुलातील सूक्ष्मजंतू ग्रॅम-रंजक-अव्यक्त असून बीजाणुजनक नसतात. त्यांच्या कोशिका शलाकाकार ( काडीसारख्या ) ते लंबगोलाकार असून बहुतांशी चल असतात. त्यांचा व्यास सु. १ म्यूमी. आणि लांबी अनेक म्यूमी. असते (१ म्यूमी. = १०–६ मी.). कशाभिका ( कोशिकेबाहेर आलेल्या जीवद्रव्याचा केसासारखा धागा ) कोशिकांच्या टोकांवर एक किंवा अनेक, लहान वा मोठ्या झुबक्यांत आढळतात. ते बहुतांशी सानिल ( हवेच्या सान्निध्यात जगणारे ) असले, तरी त्यातील काही जाती अननिल ( हवेच्या अभावी जगणारे ) आहेत. त्यांच्यामध्ये प्रकाशसंश्लेषी रंगद्रव्य नसले, तरी पायोसायनीन व फ्ल्यूओरेसीन ही रंगद्रव्ये सामान्यपणे आढळतात. काही जाती प्रकाशजनक आहेत. सामान्यपणे त्या मृदेत अथवा पाण्यात असतात.
महत्त्वाच्या प्रजाती व जाती : (१) स्यूडोमोनस : या प्रजातीतील सूक्ष्मजंतू मृदा व पाण्यात असतात, त्यामुळे ते सर्वत्र आढळतात. काही जाती सेल्युलोजाचे विघटन करतात, तर काही मानव, प्राणी व वनस्पती यांना रोगकारक आहेत. तसेच काही जाती उद्योगधंद्यांतही उपद्रवी आहेत. काही जातींमध्ये रंगद्रव्य निळसर हिरवे अथवा बदामी रंगाचे आढळते. बहुधा ते सानिल असतात, परंतु काही अननिल आहेत.
(अ) स्यू. एरुजिनोझा : ही एक प्रमुख जाती असून तिच्यामुळे जखमेत पू होतो. तसेच बालकांमध्ये हगवण लागते व कोंबड्यांनाही रोग होतो. पॉलिमिक्सी बी व ई यांशिवाय हे सूक्ष्मजंतू इतर प्रतिजैविकांस प्रतिकारक आहेत.
(आ) स्यू. फ्ल्युओरेसेन्स : ह्या सूक्ष्मजंतूंमध्ये हिरवट पिवळे रंगद्रव्य आढळते.
(इ) स्यू. टाबासाय : तंबाखूवरील रोगकारक जाती.
(ई) स्यू. मँजिफेरी : या जातीमुळे आंब्यावर रोग पडतो.
(२) झँथोमोनस : या प्रजातीतील बहुतेक जाती वनस्पतींना रोगकारक आहेत. यांमध्ये पिवळे रंगद्रव्य आढळते व ते पाण्यात विरघळत नाही. या सूक्ष्मजंतूंच्या कोशिकेच्या टोकावर एकच कशाभिका असते.
(अ) झँ. सिट्री : या जातीमुळे कागदी लिंबावर खैरा रोग पडतो.
(आ) झँ. ओरिझी : ही जाती भात पिकासाठी रोगकारक आहे.
(इ) झँ. माल्व्हेसिॲरम : ही जाती कपाशीवरील रोगाला जबाबदार आहे.
(३) ॲसिटोबॅक्टर : या प्रजातीतील सूक्ष्मजंतू एथेनॉलपासून व्हिनेगर व ॲसिटिक अम्लाची निर्मिती करतात.
(४) एरोमोनस : या प्रजातीतील सूक्ष्मजंतू मासे व पाण्यातील इतर प्राण्यांना रोगकारक आहेत.
(५) फोटोबॅक्टिरियम : या प्रजातीतील सूक्ष्मजंतू प्रकाशमान असल्यामुळे अंधारात चमकतात आणि मृत मासे व समुद्रातील प्राण्यांवर वस्ती करतात.
(६) ॲसिटोमोनस : या प्रजातीतील सूक्ष्मजंतू मृदेमध्ये हवेतील नायट्रोजन वायूचे स्थिरीकरण करतात.
(७) झायमोमोनस : या प्रजातीतील सूक्ष्मजंतूमुळे त्वरित साखरेचे किण्वन होऊन १०% अल्कोहॉल बनते त्यामुळे बिअर व पल्कसारखी अल्कोहॉलयुक्त पेय निर्मितीमध्ये त्यांचा उपयोग करतात.
झूग्लोइया व हॅलोबॅक्टिरियम या प्रजाती कमी महत्त्वाच्या आहेत. झूग्लोइया प्रजातीतील सूक्ष्मजंतू वाहितमल व औद्योगिक सांडपाणी यांचे ऑक्सिडीकरण करतात. हॅलोबॅक्टिरियम या प्रजातीतील सूक्ष्मजंतू खार्या पाण्यात किंवा खारे मासे व कातडीवर राहून कॅरोटिनॉइड रंग-द्रव्याच्या शेंदरी ते लालसर रंगछटा निर्माण करतात.
पहा : ॲसिटोबॅक्टर सूक्ष्मजंतूंचे वर्गीकरण.
संदर्भ : 1. Burrows, N. Textbook of Microbiology, London, 1965.
3. Salle, A. J. Fundamental Principles of Bacteriology, Tokyo, 1961.
कुलकर्णी, नी. बा.
“