स्मोलेन्स्क : रशियाच्या पश्चिम भागातील ( यूरोपीय रशियातील ) स्मोलेन्स्क प्रांताचे प्रशासकीय ठिकाण व देशातील महत्त्वाचे ऐति-हासिक, व्यापारी, शैक्षणिक, सांस्कृतिक केंद्र. लोकसंख्या ३,२६,८६१ (२०१० अंदाजे ). हे मॉस्कोच्या पश्चिमेस ४१८ किमी. वर, नीपर नदीच्या दोन्ही काठांवर वसलेले असून ते नदीबंदर व रेल्वे प्रस्थानक म्हणूनही प्रसिद्ध आहे.

या शहराच्या परिसरात पाइन वृक्षांपासून मोठ्या प्रमाणात राळ उत्पादन घेतले जात होते. रशियन भाषेतील स्मोला ( रेझीन-राळ ) या शब्दावरून या शहरास स्मोलेन्स्क हे नाव देण्यात आले. या शहराचा पहिला उल्लेख इ. स. ८६३ मधील आढळतो. त्या काळात या प्रदेशातून नीपर व पश्चिम द्वीना या नद्यांमार्गे बाल्टिक समुद्रातून यूरोपशी व्यापार चालत असे.त्या व्यापारमार्गावर हे शहर असल्याने त्याला व्यापारी व ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले होते. नवव्या शतकात हे क्रीव्हीची जमातीच्या राजधानीचे ठिकाण होते व अनेक वसाहतकार आणि व्यापार्‍यांच्या येथे वसाहती होत्या. त्यानंतर हे शहर कीव्ह राज्याच्या ताब्यात गेले. अकराव्या शतकात याचे महत्त्व थोडे कमी झाले होते परंतु बाराव्या शतकात व्यापारवाढीमुळे याचे महत्त्व पुन्हा वाढले. ते बेलोरशियन राज्याचे मुख्यालय बनले. [⟶ बेलोरशिया ]. इ. स. १२३७—४० या काळात हे शहर मंगोलांनी ( तार्तर लोकांनी ) घेतले होते. त्यानंतर ते लिथ्युएनियाच्या ताब्यात गेले. पुढे सु. ४०० वर्षे हे शहर लिथ्युएनिया, पोलंड व रशिया यांच्यातील संघर्षाचे प्रमुख कारण बनले होते. १३४० मध्ये याचा ताबा मॉस्कोकडे ( रशिया ), तर १४०८ मध्ये पुन्हा लिथ्युएनियाकडे आला. १५१४ मध्ये रशिया, तर १६११ मध्ये पोलंड व १६५४ मध्ये पुन्हा रशियाने हे ताब्यात घेतले. १६६७ च्या करारानुसार ते रशियाकडेच राहिले. एकूणच मॉस्को ते वॉर्सा तसेच सागरमार्गे यूरोपच्या व्यापारी मार्गा-वरील याच्या स्थानामुळे त्याला इतिहासकाळात कधी शांतता लाभली नाही. १८१२ मध्ये पहिल्या नेपोलियनने रशियावर केलेल्या आक्रमणाच्या वेळी स्मोलेन्स्क शहराचे अतोनात नुकसान झाले होते. या संघर्षात नेपोलियनने हे शहर जाळले होते. त्यानंतर रशियाच्या कडव्या विरोधामुळे नेपोलियनला रशियातून काढता पाय घ्यावा लागला. [⟶ रशिया ]. जुलै ते सप्टेंबर १९४१ व १९४३ या दुसर्‍या महायुद्धाच्या काळात स्मोलेन्स्क शहरात व बाजूच्या प्रदेशात मोठी लढाई झाली व हे शहर जर्मनीच्या ताब्यात गेले होते परंतु जर्मनीच्या पराभवानंतर हे शहर पुन्हा रशियाच्या ताब्यात आले (१९४३).

देशातील ताग प्रक्रियेचे व गोणपाट निर्मितीचे हे प्रमुख केंद्र आहे. यांशिवाय अभियांत्रिकी (विशेषतः कापडनिर्मितीची यंत्रे बनविणे ) तसेच कापड, विद्युत् साहित्य, फर्निचर, गोणपाट इ. निर्मितिउद्योग येथे विकसित झाले आहेत. तसेच प्रदेशातील शेतमाल आणि अन्य उत्पादनांचे निर्यात केंद्र म्हणूनही हे महत्त्वाचे आहे. शहरात अनेक जुन्या ऐतिहासिक वास्तू जतन करून ठेवण्यात आल्या असून, त्यांपैकी सेंट पीटर व सेंट पॉल ही बाराव्या शतकातील चर्च, सतराव्या व अठराव्या शतकांतील ॲझम्पशन कॅथीड्रल, जुन्या शहराभोवतीची तटबंदी (१५९६—१६०२), शहरातील क्रेमलीन राजवाडा इ. वास्तू व अवशेष तसेच नेपोलियनच्या युद्धासंबंधीची व रशियन संगीतकार एम्. आय्. ग्लींका यांची स्मारके विशेष आहेत. शहरातील वैद्यकीय, पशुवैद्यकीय, शिक्षक प्रशिक्षण व शारीरिक शिक्षण-विषयक संस्था तसेच अनेक बागा, कलावीथी इ. प्रसिद्ध आहेत.

चौंडे, मा. ल.