स्मृति व विस्मृति : व्यक्तीला जीवनात आलेले अनुभव, मिळालेली माहिती, ज्ञान यांसारख्या गोष्टी मनात साठवून ठेवण्याची आणि भविष्यात त्या आठवून (त्यांना बाहेर काढून) जाणिवेच्या अवस्थेत त्यांचा पुन्हा अनुभव घेण्याची वा वापर करण्याची क्षमता म्हणजेच स्मृती होय. मनाच्या कार्यपद्धतीत स्मृतीच्या निर्मितीसाठी (अ) अनुभवांच्या विविध घटकांची स्वीकृती आणि नोंद, (ब) साठविलेल्या माहितीचे व्यवस्थित संकलन व (क) माहितीच्या पुनर्विलोकनासाठी तिचे स्मरण (आठवणे) या तीन प्रक्रिया घडत असतात. त्या समजण्यासाठी प्रथम मनोव्यापारातील अनुभवांची जाणीव व बोधन किंवा ज्ञान या प्रक्रिया स्पष्ट केल्या पाहिजेत.
संवेदना ग्रहण करणाऱ्या सर्व इंद्रियांकडून मिळालेल्या माहितीचे रूपांतर तात्काळ अनुभूतीमध्ये होण्याच्या प्रक्रियेस जाणीव म्हणतात. ही प्रक्रिया अत्यंत जलद होत असल्यामुळे ती लक्षात येत नाही आणि ती केवळ संवेदनेवर निष्क्रियपणे घडून येत नाही. व्यक्तीचे पूर्वानुभव आणि अपेक्षा यांचा तिच्यावर प्रभाव पडत असतो. ज्या संदर्भात व्यक्ती संवेदना स्वीकारते त्यानुसार त्यांचा अर्थ बदलू शकतो. उदा., पूर्व क्षितिजावर उजळलेले आकाश पाहताच आपण पहाट झाली आहे, सूर्योदय लवकरच होईल असे समजतो. क्वचित प्रसंगी हा प्रकाश दूरवर लागलेल्या आगीमुळे असू शकतो. जाणिवेची निर्मिती होण्याच्या प्रक्रियेचे स्पष्टीकरण दोन प्रकारे दिले जाते. दोन्ही अंशतः कार्यान्वित असतात. पहिल्या सिद्धांतानुसार, मिळालेल्या प्रदत्ताचे (माहितीचे) सविस्तर विश्लेषण होऊन नंतर त्यातील प्रत्येक घटक आपल्या मनात आधीच साठविलेल्या पूर्वानुभवांच्या घटकांशी संकलित रीत्या जोडला जातो (समाकलन, एकात्मन). दुसऱ्या सिद्धांतानुसार सविस्तर विश्लेषणाचा त्रास वाचविण्यासाठी या प्रक्रियेचा प्रारंभ साठविलेले ज्ञान आणि पूर्वानुभव यांवर आधारित संकल्पनेपासून होतो नव्या संवेदनांची तुलना आधीच्या अनुभवांशी करूनच त्यांचा अर्थ लावला जातो व नवीन जाणीव त्यामुळे निर्माण होते. या सर्व प्रक्रियां-मध्ये (दोन्ही सिद्धांतांमधील) आधी साठविलेले अनुभव म्हणजेच स्मृतीचे भांडार उपयुक्त ठरते, हे महत्त्वाचे आहे.
बोधन आणि विचार यांमध्ये अनेक मनोव्यापारांचा समावेश होतो. त्यांच्या आधारे नवीन अनुभव ओळखणे, शिकणे, आठविणे, परिसरातून येणाऱ्या माहितीमधील बदल लक्षात घेणे यासाठी मदत होते. यांखेरीज बोधनात नियोजन, समस्यांची सोडवणूक, परीक्षण, पर्यवेक्षण, निर्णय यांसारख्या उच्चतर कार्यांचाही समावेश होतो. प्रत्येक बोधनप्रणालीत एखाद्या विशिष्ट उद्दिष्टाकडे नेणाऱ्या प्रक्रिया घडून येत असतात. अशा अनेक प्रणाली व्यक्तीला प्रत्येक कामात साह्यभूत होतात. उदा., लेखन करण्यासाठी आपण कागद निवडतो, टेबलावरील योग्य ते पेन घेऊन ते उघडतो, उजेड असलेल्या जागी साहित्य ठेवतो, मनातल्या मनात काय लिहावयाचे त्याची तयारी करतो, योग्य ते शब्द निवडतो आणि खुर्चीवर बसून लिहू लागतो. बोधनाच्या सर्व व्यापारांमध्ये स्मृतीचा उपयोग अपरिहार्यपणे होतो, हे उघड आहे. [⟶ बोधन ].
‘स्मृती म्हणजे अनुभवांची, जाणिवांची साठवण ’ या साध्या व्याख्येमुळे ही साठवण किती काळ टिकते हा प्रश्न आपोआपच पुढे येतो. स्मृतीच्या वर्गीकरणासाठी त्याचा उपयोग केला जातो. स्थूलमानाने प्रारंभीच्या काळात स्मृतीचे अल्पकालिक व दीर्घकालिक हे दोन प्रकार मानले जात. संवेदनाचा अधिक सखोल अभ्यास सुरू झाल्यावर तीन वर्ग मानले जाऊ लागले. कालमर्यादेची काटेकोर बंधने घालणे स्मृतीच्या अभ्यासात फारसे शक्य नसते. वर्गीकरणात कार्याचाही विचार आवश्यक ठरतो. तद्नुसार (अ) संवेदना नोंदणी, (ब) अल्पकालिक किंवा कार्यकारी स्मृती आणि (क) दीर्घकालिक स्मृती असे वर्गीकरण केले जाते.
(अ) संवेदना नोंदणी : जाणिवेच्या क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या कोणत्याही संवेदनामुळे मेंदूत प्रवेश करणारी माहिती अत्यल्प काळ (एका सेकंदापेक्षा कमी ) या स्मृतिकोशात वास्तव्य करते. तिच्यावर होणारी प्रक्रिया अत्यंत वेगाने घडून येते परिणामतः ही सर्व माहिती पुढच्या टप्प्यात (कार्यकारी स्मृतीत) प्रवेश करते. संवेदनेच्या प्रकारानुसार या नोंदीला प्रतिमा स्मृती, श्राव्य स्मृती, स्पर्श स्मृती अशी नावे दिली जातात. कार्यकारी स्मृतीत प्रवेश न करणारी निरुपयोगी नोंद काही मिलिसेकंदात आपोआप नष्ट होते. [⟶ संवेदन ].
(ब) कार्यकारी स्मृती : हिला प्राथमिक किंवा अल्पकालिक स्मृती असेही म्हणतात. सुमारे १५—२० सेकंदांपासून काही मिनिटे टिकणाऱ्या या अवस्थेत ७-८ स्वतंत्र घटकांना सामावून घेण्याची क्षमता असते. या काळात व्यक्ती त्यांचाच विचार करत असते. उदा., टेलिफोन क्रमांक पाहून त्याचा उपयोग करेपर्यंत तो लक्षात ठेवणे, शब्द किंवा नाव वाचून ते मोठ्याने उच्चारणे. या स्मृतीमधील माहितीचा उपयोग करत असतानाच दीर्घकालिक स्मृतिकक्षाशी संपर्क होत असतो. तेथील उपलब्ध माहितीच्या मदतीने नवीन माहितीचे निरीक्षण, पडताळणी आणि ओळख पटविणे ही कामे होतात. या सर्व कार्यांचे नियंत्रण करणाऱ्या यंत्रणेला मध्यवर्ती कार्यकारी स्मृती असे नाव आहे. या यंत्रणेत नवीन माहितीची सतत उजळणी होत राहाते. तसेच दृश्य प्रतिमेचा आकार, रंग, आकारमान किंवा श्राव्य ध्वनीचा उच्चार, अर्थ इत्यादींची दीर्घस्मृतीशी देवघेव होत राहाते. सर्वांत शेवटी पोहोचलेल्या माहितीची आठवण ताजी राहाते (नूतनता परिणाम) असे व्यक्तीला विचारलेल्या प्रश्नांवरून लक्षात येते. स्मृतीत प्रवेश झाल्यापासून तिचा उपयोग होण्यापर्यंतच्या अल्पकाळात जर दुसऱ्या एखाद्या माहितीकडे लक्ष गेले किंवा इतर काही काम केले, तर कार्यकारी स्मृती तितकीशी ताजी रहात नाही, असे दिसते.
(क) दीर्घकालिक स्मृती : कार्यकारी स्मृतीमधील बराचसा भाग या स्मृतीत प्रवेश करतो. काही मिनिटे ते अनेक वर्षे टिकणारी ही स्मृती अमर्याद क्षमता दर्शविते. माहितीच्या प्रकारानुसार तिचे पुढील तीन उपविभाग करता येतात : (१) घटनासंबद्ध विभागात व्यक्तीच्या जीवनातील भूतकाळ आणि त्याच्याशी जोडलेली स्थळे यांच्याशी निगडित तसेच आत्मचरित्रात्मक स्मृती असतात. (२) शब्दसंबद्ध विभागात सर्व प्रकारची कालनिरपेक्ष माहिती असते. उदा., शब्दसंपदा, सर्व प्रकारचे ज्ञान, नावे (शेष नाम) इत्यादी. ही माहिती व्यक्तीला केव्हा व कुठे मिळाली याची आठवण अशा गोष्टी आठवताना येत नसते. या दोन्ही उपप्रकारांमधील माहिती शब्दांत व्यक्त करणे शक्य असल्याने तिला सुव्यक्त स्मृती असे म्हणतात. (३) कार्यविधिसंबद्ध किंवा व्यवहारात्मक स्मृती या प्रकारात शब्दांत व्यक्त करण्यास अशक्य अशी माहिती असते. उदा., सर्व प्रकारच्या शारीरिक व मानसिक सवयी, कौशल्ये, मातृभाषा बोलण्याची समर्थता इत्यादी. जाणिवेच्या पातळीवर तिचे निरीक्षण होऊ शकत नाही. ही सर्व माहिती सुव्यक्त नसून अनुस्यूत असते. स्मृतिभ्रंशाच्या बहुतेक प्रसंगांमध्ये ही स्मृती अबाधित राहाते. त्यामुळे व्यक्ती आपले सर्व दैनंदिन व्यवहार आणि मातृभाषेतील (किंवा इतर एखाद्या सवयीच्या भाषेतील) संभाषण व्यवस्थित करू शकते. काही अभ्यासक दीर्घकालिक स्मृतीचे मध्यम, दीर्घ (काही दिवस, आठवडे) आणि प्रदीर्घ (महिने, वर्ष) असेही उपप्रकार करतात.
प्राप्त झालेल्या माहितीवर दीर्घकालिक स्मृतीमध्ये पुढील तीन प्रकारे प्रक्रिया होत असते : (१) माहितीची नोंद करणे किंवा संकेतन : प्रत्येक प्रकारच्या अध्ययनात माहितीचे ग्रहण झाल्यावर मेंदूतील कोशिकांच्या (पेशींच्या) एखाद्या समूहात काही बदल होतात, त्यांना स्मृती अनुरेखन असे म्हणतात.
(२) नोंद टिकवून ठेवणे : अनुरेखनाची धारणा ही क्रिया स्थितिक किंवा कायमस्वरूपी नसते. नवनवीन माहिती जशीजशी उपलब्ध होते, तसतसे पूर्वीच्या संचयात आवश्यक ते फेरफार होत राहतात. सर्व माहितीचे सुव्यवस्थित संघटन होत जाते.
(३) आवश्यकतेनुसार योग्य त्या अनुरेखनाला कार्यान्वित करून माहिती जाणिवेच्या कक्षेत आणली जाते.
या प्रक्रियांच्या संदर्भात अभ्यासकांनी केलेल्या निरीक्षणांच्या आधारे काही सामान्य नियम किंवा ठोकताळे मांडले जाऊ शकतात. अनुरेख-नाचे सामर्थ्य किंवा टिकाऊपणा त्याच्या निर्मिती प्रसंगीच्या (माहितीशी संबंधित) अर्थपूर्णतेवर अवलंबून असतो. माहिती जितकी सखोल वा जटिल असेल तेवढे तिच्यावरील संकलन अधिक जटिल असते. त्यामुळे अनुरेखन अधिक दृढ होऊन अशी अर्थपूर्ण माहिती आठवणे अधिक सुलभ असते. आठवण्याची क्रिया प्रारंभी सुलभ असते परंतु तिची परिणामकता (सफलता) हळूहळू कमी होत जाते. नंतर येणाऱ्या माहितीचा तिच्यावर अनिष्ट परिणाम होऊ शकतो. मेंदूमधील जीवरासायनिक प्रक्रियांमध्ये सहभागी होणाऱ्या द्रव्यांच्या पातळीत होणारे बदल असा अनिष्ट परिणाम घडवू शकतात. स्मरणाच्या क्रियेस खुणांची वा सूचक चिन्हांची मदत होऊ शकते. काहीही उपलब्ध नसताना केलेल्या स्मरणाच्या प्रयत्नांपेक्षा समोर ठेवलेल्या पर्यायांमधून योग्य माहिती ओळखणे (प्रत्याभिज्ञान) अधिक सुलभ असते. व्यक्तींची मनःस्थिती, आसपासची परिस्थिती, संदर्भ इत्यादींचा परिणाम स्मरणाच्या क्रियेवर होत असतो. माहिती मिळवतेवेळची परिस्थिती आणि स्मरतेवेळची परिस्थिती समान असेल, तर (उदा., कामाची यादी, रोजनिशी, घड्याळाचा गजर, आठवण करून देणारी चित्रे किंवा आकृत्या) स्मरण सुलभ होते. हा अनुभव सामान्य माणसांनाही नेहमी येतो.
स्मृतीवरील शास्त्रीय संशोधनाच्या पद्धती : तंत्रिका तंत्राची (मज्जासंस्थेची) व विशेषतः मेंदूची रचना आणि कार्यपद्धती यांचे पुरेसे ज्ञान होण्यापूर्वी म्हणजे एकोणिसाव्या शतकापर्यंत स्मृतीच्या अभ्यासात शास्त्रज्ञ प्रामुख्याने चिंतन आणि अंतर्मुख होऊन स्वतःच्या आठवणींची नोंद करणे, मनोरुग्णांच्या मुलाखती, स्वप्नांचे विश्लेषण यांसारख्या मार्गांनी आपले सिद्धांत तयार करीत. ⇨ इव्हान प्यिट्रॉव्ह्यिच पाव्हलॉव्ह यांच्या अवलंबी ⇨ प्रतिक्षेपी क्रियांच्या अभ्यासामुळे अशा क्रियांची निर्मिती (म्हणजेच अध्ययन) आणि त्यांची प्राण्यांमध्ये टिकून राहण्याची क्षमता (म्हणजेच स्मृती) या गोष्टींचे मापन करणे शक्य होऊ लागले. अशा क्रियांचे सातत्य म्हणजेच एक प्रकारचे स्मृतिरेखन असते, हे लक्षात घेऊन त्यावर परिणाम करणाऱ्या विविध घटकांचा अभ्यास होऊ लागला. निरोगी प्राण्यांवरील प्रयोगांबरोबरच प्राण्यांच्या मेंदूचे निरनिराळे भाग शीतनाने तात्पुरते निकामी करणे, शस्त्रक्रियेने नष्ट करणे, विद्युत् प्रवाहाने उत्तेजित करणे, औषधांच्या स्थानिक अंत:क्षेपणाने त्यांची क्रियाशीलता बदलणे, जीवरासायनिक द्रव्यांचे विश्लेषण आणि विद्युत् मस्तिष्कालेख ही तंत्रे उपयोगात येऊ लागली. यांशिवाय डोक्यावर आघात झाल्यामुळे क्षणिक स्मृतिभ्रंश झालेल्या व्यक्ती, पार्किनसन रोगग्रस्त, अल्झायमर विकारग्रस्त, दीर्घकाळ मद्यपानामुळे निर्माण झालेले तंत्रिकादोष दाखविणारे रुग्ण आणि केवळ वयोवर्धनामुळे होणारे बदल क्रमाक्रमाने अभ्यासासाठी उपलब्ध करून देणारे ज्येष्ठ नागरिक यांचाही अभ्यास आता केला जात आहे. मानवी मेंदूतील कोशिकांची संख्या अतिशय प्रचंड असल्यामुळे अनुरेखनाच्या अभ्यासात अडचणी येतात. त्यासाठी गोगलगाय, फळमाशी यांसारख्या तुलनेने अतिलहान मेंदूच्या (काही हजार कोशिका असलेल्या) अपृष्ठवंशीय (पाठीचा कणा नसलेल्या) प्राण्यांचा उपयोग फलदायी ठरत आहे.
तंत्रिका कोशिकीय पातळीवर केलेल्या शरीरक्रियावैज्ञानिक अभ्यासातून आता हे स्पष्ट झाले आहे की, स्मृतीची निर्मिती कोशिकांना जोडणाऱ्या अनुबंधनातील बदलांमुळे होते. एका कोशिकेतून दुसऱ्या कोशिकेत एखादा संदेश जेव्हा प्रेषित होतो, तेव्हा हे बदल घडून येतात. अनुरेखनात समाविष्ट असणाऱ्या अशा अनेक कोशिका व त्यांचे अनुबंध यांतून माहिती देणारा संदेश जेव्हा प्रवास करतो, तेव्हा त्याच्या मार्गातील सर्व अनुबंधनांमध्ये होत असलेल्या बदलांमुळे हा मार्ग नंतर येणाऱ्या तशाच प्रकारच्या संदेशांसाठी सुकर होतो. मेंदूमधील असंख्य तंत्रिका तंतूंच्या जाळ्यांमधून असे सुकर मार्ग (मळलेल्या वाटा) तयार होत असतात. एकदा हे मार्ग तयार झाले की, व्यक्तीचे मन (मेंदू) जाणीवपूर्वक त्या मार्गांना कार्यान्वित करून मूळची संवेदना उपस्थित नसतानाही तिने पुरविलेल्या त्या माहितीचा अनुभव घेऊ शकते. या पुनर्निर्मित अनुभवाला आपण स्मृती म्हणतो.
सामान्यतः जिचा उल्लेख स्मृती म्हणून केला जातो, तिचे अनुरेखन मुख्यत: मेंदूत होत असते. अशाच प्रकारचे बदल तंत्रिका तंत्राच्या इतर भागांतही होत असतात परंतु व्यक्तीला ते जाणवत नाहीत.⇨ बुद्धिमत्तेसाठी उपयुक्त अशी सर्व स्मृती प्रमस्तिष्कातील बाह्यकात (सर्वांत वरच्या थरात) साठविलेली असते. एखाद्या विशिष्ट क्षेत्रात स्मृतीचे केंद्रीभवन झालेले नसते. विविध संवेदनांच्या प्रवासातील प्रमस्तिष्कातील अंतिम स्थाने स्मृतीस आवश्यक अशी माहिती पुरवितात. उदा., उजवीकडच्या पश्चकपालखंडात दृश्य संवेदनाची स्मृती साठविलेली असते डाव्या पश्चकपालखंडात वाक्सामर्थ्यास आवश्यक अशी शब्दांच्या वाचनातून प्राप्त स्मृती आढळते कानशिलाच्या बाजूकडील शंखखंडात श्राव्य संवेदनाची स्मृती आणि कालनिरपेक्ष शब्दसंबद्ध स्मृतीचा मोठा भाग असतो याच खंडाच्या पृष्ठभागाखाली दडलेल्या हिप्पोकँपस नावाच्या भागात सर्व प्रकारच्या स्मृतीचे संकलन आणि स्मरणाच्या प्रक्रियेचे सुनियंत्रण करण्याची क्षमता असते. प्रमस्तिष्काच्या खाली मेंदूच्या तळाशी पारमस्तिष्काचे थॅलॅमस, हायपोथॅलॅमस, स्तनाकार खंडिका, अधोमस्तिष्क गुच्छिका इ. भाग असतात. त्यांना हिप्पोकँपसाशी जोडणारे तंत्रिका मार्ग स्मरणाच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असावेत, असे मेंदू आघाताच्या रुग्णांच्या अभ्यासावरून दिसते.
विविध प्रकारच्या माहितीच्या आधारे विचारप्रक्रियेस चालना देऊन विचारांची प्रगल्भता वाढविण्याच्या कामी मेंदूच्या पुढच्या भागातील पूर्वकपालखंड अग्रेसर ठरतो. त्याच्या बाह्यकात उच्च दर्जाची मानसिक कार्ये पार पाडण्याची क्षमता असते. उदा., पुढील घटनांचा अंदाज बांधणे, त्यानुसार नियोजन करणे, आपण अनुसरलेल्या वर्तनाची अपेक्षित प्रतिक्रिया आजमावून त्यानुसार कृती करणे किंवा लांबणीवर टाकणे, तत्त्वज्ञानातील वा गणितातील गहन अमूर्त संकल्पना जाणून घेणे, नैतिक समस्यांचा विचार करणे या सर्व कार्यांसाठी आवश्यक अशी स्मृतीमधील माहिती सर्व क्षेत्रांकडून तेथे पुरविली जाते.
स्मृतीशी संबंधित तंत्रिका कोशिकांच्या निर्मितीसाठी, वाढीसाठी व कार्यक्षमता टिकून राहण्यासाठी तंत्रिकावर्धन नावाचा घटक आवश्यक असतो, असे दिसते. बालकाच्या जन्मानंतरच्या पहिल्या काही वर्षांत असंख्य कोशिकांची उपलब्धता आढळून येते. या काळात त्यांचा उपयोग होण्यावरच त्यांचा पुढील विकास अवलंबून असतो. उपयोग न झाल्यास बऱ्याच कोशिका नाश पावतात. त्यामुळे शैशवात अनेक प्रकारचे अनुभव बालकांना मिळू देणे स्मृतिविकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. तंत्रिका कोशिकांच्या प्रवर्धांच्या (कोशिकेच्या मुख्य अंगापासून निघणाऱ्या तंतूंच्या) शाखा व उपशाखा आणि त्यांना इतर कोशिकांशी जोडणारे अनुबंध यांच्या निर्मितीस बहुविध संवेदनांचा अनुभव आणि तंत्रिका-वर्धन घटक यांच्यामुळे उत्तेजन मिळते. त्यामुळे शैशवातील अनुभवांचा लाभ प्रौढावस्थेतील स्मृतिविकासातही होत राहातो. अनुबंधनांमुळे स्मृती निर्माण होते हे खरे असले, तरी अशा अनुबंधनांमध्ये कोणती रासायनिक द्रव्ये (तंत्रिका पोषके) महत्त्वाची असतात, हे तितकेसे स्पष्ट झालेले नाही. अनेक प्रकारचे प्रेषक व त्यांचे ग्राही (ज्या कोशिकांगावर रासायनिक द्रव्याचा रेणू कार्य करतो तो भाग) निरनिराळ्या क्षेत्रांत कार्यरत असावेत. उदा., ॲसेटिलकोलीन, नॉरॲड्रेनॅलीन, हिस्टामीन, सीरोटोनीन, व्हॅसोप्रेसीन. ग्राही कार्यान्वित झाल्यावर त्याच्या सक्रिय अवस्थेमुळे कोशिकेतील काही एंझाइमांना उत्तेजन मिळते. उदा., प्रोटीन कायनेज किंवा कॅल्शियमाशी संबंधित असे कॅल्मोड्युलिन हे एंझाइम.
शरीरातील आणि शरीराबाहेरील अनेक घटकांचा आणि घडामोडींचा प्रभाव स्मृतीच्या कार्यक्षमतेवर पडू शकतो. एखाद्या अनुभवाची अनेकदा पुनरावृत्ती झाल्यास त्याची स्मृतीमधील साठवणूक अधिक दृढपणे होते. संवेदनेच्या अर्थपूर्णतेबरोबरच व्यक्तीची भावनोत्कट मनःस्थितीदेखील स्मृतिरेखनास साहाय्य करते, असे काही संशोधकांचे म्हणणे आहे. प्राण्यांमधील प्रयोगांतून काही ⇨ हॉर्मोनांचा लाभदायक परिणाम सूचित होतो. उदा., ॲड्रेनॅलीन, अधिवृक्क ग्रंथीच्या बाह्यभागातून निघणारी स्टेरॉइड द्रव्ये, पोष ग्रंथीचे ऑक्सिटोसीन, व्हॅसोप्रेसीन आणि मेलॅनोसाइट उत्तेजक ही हॉर्मोने. तंत्रिका तंत्राचे उत्तेजन घडविणाऱ्या कॅफीन व स्ट्रिक्नीन या वनस्पतिजन्य औषधांच्या बाबतींतही असाच लाभ आढळतो परंतु मानवी स्मृतीच्या व्यवहारात या सर्व रसायनांचा परिणाम अजूनही अस्पष्ट आहे. शैशवामध्ये प्राणी (किंवा बालके) एकेकटे न ठेवता त्यांना एकत्र ठेवून परस्पर संपर्काच्या अनुभूतीचा लाभ मिळू दिला, तर असे सामाजिकी-करण स्मृतिविकासाच्या दृष्टीने लाभदायक ठरते, हाही निष्कर्ष असाच विचारार्ह आहे.
दीर्घकालिक स्मृतीमध्ये एखादी माहिती किंवा अनुभव साठविण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर थोड्याच वेळात अपघातामुळे मेंदूवर आघात झाला किंवा विद्युत् प्रवाहाचा मोठा झटका बसला (मनोविकाराच्या उपचारासाठी देतात तसा), तर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. अशाच प्रकारचा परिणाम रक्तामधील ऑक्सिजन किंवा ग्लुकोजाच्या कमतरतेमुळे संभवतो. स्मृतिरेखनाच्या कार्यात अडथळा आणणाऱ्या दीर्घकालिक कारणांमध्ये अल्कोहॉल, भांग, गांजा यांसारखे मादक पदार्थ, तंबाखू , मनोविकारांसाठी घेतली जाणारी काही औषधे, ब जीवनसत्त्व गटाचा आहारातील अभाव, कमालीचा गारठा किंवा ऊष्मा असलेल्या वातावरणातील असंरक्षित अवस्थेत वावरणे यांचा उल्लेख करता येईल. औपचारिक शिक्षण पद्धतीत शिक्षकांचा विद्यार्थ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन, दोघांमधील परस्पर सामंजस्य आणि विश्वास, विद्यार्थ्यांची सांस्कृतिक व सामाजिक पार्श्वभूमी, इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत त्याचे सामाजिक स्थान, वर्गाबाहेरील जगात विद्यार्थ्यांवर येणारे सामाजिक दबाव यांसारख्या अनेक घटकांचे बरेवाईट परिणाम स्मृतीच्या कार्य-क्षमतेवर होऊ शकतात.
विस्मृती : योग्य ती माहिती आवश्यक तेव्हा आठवत नसेल किंवा आठवण्यास त्रास होत असेल, तर अशा स्थितीस विस्मृती किंवा स्मृति-भ्रंशाची स्थिती असे म्हणतात. वास्तविकत: माहितीचे ग्रहण (अध्ययन), तिचे योग्य प्रकारे संकेतन करून भांडारनिर्मिती आणि जाणिवेच्या पातळी-वर तिला आणणे (पुनरानयन ) या तीन अवस्थांपैकी कोणत्याही एका अवस्थेत हा दोष निर्माण झालेला असू शकतो परंतु त्याचा दृश्य परिणाम शेवटच्या अवस्थेत अनुभवास येतो. अनावश्यक माहितीचे विस्मरण होणे ही क्रिया सतत चालूच असते. काही संशोधक तिला नकारात्मक स्मृती असे म्हणतात. मेंदूतील लिंबिक प्रणाली या नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्राशी तिचा संबंध जोडला जातो. प्राप्त माहितीमुळे तिच्या उपयुक्ततेबद्दल समाधान निर्माण होणे (परितोष) किंवा तिच्याबद्दल विमुखता वाटणे या निकषांवर तोलून अशा माहितीच्या परिपोषणाचा निर्णय ही प्रणाली घेत असते. या कार्यामुळे प्राप्त माहितीपैकी सु. ९९% निरुपयोगी माहिती अनुरेखन न होता टाकून दिली जाते. त्यामुळे मेंदूची (दीर्घकालिक स्मृतिभांडाराची) स्मृतिजतनाची क्षमता ओलांडली जाण्याची शक्यता कधीही उद्भवत नाही. अल्झायमरच्या विकारासारखी तंत्रिका कोशिकांवर विपरीत परिणाम करणारी परिस्थिती जेव्हा उद्भवते तेव्हा लिंबिक प्रणालीची कार्यक्षमता घटून त्यामुळे बरीच माहिती वाया जाऊन विस्मृती निर्माण होत असावी.
वयोवर्धनामुळे निर्माण होणाऱ्या विस्मृतीत नवीन माहितीचे संकलन करून ती आत्मसात करण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे वृद्धांना अनेक जुन्या गोष्टी चांगल्या आठवतात परंतु अलीकडच्या घटना आठवत नाहीत. स्मृतीला ताण देऊन एखादी गोष्ट पूर्णपणे स्वतंत्र रीत्या आठवणे जड जात असले, तरी समोर ठेवलेल्या पर्यायांमधून ‘ बरोबर ’ असलेला पर्याय ओळखण्यासाठी आवश्यक असा अभिज्ञानाचा नेमकेपणा अबाधित असतो. नावांच्या किंवा इतर प्रकारच्या शब्दांच्या स्मरणाच्या वेळी ‘ अगदी जिभेच्या टोकावर आहे ’, असे प्रसंग अनेकदा येतात. त्यांच्या स्पष्टी-करणासाठी काही संशोधकांनी ‘ प्रेषण तूट ’ सिद्धांत मांडला आहे. त्यानुसार शब्दाचा अर्थ किंवा इतर संदर्भ साठविणारी शब्दार्थप्रणाली कार्यक्षम असते परंतु शब्दाच्या उच्चारासाठी आवश्यक अशी उच्चारनिष्ठ ध्वनि-निर्मितीची प्रणाली कार्यान्वित होत नाही. या दोन प्रणाली स्वतंत्र रीत्या कार्यक्षम असूनही त्यांच्यामधील संपर्क प्रस्थापित होण्यात अडथळा येत असावा. असा संपर्क स्थापणे हे स्मरणाच्या पुनरानयन प्रक्रियेतील एक महत्त्वाचे कार्य आहे. नवीन ज्ञानाच्या ग्रहणाच्या संबंधातील क्षमतेमधील कमतरता ही अनेकविध कारणांमुळे निर्माण होत असावी. अध्ययनाबद्दलची अनास्था, आत्मविश्वासाचा अभाव, प्रेरक असे प्रोत्साहन न मिळणे, माहितीवरील सखोल प्रक्रियेऐवजी कामचलाऊ उथळ प्रक्रियेवर अवलंबून राहणे यांसारखी काही मानसिक कारणे असू शकतात. त्याबरोबरच तंत्रिका कोशिकांमध्ये वयोवर्धनामुळे होणारे नैसर्गिक बदलही अपरिहार्यपणे प्रभाव टाकत असतात. उदा., प्राण्यांमधील निरीक्षणातून आढळलेली हिप्पोकँपस भागातील अनुबंधनांच्या कार्यातील (मार्ग सुकर होऊन अनुरेखन तयार होण्यातील) कमतरता किंवा रासायनिक प्रेषक पदार्थांच्या (हॉर्मोने) निर्मितीचा वेग कमी होणे, मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या विकारांमुळे आणि पोषणातील दोषांमुळे निर्माण होणारे तंत्रिका तंत्रातील अनिष्ट बदलही स्मृतीच्या कार्यक्षमतेचा र्हास होण्यास कारणीभूत असतात. स्मृतीवर अवलंबून असलेल्या जाणीव व बोधन यांसारख्या मनोव्यापारांचाही र्हास त्यामुळे हळूहळू जाणवू लागतो.
अपघातामुळे डोक्याला होणारी इजा हे विस्मृतीचे एक महत्त्वाचे कारण कोणत्याही वयातील व्यक्तींमध्ये लक्षात घ्यावे लागते. मेंदूवरील आघातापूर्वी नुकत्याच घडलेल्या घटना पूर्णपणे विसरून गेल्या, तरी फार आधीच्या आठवणी अबाधित राहतात. मिळालेल्या माहितीचे संकेतन किंवा दृढीकरण होऊन ती दीर्घकालिक स्मृतीमध्ये साठविण्याची क्षमता काही काळ नाहीशी होते. त्यामुळे आघाताच्या आधीचा व नंतरचा काही काळ आठवणे अशक्य होते (पश्चगामी व अग्रगामी विस्मृती). अधिक गंभीर स्वरूपाच्या आघातामुळे स्मरणाच्या प्रक्रियेवर दूरगामी परिणाम होऊन मागचे काहीच आठवत नसल्यामुळे आपण कोण आहोत याबद्दलच संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असते. आघाताच्या समीपचा काही कालखंड सोडल्यास, इतर सर्व स्मृती आणि नवीन माहिती आत्मसात करण्याची क्षमता सुदैवाने बहुतेक सर्व आघातग्रस्तांमध्ये काही दिवसांत परत येते.
कुपोषण किंवा अतिरेकी मद्यपान यांमुळे काही व्यक्तींमध्ये थायामिनाची (जीवनसत्त्व ब१) तीव्र कमतरता निर्माण होते. त्याची परिणती वर्निक मस्तिष्कविकृती या विकारात होते. या गंभीर स्वरूपाच्या अवस्थेत गोंधळलेली, अर्धनिद्रिस्त, अडखळत वावरणारी अशी व्यक्ती काहीही आठवू शकत नाही. डोळ्यांचे स्नायू निर्बल झाल्यामुळे दुहेरी प्रतिमा दिसू लागतात. वेळीच थायामिनाच्या मोठ्या मात्रा देऊन स्थिती सुधारू शकते परंतु त्यानंतरही कॉर्सॅकॉफ विस्मृती नावाची दीर्घ-कालिक अवस्था निर्माण होऊ शकते. नुकत्याच काही मिनिटांपूर्वीच्या घटनांपासून काही दिवस, महिने किंवा वर्षांपूर्वीच्या कालावधीचा विसर पडतो. फार पूर्वीचा भूतकाळ मात्र स्मरणात असतो. समाजात वावरताना व संभाषण करताना अशा विस्मृतीची कबुली देण्याऐवजी न आठवणाऱ्या घटनांबद्दल बनवाबनवी करून वेळ मारून नेण्याची प्रवृत्ती असते. शिवाय कधी भ्रमावस्था [⟶ मुग्धभ्रांति ], तर कधी क्षुब्धता निर्माण होते. अशाच प्रकारची विस्मृती कधीकधी आघातजन्य इजा, मस्तिष्कशोथ, दीर्घकाळ हृदयक्रिया थांबणे यांसारख्या कारणांनी होऊ शकते.
विस्मृतीच्या इतर प्रकारांमध्ये क्षणिक सर्वंकष विस्मृती किंवा स्मृति-लोप नावाची अवस्था उल्लेखनीय आहे. अर्ध्या तासापासून ते १०—१२ तासांपर्यंत टिकणाऱ्या या झटक्याचे कारण रुग्ण घेत असलेली मनो-विकारावरील औषधे, अर्धशिशी किंवा रोहिणी-काठिण्यामुळे मेंदूतील एखाद्या भागाचा रक्तपुरवठा कमी होणे असे विविध प्रकारचे असू शकते. आसपासच्या व्यक्ती, स्थळ, काळ यांविषयी एकाएकी संपूर्णपणे गोंधळाची स्थिती निर्माण होते. मागील काही वर्षांतील घटना आठवणे अशक्य होते. काही तासांनी सर्वकाही पूर्ववत होते. काही व्यक्तींना हा अनुभव पुन्हा कधीही येत नाही काहींमध्ये त्यांची पुनरावृत्ती होत राहते.
प्रत्येक निरोगी व्यक्तीमध्ये थोडाफार विसराळूपणा आढळून येणे स्वाभाविकच असते परंतु यापेक्षा अगदी निराळी अशी विस्मृतीची अवस्था म्हणजे ‘विदलनीय विस्मृती ’ ही होय. विदलन ही एक मनोव्यापारातील संरक्षक यंत्रणा असते. तिच्यामुळे व्यक्तीच्या चेतनावस्थेतून (जाणिवेतून) व्यक्तीची स्वतःची ओळख, स्मृती, कल्पना, भावना किंवा पूर्वानुभवांची जाणीव यांसारख्या गोष्टींपैकी काहींना अलग केले जाते. प्रयत्न करूनही त्या आठवत नाहीत. विदलनीय विस्मृतीमुळे मनावर आघात करणारे अनुभव आणि त्यांच्याशी संबंधित कालखंड पूर्णपणे विसरला जातो. उदा., लैंगिक अत्याचार, युद्धाच्या आघाडीवरील मनुष्य संहाराचे विदारक दर्शन, आर्थिक नुकसानीमुळे आयुष्य उद्ध्वस्त झाल्यासारखे वाटणे, बालपणी झालेला अमानुष छळ इत्यादी. त्यामुळे कधीकधी आपल्या आयुष्याच्या सातत्यात पडलेला खंड व्यक्तीला अस्वस्थ करत राहतो. विदलनीय स्मृतिखंडन (स्मृतिपलायन) या प्रकारात तर अनपेक्षित रीत्या अचानकपणे व्यक्ती आपले घर सोडून प्रवासास निघते. या प्रवासात आपला पूर्वेतिहास व आपली ओळख पूर्णपणे विसरून एखादे नवीनच व्यक्तीत्व काही दिवस या व्यक्तीने धारण केलेले आढळते. ही स्थिती काही तासांपासून काही महिने टिकू शकते. अशाच एका विदलनाच्या स्थितीत कधीकधी दोन भिन्न व्यक्तीत्वे आळीपाळीने अवतरत असल्या-मुळे गंभीर स्वरूपाचा मनोविकार निर्माण होऊ शकतो. या रुग्णांमध्ये अनेकदा बालपणीच्या यातनांचीच पार्श्वभूमी प्रामुख्याने आढळते आणि आत्महत्या करण्याची प्रवृत्ती निर्माण होते. या स्थितीस विदलनीय स्वत्व असे नाव दिले जाते.
विस्मृतीच्या मूल्यमापनासाठी श्रवण, दृष्टी यांसारख्या संवेदनांमधील दोष प्रथम विचारात घ्यावे लागतात. विस्मृतीच्या शारीरिक कारणांचा शोध घेण्यासाठी पूर्ण शारीरिक तपासणी करणे इष्ट असते. काही काळ मुलाखत घेऊन व्यक्तीचे ⇨ अवधान आणि दिलेल्या तोंडी व लेखी सूचनांचे अनुपालन करण्याची समर्थता यांचा अंदाज घेतला जातो. साध्या चाचण्यांच्या मदतीने जोड्या जुळविणे, क्रम लावणे, दिलेल्या आकृतीची नक्कल करणे, विशिष्ट प्रकारच्या आकृतीचा अर्थ लावणे, वस्तूंची वर्गवारी करणे, वाचनानंतर त्यातील शब्दांचा किंवा मजकुराचा पुनरुच्चार (स्मृतीच्या साहाय्याने) करणे यांसारख्या स्मृतीवर अवलंबून असलेल्या क्षमतांचे मापन करणे शक्य असते. व्यक्तीस आपल्याकडून घडलेल्या त्रुटींची किंवा विसरलेल्या गोष्टींची नोंद करण्यासाठी दैनंदिनी ठेवायला सांगणे आणि तिची तुलना नजीकच्या आप्ताने ठेवलेल्या नोंदींशी करणे ही पद्धतही स्मृतिमापनात उपयोगी ठरते.
विस्मृतीच्या प्रतिबंधासाठी किंवा निवारणासाठी फारसे उपचार अद्याप उपलब्ध नाहीत.पोषणातील कमतरता दूर करणारा प्रथिनयुक्त आणि जीवनसत्त्वयुक्त आहार घेणे, मधुमेह किंवा रक्तदाबासारखे विकार नियंत्रणात ठेवणे आणि तंत्रिका कोशिकांवर अनिष्ट परिणाम करणारी मादक द्रव्ये आणि औषधे टाळणे यांसारख्या उपायांनी स्मृतीची कार्यक्षमता टिकवून ठेवणे शक्य असते. स्मृती सुधारण्यासाठी अध्ययनाच्या काळातच निरनिराळी स्मृतिसाहाय्यक तंत्रे अवलंबण्यात येतात. त्यांचा उपयोग आवश्यक ती माहिती ऐनवेळी आठविण्यासाठी होऊ शकतो. नावांची आद्याक्षरे असलेले संच पाठ करणे, प्रत्येक महत्त्वाच्या नावासाठी वा अन्य शब्दासाठी चित्रांची खूणगाठ बांधणे, अक्षरे व आकडे यांचे संबंध दाखविणारे संकेत निर्माण करणे यांसारखी स्मृतिसाहाय्यके अनेकदा शैक्षणिक क्षेत्रात वापरली जातात. वयोवर्धनामुळे होणाऱ्या विस्मृतीसाठी प्रथम विस्मृतीची जाणीव ज्येष्ठ व्यक्तीला पटेल अशा पद्धतीने करून देणे आवश्यक असते. त्यामुळे ती व्यक्ती आठवणीसाठी बाह्य साधनांचा उपयोग करण्यास तयार होते. उदा., घड्याळाचा गजर लावणे, दैनंदिनी किंवा टिपण वही ठेवणे, यादी करणे, वार्षिक, मासिक किंवा साप्ताहिक कामांचे नियोजन (वेळापत्रक) लिहून ठेवणे इत्यादी. अधिक गंभीर स्वरूपाच्या विस्मृतीसाठी मानसोपचारतज्ञांची मदत घ्यावी लागते. त्यात मुलाखती, औषधे देऊन त्यांच्या शामक प्रभावाखाली केलेली मनोविश्लेषणे, संमोहन इत्यादींचा समावेश होतो.
स्मृती सुधारण्यासाठी प्रभावी औषधे अजून प्रयोगावस्थेत आहेत. विशेषत: मेंदूतील डोपामीन, सीरोटोनीन, नॉरॲड्रेनॅलीन यांसारख्या द्रव्यांची पातळी बदलणारी औषधे यशस्वी ठरतील, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी मानवनिर्मित रेणूंबरोबरच नैसर्गिक वनस्पतिजन्य द्रव्येही आता अभ्यासली जात आहेत. त्यांच्या लाभदायक परिणामांचे योग्य प्रकारे मूल्यमापन होण्यासाठी स्मृतीच्या व विस्मृतीच्या मापनाच्या नवीन पद्धतीही आता विकसित होत आहेत.
पहा : अपसामान्य मानसशास्त्र चित्तविकृति तंत्रिका तंत्र मज्जाविकृति मन मनोगति मनोदौर्बल्य मनोधैर्य मनोभाव मनोविश्लेषण मानसचिकित्सा मानसभौतिकी मानसशास्त्र मानसशास्त्र, अनुप्रयुक्त मानसशास्त्रीय पद्धति मानसिक अवसाद मानसिक आरोग्य मानसिक कसोट्या मानसोत्तेजके मानसोपचार मानसोपचारपद्धति मानसौषधी माहिती संस्करण मेंदू वर्तनविकृति स्मृतिलोप ज्ञानसंपादन.
संदर्भ : 1. Berkow, R. Ed., Merck Manual of Medical Information, 1997.
2. Grieve, J. Neuropsychology for Occupational Therapists, 1993.
3. Gruneberg, M. Morris, P. Eds., Aspects of Memory, Vol. I, 1992.
4. Guyton, R. C. Hall, J. E. Textbook of Medical Physiology, 1996.
5. Martinez, J. L. Kesner, R. P. Learning and Memory : A Biological View, 1991.
6. Mcmanus, I. C. Psychology in Medicine, 1992.
श्रोत्री, दि. शं.
“