स्मारके : व्यक्ती, प्रसंग वा घटना यांच्या स्मरणार्थ बांधलेली वास्तू. या प्रत्येक वास्तूला पार्श्वभूमी असून इतिहासही असतो. स्मारके ( मॉन्युमेन्ट्स किंवा मिमॉरिअल ) विविध प्रकारची असू शकतात. काही धार्मिक स्वरूपाची, काही जादूटोण्याशी तर काही लढाईतल्या विजयाशी संलग्न असू शकतात. अशी विविध प्रकारची स्मारके बहुतेक देशांत आढळतात.

स्मारकांचे विविध प्रकार आढळतात. थडगी, स्तंभ, देवळे, मिनार, कमानी, स्तूप, स्तंभलेख, वीरगळ, सतीचे दगड, पुष्करिणी, हौद इ. विविध प्रकार स्मारकांमध्ये गणता येतील. ज्यामुळे एखाद्या व्यक्तीची, घटनेची वा प्रसंगाची आठवण राहण्यास मदत होते, त्या सर्वांना स्मारके असे म्हणता येईल. स्मारकांची सुरुवात कशी झाली, याविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही तथापि इ. स. पू. काळात प्राचीन संस्कृतींत ती प्रचलित असल्याचे अनेक पुरातत्त्वीय दाखले मिळतात.

ईजिप्तमधील विविध देवतांची देवळे, राजाराणींचे पुतळे अथवा पिरॅमिड ही प्राचीन स्मारके होत. ग्रीकांमध्ये स्मारकाचा प्रकार, विशेषतः थोर पुरुषांचे पुतळे व थडग्यांमध्ये आढळून येतो. त्याचप्रमाणे   त्यांनी बांधलेली विविध देवतांची देवळेही स्मारकेच होत. रोमनांची देवळे त्याचप्रमाणे त्यांनी उभारलेल्या विजयद्योतक कमानी हाही स्मारकाचा एक प्रकार होय. [ विजयकमानी व कीर्तिस्तंभ ].

 

 भारतामध्ये सर्वांत प्राचीन स्मारके बौद्ध स्तूपांच्या रूपाने पहावयास मिळतात. बौद्ध धर्माशी संलग्न असलेल्या स्थलांशी व प्रसंगांशी निगडित असलेल्या अशोकाचे लेखही स्मारके समजली जातात. चितोडचा मध्य-युगीन जयस्तंभ हेही एक स्मारकच होय. याशिवाय ताजमहाल ( आग्रा ) कुतुबमिनार, इंडिया गेट ( दिल्ली ) हवामहल ( जयपूर ) व्हिक्टोरिया मेमोरिअल ( कोलकाता ) चारमिनार ( हैदराबाद ) काळेपाणी-सेल्युलर जेल ( पोर्ट ब्लेअर ) ही भारतातील काही उल्लेखनीय स्मारके होत. विसाव्या एकविसाव्या शतकांत थोर पुरुषांचेड्ढविशेषतः क्रांतिकारक व राष्ट्रपुरुषांचेड्ढपुतळे जागोजागी उभारण्यात आले. ती राष्ट्रीय स्मारकेच होत. महाराष्ट्रात छ. शिवाजी महाराज, छ. राजर्षी शाहू महाराज, महाराणी ताराबाई व अन्य मराठा सरदार-सेनापती यांचे पुतळे असून रायगड--प्रतापगड यांसारख्या प्रसिद्ध किल्ल्यांवर स्मारके आहेत. काही शहरांतून हुतात्मा-स्मारके बांधली आहेत. पुणे जिल्ह्यातील तुळापूरजवळील वढू येथील छ. संभाजी महाराज यांचे स्मारक प्रसिद्ध आहे.

 

 स्मारके हा प्रत्येक राष्ट्राचा सांस्कृतिक व प्रतिष्ठेचा ठेवा असल्याने निरनिराळ्या देशांमध्ये स्मारकजतनाचे कायदे अमलात आहेत. भारता-मध्ये १८७८ मध्ये प्रथम प्राचीन स्मारके व वास्तूंच्या संरक्षण-संवर्धना-करिता अधिकारी नेमण्यात आला होता. पुढे १९०४ मध्ये एन्शंट मॉन्युमेंट प्रिझर्व्हेशन ॲक्ट संमत करण्यात आला. स्वातंत्र्योत्तर भारतात केंद्र शासनाने अँटिक्विटीज अँड आर्ट ट्रेझरर्स ॲक्ट ड्ढ१९७२ संसदेत संमत करून घेतला. त्यानुसार महत्त्वाची स्मारके, पुतळे व वास्तू केंद्र- सरकारच्या अखत्यारीमध्ये व प्रादेशिक महत्त्वाची स्मारके राज्य-सरकारच्या ताब्यात आली. स्मारकांचे जतन ही एक शासकीय बाब झाली आहे.

देव, शां. भा.


कुतुबमीनार (स्मारकशिल्प), दिल्ली. ताजमहाल (स्मारकशिल्प), आग्रा.
चारमीनार (स्मारकशिल्प), हैदराबाद.
हवामहल (स्मारकशिल्प), जयपूर.