स्पाल्लानत्सानी, लाद्दझारो : (१२ जानेवारी १७२९ — ११ फेब्रुवारी १७९९). इटालियन निसर्गवैज्ञानिक. त्यांनी आधुनिक प्रायोगिक जीवविज्ञानाचा पाया रचला. त्यांनी शरीरातील क्रिया आणि प्राण्यांचे प्रजोत्पादन यांसंबंधी महत्त्वपूर्ण प्रायोगिक संशोधन केले. त्यांनी पोषक संवर्धित विद्रावात सूक्ष्मजीवांच्या होणार्या वाढीसंबंधी केलेल्या निरीक्षणांमुळे ⇨ लूई ( ल्वी ) पाश्चर यांच्या संशोधनाचा मार्ग सुकर झाला.
स्पाल्लानत्सानी यांचा जन्म स्कँडिॲनो येथे झाला. त्यांनी रेद्जो येथील जेझुइट महाविद्यालयात अभिजात साहित्य आणि तत्त्वज्ञान या विषयांचे अध्ययन केले. त्यांनी १७५४ मध्ये रेद्जो महाविद्यालयात तर्कशास्त्र, तत्त्वमीमांसा आणि ग्रीकविद्या या विषयांचे अ ध्या प न करण्यास सुरुवात केली. १७६० मध्ये त्यांची मोदीना विद्यापीठात भौतिकी विषयाचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. ते पाव्हिया विद्यापीठात निसर्गविज्ञान या विषयाचे प्राध्यापक होते (१७६९ — ९९).
स्पाल्लानत्सानी यांनी इलिअड या अभिजात ग्रीक महाकाव्याच्या भाषांतरावर टीकात्मक लेखन केले (१७६०), परंतु त्यांचा ओढा मात्र वैज्ञानिक संशोधनाकडेच होता. स्वयंजनन पद्धतीशी संबंधित त्यांनी केलेल्या सूक्ष्ममानीय निरीक्षणांबद्दल ते प्रसिद्ध आहेत. त्यांचा प्रयत्न जॉन टर्बेरव्हिल नीडम आणि ⇨ झॉर्झ ल्वी लक्लेर ब्यूफाँ यांनी जीवविज्ञानविषयक मांडलेला सिद्धांत चुकीचा ठरविण्याकरिता होता. त्यांनी स्वयंजनन सिद्धांताला पाठिंबा देणारे पुरावे दिले. स्पाल्लानत्सानी यांचे प्रयोग अचूक असले तरी त्यांचा सिद्धांत सर्वसमावेशक असा नव्हता. [⟶ स्वयंजनन ].
स्पाल्लानत्सानी यांनी भ्रूणविज्ञान या विषयातसुद्धा महत्त्वपूर्ण कार्य केले. कापडाच्या गाळणीने गाळलेल्या वीर्याचा वापर कृत्रिम फलना-करिता उभयचर प्राण्यांमध्ये करून त्यांनी असे दाखवून दिले की, अंड आणि वीर्य यांचा संयोग नवीन जीवाच्या निर्मितीसाठी आवश्यक असतो. त्यांनी कुत्र्यावर कृत्रिम वीर्यसेचनाचे यशस्वी प्रयोग केले. तसेच त्यांनी पुनर्जनन आणि प्रतिरोपण या प्रयोगांचे निष्कर्ष १७६८ मध्ये प्रकाशित केले. त्यांनी विविध प्राण्यांमधील ( उदा., पर्णचिपट, गोगलगायी आणि उभयचर) पुनर्जननाचा अभ्यास केला आणि अनेक सामान्य निष्कर्ष काढले. जसे उच्चवर्गीय प्राण्यांपेक्षा कनिष्ठ प्राण्यांमध्ये पुनर्जननक्षमता अधिक असते. सामान्य प्राणी वगळता इतरांमध्ये बाह्य भागाद्वारे पुनर्जनन होते, अंतर्गत अवयवाद्वारे होत नाही. [⟶ पुनर्जनन ].
स्पाल्लानत्सानी यांचे प्रतिरोपणाचे कौशल्य असाधारण होते. त्यांनी एका गोगलगायीचे तोंड दुसर्या गोगलगायीच्या धडावर यशस्वी रीत्या बसवून दाखविले होते. त्यांनी रक्ताभिसरण, जठरातील पचन, श्वसन, वट-वाघळाचे श्रवण, टॉर्पेडो माशावरील विद्युत् भार आणि ईल माशाचे प्रजोत्पादन या विषयांवरसुद्धा प्रयोग केले. त्यांनी प्रयोगावरून असा निष्कर्ष काढला होता की, पचन स्रावात विशेष रसायने असतात व ती विशिष्ट अन्नाला पूरक असतात. ते जठर स्रावातील अम्ल वेगळे करू शकले नाहीत. त्यांनी प्रयोगाद्वारे असे दाखविण्याचा प्रयत्न केला होता की, ऑक्सिजनाचे कार्बन डाय-ऑक्साइडात रूपांतर फुप्फुसात न होता ऊतकांत ( समान रचना व कार्ये असलेल्या कोशिकांच्या समूहात ) होते.
स्पाल्लानत्सानी यांना यूरोपातील अनेक विज्ञानविषयक संस्थांचे सदस्यत्व मिळाले. त्यांनी कॉन्स्टँटिनोपल ( आताचे इस्तंबूल ) व सिसिली या शहरांवर लिहिलेली प्रवासवर्णने आजही वाचनीय आहेत.
स्पाल्लानत्सानी यांचे निधन पाव्हिया ( सिसालपाइन रिपब्लिक)येथे झाले.
सूर्यवंशी, वि. ल.