स्पायरील्लेसी : सूक्ष्मजंतूंच्या स्यूडोमोनेडेली गणातील स्यूडो- मोनेडिनी या उपगणात समाविष्ट केलेल्या सात कुलांपैकी स्पायरील्लेसी हे एक कुल आहे. या कुलातील सूक्ष्मजंतू ग्रॅम रंजक अव्यक्त, वक्र, चंद्र-कोरीसारखे किंवा सर्पिलाकार ( फिरकीसारखे ) शलाका असून आडव्या विभाजनामुळे एकमेकांस सर्पिलाकार मालिकेत जोडलेले आढळतात. हे सूक्ष्मजंतू स्पायरोकीटेसी सूक्ष्मजंतूंपेक्षा भिन्न असतात त्यांच्यामध्ये आकुंचनशीलता नसून ते ताठर किंवा दृढ असतात. ते चल असून कशाभिका ( कोशिकेबाहेर असलेला लांबट व जीवद्रव्याचा केसासारखा धागा ) एक किंवा अनेक, परंतु झुबक्यांत असून टोकावर आढळतात. काही जातींत सुप्तावस्था आढळते सुप्तावस्थेत कोशिका आखूड होऊन तिचे गोलाकार सूक्ष्मपुटीत ( जाड आवरणाच्या बंद पिशवीत ) रूपांतर होते. ते सानिल ( हवेच्या सान्निध्यात जगणारे ), प्रासंगिक व काही अननिल( हवेशिवाय जगणारे ) आहेत. या सूक्ष्मजंतूंचे अस्तित्व बहुधा पाण्यात व काही वेळा मातीत ( जमिनीत ) आढळते. काही सूक्ष्मजंतू उच्च प्राण्यांना किंवा मानवास रोगकारक आहेत. रोगकारक जंतू मानवात पटकी होण्यास व उंदीर चावल्यामुळे होणार्या तापास कारणीभूत असतात. काही सूक्ष्मजंतूंमुळे मेंढ्या, गुरे व घोडे यांचा गर्भपात होऊ शकतो.
या कुलात एकूण दहा प्रजाती आहेत.
(१) व्हिब्रिओ : या प्रजातीतील सूक्ष्मजंतूंच्या कोशिका लहान काडीसारख्या असून त्यांना एकच बाक असतो काही सानिल व काही अननिल असतात. काही जाती मानवास व उच्च दर्जाच्या प्राण्यांना उपद्रवी आहेत. ते पाण्यात आढळतात.
(अ) व्हि. कॉमा : ह्या सूक्ष्मजंतूंमुळे मानवास पटकी रोग होतो. यांचे इनाबा, ओगावा इ. प्रकार आढळतात.
(आ) व्हि. मेशनिकोव्ही : कोंबड्या, कबुतरे व गिनीपिग यांना रोगकारक.
(इ) व्हि. फेटस : मेंढ्या, गुरे व घोडे यांच्या गर्भपातास कारणीभूत.
(२) डीसल्फोव्हिब्रिओ : या प्रजातीतील सूक्ष्मजंतू सल्फेटांच्या क्षपणाने सल्फाइडे बनवितात.
डी. डीसल्फ्यूरिकन्स : हे सूक्ष्मजंतू रोगकारक नसले तरी उपद्रवी असतात. ते पाण्यात, गाळात अथवा मृदेत आढळतात. खनिज तेल निर्मितीमध्ये यांचा सहभाग असावा असा अंदाज आहे. यांद्वारे केलेल्या हायड्रोजन सल्फाइडाच्या निर्मितीमुळे दुर्गंधी येते, त्याचप्रमाणे लोह नलिकेवर ( विशेषतः मृदेत पुरलेल्या लोह नलिकेवर ) गंज चढल्यामुळे ते उपद्रवी असतात.
(३) मेथॅनोबॅक्टेरियम : या प्रजातीतील सूक्ष्मजंतूंमुळे कार्बन डाय–ऑक्साइडच्या क्षपणाने मिथेन वायू तयार होतो.
(४) सेलव्हिब्रिओ : याची सेल्युलोजावर क्रिया होते.
(५) सेलफाल्सीक्युला : याचीही सेल्युलोजावर क्रिया होते.
(६) मायक्रोसायक्लस : वाकड्या कोशिका, परंतु त्यांच्या युतीमुळे वर्तुळे बनतात.
(७) स्पायरिलम : या सूक्ष्मजंतूंच्या कोशिका सर्पिलाकार असून टोकावर अनेक कशाभिका आढळतात.
(अ) स्पा. व्होल्यूटन्स : यांचा आकार मोठा म्हणजेच ५-८ म्यूमी. x ६० म्यूमी. असतो (१ म्यूमी. = १०-६ मी.).
(आ) स्पा. मायनस : हे उंदराच्या लाळेत आढळतात, म्हणून उंदीर चावल्याने होणार्या तापास ते कारणीभूत असतात.
(८) पॅरास्पायरिलम : या सूक्ष्मजंतूंच्या कोशिकेच्या टोकावर एकच कशाभिका आढळते.
(९) सेल्युलोमोनस : चंद्रकोरीसारख्या कोशिकेच्या खोलगट बाजूच्या मध्यावर कशाभिका झुबक्यांत आढळतात.
(१०) मायकोनोस्टॉक : कोशिकांचे आकार चंद्रकोरीपासून सर्पिला-कारापर्यंत आढळतात ते ताज्या पाण्यात आढळतात.
पहा : खनिज तेल पटकी सूक्ष्मजंतूंचे वर्गीकरण.
संदर्भ : 1. Dey, N. C. Medical Bacteriology, 2nd Edition, 1962.
2. Frobisher, Martin Fundamentals of Microbiology, 6th Edition, Tokyo, 1957.
3. Salle, A. J. Fundamental Principles of Bacteriology, 5th Edition, Tokyo, 1961.
कुलकर्णी, नी. बा.
“